Monday 14 July 2014

विनाशकाले...... पांढरा म्हातारा

मोह, वासना, विषय ही सगळी भावंडं जळवेसारखी आहेत. एकदा चिकटली की सगळं शोषून बाहेर पडणार. ज्याला चिकटली त्यालाच त्याचा त्रास माहित. आयुर्वेदात दुषित रक्तं काढण्यासाठी अंगाला जळवा चिकटवतात पण त्या काढायच्या कधी या साठी बाजूला तज्ञ उभा असतो. एकटया माणसानी काय करावं? जमलं तर सावरावं नाहीतर नशिबात असेल ते भोगावं. 

८८ ला कोल्हापूरच्या गोकुळ शिरगांव एम.आय.डी.सी.त मी आठवडाभर नोकरी केली होती. पिंपरीचे श्री.दुंडगे म्हणून होते त्यांनी इंजिनीअरिंग वर्कशॉप काढलं होतं. मी सुपरवायझर. आठवड्याभरातच माझ्या लक्षात आलं की इथे आपलं जमणार नाही त्यामुळे मी पुण्याला येउन त्यांना रीतसर तसं सांगून टाकलं. वर्कशॉप अर्धवट बांधून झालं होतं त्यामुळे दिवसभर काहीच काम नसायचं. दिवस थंडीचे होते त्यामुळे दिवस लवकर मावळायचा. दुंडगे दोन दिवस थांबून पुण्याला आले. फरशी घालण्याचं काम चालू होतं. कर्नाटकी गवंडी, त्याची बायको, मुलगा आणि एक म्हातारा बिगारी यांचं काम चालू असायचं. त्याचा मुलगा साधारण माझ्यापेक्षा २-४ वर्षांनीच लहान असेल. तगडा आणि उद्योगी होता. साहेब संध्याकाळी या हायवेला, मस्तं ऊस खाऊ म्हणायचा. त्याची आणि माझी चांगली गट्टी जमलेली. चालत्या ट्रेलर मधून ४-५ उस उपसून काढायचा. माझा वितभर खाऊन होईपर्यंत त्याचा पाऊण ऊस संपायचा. 

तेंव्हा रु.१.२५ ला प्रिन्स हा गुटखा मिळायचा. मी नाक्यावरून चहाला गेलो की दोन तीन आणून ठेवायचो.  दिवसभर पुरायचे. म्हातारा सुपारीसाठी घुटमळायचा मग त्याला अर्धी पुडी एकदाच दयायचो, गडी खुश व्हायचा एकदम. साठीच्या पुढे असावा. त्याला कुठलंच काम यायचं नाही. गवंडी वयाचा मान राखून शिव्या घालायचा दिवसभर. जरा काम केलं की दमायचा. तण वाढल्यासारखी पांढरी स्वच्छ तोंडभरून दाढी आणि मिश्या, ओठ दिसायचे नाही इतकी. अगदी बारीक शरीरयष्टी, कमरेला धोतर साधारण दोन पंचे होतील इतपत लांबीचं गुंडाळलेलं, मातकट, बटणं तुटलेला सदरा. संध्याकाळ होत आली की त्याला हुडहुडी भरायची. गवंडी शिव्या पुटपुटत अंगावर बिड्या आणि माचिस फेकायचा. काहीही ऐकलं नाही असं दाखवत तो एका कोप-यात बसून झुरके घेत थंडी घालवायचा प्रयत्नं करायचा. अंधार पडल्याच्या त्याला आनंद व्हायचा कारण वीज नसल्यामुळे काम संपायचं. हायवेच्या पलीकडेच सगळ्यांच्या झोपड्या होत्या. 

माझ्या दोस्ताला मी सांगितलं मी काही येईनसं वाटत नाही परत. रविवारी जाईन, आलो परत तर भेटू. म्हणाला, साह्येब, चिकन खाता का? शनिवारी आमच्या बरोबरच चला, जेवा, मी परत आणून  सोडतो इकडे. मी ही गेलो. साडेसहाला त्याच्या घरात. बरं, सगळं मटेरीअल आणण्यापासून तयारी, त्यामुळे रग्गड वेळ होता. चिकनच्या रश्श्याचा चुलीवरचा वास अजून नाकात आहे. दोन झोपडी सोडून म्हातारा त्याचं जेवण बनवत होता. मला हसूच आलं. मोजून ३ दगड, त्यावर एक कळकट्ट भांडं, गवताची एकेक काडी, काटक्या असं तो घालत बसला होता. बिरबलाची खिचडीच आठवली. पहाट झाली असती तरी आधण आलं नसतं  शिजणं लांब. म्हटलं, काय रे, वेडा आहे का म्हातारा? दोस्त म्हणाला, नाटकी आहे, ज्येवताना बा ला इचारा, मग ऐका. मलाही उत्सुकता होतीच. 

आम्ही जेवायला बसलो, घासलेटचे दोन मोठे टेंभे आणि चंद्रप्रकाश. बसायच्या आधी, गवंड्यानी त्यांच्या भाषेत म्हाता-याला बोलावलं (पण शिव्याच असणार). म्हातारा नाईलाज झाल्यासारखा आला. त्याच्या बायकोनी ताटात ढीगभर भात आणि रस्सा त्याला दिला. डोळ्यात जे काही दिसलं त्याला चमक म्हणवत नाही आता. मला काय कमी उत्सुकता नव्हती, मी आपली काडी पुढे सरकवली. इथेच जेवणार होता तर कशाला नाटक चालू होतं ते खिचडीचं. मग गवंडी जे सुरु झाला ते जेवेपर्यंत. कानडी मिश्रित मराठीत, पु.लं.च्या रावसाहेबांसारख्या शिव्यांचा पिसारा काढून. मतितार्थ मोठा धक्कादायक होता. 

म्हातारा ना त्याचा नातेवाईक ना ओळखीचा. म्हातारा रईस होता चार वर्षांपूर्वी. १२-१५ एकर जमिन, सगळ्यात ऊस लावलेला, स्वत:चं घर, एकुलता एक मुलगा, बायको गेलेली, अंगावर १५-२० तोळे सहज बाळगायचा. घरात ४०-५० असेल. विनाशकाले विपरीत बुद्धी. चार वर्षामागे त्यानं लग्नं केलं. हा ५५-५६, ह्याचा मुलगा २४-२५ चा आणि नवीन बायको २२ ची. सगळ्यांनी तोंडात शेण घातलं. त्यात ती अंगापिंडानी सणसणीत, गोरीपान पण गरिबाघरची. एवढं सगळं वैभव पाहून तिचे डोळे विस्फारले. पहिल्याच दिवशी म्हाता-याच्या लक्षात आलं, आपण कमरेत नाही हलू शकत. म्हाता-याच्या मुलाच्या लक्षात आलं ते. एकदा दारू पाजून त्याने कागदपत्रांवर सह्या घेतल्या. सगळं शेत,घर त्यानी एका रात्रीत विकलं, परस्पर पैसे घेतले. घरातले सगळे पन्नास एक तोळ्यांचे दागिने आणि वडिलांची तरणी ताठी बायको यासकट पोबारा केला. म्हाता-याकडे ताकद, पैसे काहीच नव्हतं. सकाळ संध्याकाळ आठवतील त्या शिव्या द्यायचा. बोटातल्या अंगठ्या आणि गळ्यातली चेन किती दिवस पुरी पडणार. मग तो रस्त्यावर आला. मुलगा आणि बायको इतके छान पळून गेले की त्यांचा तपास लागलाच नाही. पोलिसात कुठल्या तोंडानी जाणार आणि? त्यामुळे तो फक्त शिव्या द्यायचा. गवंड्याला दया आली. काहीही काम जमायचं नाही कारण कधी केलेलंच नव्हतं. शिव्या देऊन का होईना पण तो त्याला जेऊ घालायचा, थोडा पगारही द्यायचा. गवंडी जाईल तिकडे घेऊनही जायचा.

'जेवा साह्येब. काही दया वाटायला नको. त्याच्या कर्माची फळं आहेत. एवढी खाज होती तर जायचं की रांडेकडं, पैका होता. पण ह्याला वाटलं आपण अजून जवानच. मसणवाटेच्या रस्त्याला फुलपाखरू नाही पकडत कुणी'. सव्वीस वर्ष झाली. नात्यागोत्याचा नसताना त्या म्हाता-याला सांभाळणारा तो काळा गवंडी, त्याचा तो बिनधास्त पोरगा आणि वासनेपायी रस्त्यावर आलेला, लाजीरवाणं जिणं जगणारा तो सांताक्लौज सारखा दिसणारा पांढरा म्हातारा अजून डोळ्यांपुढून हलत नाहीत. 
 
--जयंत विद्वांस
 
 

Wednesday 9 July 2014

व्यवहारी अपूर्णांक..... धर्माधिकारी सर

परवा 'याराना'च्या गाण्यांवर पोस्ट टाकली होती. त्यात 'इम्पेरिअल स्लिम'चा अर्थ सांगताना धर्माधिकारींचा उल्लेख होता. १९८८ म्हणजे सव्वीस वर्ष झाली. बारावीला कर्नावट क्लास मधे ते आम्हांला इंग्लिश शिकवायचे. अंबरनाथहून बदलापूरला यायचे. त्यांच्या दांड्याच जास्तं असायच्या. पण त्यांच्या दांडीनी क्लास लवकर सुटल्याचा आनंद मात्रं व्हायचा नाही. एकही मराठी शब्द न वापरता समजेल असं इंग्लिश बोलायचे. अक्सेंट नसेल स्टायलिश पण सोप्पं बोलायचे. बिटवीन द लाईन्स शिकवायचे. पुस्तकातलं त्यांनी सांगितलं की समजायचं. माझी अकरावी नंतर चार वर्ष ग्याप असल्यामुळे मी वर्गात मोठा दिसायचो. त्यामुळे आपोआप एक वडिलकीचा मान मिळायचा. 

मेरी गिलमोरची ' कम्प्लेन इज चिप' (बहुतेक) आणि ई.ए.राबिन्सनची 'रिचर्ड कोरी' कायम लक्षात राहायचं कारण 'धर्माधिकारी'. एक तर अतिशय सुंदर कविता आहे ती. यमक असलेली, तालबद्ध आणि शेवटी सुन्न करणारी. धर्माधिकारी तालासुरात वाचायचे. कोरी डोळ्यांसमोर उभा राह्यचा. परफॉरमर होते ते, शिक्षक कमी. साधारण साडेपाच फुटाच्या आतबाहेरची उंची, दाढी कायम वाढलेली, खांद्याला शबनम, चेह-यावर कायम स्मित करत असल्याचा भास, एरवी अबोल, पण बोलतील तेंव्हा मिस्किल बोलायचे, शिकवताना मात्रं तोंड उघडलं की बुद्धी जाणवायची. कर्नावट सर आणि मी क्लास झाला की गप्पा मारायचो. एकदा बोलता बोलता विषय निघाला सरांचा. बोलू की नको बोलू असं क्षणभर वाटलं त्यांना. 
 
म्हणाले, माणूस चांगला आहे रे, शिकवतो पण छान पण (तोंडाकडे अंगठा नेत) 'हे' चालू झालं की संपलं. इंग्लिश साहित्यावर बोल कधी त्यांच्याशी, ऐकून वेड लागेल. त्यांचं बोलणं ऐकलंस  तरी वाचायला हवं असं वाटेल तुला. सगळं चांगलं आहे पण व्यवहारी अपूर्णांक रे.  दांड्या मारणार, कळवणार नाही, आले की दोन दिवस अपराध्यासारखा चेहरा करतात फक्तं. सगळ्या क्लास मधे डच्चू दिलेला आहे. माझा जुना मित्रं आहे त्यामुळे काढवत नाही. त्याला किती गरज आहे हे मला माहित आहे, येऊ नको म्हटलं तर काहीही म्हणणार नाही तो, येणारही नाही. त्यामुळे त्यानी दांड्या मारून होणा-या त्रासापेक्षा यामुळे होणारा त्रास जास्तं आहे.

दांड्याच जास्ती त्यामुळे पुस्तकातलं कमी शिकायला मिळालं पण जे काही मिळालं ते लक्षात राहिलं. हुशार माणसं व्यसनी असतात की व्यसनी माणसं हुशार असतात? त्यांचा प्रॉब्लेम काय होता माहित नाही. तेवढं वयही नव्हतं आणि जवळीकही नाही. साधारण डिसेंबर ८८ ला शेवटचं पाहिलं असेन कारण नंतर त्यांनी येणं जवळपास बंद केलं होतं. नंतर कधी दिसलेही नाहीत. मी ही ९१ ला पुण्याला परत आलो. असतील? माहित नाही. जोपर्यंत 'रिचर्ड कोरी'आणि 'अमिताभ' लक्षात आहेत तो पर्यंत - 'मिश्किलपणे  'इम्पेरिअल स्लिम' म्हणजे 'अमिताभ' असा अर्थ सांगणारे - 'धर्माधिकारी' पण लक्षात रहाणार. 

---जयंत विद्वांस 


Thursday 3 July 2014

लल्याची पत्रं (१५) …''कही दूर जब….'

लल्यास,
मागच्या पत्रात 'सजन रे झुठ मत बोलो' वर लिहिलं होतं तुला. परवा 'आनंद' बघितला आणि त्यावर लिहिलं. काही काही गाणी कशी चिरंतन आहेत बघ म्हणजे निदान आपण जिवंत असेतोवर तरी असतील, पुढचं कुणी पाहिलंय. संध्याकाळची कातरवेळ म्हणजे नक्की काय ते सांगणारं हे योगेश आणि मुकेशचं 'कही दूर जब दिन ढल जाये….'. संपूर्ण चित्रपट डोळ्यात वाशर गेलेले गळके नळ बसवल्यासारखा बघावा लागतो. स्टोरी, गाणी, संगीत, कलाकार, संवाद, डायरेक्शन पण भन्नाटच आहे सगळं. हे गाणं मात्रं मला जाम आवडतं.


मुकेश हा काही फार आवडीचा गायक नाहीये माझा. पण काही गाणी मात्र त्याच्या नाकातल्या, वर  गेल्यावर  बेसूर  होणा-या  आवाजातच चांगली वाटतात हे ही आहे. मुकेश रडवा वाटू शकेल नुसतं ऐकताना पण बघताना मात्रं तो रडका नाही वाटत. पु. लं च्या  'अंतू बरवा' मधे अंतू शेठ म्हणतो ना, अहो करायचेत काय लाईट, बघायचे काय आणि? दळीद्रच ना? (शब्दांची  उलटापालट  झाल्यास माफी असावी, 'व्यक्ती आणि वल्ली'च्या नाट्यं रुपांतर मी पाहिलंय त्यात जयंत सावरकर या वाक्याला टचकन  पाणी  आणतात). तात्पर्य, अंधार काही वेळेला गरजेचा असतो. 'लिव्ह मी अलोन' हे फिल्म मधे ऐकताना मला हसू येतं.  नाटकी  असतं  ते.  पण आयुष्यात अशा काही वेळा असतात जिथे तुम्ही एकटे असता लौकिक, भौतिक अर्थानीही.


अशा वेळेस तुमच्याभोवती तुमचा बरा वाईट गतकाळ, जो काही असेल तो, 'ऐलोमा पैलोमा' म्हणत तुमच्या भोवती भोंडल्याचाफेर धरतो. त्या रिंगणातून सुटका नाही. आपलीही इच्छा नसतेच म्हणा त्यातून बाहेर पडायची. त्यावेळेला खुट्ट आवाजही नको असतो. टोचणारी शल्यं, हातातून वाळूसारखे निसटून गेलेले क्षणांचे मोती, परत कधीही न दिसणा-या आवडत्या माणसांचे चेहरे सगळं सगळं तरळतं बघ. मरताना दिसतं, आठवतं सगळं असं म्हणतात पण  रोज  मरतो  त्याला  हा  सोहळा  रोजचाच.  चित्रपटात 'आनंद'ची गरज असलेला हा एकांत फार सुंदर टिपलाय. घरात भास्कर नाही, त्यामुळे 'आनंद'ला डिस्टर्ब करायला कुणी नाही अशा वेळी कोषातला 'आनंद' बाहेर पडतो, जुनी डायरी काढतो आणि अज्ञातात असलेल्या कुणाची तरी आठवण  काढतो.  दिवसाची  काय नी आयुष्याची काय संध्याकाळ कातरच बघ, मग तुम्ही आनंदी, यशस्वी असा नाहीतर दु:खी, अयशस्वी. योगेशनी काय सुरेख लिहिलंय पण दूर क्षितिजावर मावळणारा सुर्य आणि इकडे अस्ताला चाललेला आनंद. काय लिहिलंय बघ 'मेरे खयालोके आंगन में कोई सपनोके दीप जलाये'. मृत्युचं सावट गडद आहे तरी स्वप्नाचा दिवा लागतोय. आशाकुणाला सुटलीये. उगाच तिला आश्चर्यशृंखला म्हणत नाहीत. गर्भार बाई सारखे कुणाच्यातरी आठवणीनी किंवा विनाकारणही पाण्याने ओथंबलेले डोळे वहावत नाहीत. आपलच ना गं ते, सांडणार कसं. अशावेळेस कुणाच्या तरी मोरपिशी स्पर्शाची आठवण करून देणारी वा-याची झुळूक सर्वांगाला स्पर्शून जाते. तो मायेचा स्पर्श, ती प्रेमळ नजर दिसत नाही पण जाणवते.  





योगेशनी तरलता अगदी सुरीच्या धारीसारखी लिहिलीये. दोन तीन वेळा पाहिल्यावर चित्रपटात त्याची प्रेयसी तो जायच्या आधी एकदा तरी येउन जावी असा भाबडा विचार माझ्या मनात आला होता पण मग त्यात काही वेगळेपण नसतं उरलं हे ही मान्यं पण ती 'नजर न आये' ती कोण ह्याची चुटपूट योगेशनी निश्चितच वाढवली. दुस-यांची धुणी धुतली कि आपण त्याला लष्करच्या भाक-या भाजणं म्हणतो योगेश असलं राकट लिहित नाही बघ, तो म्हणतो 'है मीठी उलझन, बैरी अपना मन, अपना ही हो के सहे दर्द पराये, दर्द पराये'. आपलंच मन घरचा भेदी. 



पण काही म्हण जेंव्हा जेंव्हा हे गाणं ऐकतो ना तेंव्हा तेंव्हा हुरहूर लागते, रेलिंगवर बसलेला 'आनंद' खन्ना आठवतो आणि परत एकदा कितीही पण केला तरी 'आनंद' बघायची इच्छा होते.

चल, पुढच्या पत्रापर्यंत बाय.

--जयंत विद्वांस