Friday 29 March 2013

योगायोग असेल?....

(Click the image)

मनश्री - सुमेध वडावाला (रिसबूड)



काही पुस्तकं वाचून मनोरंजन होतं, काही वाचून ज्ञान वाढतं, इतिहास कळतो, सत्यं असत्य कळतं, प्रश्न पडतात तर कधी प्रश्न वाढवतात, कधी उत्तरं सापडतात, काही पुस्तकं मनमुराद हसवतात आणि काही तुमच्या नकळत तुम्हांला आतून हलवतात, तुम्ही कितीही प्रयत्न केलात तरी डोळ्यातून पाणी कधी वहायला लागेल तुम्हांला सांगता येत नाही. 'मनश्री' वाचताना शेवटचा प्रकार होतो.  


मनश्री सोमणची जन्मापासून सुरु झालेली ही संकटांची मालिकाच आहे. वाहिन्यांवरच्या मालिकांबद्दल वाचलं की कायम प्रश्नं पडायचा मला की एकाच घरात वर्षानुवर्ष फक्त प्रॉब्लेम्स, कारस्थानं, संकट कशी काय येऊ शकतात? पण "मनश्री" वाचल्यावर मात्रं पटत की संकट, दु:ख हे न संपणारंही असू शकतं. असं का? का उपाय नाही या वर? या प्रश्नांची उत्तर सापडणार नाहीत हे माहित असूनही ते शोधण्याच्या नादात मेंदू कुरतडला जातो विचार करून. ती जन्माला येतानाच डोळे विसरून आणि फाटलेला ओठ घेऊन आली किंवा तिला पाठवलं गेलं. डोळ्यांच्या जागी बुबुळ नाहीतच फक्त दोन रेषा. वाचूनच रडू फुटलं. डॉक्टर म्हणाले, जशी जशी मोठी होईल तसं तसं अजून काय काय प्रॉब्लेम आहेत ते बघाव लागेल. तिच्या तपासण्या, उपचार वाचताना पटकन संपतात पण ते दृश्य डोळ्यापुढे उभ राहिलं की अस्वस्थ व्हायला होत. येणा-या अडचणी या तिच्यासाठी रुटीन होत्या, आहेत, रहाणार.


या प्रवासात त्यांना चांगली माणसं भेटली, वाईट ही भेटली. पण कुठलाही तिरस्कार न ठेवता त्यांनी ते पुस्तकात मांडल आहे. एक इंद्रिय निरुपयोगी असेल तर त्याची ताकद दुस-या इंद्रियाला मिळत असावी. अफाट स्मरणशक्ती आणि न हरण्याची तिच्यातली जिद्द ठाई ठाई जाणवते. राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या हस्ते तिनी 'बालश्री' पुरस्कार मिळवलाय आणि तो ही अपंगत्वाच्या कुबड्या घेऊन नाही तर धडधाकट इतर मुलांबरोबर भाग घेऊन. इतर अपंगत्व आलेल्या मुलांचाही उल्लेख यात आहे. व्हीलचेअरवर बसलेला मुलगा पहिला की हिला चालता तरी येतंय हा सुद्धा आनंद होऊ शकतो आणि त्याला वाटत आपल्याला निदान दिसतंय तरी. काय बोलणार? नि:शब्द करून टाकतात. 


सुमेध वडावाला यांनी केलेलं शब्दांकन दोन चार पानाआड पाणी आणतातच. कुठेही अलंकारिक भाषा नाही, साध्या सोप्या, संवाद शैलीत ते पानागणिक हलवून सोडतात. तिचे प्रॉब्लेम वाचले की काहीवेळेस सुचत नाही. आपण त्या जागी असतो तर? या कल्पनेनी सुद्धा भीती वाटते. मनश्री सोडा तिच्या आई वडिलांच्या जागी पण आपण स्वत:ला कल्पू शकत नाही. मनश्री सोमणला जेवढा सलाम तेवढाच तिच्या आईला, वडिलांना आणि सा-या कुटुंबाला. कधी जमलं तर मी त्यांच्याकडे जाऊन येणार आहे. काय बोलेन माहित नाही, शब्द की अश्रू आधी कोण फुटेल माहित नाही पण निदान त्यांच्या जिद्दीला एक नमस्कार तरी करून यावं असा मनात आहे.


देवाकडे काय काय मागावं हेच अजून आपल्याला कळलेलं नाही तिथे त्याचे आभार मानायचे वगैरे भानगडीत आपण पडतच नाही. मनश्री सोमण, सांगलीची करमरकर या लोकांचं समजलं, वाचलं की आपल्या देवाकडच्या मागण्यांची लाज वाटते. धडधाकट शरीर दिलंय याचे आभार कधी मानणार आपण? नुसतं आपल्याला नाही तर आपल्या प्रियजनांना पण. पुस्तक वाचून रडू येईल, चार जणांना सांगू, त्यांच्या दु:खाची, कष्टाची, कल्पना येईल पण जो माणूस या दिव्यातून गेला त्याच काय? जिद्द आपोआप येते की लादली जाते? मन होतं तयार की करावं लागतं? देवाचा राग त्यांनी केला तर काय चूक आहे? आपण मात्रं साधे आभार सुद्धा मानत नाही.   


देवा, एकवेळ पैसा देऊ नकोस, मान मरातब नको, गोरा रंग नको, देखणेपण नको, दीर्घायुष्य नको पण या पुढे निदान प्रत्येकाला फक्त धडधाकट शरीर तरी दे रे. तुला यात काही आनंद मिळत नसणार हे माहित आहे. दुस-याच्या दु:खात आनंद मानायला लागलास तर मग तुझ्यात आणि आमच्यात फरक तो काय? त्यामुळे लई नाही मागणं. बघ काही जमतंय का. 

 --जयंत विद्वांस

Wednesday 27 March 2013

ब (म) र्फी ......



ब (म) र्फी ......

रविवारी बर्फी बघितला. मस्तं एकदम. कोशिश, सरगम, सदमा, ब्लॅक, पा, आठवले. रणबिर, इलेना, प्रियांका - सगळेच् छान. सोबतीला दिग्गज बरेच् – आशिष विद्यार्थी, सौरभ शुक्ला, रूपा गांगुली (द्रौपदी), उदय टिकेकर.

काय आवडलं? सरळ, साधा. झाडांपाठीमागची गाणी, व्हिलन्स, गोळीबार, अचाट हाणामा-या, कमरेखालचे विनोद, अश्रूंचे पाट, ऑर्केस्ट्राचा ढणढणाट, पंजाबी लिरीक्स्, व्हॅम्प्स् - काही म्हणजे काही नाही. यातले विनोद सुद्धा हलकसं स्मित आणतात, क्वचित खदाखदा. प्रोमोज् मधे पाहिल्यामुळे काही जोक्स् आधीच् माहित होते, हा एकच् तोटा.

दार्जिलिंगचा निसर्ग, मेरे सपनोंकी रानीची आठवण करून देणारी ट्रेन आणि तो रस्ता. निरागस रणबिर कपूर (करिश्मा कपूर आली तेंव्हा तिला एकानी साडीतला रणधीर कपूर म्हटलं होतं, त्या धर्तीवर याला शर्ट पँटमधली नितूसिंग म्हणायला हरकत नाही), मोहक इलेना आणि नॉनग्लॅमरस् प्रियांका चोप्रा. मुळात कॅरॅक्टरच्या वयाला सुट होणारे कलाकार त्यामुळे ऑड वाटत नाही.

काही प्रसंग अनुराग बासूचे, काही कलाकारांचे. कलकत्त्यात घडणा-या चित्रपटात गाडीची नंबर प्लेटही तिथलीच्, गाड्याही जुन्याच्, एका पिक्चरमधे डेहराडूनमधे एम एच 02 पासिंगची गाडी होती. कपडेही बंगालचे, मर्फीची जाहिरात ऑटलासच्या जाहिरातीनी रिप्लेस होते. इव्हन नोटाही जुन्याच्. रणबिर प्रियांकाला इलेनासमोर आणताना तिल जरे बरे कपडे घालतो. छोट्या प्रसंगात बरच् काही.

रणबिर शोभून दिसतोच, पण इलेनाही छान् वावरली आहे. शेवटी रहाते प्रियांका चोप्रा. अप्रतिम काम. ती अभिनय करते असं वाटतच् नाही. दोन शॉट – एकदा ती आरश्यासमोर पदरासारखी पटकन ओढणी घेते तो आणि रणबिरच्या पुढे उभी राहून इलेनाला शब्दांपलिकडचं पोचवते तो. कुठेही शब्दं लागत नाहीत. ऐतराजमधे पण तिनी छान काम केलं होतं.

इतनीसी खुशी, गोरेगोरे, ओ बांके छोरेशी मिळत जुळतं वाटलं मला. पण प्रितमच्या गाण्यांचा त्रास होत नाही. म्हातारी इलेना थेट मेरा नाम जोकर मधल्या सिमी ग्रेवालची आठवण करून देणारी तर एंड पा सारखा बेडवर.

जयंत विद्वांस




Thursday 21 March 2013

पारध - अशोक जैन

पारध - अशोक जैन

क्षेत्रफळात महाराष्ट्र साधारण १४ पट मोठा आहे इस्राइलपेक्षा, भारताशी तुलना करण्याच्या भानगडीत न पडलेलच बरं. मुळावर उठलेले हिटलर आणि त्याचे साथीदार यांच्या तावडीतून जे सुटले, निसटले, पळाले, वाचले त्या ज्यूंचा हा देश. आख्ख्या देशात एक नदी, चारी बाजूनी शत्रू, पालेस्तीनी लोकांशी रोजचा संघर्ष अशी अनेक संकटं असतानाही हे राष्ट्रं ताठ मानेनं उभं आहे आणि विशेष म्हणजे अमेरिकेला फाट्यावर मारून.

हिटलर, त्याचा नरसंहार, पराभव, अधोगतीची कारणमीमांसा यावर बरीच पुस्तकं आली. कुणावरही हल्ला न करणारा, कुणाचीही भूमी कुरापत काढून, युद्ध करून न जिंकणारा, सहिष्णू आणि स्वभावाने गरीब समाज नेहमी भरडला जातो हे सत्य मात्रं त्यामुळे जास्तच उठून दिसतं. असं काही घडलं की तो समाज एकतर नाहीसा तरी होतो, अगदी अस्तित्व पुसून जातं, नाहीतर तो पेटून तरी उठतो आणि असा धडा शिकवतो की परत कुणी वाटेला जायला नको. आपण ही त्यातलेच आहोत फक्तं पेटून कधी उठणार याचं उत्तर मात्र सापडत नाही (थोर ज्योतिषी Naustradamus पण हयात नाही, अर्थात तो हि सांगू शकला नसता हा भाग वेगळा).

''पारध'' ही साठ लाख ज्यूंना संपवणारा अडोल्फ आईशमान आणि त्याला शोधणारी ''मोसाद'' याची चित्तथरारक कहाणी आहे. रशियाची के.जी.बी., अमेरिकेची सी.आय.ए., इंग्लंडचं स्कॉटलंड यार्ड आणि इस्राइलची मोसाद या मान्यवर गुप्तचर संघटना आहेत. यांच्या कारवाया आपण पुस्तकातून, बोंडच्या चित्रपटातून पहात आलोय. (आपल्याकडील सी.बी.आय.किंवा RAW वरचं पुस्तक ऐकिवात नाही). दुस-या महायुद्धानंतर १८ वर्षांनी त्यांनी आईशमानला अर्जेन्टीनामधून शोधून काढलं. नुसतं शोधलं नाही तर विमानात घालून इस्राइलला घेऊन गेले कुणालाही न सांगता आणि त्याला शिक्षाही केली.

उत्सुकता, तो सापडल्यावर, संशय आल्यावर रचलेल्या चाली, पूर्ण कारवाई होईपर्यंत पाळलेली गुप्तता हा सगळा भाग वाचनीय आहे. दुस-या राष्ट्राच्या भूमीत जाऊन हा उद्योग करायचा हे काम सोप्पं नाहीये. केवढा मानसिक ताण असेल उच्चपदस्थ अधिका-यांपासून ते मोहिमेत भाग घेणा-या लोकांपर्यंत याची कल्पनाच केलेली बरी.

कसं जमतं हे त्यांना? की रक्तातच लागतं ते? बरं, सूड तर घेतला पण तो ही कायदेशीर मार्गांनी रीतसर, कसं शक्यं होतं? एवढी गोपनीयता कशी पाळता येते? अठरा वर्षांमध्ये आलेल्या अपयशानी खच्चीकरण का झाल नाही त्यांच? असे अनेक उद्विग्नता आणणारे, निरुत्तर करणारे आणि आपल्याकडे का असं शक्यं होत नाही असे प्रश्न फक्त पडतात.

जयंत विद्वांस

इट्स नॉट फ़ेअर! .....

इट्स नॉट फ़ेअर!.....
 

- क्लासला गेले होते
- बी.सी.एस.करतीये, त्याचा
- क्लास नऊ पर्यंत असतो, परीक्षा आहे म्हणून काल उशिरा ९.४५ ला सुटला  
- शेअर रिक्षा रोजच करते मी
- कालही केली,
- हो, एकटीच, माझ्या बाजूला येणार कुणी नाही क्लासमध्ये 
- चारजण होते, ड्रायव्हर आणि मागे तीन
- नंबर कधी घेणार? बसतानाच?
- शंका नाही आली, रोज ५-६ वेळा जाते शेअर रिक्षानी
- प्रत्येकाकडे संशयानी बघणार का मग?

- हो, मी साइडला बसले होते
- हो, अंगभर कपडे होते
- त्यांनी अंधा-या बोळात एकाला उतरायचय म्हणून गाडी घातली
- हो, मी ओळखू शकेन त्यांना. अहो एवढाही अंधार नव्हता
- अहो मला कसं कळणार तो प्लान होता ते?

- हात कुठे कुठे लावले?
- लेडीज पोलिस नाहीयेत का? त्यांना सांगेन मी काय काय झालं ते
- गुन्हा मी केलाय की त्यांनी हे एकदा सांगा मला?

……

बाबा, मी ना "पोलिस चौकीतला एक तास" ह्यावर एक नाटुकलं लिहिलं होत
मला पहिलं बक्षीस मिळालं, पण परीक्षक म्हणाले
बाबा, खात्यात आहेत म्हणून सगळं माहितीये तुला. 

इट्स नॉट फ़ेअर!

जयंत विद्वांस

कदाचित…

कदाचित…

येशील परत त्या ठिकाणी जरी तू
पण भेटणार नाही मी कदाचित

अप्सरे समान असलीस जरी तू
पण पेटणार नाही मी कदाचित

धून ओळखीची म्हणलीस जरी तू
पण छेडणार नाही मी कदाचित

स्मृतीपुष्पे काही सांडलीस जरी तू
पण वेचणार नाही मी कदाचित


जयंत विद्वांस

Tuesday 19 March 2013

वेड (?)….

वेड (?)….
सोनुल्या उठ बलं, वाजलेत बघ किती
किती झोपतोश, आलशी मुग्गा नुसता
आज बाबाला हाफडे, येईल आत्ता
आवल्लेलं नसेल तर कटकट करेल

चला, तापलेलं पाणी गाल होईल पलत
शगले कपले ओले केलेस ना, लब्बाड
असू दे, आता शगलच बदलून टाकू
बाबा येईपर्यंत पोग्गा तय्याल होणाल

कित्ती शानं बाळ, हु की चू नाही तेल लावताना
चांगलं मालिश कलू दे, जिरलं बघ तेल शगलं
गलम गलम पाण्यानी शंभोला मज्जा ना शोनू?
आता मऊ मऊ फक्क्यानी पुशलं की झ्यालं

पावडल लावू, टीटी लावू, काजळ घालू
आणि मग नवीन नवीन लाल फ्लाक
कित्ती गोल दिशतोष ले बिंडूकल्या तू
ललत नाहीये काही, आनंद झालाय मला

….……

जायचय का परत दवाखान्यात कायमचं रहायला ?
काय ठरलं होतं आपलं? नाही कळत का तुला?
असे किती बाहुले खराब करणार आहेस अजून?

…. नाही रे, कळतं मला, पण काय करु? तूच सांग.


जयंत विद्वांस

Saturday 16 March 2013

परांजपे वहिनी....

 (Click the image)



वसंत लावण्य...

वसंत लावण्य : मधु पोतदार 

चित्रपटाशी निगडीत काहीतरी वाचायला मिळालं की ते आवडतच, खुमासदार, मसालेदार, चटपटीत हा एक भाग आणि त्यांची दु:खं, पूर्ण झालेली, अपूर्ण राहिलेली स्वप्नं, दुर्दशा, फसवणूक आणि उध्वस्त आयुष्याच्या कहाण्या हा एक भाग. आपल्याला वरवर दिसणार चकचकीत जीवन आतून कसं आहे ते कळत, वाईट गोष्टींचा मोह पटकन होतो म्हणतात पण चित्रपटांना वाईट तरी कसं म्हणायचं. कला वाईट नसते. तिचा वापर करणारे हात चांगल की वाईट ते ठरवतात. सुरी सर्जनकडे पण असते आणि खाटकाकडे पण. वापरणारे हात बदलले की निर्मिती बदलते. 

वसंत पवार - अनेक सुमधूर गाण्यांना सुरेल, श्रवणीय चाली देणारा हा संगीतकार फक्तं अडतीस वर्षाचं तुटपुंज आयुष्य जगला. विस्मरण आणि कृतघ्नपणा हे आपल्या समाजाचे उपजत गुण आहेत. चांगल्या लोकांच, त्यांच्या कामाचं लवकरात लवकर विस्मरण कसं होईल या करता आपल्याला फार कष्ट घ्यावे लागत नाहीत, इतकं ते अंगवळणी पडलंय. अरेच्च्या, हे गाणं यांचं आहे होय, माहितीच नव्हतं असे उद्गार वारंवार कानावर पडतात. या थोर लोकांच्या रचना गाणारे लोक पण याला कारणीभूत आहेत. ज्यांच्या जीवावर पोट भरता त्याचं निदान नाव तरी घ्या, पैसे तर द्यावे लागणार नाहीयेत ना? गीतकार, संगीतकार यांची नावं घेणं त्यासाठी गरजेचं आहे. 

वानगीदाखल ही गाणी बघा, पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा, बुगडी माझी सांडली ग, कसं काय पाटील बर हाय का?,. मला हो म्हणत्यात लवंगी मिरची आणी हे तुफान चाललेले चित्रपट - सांगत्ये ऐका, मल्हारी मार्तंड, रंगल्या रात्री अशा, मानिनी. एकूण ५० मराठी चित्रपट, काही हिंदी आणि एक इंग्लिश - महात्मा. काही नाटक. 

हे काही आत्मचरित्र नव्हे कारण मुळात चरित्रकथानायक नव्हताच हे लिहिताना, त्यामुळे परिचित लोक आणि इतर साधने यावरून लिहिलंय सगळं. ब-याच ठिकाणी काही गोष्टींची, किश्श्यांची पुनरावृत्ती झाली आहे. पण ते काही फार महत्वाचं नाही. मुळात प्रेमापोटी, आपण काहीतरी त्या व्यक्तीच देणं लागतो या भावनेपोटी जेंव्हा कुणी कष्ट घेऊन लिहितं त्या वेळी चुका काढण्यापेक्षा ते वाचावं असा मला वाटत. मनस्वीपणा हा कलाकाराचा गुण की अवगुण? कलेची निर्मिती होते हे मान्य केलं तरी व्यावहारिक पातळीवर काय करायचं? लाखमोलाच्या चाली रचणा-या माणसाचं कुटुंब मात्रं उद्या काय या विवंचनेत. हाडाचा कलाकार वगैरे  मोठे शब्दं वापरून हुशार लोक स्व:ताची पोतडी तुडुंब भरून घेतात आणि हाडाच्या कलाकाराची मात्रं हाडं निघतात. कलेच्या दुनियेतले हे व्यवहारी अपूर्णांकच म्हटले पहिजेत.

दारूची बाटली देऊन त्यांच्याकडून अप्रतिम काम करून घेणारे दिग्दर्शक, निर्माते, त्यांच्या मरणानंतर त्यांचं नाव काढून त्यांच्या चालींवर स्व:ताचं नाव लावणारे संधिसाधू आणि आमच्या आयुष्यभराच्या  मीठ भाकरीची सोय त्यांनी केली असं कृतज्ञतापुर्वक सांगण-या सुलोचना चव्हाण, त्यांच ऋण मानणारे आणि लावणीचा वारसा पुढे नेणारे सहाय्यक राम कदम, जगदीश खेबुडकर, त्यांच्या कलेवर प्रेम करणारे पु.लं., गदिमा, शांताबाई, हंसा वाडकर असे दिग्गज लोक पण इथे भेटतात. 

शेकडो लावण्या, अभंग, कवन, फटके, गीतं, उर्दू शेरोशायरी, सवालजबाब मुखोद्गत असणारा, उत्कृष्ट सतार वाजवणारा, अनेक वाद्य वाजवणारा, खिळवून ठेवणारे जादूचे प्रयोग करणारा (पत्त्यांच्या ६५ जादू यायच्या म्हणे त्यांना), नृत्यदिग्दर्शन करणारा, छोटे मोठे फुटकळ रोल करणारा, पार्श्वगायन करणारा, पु.लं.नी ज्याला मैफिलाचा चांद म्हटलं असा मैफिल रंगवणारा हा माणसांचा, सुरांचा लोभी अवलिया माणूस. जगाकरता प्रतिभावंत, असामान्य कलाकार पण कौटुंबिक आयुष्यात मात्रं पूर्ण अपयशी. तीन मुली आणि एक मुलगा. दोघींच्या आयुष्याची वाट लागली. मुलाचं आणि एका मुलीचं बरं आहे एवढंच काय ते त्यातल्या त्यात दिलासा देणारं.

के.एल.सैगल, चंद्रमोहन, आर.डी., मीनाकुमारी, लक्ष्मीकांत बेर्डे, डॉ. घाणेकर आणि असे अनेक कितीतरी लोक त्या हातभर बाटलीच्या कह्यात गेले आणि मग त्यांना परतीची वाट मिळालीच नाही. एका दिवसात सहा-सहा , नऊ-नऊ गाण्यांचं ध्वनिमुद्रण करून निर्मात्याचे पैसे वाचवणारा हा माणूस कसली तरी घाई झाल्यासारखा अनेक,  जो पर्यंत मराठी भाषा बोलली जाईल, चित्रपट निघतील तो पर्यंत, अजरामर गाणी ठेवून निघून गेला. 

(राम कदम - छिन्नी हातोड्याचा घाव, वसंत शिंदे - विनोदवृक्ष, अनंत मने, जगदीश खेबुडकर, सुलोचना चव्हाण, जयश्री गडकर, वसंत प्रभू आणि वसंत देसाई यांच्या पुस्तकांची नावं त्यात आहेत. आता ही सगळी आणून वाचण आलं, आपल्याला ह्या लोकांनी आनंद दिलाय, परतफेड काय करणार? निदान त्यांच्या विषयी वाचून कृतज्ञता व्यक्त करण आणि दुस-याला सांगणं एवढंच करू शकतो)

जयंत विद्वांस


Thursday 14 March 2013

काय ठरलंय शेवटी?.....

काय ठरलंय शेवटी?.....

ओळखीचे, कामावरचे, शेजारपाजार,
लांबचे, जवळचे नातेवाईक काय म्हणतील?
तोंड दाखवायला जागा उरली नाही अगदी
मी म्हणते आमच्याच नशिबी कसं आलं हे?

एवढी मोठी घोडी झालीस, एवढ कळलं नाही?
सायन्स न शिकतेस? ''दोन'' महिने कळलं नाही?
आणि खाल्लस कधी हे शेण? क्लासच्या नावाखाली
की मैत्रिणींकडे अभ्यासाच्या नावाखाली?

डॉक्टरकडे नेउन आणा आधी, जाहिरात होणारच
कार्टे, निदान आपल्या जातीचा तरी आहे का?
त्यापेक्षा सरळ त्याच्या घरी जाऊयात आणि
वाट्टेल ते होवो दरवाज्यात सोडून येउयात
. . . . .

आई, मला फक्तं प्रतिक्रिया आणि त्यावर
निघालेला तोडगा बघायचा होता
असंच घडलंय सगळं, फक्तं माझ्या बाबतीत नाही
दादाच्या बाबतीत

मग, तुमचं काय ठरलंय शेवटी?


जयंत विद्वांस 


द्रोहपर्व

द्रोहपर्व

द्रोहपर्व : अजेय झणकर 

नारायणराव पेशव्यांच्या खूनानंतर नाना फडणीसांनी राघोबादादांच्या हातात जाऊन नाश होऊ पाहणा-या पेशवाईला वाचवण्यासाठी बुद्धीच्या बळावर केलेला आटोकाट प्रयत्न म्हणजे द्रोह्पर्व. नेहमीच्या वापरातल्या भाषेत हे पुस्तक आहे. हा या पुस्तकाचा मोठा गुण. त्या काळातील अलंकारिक, फडावर शोभणा-या राजकीय भाषेने वातावरण, ती गंभीरता तयार होते हे मान्य पण ही भाषा विषय पटकन जवळ आणते.  

ऐतिहासिक पुस्तकं वाचताना काही पात्रांबद्दल आपण आधी कुठे तरी वाचलेले असते त्यामुळे त्या प्रमाणे त्यांच्या बाबतीत आपली काही मतेही तयार झालेली असतात. सतत त्याला दुजोरा मिळेल अस वाचलं गेलं की ती ठाम होतात. मग अचानक त्या मतांना धक्का बसेल अस काही वाचलं की त्रास होतो. या पुस्तकात हे होतं. ज्यांनी स्वामी वाचली आहे त्यांना रमाबाइंच सती प्रकरण हा भाग हळवा करून जातोच. त्याला तडा देणारी विधानं इथे सापडतात. 

त्या काळातील राज्यकर्त्यांचा अतिधार्मिक आणि म्हणून दुबळा, भावनिक स्वभाव विषण्ण करतो. पानिपत वाचताना असाच मानसिक त्रास झाला होता. तोच इथेही होतो. इंग्रजांच्या शिस्तीमुळे, निर्णयक्षमतेमूळे, अधिकार आणि जबाबदा-या दोन्ही देण्याच्या वृत्तीमुळे त्यांनी राज्य केलं. त्या पार्श्वभूमीवर आपल्या राज्यकर्त्यांच्या चुका जास्तच उठून दिसतात. जग काय म्हणेल, पाप-पुण्य या गोष्टींचा पगडा, वैयक्तिक हेवेदावे, स्वार्थ, त्या पोटी राज्यं, राजा बुडाला तरी चालेल पण माझं भलं व्हायला हवं ही वृत्ती अजूनच विषण्ण करते. मराठयांच्या अधिपत्याखाली २/३ हिंदुस्थान होता हे खोटं तर नाही ना अशी शंका येते. अहिल्याबाई होळकर, महादजी शिंदे यांचं मोठेपण फार त्रोटक येत. त्यांच्यावरची पुस्तकं वाचल्याशिवाय ते कळणार नाही. 

लेखकानुसार, कादंबरी नायकानुसार काही गोष्टींचे मोठेपण, संदर्भ, महत्व  बदलतं. 'स्वामी' मधे तोतयाचा उल्लेख त्रोटक आहे तर 'शिकस्त' मधे पार्वतीबाई मुख्य असल्यामुळे सविस्तर चर्चा आहे. इथेही तोतयाचा उल्लेख आहे. पण मला एवढ्या पुस्तकातून तो खरच तोतया की भाऊसाहेब हे अजून ठाम ठरवता आलेलं नाही. काही मोघम उल्लेखांमुळे असेल किंवा ते भाऊसाहेबच असावेत अशी इच्छा आणि मग त्यानुसार पुढे येणारी तर्कसंगती आपल्याला आणि लेखकाला सुद्धा हवी असावी, कदाचित. 

त्याकाळातील खर्चाचे आकडे, राजकारण्यांचे शौक आणि त्यावरची उधळपट्टी वाचून हसू येतं. सैनिकांना द्यायला पगार नाही, वाट मिळेल तिकडे धावणारे राघोबा, सोबत मात्रं ६-७ नाटकशाळा हव्यातच. आपल्याकडे कधीतरी केलेल्या चांगल्या एकमेव कृत्याबद्दल आयुष्यभर कौतुक करणं हा दोष पिढ्यानपिढ्या चालत आलेला आहे. अटकेपार झेंडा या दोन शब्दांवर राघोबा आयुष्यंभर जगले. 'स्वामी 'मधे एकदाच माधवराव त्यांच्या अटकेपार झेंडा लावण्याचे, कर्जाचे वाभाडे काढतात. पण ते तेवढंच. खुशमस्क-या लोकांचा ताफा, आटोक्यात नसलेली विषयवासना, पूर्वीच्या किडूक मिडूक कर्तृत्वाचे सतत दाखले द्यायचे आणि राज्यं उपभोगायचे, इतके क्षुद्र विचार करणारी माणसं अनेक ठिकाणी आढळतात. पेशव्यांच्या इतिहासात जरा जास्तच. 

रामशास्त्री निस्पृह होते हे मान्य पण सजेच्या अंमलबजावणीच काय? खमक्या राजा नको? महाराजांनी उभ केलेलं साम्राज्य यांनी काही काळ लांबवल. त्यांचे वारसही निरुपयोगी निघाले आणि नेमलेलेहि. काही काळ टिकल ते काही मोजक्या पेशव्यांमुळे आणि काही हुशार कारभा-यांमुळे. वारस आपल्याच घरातला हवा मग तो नालायक असला तरी चालेल. वाडवडिलांनी जे कमावून ठेवलं आहे ते उपभोग घेण्यासाठी आहे, वाढ झाली काय न झाली काय, नाहीच जमलं तर पैसे घ्यायचे आणि हक्क विकायचे आणि उर्वरित आयुष्यं सुखासिनतेत जगायचं. (अजूनही हीच मानसिकता आहे, हा दैवदुर्विलास). 

हे पुस्तक वाचून हे सगळ असं विचार करायला लावणार, चीड आणणारं समजतं. आपल्या लोकांचा अजून एक दोष म्हणजे कुणी मोठा माणूस असला की त्याचे दोष हुडकायचे, त्याच्यावर चर्चा करायच्या, स्वतःची मतं घुसडून, तिखट मीठ लावून अजून बदनामी कशी होईल ते पहायचं आणि चांगल्या गुणांवर कर्तुत्वावर बोळा फिरवायचा. नाना फडणीस लंपट होते, दुबळे होते, पळपुटे होते, बायकोला आईला पानिपतावर सोडून पळून आले याचीच चर्चा जास्तं. ज्या धीरानी आणि बुद्धीनी त्यांनी पेशवाई टिकवली, इंग्रज लांब ठेवला, मराठे एकत्र ठेवले ते वाचण्यासारख आहे. पुस्तकात म्हटल आहे की नानांचा हेतू सफल झाला असता तर इंग्रजांच राज्यं भारतावर आल नसतं, पण ते व्हायच नव्हतं. शारीरिक दौर्बल्यामुळे ते मागे राहिले नाहीत, ती कसर बुद्धीने त्यांनी भरून काढली.

राघोबादादांची इंग्रजांकडे चालू असलेली लाचारी आणि कारभा-यांनी दाखवलेला संयम हा भाग मोठा वाचण्यासारखा आहे. नेपोलिअनवरच्या एका लेखात की पुस्तकात वाचलं  होतं - तो युद्धभूमीवर असला की आलेलं टपाल म्हणे आठवड्यानी उघडायचा, तो पर्यंत त्यातले बरेचसे प्रॉब्लेम सुटलेले असायचे. जलद न होणा-या हालचाली आणि निरोपाच्या देवाण घेवाणीला लागणारा वेळ यामुळे पारतंत्र्य बरंच उशिरा आलं असं आपल मला वाटत.  

बोरघाटातल्या शिंगरोबाच्या देवळाचा इतिहास कळतो. काल्पनिक पण पुस्तकाचा महत्वाचा भाग व्यापणारी काल्पनिक पात्रं पुस्तक रंजक करतात. रशियन लोकांनी जर्मन लोकांविरुद्ध वापरलेलं दग्धभू धोरण इथे किती तरी वर्ष आधी पेशव्यांच्या सैन्याने परिणामकारकरीत्या वापरलेलं आहे. इंग्रजांचा पराभव करून हे पुस्तक संपतं तो सगळा कथाभाग वाचनीय आहे. पुस्तकाचा शेवट थोडा फिल्मी आहे पण तो मूळ विषयाला बाधा आणत नाही. 

लेखक श्री.अजेय झणकर यांनी दिलेल्या संदर्भ ग्रंथांची यादी वाचूनच दडपायला होतं. या सगळ्यातून रंजक पण सत्य माहिती निवडून त्यांची गुंफण करण हे अतिशय कष्टाचं काम आहे याची जाणीव पुस्तक वाचताना होते. 

जयंत विद्वांस