Tuesday 10 June 2014

लल्याची पत्रं (१३) …'लागा चुनरीमें दाग…'

काही काही गाणी अजरामर आहेत बघ. १९६३ चा 'दिल ही तो है', जन्मं पण नव्हता झाला तेंव्हा आपला. ५१ वर्षं झाली. लिहिणारा साहिर, संगीतकार रोशन, गायक मन्ना डे आणि राज कपूर, नूतन  आज  कुणीही हयात नाही. गाणं मात्रं टिकून आहे. स्पर्धांमधून हुकमी मार्क मिळण्यासाठी का होईना लोक  म्हणतात  अजून.  पण  प्रत्येकालाच  झेपतं  असं  नाही.  मुळात  मन्नादांची अमिट छाप त्या गाण्यावर आहे. ऐकताना  आपण त्यांच्याप्रमाणे कितपत म्हटलंय हे लक्षात ठेवूनच ऐकतो त्यामुळेही असेल पण ते दुस-याच्या आवाजात आवडत नाही मग. 
 
 
 
रोशन बद्दल काय बोलावं (त्याचं आणि साहीरचं 'बरसात की रात' मधलं 'ना तो कारवांकी तलाश है…' असंच एका अजरामर गाणं आहे). मागे मी या मोठया लोकांची एक गंमत वाचली होती. मदन मोहननी ६४ साली 'आपकी परछाइया' मधे एक गाणं दिलं होतं 'यही हैं तमन्ना…'. रोशन त्या चालीच्या प्रेमात पडला. त्यानी रीतसर परवानगी घेतली आणि ६६ च्या 'ममता' मधे हिट गाणं दिलं 'रहे न रहे हम…'.  आर.डी.नी त्यावरून ८५ ला 'सागर' मधे 'सागर किनारे….' आणि राजेश रोशननी ९६ ला 'पापा कहते है' मधे 'घरसे निकलते ही…'. सांगायचा मुद्दा हा की १९६४ ते २०१४ शब्दं, गायक, गीतकार, संगीतकार, अभिनेते बदलले पण सुरावट अजरामर आहे. जुनं नव्या रुपात आलं की ते जास्तं आकर्षक होतं (म्हणजे रिमिक्स नव्हे). 
 
सुफी गाण्यांमधे किंवा काही उर्दू गझलांमधे ती वरकरणी प्रेयसीला किंवा अन्यं कुणाला उद्देशून असली तरी ती ईश्वराला उद्देशून पण असते असं मी वाचलंय. बुलेशाहनी लिहिलेलं नुसरत फतेह अलीचं 'मेरा पिया घर आया…' त्याच धर्तीवर होतं (अन्नू मलिकने त्याला चहाटळ केलं). तसंच हे गाणं आहे. गाण्यात वरकरणी वडिलांना घाबरणारी तरुणी असली तरी शेवटच्या कडव्यात ईश्वराचं आणि आपलं नातं साहीर सांगतो. सर्वसामान्यं लोकांना मरणाची भीती वाटते ती आपण या जगात आता असणार नाही म्हणून, विचार करणा-या लोकांची भीती वेगळीच. 'त्या'ला उत्तरं काय द्यायची असा मोठ्ठा प्रश्नं त्यांना  पडतो. खोटं बोलता येणार नाही कारण 'त्या'ला सगळंच कळतं, माहिती पण आहे, काय गंडवणार.          
 
येताना कसा हा आत्मा कुठलाही रंग, अभिनिवेष न घेता, कोरा करकरीत, मातीच्या गोळ्यासारखा आणला होता. त्याला कुठलाच आकार नव्हता, अमुक एक आकार, रंग हवाच असा आग्रहही नव्हता. जगण्याच्या धडपडीत, षडरिपुंच्या सहवासात त्याला हवा तसा आकार येत गेला, 'त्या'ला हवा तसा मात्रं नाही. या जगातून 'त्या'नी बोलावलं की परत यायच्या बोलीवर सगळ्याला हो म्हणालो. 'त्या'नी फक्तं एवढंच सांगितलं होतं की तुला हवं   ते कर, फक्तं मला जाब देताना डोळ्यात डोळे घालून देता आला म्हणजे झालं. उत्सुकता होती, नवीन  दुनिया बघायची, अनुभवायची, भोगायची. वाईट गोष्टींची, आरामाची, सुखाची चटक लवकर लागते. मन भरत नाही, वासना तृप्तं होत नाहीत, अतिभोगानी शमवू म्हटलं तर उलटंच होतं, ठिणगीला वारा लागावा अन क्षणात वणवा पेटावा असं होतं. कधी मायेपोटी, कधी असूयेपोटी, कधी सत्तेसाठी, कधी संपत्तीसाठी मूळ सचोटीचा मार्ग पायाखालून निसटून अध:पतनाचा मार्ग कधी सुरु होतो कळतच नाही. तकलादू ध्येयं गाठण्यासाठी जगणं राहूनच जातं. ज्यासाठी जीव टाकला, अनंत लटपटी केल्या ते यश नव्हतंच हे समजल्यावर फुटलेला भ्रमाचा भोपळा. अशावेळी सगळं सगळं आठवतं, मनाला कसं फसवणार, ते ही जमत नाही, 'त्या'ला काय उत्तर देणार हा तर चिंतेचाच भाग मग. 
 
आपण तर सर्वसामान्यं. इतके डाग पडतात की मुळ वस्त्रं स्वच्छ करण्यासाठी आपल्याला परत नेणं 'त्या'ला गरजेचंच होत असणार. आपली भीती वेगळी, 'त्या'ची काळजी वेगळीच. 'त्या'चा हा खेळ  शतकानुशतके चालू आहे. 'तो' दमत नाही आणि आपणही नाही, रिमोट 'त्या'च्याकडे आहे एवढाच काय तो फरक. असो.     
 
साहीरनी अर्क दिलाय. फाफटपसारा नसलेला, गागर में सागर म्हणतात  तसा.  राजकपूरला  संगीताची  नुसतीच  जाण  नव्हती  तर  तो वाद्यंही वाजवू शकायचा (जाने कहा गये वो दिन… ची मुखड्याची चाल त्याची  होती). मन्नादा म्हणतात त्याप्रमाणेच त्याचं तोंड हलतं, अगदी तराण्यात सुद्धा, समेवर मान हलते, एक प्रेक्षणीयं आणि श्रवणीयं आनंद आर.के.नी दिलाय हे मात्रं  खरं. अगदी असंच नाही पण साधारण याच प्रकारातलं (लिखा कुछ है, कहता कुछ है) भैरवीतलं 'बाबुल मोरा….' पण मला आवडतं. मी सैगल, भीमसेन जोशी आणि हृदयनाथ मंगेशकरांचं ऐकलंय. त्याबद्दल परत कधीतरी. 
 
लागा चुनरी में दाग, छुपाऊँ कैसे
चुनरी में दाग, छुपाऊँ कैसे, घर जाऊँ कैसे
लागा चुनरी में दाग...

हो गई मैली मोरी चुनरिया
कोरे बदन सी कोरी चुनरिया
जाके बाबुल से नज़रें मिलाऊँ कैसे, घर जाऊँ कैसे
लागा चुनरी में दाग...

भूल गई सब बचन बिदा के
खो गई मैं ससुराल में आके
जाके बाबुल से नज़रे मिलाऊँ कैसे, घर जाऊँ कैसे
लागा चुनरी में दाग...

कोरी चुनरिया आत्मा मोरी
मैल है माया जाल
वो दुनिया मोरे बाबुल का घर
ये दुनिया ससुराल
जाके बाबुल से नज़रे मिलाऊँ कैसे, घर जाऊँ कैसे
लागा चुनरी में दाग...
--जयंत विद्वांस 

No comments:

Post a Comment