Sunday 24 February 2013

अशी होते पहाट...


अशी होते पहाट...

तू केसांमधून हात फिरवताना 
तुझ्या कुशीतच् मला झोप लागावी
झोपला वाटतं म्हणून 
पांघरूण नीट करायला जरा हालचाल करावीस्
आणि माझी झोप चाळवावी

मग तू मला अजूनच् कुशीत घ्यावस्, 
तुझ्या साईच्या स्पर्शानं
सर्वांगावर चांदण्याची दुलई पांघरावी 
आणि मी अतृप्तं मनानं
तुला अजूनच बिलगावं

तुझ्या नादमंजूळ स्मितानी 
पाव्याचा अलवार स्वर माझ्या कानात शिरावा
आणि तुला माझ्या मिठीत शिरताना पाहून चंद्रही लाजावा

सुखाच्या ग्लानीत तू मला कवटाळावस्
आणि तुझ्या मंद हालचालीतल्या नादानंही 
पाखरांनी हर्षानं चिवचिवाट करावा आणि 
आज बराच् उशीर झाला की काय असं म्हणत् 
पूर्वेला उषेनं लगबगीनं वर यावं

गवाक्षातल्या कवडश्यांवर तू नाराज होउन 
सकाळ लवकर झाली म्हणावस्
आणि त्या किरणांनी तुझ्या लालचुटूक पाळ्यात 
लाजत लाजत सागावं....

‘आम्ही काय करणार? तूच हालचाल केलीस्
आणि मग पहाट झाली’

--जयंत विद्वांस



No comments:

Post a Comment