Friday 12 October 2012

काही खरं नाही.....

सारखं सारखं असं समोरून जाणं बरं नाही 
सारखं सारखं असं चोरून बघणं बरं नाही 
मनाचं काय सांगावं, त्याचं काही खरं नाही 
सारखं सारखं असं नटणं मुरडणं बरं नाही 
वय सत्रात मदन गात्रात काही खरं नाही 
सारखं सारखं असं बटांशी खेळणं बरं नाही 
कापूरदेह त्यात अंगात वसंत काही खरं नाही
सारखं सारखं असं सतत भुलवणं बरं नाही 
चालीला लय, कळीचं वय काही खरं नाही 
सारखं सारखं असं जलद उमलणं बरं नाही 

जयंत विद्वांस

Saturday 7 July 2012

मठ्ठं....
ती मला नेहमी प्रेमानं(?) मठ्ठं म्हणते
(मला फार राग येतो)
कालचीच् गोष्टं, मी तिला म्हणालो
मी काय होउ?

डोळ्यातलं काजळ की पायातलं पायल्,
ओठावरचा तीळ की कानातला लोलक,
गालावरचं लाल लाल सफरचंद की
नाकातला हिरा की गळ्यातला तन्मणी,
तुझा नाजूक हातातला सेंटेड हातरूमाल,
गो-यापान हातावर बाजूबंद होउ की
मखमली कमरेवर कमरबंध होउ?

ती हसून म्हणाली, येडं ते येडच् शेवटी.
(मला फार राग येतो)
अरे खुळ्या, छान प्रिंटेड वायल तरी
व्हायचस्, नखशिखांत लपेटलं असतं.

मठ्ठं तो मठ्ठंच्......
जयंत विद्वांस

Tuesday 3 July 2012


कधी वाटते........

कधी वाटते पक्षी व्हावे
उंच आकाशी मस्त उडावे
कधी वाटते होउन मासा
खोल सागरी तळा धुंडावे

कधी वाटते फूल व्हावे
केशी किंवा पायी वहावे
कधी वाटते होउन वारा
मनोवेगाने जगी फिरावे

कधी वाटते आस्तिक व्हावे
मुखी नाम त्याचे रंगावे
कधी वाटते होउन नास्तिक
दांभिकतेचे बुरखे फाडावे

कधी वाटते माणूस व्हावे
मनासारखे काही जगावे
कधी वाटते होउन अंकुर
मातीतून पुन्हा उगवावे

जयंत विद्वांस

Thursday 3 May 2012


समिंदराच्या किनारी, मउ रेतीत चांदणं चमचमतं,
ओल्या पाउलात, कुणाच्या माझं मन रमतं

दर्यावरती जातो भरतार माझा
घेउन येतो म्हावरा ताजा ताजा
उसळत्या दर्यात, उभारल्या शिडात,
पिसाटं बेभान वारं घुसतं.... माझं मन रमतं

वाट बघून थकतात डोळे माझे
मन कानोसा घेई पाउल वाजे
धडकत्या मनात, आतुरल्या डोळ्यात,
समिंदराचं पानी जमतं.... माझं मन रमतं

कशी येते फुलारून माझी काया
गडी मर्दानी सिंह माझा राया
पुनवेच्या रातीला, साजण साथीला
झालं गेलं ते पुन्हा स्मरतं.... माझं मन रमतं

जयंत विद्वांस

हताश ....


तिन्हीसांजेला देवापाशी दिवा आताशा लावत नाही
एकांताला माझ्यापाशी सावलीलाही नेत नाही

कोण कुणाचे, आशा कुणाची
दिवस संपला, आशा उद्याची
मरण आजही येणार नाही
....दिवा आताशा लावत नाही

जुळता जुळता तुटले गेले
मिळता मिळता लुटले गेले
शल्यं तुला कळणार नाही
....दिवा आताशा लावत नाही

गुन्हा असा तो काय घडला
पुन्हा तुझा पाय न वळला
मार्ग आता मिळणार नाही
....दिवा आताशा लावत नाही

जयंत विद्वांस  

तिच्या गो-यापान देहाला चांदणं लगडतं
तिच्या पाठीचं गोंदण उगाच् फुरंगटतं

तिला स्पर्शताना वारा अजूनच् मंद
परिमळ त्याचा करतो आसमंत धुंद

बटा तिच्या हतबल, किती झाकणारं
चंद्र चुंबितो चेहरा, किती वाचवणारं

तिच्या गात्रातून सा-या सांडे तृप्तीची साय
कधी खुशीत कुशीत, कधी कुशीत खुशीत

तिचे रूप, तिचा वेग, सारे लावण्याचे लेणे
मिळता मिळता निसटतं हे यौवनाचे देणे

जयंत विद्वांस 01.04.2012

पुरूषाची जातच् साली डांबरट...

हो, हेच् म्हणायचय मला
स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंतकाळची माता आहे
ही असली विधानं आमच्या सोयीची आहेत
म्हणूनच् तर आम्हांला ती आवडतात.
‘क्षण’भर ‘पत्नीचं कर्तव्यं’ तिनं पार पाडलं की
आम्ही एक उशी जास्तं घेउन घोरायला मोकळे
त्यामुळे समजा ती माता झालीच् तर वरचं
विधान सत्यं करायला आमचा सहभाग किती
महत्वाचा, हे सांगायला आम्ही मोकळे.
म्हणूनच् म्हणतो पुरूषाची जातच् साली डांबरट...

आम्ही पैसे कमावून आणतो, ती काय घरीच् असते
आम्हाला कष्टं पडतात, तिला काय कळणार घरी बसून
ती मुलांचा (माझ्या) अभ्यास घेते, तो काय कुणीही घेतं
चांगल्या मार्कांनी पास होतात तेंव्हा ती माझी असतात
टक्का घसरला की मग मी तिच्यावर घसरतो, एवढं
पण जमत नाही का घरी बसून? ती खाली मान घालून
ऐकते, कारण तसा नियमच् आहे आमचा, कारण चूक
फक्तं तिचीच् असते, माझी शक्यच् नाही, काहीतरीच्...
म्हणूनच् म्हणतो पुरूषाची जातच् साली डांबरट...

लहान असताना वडील, भाउ, लग्नं झाल्यावर नवरा
उतारवयात मुलं, सतत आधाराची सवय लावलेलं
फायद्याचं असतं आपल्या, डोकं वर काढूच द्यायचं नाही
आणि आम्ही काय कमी लाड पूरवत नाही बरं का
नविन टोमणे फुकट, कुचकटपणा तर रोजचा वेगळा
चारचौघात, मुलांसमोर अपमान याला तर खाडा नाही
आता एखादवेळेस् आमची तब्येतच् बरी नसेल तर होतो
औषध वगैरे द्यायला उशीर झाला तर मात्रं खाडा नाही
म्हणूनच् म्हणतो पुरूषाची जातच् साली डांबरट...

.......................................................................

हे सगळं चुकतय, बदलायला हवं, असं कुठेतरी आत
वाटत् असतं, पण पिढयानपिढ्या चालत आलेल्या
पुरूषी अहंकाराची मगरमिठी सुटत नाही.
आयुष्याच्या उतरंडीवर गाडी येते तेंव्हा तिची किंमत कळते
सगळ्यांचं करून ती दमलेली असते, पण ती तृप्तं दिसते
आमच्या दुखण्यात ती अजूनही धावते, उशाशी बसते,
पाठीवरून हात फिरवते, बरं वाटेल म्हणते, तेंव्हा खूप
ओशाळवाणं होतं, असं आपण शेवटचं कधी केलं होतं?
कितीही प्रयत्नं केला तरी नाही आठवत्.
परवा म्हणाली, आता एकच् मागणं आहे देवाजवळ
संसार सुखाचा झाला, मुलं, सुना, नातवंड पाहयली
तुमच्यामागे मी काही राहू शकणार नाही, आता
अहेवपणी ने म्हणजे झालं, हेच मागते मी सारखं.
मी चरकलो, म्हटलं, काहीतरीच् काय अभद्र बोलतेस्?
मी सांगितलय, मलाच् आधी ने म्हणून.

कारण, ती नसेल तर माझं करणार कोण?
म्हणूनच् म्हणतो पुरूषाची जातच् साली डांबरट...

--जयंत विद्वांस 
फुलराणी......

तिच्या गो-यापान हातावर
मेंदी कशी खुलून यायची
त्यात ती येताना ओठांवर
जास्वंद चुरडून यायची

ती हसताना प्राजक्तं सांडायची,
अंगभर चाफा लावून यायची
बोलताना ओठ मुडपायची, इकडे
माझ्या कानाची पाळी लाल व्हायची

काळ्याभोर शेपट्यावर कधी मोगरा,
कधी अबोली माळून यायची
मंद वारा जरी स्पर्शला तिला
तरी ती अत्तराची कुपी होउन जायची

चुकून किंवा मुद्दाम, जरा झाला स्पर्श,
ती लाजाळूचं झाड व्हायची
तिचे मेंदीचे हात हातात घेतले की
ती माझी वेल व्हायची

जयंत विद्वांस 01.05.2012