Thursday 14 March 2013

द्रोहपर्व

द्रोहपर्व

द्रोहपर्व : अजेय झणकर 

नारायणराव पेशव्यांच्या खूनानंतर नाना फडणीसांनी राघोबादादांच्या हातात जाऊन नाश होऊ पाहणा-या पेशवाईला वाचवण्यासाठी बुद्धीच्या बळावर केलेला आटोकाट प्रयत्न म्हणजे द्रोह्पर्व. नेहमीच्या वापरातल्या भाषेत हे पुस्तक आहे. हा या पुस्तकाचा मोठा गुण. त्या काळातील अलंकारिक, फडावर शोभणा-या राजकीय भाषेने वातावरण, ती गंभीरता तयार होते हे मान्य पण ही भाषा विषय पटकन जवळ आणते.  

ऐतिहासिक पुस्तकं वाचताना काही पात्रांबद्दल आपण आधी कुठे तरी वाचलेले असते त्यामुळे त्या प्रमाणे त्यांच्या बाबतीत आपली काही मतेही तयार झालेली असतात. सतत त्याला दुजोरा मिळेल अस वाचलं गेलं की ती ठाम होतात. मग अचानक त्या मतांना धक्का बसेल अस काही वाचलं की त्रास होतो. या पुस्तकात हे होतं. ज्यांनी स्वामी वाचली आहे त्यांना रमाबाइंच सती प्रकरण हा भाग हळवा करून जातोच. त्याला तडा देणारी विधानं इथे सापडतात. 

त्या काळातील राज्यकर्त्यांचा अतिधार्मिक आणि म्हणून दुबळा, भावनिक स्वभाव विषण्ण करतो. पानिपत वाचताना असाच मानसिक त्रास झाला होता. तोच इथेही होतो. इंग्रजांच्या शिस्तीमुळे, निर्णयक्षमतेमूळे, अधिकार आणि जबाबदा-या दोन्ही देण्याच्या वृत्तीमुळे त्यांनी राज्य केलं. त्या पार्श्वभूमीवर आपल्या राज्यकर्त्यांच्या चुका जास्तच उठून दिसतात. जग काय म्हणेल, पाप-पुण्य या गोष्टींचा पगडा, वैयक्तिक हेवेदावे, स्वार्थ, त्या पोटी राज्यं, राजा बुडाला तरी चालेल पण माझं भलं व्हायला हवं ही वृत्ती अजूनच विषण्ण करते. मराठयांच्या अधिपत्याखाली २/३ हिंदुस्थान होता हे खोटं तर नाही ना अशी शंका येते. अहिल्याबाई होळकर, महादजी शिंदे यांचं मोठेपण फार त्रोटक येत. त्यांच्यावरची पुस्तकं वाचल्याशिवाय ते कळणार नाही. 

लेखकानुसार, कादंबरी नायकानुसार काही गोष्टींचे मोठेपण, संदर्भ, महत्व  बदलतं. 'स्वामी' मधे तोतयाचा उल्लेख त्रोटक आहे तर 'शिकस्त' मधे पार्वतीबाई मुख्य असल्यामुळे सविस्तर चर्चा आहे. इथेही तोतयाचा उल्लेख आहे. पण मला एवढ्या पुस्तकातून तो खरच तोतया की भाऊसाहेब हे अजून ठाम ठरवता आलेलं नाही. काही मोघम उल्लेखांमुळे असेल किंवा ते भाऊसाहेबच असावेत अशी इच्छा आणि मग त्यानुसार पुढे येणारी तर्कसंगती आपल्याला आणि लेखकाला सुद्धा हवी असावी, कदाचित. 

त्याकाळातील खर्चाचे आकडे, राजकारण्यांचे शौक आणि त्यावरची उधळपट्टी वाचून हसू येतं. सैनिकांना द्यायला पगार नाही, वाट मिळेल तिकडे धावणारे राघोबा, सोबत मात्रं ६-७ नाटकशाळा हव्यातच. आपल्याकडे कधीतरी केलेल्या चांगल्या एकमेव कृत्याबद्दल आयुष्यभर कौतुक करणं हा दोष पिढ्यानपिढ्या चालत आलेला आहे. अटकेपार झेंडा या दोन शब्दांवर राघोबा आयुष्यंभर जगले. 'स्वामी 'मधे एकदाच माधवराव त्यांच्या अटकेपार झेंडा लावण्याचे, कर्जाचे वाभाडे काढतात. पण ते तेवढंच. खुशमस्क-या लोकांचा ताफा, आटोक्यात नसलेली विषयवासना, पूर्वीच्या किडूक मिडूक कर्तृत्वाचे सतत दाखले द्यायचे आणि राज्यं उपभोगायचे, इतके क्षुद्र विचार करणारी माणसं अनेक ठिकाणी आढळतात. पेशव्यांच्या इतिहासात जरा जास्तच. 

रामशास्त्री निस्पृह होते हे मान्य पण सजेच्या अंमलबजावणीच काय? खमक्या राजा नको? महाराजांनी उभ केलेलं साम्राज्य यांनी काही काळ लांबवल. त्यांचे वारसही निरुपयोगी निघाले आणि नेमलेलेहि. काही काळ टिकल ते काही मोजक्या पेशव्यांमुळे आणि काही हुशार कारभा-यांमुळे. वारस आपल्याच घरातला हवा मग तो नालायक असला तरी चालेल. वाडवडिलांनी जे कमावून ठेवलं आहे ते उपभोग घेण्यासाठी आहे, वाढ झाली काय न झाली काय, नाहीच जमलं तर पैसे घ्यायचे आणि हक्क विकायचे आणि उर्वरित आयुष्यं सुखासिनतेत जगायचं. (अजूनही हीच मानसिकता आहे, हा दैवदुर्विलास). 

हे पुस्तक वाचून हे सगळ असं विचार करायला लावणार, चीड आणणारं समजतं. आपल्या लोकांचा अजून एक दोष म्हणजे कुणी मोठा माणूस असला की त्याचे दोष हुडकायचे, त्याच्यावर चर्चा करायच्या, स्वतःची मतं घुसडून, तिखट मीठ लावून अजून बदनामी कशी होईल ते पहायचं आणि चांगल्या गुणांवर कर्तुत्वावर बोळा फिरवायचा. नाना फडणीस लंपट होते, दुबळे होते, पळपुटे होते, बायकोला आईला पानिपतावर सोडून पळून आले याचीच चर्चा जास्तं. ज्या धीरानी आणि बुद्धीनी त्यांनी पेशवाई टिकवली, इंग्रज लांब ठेवला, मराठे एकत्र ठेवले ते वाचण्यासारख आहे. पुस्तकात म्हटल आहे की नानांचा हेतू सफल झाला असता तर इंग्रजांच राज्यं भारतावर आल नसतं, पण ते व्हायच नव्हतं. शारीरिक दौर्बल्यामुळे ते मागे राहिले नाहीत, ती कसर बुद्धीने त्यांनी भरून काढली.

राघोबादादांची इंग्रजांकडे चालू असलेली लाचारी आणि कारभा-यांनी दाखवलेला संयम हा भाग मोठा वाचण्यासारखा आहे. नेपोलिअनवरच्या एका लेखात की पुस्तकात वाचलं  होतं - तो युद्धभूमीवर असला की आलेलं टपाल म्हणे आठवड्यानी उघडायचा, तो पर्यंत त्यातले बरेचसे प्रॉब्लेम सुटलेले असायचे. जलद न होणा-या हालचाली आणि निरोपाच्या देवाण घेवाणीला लागणारा वेळ यामुळे पारतंत्र्य बरंच उशिरा आलं असं आपल मला वाटत.  

बोरघाटातल्या शिंगरोबाच्या देवळाचा इतिहास कळतो. काल्पनिक पण पुस्तकाचा महत्वाचा भाग व्यापणारी काल्पनिक पात्रं पुस्तक रंजक करतात. रशियन लोकांनी जर्मन लोकांविरुद्ध वापरलेलं दग्धभू धोरण इथे किती तरी वर्ष आधी पेशव्यांच्या सैन्याने परिणामकारकरीत्या वापरलेलं आहे. इंग्रजांचा पराभव करून हे पुस्तक संपतं तो सगळा कथाभाग वाचनीय आहे. पुस्तकाचा शेवट थोडा फिल्मी आहे पण तो मूळ विषयाला बाधा आणत नाही. 

लेखक श्री.अजेय झणकर यांनी दिलेल्या संदर्भ ग्रंथांची यादी वाचूनच दडपायला होतं. या सगळ्यातून रंजक पण सत्य माहिती निवडून त्यांची गुंफण करण हे अतिशय कष्टाचं काम आहे याची जाणीव पुस्तक वाचताना होते. 

जयंत विद्वांस 




No comments:

Post a Comment