Saturday 23 February 2013

येडचॅप...


येडचॅप...

आमचे आबा जरा येडचॅपच् आहेत
मधेच् शांत बसतात, मधेच् हसतात                                                             मी रडलो की मला चिडवतात
बाळाला आईची आठवण आली का?
मग मला अजूनच् रडू येतं

परवा असेच् शांत बसले होते
मी पण चिडवलं त्यांच्यासारखच्,
आजीची आठवण येते का?

तर अचानक रडायलाच् लागले
म्हटलं ना मी, जरा येडचॅपच् आहेत
काहीही बोलतात, मला न्‍ समजेलसं

मला म्हणाले, तू रडतोस,
आईला उशिर झाला म्हणून
पण ती येणार हे निश्चित आहे रे

पुढे काही बोललेच नाहीत
डोळे पुसत खिडकीतून बाहेर
बघत बसले दुपारभर

मला काही कळलं नाही
म्हटलं ना मी,
जरा येडचॅपच् आहेत

--जयंत विद्वांस

No comments:

Post a Comment