Tuesday 24 June 2014

'आनंद'…

हा चित्रपट बघून दरवेळेस मी मानसिक त्रास करून घेत आलोय. धड जीव जातही नाही आणि रहातही नाही अशी परिस्थिती होते. परवा म्हणजे १५ जूनला सेट म्याक्स टू ला परत एकदा बघितला आणि परत बघायचा नाही असं मी ठरवलंय. सांगितलंय कुणी वेळ घालवून दु:खी व्हायला. 'शोले' मधलं प्रत्येक पात्रं किती मिनिटं पडद्यावर आहे याला महत्वं नाही, तरीही ते लक्षात रहातं. 'आनंद' मधे ही तसंच होतं. पेशंट 'असित सेन', 'मिस्टर आणि मिसेस कुलकर्णी' 'श्री व सौ.सीमा रमेश देव', पहिलवान 'दारासिंह', 'रेणू' सुमिता संन्याल आणि तिची फक्तं एकाच शॉट मधे दिसणारी आणि खाऊन टाकणारी, डोळ्यात टचकन  पाणी आणणारी प्रेमळ, गोड खळ्यांची मालकीण आई 'दुर्गा खोटे', चिरक्या  आवाजात  बोलणारा  आणि  बाकावर बसून हमसून हमसून रडणारा बद्रुद्दिन काझी उर्फ 'जॉनी वाकर', कडक मेट्रन 'मिसेस डिसा' 'ललिता पवार', थोड्या दिवसांची ओळख असलेल्या आणि थोड्याच दिवसांची सोबत असलेल्या आनंद साठी देवाला कौल लावायला जाणारा घरगडी 'रघू काका', आनंदसाठी आपण काहीही  करू शकत नाही त्यामुळे चिडचिडा झालेला, आतून तुटत चाललेला, देवाला न मानणारा पण रघूकाकाला परवानगी देणारा गंभीर डॉ. भास्कर 'अमिताभ' आणि ज्या माणसाच्या भोवती या बाकी सगळ्यांचा जीव घुटमळतोय तो आनंद सहगल 'राजेश खन्ना'. 



ही झाली पडद्यावर दिसणारी माणसं. पडद्यामागून वार करणारी पण भरपूर आहेत. लेखणीला सुरीसारखी धार लावून भोसकणारा संवाद लेखक गुलझार (ते कमी पडेल की काय म्हणून 'योगेश' बरोबर दोन गाणीही लिहिलीत), 'कही दूर जब' आणि 'जिंदगी, कैसी ये पहेली है' असं  काव्यं  लिहिणारा  योगेश,  संध्याकाळच्या कातरवेळेचा नेमका फिल देणारा मुकेश, संगीतकार सलिल चौधरी. सगळे मिळून कट केल्यासारखे मिळेल तेंव्हा दोन तास भोसकत असतात. 







या चित्रपटाबद्दल ब-याच गंमतीशीर गोष्टी मी वाचल्यात, ऐकल्यात. चित्रपटाच्या सुरवातीला 'राजकपूरला समर्पित' अशी पाटी येते. त्याचं कारण चित्रपट बघताना कळत नाही. हृषीकेश मुखर्जी आणि राजकपूर चांगले मित्रं  होते. राजकपूर गंभीर आजारी होता तेंव्हा बेचैन झालेल्या हृषिदांना ही कथा सुचली. आर.के. त्यांना 'बाबू मोशाय' म्हणायचा. आधी म्हणे किशोरकुमार 'आनंद' आणि मेहमूद 'बाबू मोशाय' करणार होता. दोघांबद्दल आदर आहेच पण त्यांनी नाही केलं तेच बरं झालं. 'आराधना'चं यश किशोरकुमारच्या पाठीशी असून सुद्धा सलिलदांनी मुकेशचा आवाजच हवा तो करूण फील देईल असं म्हटलं आणि खन्नानी ते ऐकलं पण. ज्या ज्या वेळेस त्यानी ऐकलं आणि हातवारे कमी केले ते त्याचे सुंदर चित्रपट होते. 'आनंद' आणि 'नमकहराम' मधे त्याच्या बरोबर काम केल्यावर माझ्या लक्षात आलं होतं की मीच मला तगडा प्रतिस्पर्धी उभा केलाय आणि ती माझी घोडचूक होती. 'आनंद' मधे त्यानी चेह-यावर दाखवलेली उद्विग्नता माझा अभिनयाच्या तोडीस तोड होती ज्यानी मी धास्तावलो खरं तर' असं  राजेश खन्नानी एका मुलाखतीत कबूल केलं होतं. 

अमिताभचं नवखेपण चित्रपटभर जाणवतं. बुजलेला, शामळू, सुशिक्षित, सरळमार्गी, ज्ञानाची किंमत माहित असलेला पण त्यालाही मर्यादा आहेत हे समजल्यावर त्याने दाखवलेली घुसमट मात्रं लाजवाब. आनंदवर तो चिडतो तेंव्हा तो उत्स्फूर्त वाटतो, अभिनय नाही वाटत तो. त्याच्या आनंदी रहाण्याचा राग येतोय त्याला. तो कुढत रडत बसला असता तर कदाचित नसता रागावला तो, त्यानी त्याला सहानुभूती दिली असती पण ती संधीही आनंद देत नाही याचाही राग त्यात आहे.


 ललिता पवारांबद्दल काय बोलावं. श्री ४२० ची केळेवाली, अनाडी मधली (पण) 'मिसेस डिसा' लाजवाबच होत्या. एकाच बारीक डोळ्याचा वापर खुनशीपणा, कपटीपणा दाखवण्यासाठी व्हायचाच  पण माया दाखवताना तो कधी आड आला नाही त्यांना. मराठीतल्या इंदिरा चिटणीस एक त्यांना तोडीस तोड होत्या. खाष्ट दिसायच्या पण फणसासारख्या होत्या. ललित पवार आणि ओमप्रकाश  फार मेलो ड्रामा न करता एखाद्या शब्दाने पण टचकन पाणी आणायचे. रमेश, देव सीमाच्या घरी गेल्यावर डॉक्टर म्हणून देहबोलीतून दाखवलेला आदर, सीमावर दाखवलेली माया आणि आनंद यायच्या आत, बांध फुटू नये म्हणून जाण्याची लगबग काय सुरेख दाखवलीये त्यांनी. हे असे अभिनयसंपन्न लोक केशारासारखे असतात, काडीभर टाकतील पण असा काही रंग आणतील की ज्याचं नाव ते.

परत बघायचा नाही 'आनंद' असं ठाम ठरवलंय. पण कधी ब-याच दिवसात डोळे नाही स्वच्छ झाले तर बघावाच लागणार, नैसर्गिक उपाय बरा. 
--जयंत विद्वांस 

No comments:

Post a Comment