Monday 30 June 2014

रेस....

रेस - सगळीकडेच आहे. शिक्षण घेतोय आपण, ज्ञान नाही. आपण सुशिक्षित असू कदाचित सुसंस्कृत नाही अजून. त्याची फळं आहेत ही. बदलती सामाजिक परिस्थिती, लक्झरीचे बदलणारे निकष, स्टेटसच्या भ्रामक कल्पना आणि त्यासाठी वाढवलेल्या गरजा, वाढणारे खर्च अशा ब-याच गोष्टी कारणीभूत आहेत. प्रगतीकरता 'अजून' हा शब्दं गरजेचा असतो. अजून चांगलं काय करता येईल, सुधारता येईल, सोप्पं करता येईल. असा विचार येणं हेल्दी आहे पण 'अजून' ला हवं चिकटलं की त्याची हाव होते. 'भला उसकी कमीज मेरे कमीजसे सफेद कैसी?' या भावनेतून सगळी रेस सुरु होते. माझ्याकडे का नाही? मी येनकेन मार्गाने  हवं ते मिळवेनच मग माझी लायकी ते कमावण्याची, भोगण्याची असो, नसो.

सगळ्या कन्सेप्टच बदलल्यात. बायको आणि फोन एकाच लेव्हलला आलेत, टच आणि कॉन्फिगरेशन महत्वाचं. मिरवणं महत्वाचं, उपयोग नंतर. मग त्याकरता पैसे हवेत, मोठ्ठ घर, कार पाहिजे, २-४ क्रेडीट कार्ड्स पाहिजेत, बँक ब्यालंस पाहिजे. नाहीये? मग  कर्ज  काढण्यात  काही  गैर  नाही.  मग  त्याचे  हप्ते  आले. ते फेडायला जास्तं कष्ट आले. मग आयुष्यं गहाण टाकायचं. अधून मधून या सगळ्या गोष्टींचा जमलं तर वापर करायचा. पण हे झुगारून देणं अवघड होतं मग रेस मधे धावत रहायचं. मनाला लावून घ्यायचं नाही, खरं तर काय लागतं सुखी व्हायला? प्रत्येकाच्या कल्पना वेगळ्या त्यामुळे निकष वेगळे पण आनंद वाटून घेणं आणि आनंद होणं  यात  फरक आहे. उन्हातून आल्यावर नरड्यातून माठातलं  गार पाणी आत गेल्यावर होतोच की आनंद.  पण  फ्रीज  मधून  कोल्डड्रिंक काढून एसी चालू करून सोफ्यावर पडण्यात पण सुख आहेच की. पण मग ते मिळवण्यासाठी धावणं गरजेचं आहे. कुठे  थांबायचं कळत नाही, कळलं तरी वळत नाही, जगायचं, उपभोगायचं मात्रं राहून जातं. कासव व्हायचं की ससा ज्याचं त्यांनी ठरवायचं.          




जगून घे जरा.....

 
काळ धावतोय, तू ही पळतोस,
काळ जिंकतोय, मागे टाकतोय,
जमलंच तर जगून घे जरा

अर्धवट स्वप्नं, उडालेली झोप,
पैश्यांचा राशीत, हरवली नाती,
सापडली तर जगून घे जरा

तारुण्य सरलं, कितीसं उरलं,
जर्जर होशील, मातीत जाशील,
जाण्याआधी थोडं जगून घे जरा

-- जयंत विद्वांस 

No comments:

Post a Comment