Monday 16 June 2014

लल्याची पत्रं (१४) …'सजन रे झूठ मत बोलो…'

'शंकर'सिंह रघुवंशी-'जयकिशन' पांचाळ, शंकरदास केसरीलाल उर्फ 'शैलेन्द्र', 'मुकेश'चंद माथूर आणि  रणबीर'राज' कपूर ही चौकडी स्वप्नंवत होती बघ. (हो, त्याचं पूर्ण नाव तेच होतं. त्यांच्या सगळ्यांच्या नावापुढे  'राज' असतंच. शमशेरराजउर्फ शम्मी, बलबीरराज उर्फ शशी, असो! नातवाला आजोबाचं नाव काय ठेवलं, लफडी करण्याचे गुण मात्र घेतलेत बघ). फणीश्वरनाथ रेणूंच्या 'मारे गये गुलफाम' या कथेच्या प्रेमात शैलेन्द्र पडला आणि पूर्ण झोपला. त्यानीच काढला होता हा सिनेमा. 
 
सगळे योग जुळून आले होते. सुंदर कथा, गाणी स्वत: शैलेंद्र (मारे गये गुलफाम फक्तं हसरत जयपुरी), सगळी गाणी हिट, राजकपूर, वहिदा, बासू भट्टाचार्य. पण…  सिनेमा फ्लॉप झाला. आर.के.च्या निवांतपणामुळे शुटींग लांबलं, खर्च वाढला त्यात सिनेमाही पडला. त्या धक्क्यानी आणि  आर्थिक अडचणींनी त्रासून शैलेंद्रनी परत सिनेमा म्हणून काढायचा नाही ही 'आखरी कसम' पाळण्यासाठी १४ डिसेंबर ६६ ला कायमची विश्रांती घेतली. ६७ साली याच चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. क्लासिक चित्रपटांच्या यादीत नाव मिळवण्यासाठी तो चित्रपट लोकांना आधी न आवडणं गरजेचं असतं की काय माहित. 
 
एका पेक्षा एक सरस गाणी होती. 'आ, आ भी जा…', चलत मुसाफिर…', 'दुनिया बनानेवाले…', 'सजनवा बैरी हो गये…' आणि आशाताईंच्या कडक आवाजातलं 'पान खाओ सैय्या हमारो…'. अफाट आहे बाबा ती  बाई एक. हसते  काय, विजेसारख्या ताना काय घेते पण त्या गाण्याविषयी परत कधीतरी. आज मी म्हणतोय ते आहे 'सजन रे झूठ मत बोलो….'. आपल्याला इयत्ता पहिलीमधे धडा असायचा बघ - शरद डोंगर बघ, सरू चटई घाल, रमेश चेंडू टाक. शैलेंद्र तशी गाणी लिहायचा. साधी, सोपी, सरळ, सुटसुटीत. उगाच शब्दांचा बडेजाव नाही, अलंकारिक भाषा नाही, यमक वगैरेचा अट्टहास नाही, नाकासमोर चालल्यासारखं पण काळजाला हात घालणारं लिहायचा. 
 
'वर' गेल्यावर ज्याच्या त्याचा कोण भगवान, अल्ला, येशू असेल त्याला जाब द्यावा लागतो हे सगळ्यांनीच म्हटलंय. ते पटावं म्हणून संत लोकांनी अभंग लिहिले, कव्वाल्या झाल्या, पुस्तकं झाली, भाषणं, प्रवचनं झाली. पण गाण्यातून जो संदेश मिळतो नातो जास्तं परिणामकारक असतो कारण ते आपण गुणगुणतो. अर्थ कळो न कळो तोंडात ते येतं सतत, ज्या दिवशी अर्थ कळतो त्या दिवशी मग ते फिट्ट बसतं डोक्यात. ग्रेट मेन थिंक अलाईक असं म्हणतात. भाषा, मांडणी काय ती वेगळी बघ. चढता सूरज धीरे धीरे…. मधे या गाण्यातलं सगळंच आहे, फक्तं बाज वेगळा. तो म्हणतो, 'याद रख सिकंदरके हौसले तो भारी थे, जब गया था दुनियासे दोनो हाथ खाली थे...'. शैलेंद्र म्हणतो, 'न हाथी है न घोडा है, वहां पैदल ही जाना है.., तुम्हारे महल चौबारे, यहीं रह जायेंगे सारे'. अजीज नाझा शिरा ताणून सांगतो, 'कल जो तनके चलते थे अपनी शान शौकत पर….', शैलेंद्र म्हणतो, अकड़ किस बात की प्यारे, ये सर फिर भी झुकाना है'. 
 
 
 
'जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतसे ईश्वर…' हे आपलं मराठी झालं, शैलेंद्र काय वेगळं सांगतोय, 'भला कीजे भला होगा, बुरा कीजे बुरा होगा, बही लिख-लिख के क्या होगा, यहीं सब कुछ चुकाना है'. 'कट्यार काळजात घुसली' मधे 'भजनाविण सारे दिन गेले….' मधे दारव्हेकर म्हणतात 'बालपणा रमविण्यात गमविला, यौवनात धन लौकिक सारे', सुधीर मोघे म्हणतात, 'बालपण उतू गेले अन्‌ तारुण्य नासले, वार्धक्य साचले, उरलो बंदी पुन्हा मी, दयाघना! आणि याच अर्थाचं शैलेंद्र म्हणतो, 'लड़कपन खेल में खोया, जवानी नींद भर सोया, बुढ़ापा देखकर रोया, वही किस्सा पुराना है'. सांगायचा मुद्दा हा आहे की ही मोठी माणसं एकसारखा विचार करतात. प्रत्येकाची शैली वेगळी, त्याला दिलेली चाल वेगळी, काही अवघड तर काही सोप्प्या, तोंडावर रुळणा-या पण अर्थ एकच. 
 
मरणापेक्षा मरणाची भिती जास्तं त्रासदायक आहे नाही. जगताना धर्मानी, संस्कारांनी, समाजानी, मनानी घालून घेतलेल्या, ब-याचवेळा लादलेल्या बंधनांनी जखडलेले आपण खरं तर मनासारखं किती जगतो हा प्रश्नंच आहे. न पाहिलेल्या परमेश्वराला घाबरतो, त्याला जाब देताना काय द्यायचा याच्या काळजीत सतत सावध वागतो आणि आयुष्यातला आनंद नासवून तर नाही ना टाकत आपण असं वाटतं. समाजात. शिस्तं रहावी म्हणून गरजेचं असेलही म्हणा ते. जाऊ दे, फार विचार नको करायला. मनाला उत्तर देताना भिती वाटणार नाही असं जगणं आपल्या हातात आहे, ते करणं उत्तम. चल, पुढच्या गाण्यापर्यंत बाय.         
  
            
--जयंत विद्वांस 
 
सजन रे झूठ मत बोलो
खुदा के पास जाना है
न हाथी है न घोडा है
वहां पैदल ही जाना है

तुम्हारे महल चौबारे
यहीं रह जायेंगे सारे
अकड़ किस बात की प्यारे
ये सर फिर भी झुकाना है
सजन रे झूठ...

भला कीजे भला होगा
बुरा कीजे बुरा होगा
बही लिख-लिख के क्या होगा
यहीं सब कुछ चुकाना है
सजन रे झूठ...

लड़कपन खेल में खोया
जवानी नींद भर सोया
बुढ़ापा देखकर रोया
वही किस्सा पुराना है

2 comments:

  1. सुरुवातीला या सिनेमात मेहमूद आणि मीना कुमारी याना प्रमुख भूमिकेसाठी घ्यायचे शैलेंद्र ने ठरविले होते . पण आर के कॉटेज मध्ये राजकपूर नी कथा ऐकली आणि सांगितले मीच तुझा हिरामण . दिग्दर्शक बासू भट्टाचार्य अर्धवट काम सोडून गेला .तेव्हा संकलन आणि काही भाग राजकपूर ने चित्रित केला

    ReplyDelete
  2. सुरुवातीला या सिनेमात मेहमूद आणि मीना कुमारी याना प्रमुख भूमिकेसाठी घ्यायचे शैलेंद्र ने ठरविले होते . पण आर के कॉटेज मध्ये राजकपूर नी कथा ऐकली आणि सांगितले मीच तुझा हिरामण . दिग्दर्शक बासू भट्टाचार्य अर्धवट काम सोडून गेला .तेव्हा संकलन आणि काही भाग राजकपूर ने चित्रित केला

    ReplyDelete