Tuesday 8 December 2015

सौ.शिल्पा केळकर उपाध्ये…

सौ.शिल्पा केळकर उपाध्ये… 
 
आयुष्यात माणसं येतात, काही काळ रमतात, निघून जातात. काही लक्षात रहातात. माणूस आयुष्यातून गेल्यावर आपण त्याच्याबद्दल चांगलं बोलतोच, एकूणच आपल्याकडे तो बरोबर असताना, सहवासात असताना त्याचं कौतुक करणं, त्याच्या गुणांवर बोलणं कमी असतं. कुठलाही माणूस पूर्ण सद्गुणी नसतो तसा पूर्ण अवगुणीही नसतो, तो कसा आहे हे ब-याच वेळा आपण आपल्या सोयीनुसार, मतलबानुसार ठरवतो. कुठलाही माणूस 'आंधळे आणि हत्ती' या गोष्टीतल्या हत्तीसारखा असतो. सहवासात आलेल्या किंवा ओळखणा-या प्रत्येक माणसाबद्दलचं मत हे त्याला आलेल्या अनुभवातून, त्याच्या बुद्धीनी केलेल्या पृथ्थकरणातून, त्याच्या आवडीनिवडीनुसार असतं त्यामुळे अमुक एक माणूस असाच आहे हे कुणी ठामपणाने सांगू शकत नाही, सांगूही नये. अनेक लोकांचं एखाद्या व्यक्तीबद्दल जे समान मत असेल ते प्रमाण मानावं फारतर. उदा : एखाद्या त्रयस्थ व्यक्तीला एखाद्या व्यसनी माणसाला दुस-या समव्यसनी माणसाबद्दल असणारं प्रेम किंवा तेच मत असणार नाही, एका क्षेत्रातल्या हुशार माणसाबद्दल दुस-या हुशार माणसाला असते तशी असूया असेलच असं नाही, त्यामुळे अमुक एक माणूस मला समजला असा सर्वंकष दावा कुणी करू नये. पुलं रावसाहेब लिहिताना हेच म्हणून गेलेत. म्हणून आपल्याला जी बाजू दिसली ती मांडावी, सांगावी, दुस-याला किंवा खुद्द त्या व्यक्तीला ती पटेलच असं नाही. पटो न पटो, आपण आपल्या मतांशी प्रामाणिक असलो की झालं. तर मूळ विषय शिल्पा केळकर उपाध्ये.....  

शिल्पाचा आणि माझा मेलव्यवहार ७-८ जुलै १५ च्या दरम्यान चालू झाला. ती अमेरिकेत असल्यामुळे एक बरंय, तिच्या कामाच्या वेळेत मी झोपलेलो असतो आणि माझ्या कामाच्या वेळेत ती. आम्ही 'काय अप्पा' वर खूप बोललोय, बोलतो, फोनवर बोललोय (अर्थात तीच करते म्हणून). तिच्यात समोरच्याचं ऐकण्याचा अतिशय दुर्मिळ गुण आहे. माझ्या पाल्हाळापुढे ती लक्षणीय कमी बोलते. आपण कितीही रस्ते सोडून पळत सुटलो तरी 'पडोसन'मधे मेहमूद जसा पेटीवर 'एक चतुर नार…' गाण्यात मूळ स्वर शोधून सुनीलदत्तला मूळ चालीवर आणतो ना तशी ती मूळ मुद्द्यावर सहज येते. अवांतर फोलपट तिच्या बुद्धीच्या वा-यात ती उडवून लावते त्यामुळे तिच्याशी बोलताना जपून बोलावं लागतं, भीती म्हणून नाही तर ती एखादं वाक्यं, त्याचे संदर्भ, स्पष्टीकरण ती चार पाच दिवसांनी विचारू शकते, विचारते म्हणून. लॉजिकल थिंकिंग तिला आवडतं. एखाद्या गोष्टीची तर्काच्या कसोटीवर उकल झाली की तिला बरं वाटतं. फरक असतो, मी मत मांडतो, ती मला असं वाटतं असं म्हणते (केवढा बदल झालाय नं माझ्यात). 

तिची स्मरणशक्ती दांडगी आहे. तिला संदर्भ टपाटप आठवतात. वेगवेगळ्या वेळी केली तरी परस्परविरोधी विधानं ती झटक्यात पकडते. ती लगेच निष्कर्षावर येत नाही, प्रत्येक गोष्टीला वेळ दिला पाहिजे हे तिच्या स्वभावात आहे. राहूल द्रविड महान होता कारण फलंदाज चेंडू जेवढा उशिरा खेळेल तेवढे कुठे खेळायचं ह्याचे इतरांपेक्षा जास्ती पर्याय त्याच्याकडे असतात म्हणून तो महान असतो/होतो. तिच्याकडे पेशंस आहेत. लिखाणातल्या एखाद्या मुद्द्यावर ती मत लगेच व्यक्तं करत नाहीत, ती त्यावर चर्चा करते. माझ्यासारखा उतावळा माणूस त्यात काय चुकलं हे पहिलं सांगेल, ती आपल्याकडून वकीलासारखं काढून घेईल, आपण बदल मान्य करूच असे मुद्दे ती मांडेल याची मला खात्री आहे. लिखाणातली कुठलीही गोष्टं काल्पनिक असली तरी तिचे धागेदोरे आपल्या गतायुष्याशी, आलेल्या अनुभवाशी, बघितलेल्याशी, वाचनाशी संदर्भ सांगतात हे तिच्यामुळे मला लक्षात आलं, मी लिहायचो हे मान्यं पण हा विचार कधी माझ्या मनात आला नाही. चेह-यापाठीमागचा माणूस वाचायची मला सवय आहे तसं तिला कथेमागची प्रेरणा, मूळ शोधायची हौस आहे. आपण आपल्याबद्दल काही बोललो तर एखाद्या लिखाणात ते डोकावलं का हे तिला पटकन सापडतं.        

तिला चटपटीतपणा, नेटकेपणा, मुद्देसूदपणा आवडतो. माझ्या लिखाणावर तिचा एवढा लोभ असण्याचं कारण तेच आहे (माझ्या मते) कारण माझ्या लिहिण्यात तिच्यात असलेले गुण तिला दिसत असावेत. आठ जुलैच्या मेल मधे ती म्हणाली होती  - What I like the most about all these stories is the size and the twist. कोब्राटांचे जन्मत: काही गुण अवगुण असतात. पाल्हाळ नसतो, नेटकेपणा, काय सांगायचंय ते ठाम आणि ठरलेलं असतं, कष्ट पडले तरी चालतील तरी पण जे करतोय ते नीट, फ़्लॉलेस असावं, परफेक्शनची हौस आणि तिरकस बोलणं (इतर लोक त्याला कुचकेपणा म्हणतात, आपण लक्ष नाही द्यायचं). तिच्याकडे ती टोकदार विनोदबुद्धी निश्चितच आहे. स्मृतिचित्रे, ओव्हरड्राफ्ट, सूर्यास्ताची दिवाळी या सगळ्या वाचनात तिचा परफेक्शनचा सोस जाणवतो. हे ती कुणी चांगलं म्हणावं म्हणून करत नाही तर आपण जे करतोय ते चांगलं झालं पाहिजे या भावनेतून करते. ते स्वभावात लागतं. आनंद मिळवायचे अनेक प्रकार असतात. काही आनंद मानसिक असतात जे इतरांना कळोत न कळोत, त्या माणसाला कळतात, अवीट आनंद असतो तो. परफेक्शनचा आनंद तसाच असतो. ठरवल्याप्रमाणे ती गोष्टं झाली की तो मिळतो. ती तशी व्हायला दरवेळेला योगायोग उपयोगी पडत नाही त्याकरता ध्यास लागतो. ओव्हरड्राफ्ट वाचताना काही वाक्यं वेळेत बसण्यासाठी गाळावी लागत होती. कथेला बाधा येउन नये म्हणून तिनी मला विचारलं, कुठली वगळू? वास्तविक ती ते करू शकत होती पण ढवळाढवळ नको, लेखकाला ठरवू दे हा कोब्राट गुण आहे तिच्यात (बाकी लोक त्याला अलिप्तपणा म्हणतात, आपण लक्ष नाही द्यायचं).

Not a penny more, not a penny less अशी ती स्लिम ट्रिम आहे. आनंदानी कुठलीही गोष्टं करता यायला हवी. ती नेमाने चालायला जाते म्हणजे ती शिस्तीशी निष्ठावान आहे. किती किमी चाललो, किती वजन कमी झालं, किती दिवस खाडा न करता चालतोय असले हिशोब ती ठेवत नसावी म्हणून मग चालायला जाताना तिला सिगारवाला सापडतो. माणसं वाचायचा चाळा फार वाईट. तिचे डीपी आणि जे काय फोटू मी बघितलेत त्यात जाणवण्यासारखा एक मुद्दा आहे. सगळे कपडे प्लेन आणि मोस्टली सिंगल कलर आहेत. 'ए हास, फोटो काढतोय' असं म्हटल्यावर माणूस जसा उभा रहातो तसे तिचे फोटो आहेत, पोझ बिझ भानगड नाही. सगळ्या फोटोत ती एकसारखी हसलीये. याचा अर्थ फार शो करायची हौस तिला नाहीये. गुणांनी ओळख असावी असंही तिचं मत असावं. कसे दिसताय हे चिरकाल नसतं. पण कसे वागताय, गुण काय हे लॉंगरनमधे कळतं. मी काही तिने केलेलं खाल्लेलं नाही पण ती सुगरण असावी कारण दिवाळीला तिनी शंभर लाडू केले ते खप आहे म्हणूनच केले असणार ना? Either you are born host or guest असं म्हणतात. ती होस्ट आहे. सतत तिच्याकडे कुणी न कुणी येतं, जमतं, रहातं म्हणजे ती लोकांशी चांगली वागत असावी अशी दाट शंका घेण्यास वाव आहे. तिच्या तोंडून आज ती निवांत आहे असं मी क्वचित ऐकलंय इतके तिचे व्याप आहेत. सतत काहीतरी करत रहाण्याचं तिला व्यसन आहे.  

ती स्वत: वाचनीय लिहिते पण तिनी मला कितपत जमतंय हे बघण्यासाठी एक स्टोरी प्लॉट मला दिला आणि चक्कं मी एकांकिका लिहू शकलो. मजा आली लिहिताना कारण दृश्य लिहिण्याची मला आवड आहेच पण संवादातून ते लिहिण्याचं कसब मी कधी अजमावलं नव्हतं. नाटक, एकांकिका या विषयवार बोलण्याइतका माझा अभ्यास नाही, ज्ञान नाही पण तरीही मी लिहू शकलो (त्याची क्वालिटी काय यावर वाद होऊ शकतात पण मी लिहिलंय ते बघावं माणसानं) कारण तिची मूळ कथा छानच होती. मला फक्तं त्यात जागा भरणे एवढंच काम करायचं होतं. तिनी मला स्टोरीलाईन दिल्यामुळे अनेक शक्यता माझ्या बुद्धीच्या कुवतीनुसार मला अजमावता आल्या, मी लिहू शकेन याची तिला खात्री कशामुळे वाटली ते माहित नाही, नाही जमलं याला तर मी लिहीन असंही असावं तिच्या डोक्यात, माहित नाही. पण तिच्यामुळे एक नवीन प्रकार लिहून बघता आला. पुढेमागे ती अजून प्लॉट देईन आणि मी उच्छाद मांडेनही त्या प्रकारात.    


मी काही तिला अजून तरी भेटलेलो नाही. तिचा काय माझ्या बांधाला बांध नाही त्यामुळे वाद नाहीत. अजून पंचवीस वर्ष दोघं हयात राहू असं धरलं घटकाभर आणि ती आली दरवर्षी एकदा भारतात तरी आम्ही जास्तीत जास्ती पंचवीस वेळा भेटू शकतो. त्याच्यामुळे एकमेकांबद्दल वाईट मत होण्याचं काही कारण नाही. पुढेमागे तिची माझ्याबद्दलची आणि माझी तिच्याबद्दलची मतं बदलतीलही पण मला माझ्याच लिखाणावर प्रश्नं विचारून, त्याची उकल करून मला नविन दृष्टीकोन देणारी ती पहिली आहे, माझी साधी सोपी सरळ कथा वाचनात अभिनय केला की रिपीट व्ह्यालू असणारी होऊ शकते हे तिच्यामुळे समजलं (वाचनाचा प्रथम क्रमांक अर्थात स्वरूपाचा आहे, शिल्पाप्रमाणेच ती ही माझ्या लिहिण्यावर प्रेम करणारी आहे). माझी कथा वाचण्यासाठी तिने घेतलेले कष्ट मी पाहिले नसले तरी ऐकून आहे, पुढेमागे अजून काही कथा तू नळी वर टाकूयात असं ती म्हणाली होती, ते होईल न होईल पण मला माझ्याच लिखाणात उमटणारा मी सापडवून देण्याकरता मी तिचा ऋणी आहे.

जयंत विद्वांस  

(यातला कुठलाही गुण तिच्यात कुणाला आढळल्यास तो योगायोग समजू नये ही विनंती. :P)


No comments:

Post a Comment