Thursday 3 July 2014

लल्याची पत्रं (१५) …''कही दूर जब….'

लल्यास,
मागच्या पत्रात 'सजन रे झुठ मत बोलो' वर लिहिलं होतं तुला. परवा 'आनंद' बघितला आणि त्यावर लिहिलं. काही काही गाणी कशी चिरंतन आहेत बघ म्हणजे निदान आपण जिवंत असेतोवर तरी असतील, पुढचं कुणी पाहिलंय. संध्याकाळची कातरवेळ म्हणजे नक्की काय ते सांगणारं हे योगेश आणि मुकेशचं 'कही दूर जब दिन ढल जाये….'. संपूर्ण चित्रपट डोळ्यात वाशर गेलेले गळके नळ बसवल्यासारखा बघावा लागतो. स्टोरी, गाणी, संगीत, कलाकार, संवाद, डायरेक्शन पण भन्नाटच आहे सगळं. हे गाणं मात्रं मला जाम आवडतं.


मुकेश हा काही फार आवडीचा गायक नाहीये माझा. पण काही गाणी मात्र त्याच्या नाकातल्या, वर  गेल्यावर  बेसूर  होणा-या  आवाजातच चांगली वाटतात हे ही आहे. मुकेश रडवा वाटू शकेल नुसतं ऐकताना पण बघताना मात्रं तो रडका नाही वाटत. पु. लं च्या  'अंतू बरवा' मधे अंतू शेठ म्हणतो ना, अहो करायचेत काय लाईट, बघायचे काय आणि? दळीद्रच ना? (शब्दांची  उलटापालट  झाल्यास माफी असावी, 'व्यक्ती आणि वल्ली'च्या नाट्यं रुपांतर मी पाहिलंय त्यात जयंत सावरकर या वाक्याला टचकन  पाणी  आणतात). तात्पर्य, अंधार काही वेळेला गरजेचा असतो. 'लिव्ह मी अलोन' हे फिल्म मधे ऐकताना मला हसू येतं.  नाटकी  असतं  ते.  पण आयुष्यात अशा काही वेळा असतात जिथे तुम्ही एकटे असता लौकिक, भौतिक अर्थानीही.


अशा वेळेस तुमच्याभोवती तुमचा बरा वाईट गतकाळ, जो काही असेल तो, 'ऐलोमा पैलोमा' म्हणत तुमच्या भोवती भोंडल्याचाफेर धरतो. त्या रिंगणातून सुटका नाही. आपलीही इच्छा नसतेच म्हणा त्यातून बाहेर पडायची. त्यावेळेला खुट्ट आवाजही नको असतो. टोचणारी शल्यं, हातातून वाळूसारखे निसटून गेलेले क्षणांचे मोती, परत कधीही न दिसणा-या आवडत्या माणसांचे चेहरे सगळं सगळं तरळतं बघ. मरताना दिसतं, आठवतं सगळं असं म्हणतात पण  रोज  मरतो  त्याला  हा  सोहळा  रोजचाच.  चित्रपटात 'आनंद'ची गरज असलेला हा एकांत फार सुंदर टिपलाय. घरात भास्कर नाही, त्यामुळे 'आनंद'ला डिस्टर्ब करायला कुणी नाही अशा वेळी कोषातला 'आनंद' बाहेर पडतो, जुनी डायरी काढतो आणि अज्ञातात असलेल्या कुणाची तरी आठवण  काढतो.  दिवसाची  काय नी आयुष्याची काय संध्याकाळ कातरच बघ, मग तुम्ही आनंदी, यशस्वी असा नाहीतर दु:खी, अयशस्वी. योगेशनी काय सुरेख लिहिलंय पण दूर क्षितिजावर मावळणारा सुर्य आणि इकडे अस्ताला चाललेला आनंद. काय लिहिलंय बघ 'मेरे खयालोके आंगन में कोई सपनोके दीप जलाये'. मृत्युचं सावट गडद आहे तरी स्वप्नाचा दिवा लागतोय. आशाकुणाला सुटलीये. उगाच तिला आश्चर्यशृंखला म्हणत नाहीत. गर्भार बाई सारखे कुणाच्यातरी आठवणीनी किंवा विनाकारणही पाण्याने ओथंबलेले डोळे वहावत नाहीत. आपलच ना गं ते, सांडणार कसं. अशावेळेस कुणाच्या तरी मोरपिशी स्पर्शाची आठवण करून देणारी वा-याची झुळूक सर्वांगाला स्पर्शून जाते. तो मायेचा स्पर्श, ती प्रेमळ नजर दिसत नाही पण जाणवते.  





योगेशनी तरलता अगदी सुरीच्या धारीसारखी लिहिलीये. दोन तीन वेळा पाहिल्यावर चित्रपटात त्याची प्रेयसी तो जायच्या आधी एकदा तरी येउन जावी असा भाबडा विचार माझ्या मनात आला होता पण मग त्यात काही वेगळेपण नसतं उरलं हे ही मान्यं पण ती 'नजर न आये' ती कोण ह्याची चुटपूट योगेशनी निश्चितच वाढवली. दुस-यांची धुणी धुतली कि आपण त्याला लष्करच्या भाक-या भाजणं म्हणतो योगेश असलं राकट लिहित नाही बघ, तो म्हणतो 'है मीठी उलझन, बैरी अपना मन, अपना ही हो के सहे दर्द पराये, दर्द पराये'. आपलंच मन घरचा भेदी. 



पण काही म्हण जेंव्हा जेंव्हा हे गाणं ऐकतो ना तेंव्हा तेंव्हा हुरहूर लागते, रेलिंगवर बसलेला 'आनंद' खन्ना आठवतो आणि परत एकदा कितीही पण केला तरी 'आनंद' बघायची इच्छा होते.

चल, पुढच्या पत्रापर्यंत बाय.

--जयंत विद्वांस

1 comment:

  1. मुळात हे गाणे आनंद साठी लिहिलेले नव्हते .ते होते अन्नदाता सिनेमासाठी .पण निर्माते एक बी लशमन यांना पसंत पडले नाही .नंतर ते आनंद साठी वापरले गेले .हा सिनेमा राजकपूर ला समोर ठेवून लिहिला होता .आर के फिल्म्स तर्फे निर्माण होणार होता . ४ रिळे शूट झाली . पण राजकपूर संगम मध्ये गुंतला आणि हा विषय मागे पडला .हा सिनेमा मुंबईच्या लोकांना आणि राजकपूर ला समर्पित केल्याचे श्रेयनामावलीत सांगितले आहे

    ReplyDelete