Saturday 9 March 2013

मला निसटलच पाहिजे (मूळ पुस्तकाचं नाव - Long Walk )

मला निसटलच पाहिजे (मूळ पुस्तकाचं नाव - Long Walk )
निवेदन - स्लाव्होमीर राविझ
शब्दांकन - रोनाल्ड डाउनिंग
अनुवाद - श्रीकांत लागू 

सायबेरियातून निघून गोबीच वाळवंट, तिबेट, हिमालय अस ४००० मैल म्हणजे अंदाजे ६४३७ किलोमीटर अंतर कापून ते भारतात आले. टाईप करण्यासाठी एकदम सोप वाक्य आहे. पण अंतर पार करणं? साधारण एक वर्षभर लागलं त्यांना. कल्पना करा ६४३७ किलोमीटर ३६५ दिवसात ते ही लपत छपत, छे, बुद्धीच्या बाहेरच काम आहे. पुस्तकाच्या मलपृष्ठावर 'सपशेल खोटी वाटावी अशी खरी पलायन-साहसकथा' असं छापलंय, काहीही चुकीचं नाही त्यात. मनुष्य जिद्द, आशा, जगण्याची प्रचंड उर्मी, स्वातंत्र्याची भूक असली म्हणजे काय करू शकतो? अतर्क्य, अघटीत, अशक्यप्राय असं जे जे काही आहे ते सगळं करतो. आत्यंतिक भीतीमुळे, सगळेच मार्ग खुंटले की कमालीचं शौर्य निर्माण होतं अस म्हणतात. मांजर कोप-यात सापडलं की कसं समोरच्याच्या नरडीचा वेध घेतं तसं. तसच सुटका, स्वातंत्र्य, मायभूमीची ओढ, आपल्या माणसात परत जायचंच या उर्मिपोटी ते सातजण निघतात. 

असंही इथे मरणारच आहोत तर प्रयत्नं तरी करू सुटकेचा हे म्हणायला सोप आहे पण अपयशाच्या भीतीने, कल्पनेनेच माणूस जास्त खचतो आणि मग प्रयत्नच करत नाही. संकटात बरोबरच्या लोकांचा, ज्यांना आपण आपलं म्हणतो त्यांचा स्वभाव कळतो अस म्हणतात. कुठलंही नातं नसलेले ते सातजण कुठल्याही शपथा न घेता एकाच ध्येयानी प्रेरीत होऊन निघतात. रस्त्यात एक मुलगी सामील होते त्यांच्यात. ती ख्रिस्तिना  आणि इतर ३ जण रस्त्यातच प्राण सोडतात. वेळप्रसंगी ते हरीण, साप खातात, घोडा खायचा असतो पण त्याचा मालक येतो नेमका. त्यांना संपूर्ण प्रवासात कुणीही आडवत नाही एवढी एकच गोष्ट त्यांच्या बाजूची आहे. सात पुरुष कडेला असताना त्यांच्या बरोबर आत्मविश्वासानी जाणारी ख्रिस्तिना आणि तिचा विश्वास खोटा  न ठरवणारे ते सात जण यांच्याशी आपण नकळत जोडले जातो. स्त्री सोबत असल्यामुळे असेल, एका प्रेरणेनी तिची जिद्द खचू नये म्हणून ते निराशावादी बोलत नाहीत. तिचं अस्तित्व त्यांना मदतच करतं , अडचण ठरत नाही. 

त्यातली काही वाक्यं, वर्णनं वाचताना ती बघत आहोत अशी कल्पना केली तरी अंगावर काटा येतो 

१) साठ फूट जाडीच्या कु-हाडीनं भगदाड पाडावं तसा तो डोंगर दुभंगला. (अचानक)  
२) आठ फूट उंचीचे दोन केसाळ चौकोनी डोक्याचे हिममानव त्यांना आडवे गेले.  
३) अंगावरचं बर्फ कित्येक आठवड्यानंतर वितळवलं 

१९३९ सालची गोष्टं आहे, नशीब इंटरनेट, मोबाईल वगैरे नव्हतं, नाहीतर ते लगेच ट्रेस झाले असते, काहीवेळेस तंत्रज्ञानाचा पण तोटा होतो ह्याचीही गम्मत वाटते.  दुर्दैवाने रोनाल्ड डाउनिंग या वार्ताहरामुळे फक्त स्लाव्होमीर राविझ जगापुढे आला, बाकी वाचलेल्यांपैकी इतर कुणाचाच पत्ता लागला नाही, श्रेय, प्रसिद्धी मिळायला पण नशीब लागत हेच खर. अशा प्रसिद्धीला न आलेल्या, पण घडलेल्या अजूनही गोष्टी असू शकतील, प्रत्येक जण लिहिलच असही नाही, कदाचित त्यांना मदत करणा-या लोकांची नावं त्यात आली तर त्यांना त्रास होऊ नये हा ही हेतू असू शकतो.

जयंत विद्वांस
 
 

1 comment: