Saturday 23 February 2013

एक तरी बहीण हवीच्....


एक तरी बहीण हवीच्....
('मराठी कविता समूहा'च्या 'कविता-विश्व दिवाळी विशेषांक २०१२' मध्य प्रकाशित कविता)

आपल्यापेक्षा लहान, दादिट्ल्या म्हणणारी 
स्वतःचा मुद्दा पटवता आला नाही की
पाठीत रागानी गुद्दा घालणारी
एक तरी....

लहानपणी खाउतला वाटा न देणारी
मोठी झाल्यावर थोडं काढून ठेवणारी
मी तुझ्यासारखी आप्पलपोटी नाही, म्हणणारी
एक तरी.....

डोक्यावर दोन तुरे लावून शाळेत जाणारी
नेहमी मीच जिंकतो म्हणून खट्टू होणारी
परक्यांसमोर हिरीरीनं दादाची बाजू घेणारी
एक तरी.....

कधी खांद्यापर्यंत आली हे न समजणारी
किती रे तुझा पसारा असं म्हणत त्रासणारी
लहान असूनही एखाद्या क्षणी ताई होणारी
एक तरी.....

लग्नं झालं की मग बसशील रडत म्हणणारी
लग्नाच्या दिवशी जाताना गळ्यात पडणारी
हरवेल की काय वाटून घट्ट पकडून रडणारी
एक तरी.....

--जयंत विद्वांस


No comments:

Post a Comment