Saturday 23 February 2013

प्रतीक्षा.....


प्रतीक्षा.....

निळ्याशार समुद्राच्या किनारी मावळत्या सुर्याकडे एकटक बघत तू माझी वाट पहावीस. आपला सखा, मित्रं, प्रियकर, साजण – जे नातं हया शब्दांच्याही पलिकडचं आहे, त्याची तू प्रतिक्षा करावीस. माझी नाव अजून दृष्टीक्षेपात येत नाही म्हणून तू चिंतातूर व्हावस, कितीही नाही म्हटलं तरीही नको त्या शंका मनात याव्यात आणि दूर समुद्रात तुझ्या ओढीनं मलाही परतीची घाई लागून रहावी, मन सैरभैर व्हावं. निळ्याशार पाण्यात फक्तं वल्हयांचा आवाज आणि निःशब्दं एकलेपण. काहीवेळेस् एकांतसुद्धा बोलका होउन जातो.

तुझ्या डोळ्यांचे समुद्रपक्षी माझी वाट पहाताना दिसतात आणि जमीन जवळ आल्याचा अमर्याद आनंद सोसाट्यासारखा माझ्या अंगोपांगावर वाहतात. मग मलाही धीर धरवत नाही. नाव सोडून मी तुझ्याकडे धावत निघतो. लांबवर झोपडीत मिणमिणणा-या ज्योतींपैकी एक दोन डोळ्यांची ज्योत आपल्यासाठी तेवतीये, हे सुख पायात धाव घेण्यासाठी बळकटी आणतं आणि मग सगळे श्रम, सगळ्या विवंचना विसरून मी धावत सुटतो.

तुझ्या चेह-यावरचा आनंद लपत नाही, लपवतही नाहीस. तुला वाट पहावी लागली हयामुळे खरंतर मी कासावीस झालेला पण अहंकारापोटी मी काहीतरी विचित्रं बोलतो आणि मग सगळे बांध फोडून तू माझ्या कुशीत शिरतेस तेंव्हा मग माझीच् मला लाज वाटू लागते.

तुझं माझ्यावरचं अमर्याद प्रेम त्या इवल्याशा घट्टं मिठीत व्यक्तं होत असताना तुझे खारावलेले डोळे मला समुद्राची आठवण करून देतात. मग मला तुझं वाट पहाण्यामागचं दुःखं जाणवतं. तू जवळ असताना समुद्र जवळ असतो आणि सागरात तू माझ्या पाठीशी दुवा होउन उभी असतेस.

--जयंत विद्वांस


No comments:

Post a Comment