Thursday 3 May 2012


पुरूषाची जातच् साली डांबरट...

हो, हेच् म्हणायचय मला
स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंतकाळची माता आहे
ही असली विधानं आमच्या सोयीची आहेत
म्हणूनच् तर आम्हांला ती आवडतात.
‘क्षण’भर ‘पत्नीचं कर्तव्यं’ तिनं पार पाडलं की
आम्ही एक उशी जास्तं घेउन घोरायला मोकळे
त्यामुळे समजा ती माता झालीच् तर वरचं
विधान सत्यं करायला आमचा सहभाग किती
महत्वाचा, हे सांगायला आम्ही मोकळे.
म्हणूनच् म्हणतो पुरूषाची जातच् साली डांबरट...

आम्ही पैसे कमावून आणतो, ती काय घरीच् असते
आम्हाला कष्टं पडतात, तिला काय कळणार घरी बसून
ती मुलांचा (माझ्या) अभ्यास घेते, तो काय कुणीही घेतं
चांगल्या मार्कांनी पास होतात तेंव्हा ती माझी असतात
टक्का घसरला की मग मी तिच्यावर घसरतो, एवढं
पण जमत नाही का घरी बसून? ती खाली मान घालून
ऐकते, कारण तसा नियमच् आहे आमचा, कारण चूक
फक्तं तिचीच् असते, माझी शक्यच् नाही, काहीतरीच्...
म्हणूनच् म्हणतो पुरूषाची जातच् साली डांबरट...

लहान असताना वडील, भाउ, लग्नं झाल्यावर नवरा
उतारवयात मुलं, सतत आधाराची सवय लावलेलं
फायद्याचं असतं आपल्या, डोकं वर काढूच द्यायचं नाही
आणि आम्ही काय कमी लाड पूरवत नाही बरं का
नविन टोमणे फुकट, कुचकटपणा तर रोजचा वेगळा
चारचौघात, मुलांसमोर अपमान याला तर खाडा नाही
आता एखादवेळेस् आमची तब्येतच् बरी नसेल तर होतो
औषध वगैरे द्यायला उशीर झाला तर मात्रं खाडा नाही
म्हणूनच् म्हणतो पुरूषाची जातच् साली डांबरट...

.......................................................................

हे सगळं चुकतय, बदलायला हवं, असं कुठेतरी आत
वाटत् असतं, पण पिढयानपिढ्या चालत आलेल्या
पुरूषी अहंकाराची मगरमिठी सुटत नाही.
आयुष्याच्या उतरंडीवर गाडी येते तेंव्हा तिची किंमत कळते
सगळ्यांचं करून ती दमलेली असते, पण ती तृप्तं दिसते
आमच्या दुखण्यात ती अजूनही धावते, उशाशी बसते,
पाठीवरून हात फिरवते, बरं वाटेल म्हणते, तेंव्हा खूप
ओशाळवाणं होतं, असं आपण शेवटचं कधी केलं होतं?
कितीही प्रयत्नं केला तरी नाही आठवत्.
परवा म्हणाली, आता एकच् मागणं आहे देवाजवळ
संसार सुखाचा झाला, मुलं, सुना, नातवंड पाहयली
तुमच्यामागे मी काही राहू शकणार नाही, आता
अहेवपणी ने म्हणजे झालं, हेच मागते मी सारखं.
मी चरकलो, म्हटलं, काहीतरीच् काय अभद्र बोलतेस्?
मी सांगितलय, मलाच् आधी ने म्हणून.

कारण, ती नसेल तर माझं करणार कोण?
म्हणूनच् म्हणतो पुरूषाची जातच् साली डांबरट...

--जयंत विद्वांस 

No comments:

Post a Comment