Saturday 26 December 2015

साधना….

साधना….

दिलीपकुमार ९३, धर्मेंद्र ८०, वैजयंतीमाला, माला सिन्हा ७९, मनोजकुमार ७८, शशी कपूर, हेलन, वहिदा ७७, संजयखान ७४, आशा पारेख, जितेंद्र, अमिताभ ७३, तनुजा ७२, तबस्सुम, सायरा बानू ७१, विनोद खन्ना ६९, मुमताझ, रणधीर कपूर ६८, डयानी, हेमा मालिनी, बबिता, मौशुमी, जया भादुरी ६७. राकेश रोशन, फरीदा जलाल ६६, मिथुन, शबाना, लीना चंदावरकर ६५, झीनत ६४, ऋषी कपूर, अमितकुमार ६३, रेखा ६१. काळ काय झटझट सरला. ज्यांच्या चित्रपटावर मोठे झालो ते सगळे आता साठीच्या पुढे गेलेत किंवा गेलेत. प्रेमापोटी ते आपल्याला अजून तरुण वाटतात पण ते नाहीत आणि आपणही पन्नाशीकडे वाटचाल केल्याचं जाणवतं. सत्तरीच्या पुढचा फक्तं अमिताभ काय तो कार्यरत आहे. २००७ सालच्या जॉनी गद्दार मधे धमेंद्र दिसल्याला सुद्धा आठ वर्ष झाली. बाकी सगळे अधून मधून कुठेतरी दृष्टीस पडतात. देखणा जॉय मुखर्जी असाच विपन्नावस्थेत गेला, त्याच्या स्टेशनरीच्या दुकानात बसायचा म्हणे. त्याला शम्मी म्हणालेला, तू परत काम कर, त्यानी नकार दिला कारण त्याला त्याचं ते म्हातारं रूप दाखवायचं नव्हतं. काल साधना शिवदासानी नय्यर गेली. बबिताची चुलत बहिण, करीना करिष्माची चुलत मावशी. 

कराचीवरून फाळणी झाल्यावर सिंधी शिवदासानी कुटुंब मुंबईत स्थिरावलं. सिंधी असून पण ती सुटलेल्या अंगाची, तुपट चेह-याची नव्हती. अतिशय नितळ आणि लोभस चेहरा. कुठलंही खास वैशिष्ठ्य नसलेली ती एक सुंदर चेह-याची साधी मुलगी होती. वडिलांना नृत्यांगना साधना बोस आवडायची म्हणून तिचं नाव साधना ठेवलं होतं. साधनाला पहिल्यापासूनच अभिनेत्री व्हायचं होतं. १९५५ च्या 'श्री ४२०' मधल्या 'मूड मूड के ना देख' मधे ती कोरस डान्सर होती. साठ साली आलेल्या निर्माता शशधर मुखर्जीच्या 'लव्ह इन सिमला'मधे त्याचा मुलगा जॉय हिरो होता आणि साधना होती आणि तिला कपाळ लहान दिसण्यासाठी 'ऑड्री हेपबर्न'चा कट देऊन 'साधना कट' फेमस करणारा दिग्दर्शक होता आर के नय्यर यांनी साठ सालचा हिट सिनेमा दिला. तिनी मग त्याच्याशीच लग्नं केलं, ९५ ला नय्यर जाईपर्यंत तिचं वैवाहिक जीवन होतं, तिला मुलबाळ काही नव्हतं. तिच्या केशरचनेची क्रेझ होती. अंगाला चिकटवल्यासारखा फिट्ट सलवार कमीझ घालायची आयडिया पण तिचीच होती जी पुढे पोट सुटलेल्या, शोभो न शोभो, नायिकांनी पण वापरली. 

रहस्यमय मराठी 'पाठलाग' वरून आलेला 'मेरा साया', 'वह कौन थी', 'राजकुमार', 'वक्त', 'आरजू', लतानी गायलेलं एकमेव मादक 'आ जाने जा' असलेला 'इंतकाम', लुळ्या देवानंदचा 'हम दोनो' असे मोजकेच सिनेमे मला पाहिल्याचे आठवतात तिचे. सदाबहार 'झुमका गिरा रे'च्या स्टेप्स 'एक दो तीन'वाल्या तेंव्हा नृत्यंदिग्दर्शक सोहनलालची सहाय्यक असलेल्या सरोजखानच्या आहेत. तिचा चेहरा गीताबाली, फरीदा जलाल सारखा गोबरा नव्हता पण लोभस होता. मला साधना म्हटलं की कृष्णंधवल रंगात टेरेसवर 'असली नकली' मधलं 'तेरा मेरा प्यार अमर' म्हणणारी सिल्क साडीतली, अंबाड्यावर वेणी घातलेली, प्रसन्न चेह-याची सोज्वळ, सात्विक सुंदर दिसणारी, कोपरापर्यंत बाह्यांचा ब्लाउज घातलेली साधना आठवते. संपूर्ण गाण्यात फक्तं तिच्या चेह-यावरचा गोडवा बघावा. 'राजकुमार' बघताना मला त्याचं नाव राजकुमारी हवं होतं असं अनेकदा वाटलं होतं. संपूर्ण चित्रपटात ती अफाट सुंदर दिसली होती. मेकप वगैरे असतो मान्यं आहे पण मूळ मटेरीअल देखणंच होतं, मेकपनी फारतर शार्पनेस वाढला असेल सौंदर्याचा. तिनी एकूण ३३ चित्रपटात काम केलं आणि त्यातले २७ हिट होते पण तिला फिल्मफेअर कधीच मिळालं नाही, वह कौन थी आणि वक्त साठी नामनिर्देशित होती ती फक्तं.    

एकदा तिचा फोटो बघितला आणि काळ किती भीषण सूड उगवतो ते जाणवलं. थायरॉइडमुळे तिच्या डोळ्यांवर परिणाम झाला होता. जागा सोडलेले बटाट्यासारखे डोळे, आत गेलेले गाल, खप्पड दिसत होती, हीच का ती? असा प्रश्नं पडावा अशी. आशा पारेख, वहिदा, नंदा आणि हेलन एवढंच तिचं शेवटचं मैत्र होतं. मधे नंदाही गेली. तबस्सुम सांगत होती, 'ढासळणारी तब्येत आणि मागे लागलेलं कायद्याचं झेंगट' यासाठी तिनी अनेकांची मदत मागितली आणि कुणीही पुढे आलं नाही शेवटपर्यंत. कदाचित तिचे भोग संपल्यावर ती कर्करोगाने गेली. आशा भोसलेच्या मालकीच्या बिल्डींगमधे ती भाड्याने रहात होती. तिच्या अंत्ययात्रेला तरुण म्हणावी अशी दीप्ती नवल (५८) तेवढी होती बाकी सगळे तिच्या मागचे पुढचे. 

प्रसिद्धीची सवय झाल्यावर वयानी आलेली हतबलता किती त्रास देत असेल याची कल्पना करायची पण मला इच्छा होत नाही. काय करत असतील हे लोक? प्रचंड रिकामा वेळ, सोडून गेलेलं सौंदर्य, तारूण्य, बरेचवेळा ओढवून घेतलेली विपन्नावस्था, एकाकीपण, आपल्या वयाचं, आपलं ऐकणारं माणूस आसपास नाही, विचार केला तरी अंगावर काटा येतो. काय वाटत असेल आरशात बघताना की आपलेच जुने फोटो बघत असतील, यशाच्या बातम्या वाचत असतील, आठवत असतील?

तिचं 'तेरा मेरा प्यार अमर' मला कायमचं आवडून गेलेलं गाणं आहे कारण त्यात तो साधना कट नाही, फिट्ट ड्रेस नाही, आहे ते एक सोज्वळ, सुंदर, सालस सौंदर्य, ठसलेलं (अशीच 'सुवासिनी' मधली अंबाडा घातलेली सीमा देव). त्या गाण्यात शेवटच्या कडव्यात ती म्हणते न तशी ती काल 'चलती हू मैं तारों पर, फिर क्यो मुझ को लगता ही डर' म्हणत जिथे कसलीही भीती नाही अशा ठिकाणी तारोंपे चलते हुए निघून गेली एवढं खरं.  

जयंत विद्वांस 

 

Saturday 12 December 2015

अज्ञानात सुख असतं.....

अज्ञानात सुख असतं..... 

'अज्ञानात सुख असतं' या वाक्यात खूप काही दडलंय. अफाट आनंद आहे, बालसुलभ औत्सुक्य आहे, अचानक काहीतरी नवीन गवसल्याचा भारावून टाकणारा हर्ष आहे, ज्ञानानी होणा-या दु:खापासून, क्लेशापासून वंचित ठेवणारं अमृत आहे, आपल्याला जे ज्ञात आहे तेच अंतिम, चांगलं अशी वरवर कुपमंडूक वाटणारी पण सुखी ठेवणारी वृत्ती आहे, एक निरागस बाल्यं जपता येईल असं काहीतरी त्यात आहे. तुम्ही जेंव्हा नवीन असता तेंव्हा रहस्यकथा असो नाहीतर एखादं कोडं किंवा अगदी सुडोकू असो, ते सुटेपर्यंत जी बौद्धिक मजा येते त्यात अज्ञानाचा मोठा वाटा असतो. एकदा तुम्ही सराईत झालात की ती मजा जाते. अर्थात एखादी गोष्टं अनुभवाने, अनेकवेळा केल्याने अंगवळणी पडते आणि अज्ञान उघड्यावर ठेवलेलं पेट्रोल जसं गायब होतं तसं नकळत नाहीसं होतं. त्याचेही फायदे आहेतच पण अज्ञानात मिळणारा आनंद किंवा ते निष्पाप सुख त्यात नाही. अज्ञानातलं सुख आणि लहानपणा देगा देवा या एकाच दर्जाच्या गोष्टी आहेत. 

आम्ही एकदा नागपूरला गेलो होतो लग्नासाठी ८४ ला. सगळेजण एअरपोर्ट जवळ म्हणून तो बघायला गेलो होतो. नात्यातलीच एक बाई पहिल्यांदाच घर सोडून नागपूरला म्हणजे एवढ्या लांब गेली होती. तिनी अत्यंत आणि ख-या निरागसतेने विचारलं, 'यातून चक्कर मारायचे किती पैसे घेत असतील?' सगळेजण हसले, ती खट्टू झाली. एकानी तिला समजावून सांगितलं, ते किती खर्चिक आहे ते. खरंतर ८४ साली उपस्थितातल्या ९९ टक्के लोकांना खरंच किती पैसे घेतात हे ही सांगता आलं नसतं पण हसलो मात्रं सगळेच. तिला ज्ञान प्राप्तं झालं हे मान्यं आहे पण त्यातून निष्पन्न काय झालं? तर चक्कर मारण्याएवढे पण पैसे आपल्याकडे नाहीत हे दु:ख तिच्या पदरात आलं. काहीवेळेस न मिळालेल्या गोष्टी पण आनंद देणा-या असतात कारण अज्ञानामुळे आपण त्या प्राप्त झाल्याची स्वप्नं पहात असतो. 

त्या अजरामर 'अमर अकबर' मधे निरुपा रॉयला रक्तं देतात त्या शॉटला मी कायम ढसाढसा हसलोय. पण अजाणतेपणी पहिल्यांदा पाहिला तेंव्हा मात्रं आईचं आणि मुलांचं रक्तं एकसारखंच असतं आणि एकमेकांना कडेला झोपवून ते लगेच भरता येतं असं खरं कळेपर्यंत कितीतरी वर्ष माझा समज होता. पण त्या अज्ञानामधे विश्वास होता, एक दिलासा होता - उद्या समजा काही झालं आपल्याला तर आईचं रक्तं मिळेल किंवा तिला काही झालं तर आपलं तिला देत येईल - हा विश्वास ज्ञानामुळे मिटला. ज्ञान गरजेचं आहे हे मान्यं आहे पण त्या रक्तात पण ग्रुप असतात, अमक्याला अमुकच चालतो, वेळप्रसंगी ती बाटली मिळवण्यासाठी कसं दर दर की ठोकरे खात फिरावं लागतं, दुर्मिळ ग्रूप पण असतो म्हणे त्यात, या बाकी चिंता वाढल्या त्याचं काय? एका विशिष्ठ ठिकाणी डोक्यावर फटका बसून वर बघितलं आणि नेमक्या त्याच वेळी साईबाबांच्या डोळ्यातून निघणा-या दिव्यज्योती डोळ्यात शिरल्या की अंधा आदमी डोळस होतो, फक्तं सरपटत जाउन पायरीवर डोकं आदळायचं टायमिंग जमलं की झालं असंही वाटायचं तेंव्हा. साला मनमोहन देसाई एकदम निरागस माणूस असणार (ज्ञानप्राप्ती झाल्यामुळेच त्यानी जीव दिला असणार). 


त्या 'उत्सव'मधे एकदा तो शेखर सुमन रेखाचा एकेक दागिना काढतो (तो अजरामर हेवा आहे मला आजवर वाटलेला, मी त्या शॉटचे दहाबारा रिटेक करून विनामोबदला काम केलं असतं शिणमात), नंतर रेखा कंचुकीतली एक क्लिप काढते आणि सगळे दागिने झटक्यासरशी काढते. चारुदत्त खुळाच म्हणावा लागेल लगेच क्लिप काढणार असेल तर, काहीवेळेला मठ्ठ असल्याच्या किंवा तसं दाखवल्याचा फायदा असतो. समोरच्याला ते कळत असतं तरीपण त्यात मजा असते. सगळ्या ठिकाणी ज्ञान आहे म्हणून लगेच पाजळायचं नसतं, ना वसंतसेनेला मजा न चारुदत्ताला. वपु म्हणाले होते. 'नाविन्यासारखी चटकन शिळी होणारी दुसरी गोष्टं नाही'. त्यामुळे दरवेळेला ती क्लिप काढणे म्हणजे तो आनंद शिळा करणं आहे, घाईच्या वेळची गोष्टं अलाहिदा :P .   

आता तर काय नेटमुळे ज्ञान कमी आणि माहिती जास्ती मिळते. त्यामुळे धड अज्ञान पण नाही आणि पूर्ण ज्ञान पण नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे मला खेड्यातून आलेल्या माणसांच्या निरागसतेचा, भोळेपणाचा फार हेवा वाटतो. त्या बिचा-यांना ओढ वाटते शहराची, न्यूनत्व जाणवतं पण ते किती सुखी आहेत याची त्यांना कल्पना नाहीये. मधे एके ठिकाणी वाचलं होतं. कुठल्यातरी देशात एक माणूस तीस वर्षांची शिक्षा भोगून तुरुंगातून बाहेर आला. कोल्ड्रिंक्स कलर मधे मिळतात, कानाला हेडफोन लावून बोलता येतं हे बघून तो आश्चर्यचकित झाला म्हणे. ही दुनिया माझी नाही असं त्याला वाटलंही असेल कदाचित. ज्ञान मिळणं म्हणजे माघारी न येता येणारी प्रक्रिया आहे. नॉन रिटर्निंग व्हॉल्व्ह, पुढे जायचं, मागे एन्ट्री बंद. ज्ञान म्हणजे फूल होणं, एकदा ते झालं की कळीत्वं संपलं. ज्ञान म्हणजे  दुध - दही - ताक - लोणी - तूप अशी साखळी आहे. एकदा पुढे गेलात की मागच्या स्थितीतला आनंद संपला. 

म्हणून वर जरी म्हटलं ना अज्ञानात सुख असतं तरी फक्तं एकाच बाबतीत ते नसतं. 'शेवटी' आपण जातो म्हणजे नक्की कुठे जातो हे अज्ञान अजून तरी दूर झालेलं नाही याचं मात्रं प्रत्येकाला दु:खं आहे, भीती आहे. देव मोठा मजेशीर माणूस असणार. नियम सिद्ध करण्यासाठी तो त्याला अपवाद तयार करून ठेवतो. अज्ञानात सुख असतं म्हणतोयेस ना, घे, म्हण मग या बाबतीत पण. ते ज्ञान कधी प्राप्त होणार नाही हे ही निश्चित आहे त्यामुळे त्याची चिंता न करता सुखासाठी गरजेचं असलेलं अज्ञानाचं दही घुसळायची घाई करायची नाही म्हणजे झालं. 'शेवटी' ज्ञान किती मिळवलं हे कोण मोजतंय, सुख किती मिळालं याची गणती जास्ती झाली म्हणजे हस-या चेह-यानी तिकडे गेलं की झालो सुखी. 

जयंत विद्वांस 


Tuesday 8 December 2015

सौ.शिल्पा केळकर उपाध्ये…

सौ.शिल्पा केळकर उपाध्ये… 
 
आयुष्यात माणसं येतात, काही काळ रमतात, निघून जातात. काही लक्षात रहातात. माणूस आयुष्यातून गेल्यावर आपण त्याच्याबद्दल चांगलं बोलतोच, एकूणच आपल्याकडे तो बरोबर असताना, सहवासात असताना त्याचं कौतुक करणं, त्याच्या गुणांवर बोलणं कमी असतं. कुठलाही माणूस पूर्ण सद्गुणी नसतो तसा पूर्ण अवगुणीही नसतो, तो कसा आहे हे ब-याच वेळा आपण आपल्या सोयीनुसार, मतलबानुसार ठरवतो. कुठलाही माणूस 'आंधळे आणि हत्ती' या गोष्टीतल्या हत्तीसारखा असतो. सहवासात आलेल्या किंवा ओळखणा-या प्रत्येक माणसाबद्दलचं मत हे त्याला आलेल्या अनुभवातून, त्याच्या बुद्धीनी केलेल्या पृथ्थकरणातून, त्याच्या आवडीनिवडीनुसार असतं त्यामुळे अमुक एक माणूस असाच आहे हे कुणी ठामपणाने सांगू शकत नाही, सांगूही नये. अनेक लोकांचं एखाद्या व्यक्तीबद्दल जे समान मत असेल ते प्रमाण मानावं फारतर. उदा : एखाद्या त्रयस्थ व्यक्तीला एखाद्या व्यसनी माणसाला दुस-या समव्यसनी माणसाबद्दल असणारं प्रेम किंवा तेच मत असणार नाही, एका क्षेत्रातल्या हुशार माणसाबद्दल दुस-या हुशार माणसाला असते तशी असूया असेलच असं नाही, त्यामुळे अमुक एक माणूस मला समजला असा सर्वंकष दावा कुणी करू नये. पुलं रावसाहेब लिहिताना हेच म्हणून गेलेत. म्हणून आपल्याला जी बाजू दिसली ती मांडावी, सांगावी, दुस-याला किंवा खुद्द त्या व्यक्तीला ती पटेलच असं नाही. पटो न पटो, आपण आपल्या मतांशी प्रामाणिक असलो की झालं. तर मूळ विषय शिल्पा केळकर उपाध्ये.....  

शिल्पाचा आणि माझा मेलव्यवहार ७-८ जुलै १५ च्या दरम्यान चालू झाला. ती अमेरिकेत असल्यामुळे एक बरंय, तिच्या कामाच्या वेळेत मी झोपलेलो असतो आणि माझ्या कामाच्या वेळेत ती. आम्ही 'काय अप्पा' वर खूप बोललोय, बोलतो, फोनवर बोललोय (अर्थात तीच करते म्हणून). तिच्यात समोरच्याचं ऐकण्याचा अतिशय दुर्मिळ गुण आहे. माझ्या पाल्हाळापुढे ती लक्षणीय कमी बोलते. आपण कितीही रस्ते सोडून पळत सुटलो तरी 'पडोसन'मधे मेहमूद जसा पेटीवर 'एक चतुर नार…' गाण्यात मूळ स्वर शोधून सुनीलदत्तला मूळ चालीवर आणतो ना तशी ती मूळ मुद्द्यावर सहज येते. अवांतर फोलपट तिच्या बुद्धीच्या वा-यात ती उडवून लावते त्यामुळे तिच्याशी बोलताना जपून बोलावं लागतं, भीती म्हणून नाही तर ती एखादं वाक्यं, त्याचे संदर्भ, स्पष्टीकरण ती चार पाच दिवसांनी विचारू शकते, विचारते म्हणून. लॉजिकल थिंकिंग तिला आवडतं. एखाद्या गोष्टीची तर्काच्या कसोटीवर उकल झाली की तिला बरं वाटतं. फरक असतो, मी मत मांडतो, ती मला असं वाटतं असं म्हणते (केवढा बदल झालाय नं माझ्यात). 

तिची स्मरणशक्ती दांडगी आहे. तिला संदर्भ टपाटप आठवतात. वेगवेगळ्या वेळी केली तरी परस्परविरोधी विधानं ती झटक्यात पकडते. ती लगेच निष्कर्षावर येत नाही, प्रत्येक गोष्टीला वेळ दिला पाहिजे हे तिच्या स्वभावात आहे. राहूल द्रविड महान होता कारण फलंदाज चेंडू जेवढा उशिरा खेळेल तेवढे कुठे खेळायचं ह्याचे इतरांपेक्षा जास्ती पर्याय त्याच्याकडे असतात म्हणून तो महान असतो/होतो. तिच्याकडे पेशंस आहेत. लिखाणातल्या एखाद्या मुद्द्यावर ती मत लगेच व्यक्तं करत नाहीत, ती त्यावर चर्चा करते. माझ्यासारखा उतावळा माणूस त्यात काय चुकलं हे पहिलं सांगेल, ती आपल्याकडून वकीलासारखं काढून घेईल, आपण बदल मान्य करूच असे मुद्दे ती मांडेल याची मला खात्री आहे. लिखाणातली कुठलीही गोष्टं काल्पनिक असली तरी तिचे धागेदोरे आपल्या गतायुष्याशी, आलेल्या अनुभवाशी, बघितलेल्याशी, वाचनाशी संदर्भ सांगतात हे तिच्यामुळे मला लक्षात आलं, मी लिहायचो हे मान्यं पण हा विचार कधी माझ्या मनात आला नाही. चेह-यापाठीमागचा माणूस वाचायची मला सवय आहे तसं तिला कथेमागची प्रेरणा, मूळ शोधायची हौस आहे. आपण आपल्याबद्दल काही बोललो तर एखाद्या लिखाणात ते डोकावलं का हे तिला पटकन सापडतं.        

तिला चटपटीतपणा, नेटकेपणा, मुद्देसूदपणा आवडतो. माझ्या लिखाणावर तिचा एवढा लोभ असण्याचं कारण तेच आहे (माझ्या मते) कारण माझ्या लिहिण्यात तिच्यात असलेले गुण तिला दिसत असावेत. आठ जुलैच्या मेल मधे ती म्हणाली होती  - What I like the most about all these stories is the size and the twist. कोब्राटांचे जन्मत: काही गुण अवगुण असतात. पाल्हाळ नसतो, नेटकेपणा, काय सांगायचंय ते ठाम आणि ठरलेलं असतं, कष्ट पडले तरी चालतील तरी पण जे करतोय ते नीट, फ़्लॉलेस असावं, परफेक्शनची हौस आणि तिरकस बोलणं (इतर लोक त्याला कुचकेपणा म्हणतात, आपण लक्ष नाही द्यायचं). तिच्याकडे ती टोकदार विनोदबुद्धी निश्चितच आहे. स्मृतिचित्रे, ओव्हरड्राफ्ट, सूर्यास्ताची दिवाळी या सगळ्या वाचनात तिचा परफेक्शनचा सोस जाणवतो. हे ती कुणी चांगलं म्हणावं म्हणून करत नाही तर आपण जे करतोय ते चांगलं झालं पाहिजे या भावनेतून करते. ते स्वभावात लागतं. आनंद मिळवायचे अनेक प्रकार असतात. काही आनंद मानसिक असतात जे इतरांना कळोत न कळोत, त्या माणसाला कळतात, अवीट आनंद असतो तो. परफेक्शनचा आनंद तसाच असतो. ठरवल्याप्रमाणे ती गोष्टं झाली की तो मिळतो. ती तशी व्हायला दरवेळेला योगायोग उपयोगी पडत नाही त्याकरता ध्यास लागतो. ओव्हरड्राफ्ट वाचताना काही वाक्यं वेळेत बसण्यासाठी गाळावी लागत होती. कथेला बाधा येउन नये म्हणून तिनी मला विचारलं, कुठली वगळू? वास्तविक ती ते करू शकत होती पण ढवळाढवळ नको, लेखकाला ठरवू दे हा कोब्राट गुण आहे तिच्यात (बाकी लोक त्याला अलिप्तपणा म्हणतात, आपण लक्ष नाही द्यायचं).

Not a penny more, not a penny less अशी ती स्लिम ट्रिम आहे. आनंदानी कुठलीही गोष्टं करता यायला हवी. ती नेमाने चालायला जाते म्हणजे ती शिस्तीशी निष्ठावान आहे. किती किमी चाललो, किती वजन कमी झालं, किती दिवस खाडा न करता चालतोय असले हिशोब ती ठेवत नसावी म्हणून मग चालायला जाताना तिला सिगारवाला सापडतो. माणसं वाचायचा चाळा फार वाईट. तिचे डीपी आणि जे काय फोटू मी बघितलेत त्यात जाणवण्यासारखा एक मुद्दा आहे. सगळे कपडे प्लेन आणि मोस्टली सिंगल कलर आहेत. 'ए हास, फोटो काढतोय' असं म्हटल्यावर माणूस जसा उभा रहातो तसे तिचे फोटो आहेत, पोझ बिझ भानगड नाही. सगळ्या फोटोत ती एकसारखी हसलीये. याचा अर्थ फार शो करायची हौस तिला नाहीये. गुणांनी ओळख असावी असंही तिचं मत असावं. कसे दिसताय हे चिरकाल नसतं. पण कसे वागताय, गुण काय हे लॉंगरनमधे कळतं. मी काही तिने केलेलं खाल्लेलं नाही पण ती सुगरण असावी कारण दिवाळीला तिनी शंभर लाडू केले ते खप आहे म्हणूनच केले असणार ना? Either you are born host or guest असं म्हणतात. ती होस्ट आहे. सतत तिच्याकडे कुणी न कुणी येतं, जमतं, रहातं म्हणजे ती लोकांशी चांगली वागत असावी अशी दाट शंका घेण्यास वाव आहे. तिच्या तोंडून आज ती निवांत आहे असं मी क्वचित ऐकलंय इतके तिचे व्याप आहेत. सतत काहीतरी करत रहाण्याचं तिला व्यसन आहे.  

ती स्वत: वाचनीय लिहिते पण तिनी मला कितपत जमतंय हे बघण्यासाठी एक स्टोरी प्लॉट मला दिला आणि चक्कं मी एकांकिका लिहू शकलो. मजा आली लिहिताना कारण दृश्य लिहिण्याची मला आवड आहेच पण संवादातून ते लिहिण्याचं कसब मी कधी अजमावलं नव्हतं. नाटक, एकांकिका या विषयवार बोलण्याइतका माझा अभ्यास नाही, ज्ञान नाही पण तरीही मी लिहू शकलो (त्याची क्वालिटी काय यावर वाद होऊ शकतात पण मी लिहिलंय ते बघावं माणसानं) कारण तिची मूळ कथा छानच होती. मला फक्तं त्यात जागा भरणे एवढंच काम करायचं होतं. तिनी मला स्टोरीलाईन दिल्यामुळे अनेक शक्यता माझ्या बुद्धीच्या कुवतीनुसार मला अजमावता आल्या, मी लिहू शकेन याची तिला खात्री कशामुळे वाटली ते माहित नाही, नाही जमलं याला तर मी लिहीन असंही असावं तिच्या डोक्यात, माहित नाही. पण तिच्यामुळे एक नवीन प्रकार लिहून बघता आला. पुढेमागे ती अजून प्लॉट देईन आणि मी उच्छाद मांडेनही त्या प्रकारात.    


मी काही तिला अजून तरी भेटलेलो नाही. तिचा काय माझ्या बांधाला बांध नाही त्यामुळे वाद नाहीत. अजून पंचवीस वर्ष दोघं हयात राहू असं धरलं घटकाभर आणि ती आली दरवर्षी एकदा भारतात तरी आम्ही जास्तीत जास्ती पंचवीस वेळा भेटू शकतो. त्याच्यामुळे एकमेकांबद्दल वाईट मत होण्याचं काही कारण नाही. पुढेमागे तिची माझ्याबद्दलची आणि माझी तिच्याबद्दलची मतं बदलतीलही पण मला माझ्याच लिखाणावर प्रश्नं विचारून, त्याची उकल करून मला नविन दृष्टीकोन देणारी ती पहिली आहे, माझी साधी सोपी सरळ कथा वाचनात अभिनय केला की रिपीट व्ह्यालू असणारी होऊ शकते हे तिच्यामुळे समजलं (वाचनाचा प्रथम क्रमांक अर्थात स्वरूपाचा आहे, शिल्पाप्रमाणेच ती ही माझ्या लिहिण्यावर प्रेम करणारी आहे). माझी कथा वाचण्यासाठी तिने घेतलेले कष्ट मी पाहिले नसले तरी ऐकून आहे, पुढेमागे अजून काही कथा तू नळी वर टाकूयात असं ती म्हणाली होती, ते होईल न होईल पण मला माझ्याच लिखाणात उमटणारा मी सापडवून देण्याकरता मी तिचा ऋणी आहे.

जयंत विद्वांस  

(यातला कुठलाही गुण तिच्यात कुणाला आढळल्यास तो योगायोग समजू नये ही विनंती. :P)