Saturday 23 February 2013

पण मी ओळखतो ना.....


चार महिने झाले, मी रोज येतोय
आता सगळे मला ओळखू लागलेत 
कुणी आपुलकीनं बोलतात, कुणी
अतिपरिचयामुळे बोलत नाहीत… 


काल डॉक्टरांना विचारलं, पुढे काय?
लहानच आहे तसा तो, त्यालाही शब्दं सापडेनात
शेवटी सगळा धीर एकवटून म्हणाला,

बाकी तब्येत छान आहे हेच दुर्दैव आहे त्यांचं… 
तिचं सगळच् काम वक्तशीर होतं
प्रत्येक गोष्टं कशी घड्याळाच्या काट्यावर
एक मिनिट इकडचा तिकडे नाही कधी
अकराला जेवायला बसायची ती
(हो, शार्प अकरालाच बसायची)


आज तिचा वाढदिवस आहे,
तिच्या आवडीचा प्रसादाचा शिरा आणलाय
आणि शेवंतीची वेणीही
आता अंबाडा खरं तर लिंबाएवढा झालाय
पण तिला आवडते ना, म्हणून


तुमचं झालं असेल आवरून तर जेवू दे का तिला?
करा वाजले, तिला भूक लागली असेल

अहो, थांबा हो, कशाला उगाच् घाई करताय?
तुम्ही कोण आहात हे सुद्धा आठवत नाही त्यांना
त्या काय ओरडणार आहेत का अकरा वाजून गेले म्हणून?

बाळा, तू बोललीस ते अर्धसत्यं आहे,
ती मला ओळखत नाही, हे बरोबर

पण मी ओळखतो ना.....


-- जयंत विद्वांस

No comments:

Post a Comment