Friday 13 March 2015

the vulture is a patient bird - James Hadley Chase

खूप दिवसांनी चेस वाचला. ८३-८४ च्या आसपास भानू शिरधनकर यांचं याचंच अनुवादित 'गिधाडांची जातच चिवट' वाचलं होतं. स्टोरी लक्षात अजिबात नव्हती पण चेस वाचावा असं याच पुस्तकामुळे डोक्यात फिट्ट बसलं होतं. 'शेवटपर्यंत चेस खिळवून ठेवतो' या वाक्यात नाविन्यं काहीही नाही. कृष्णा शाहच्या 'शालीमार' पिक्चरची थीम यावरून घेतली असावी असं वाटतंय. फक्तं एंड वेगळा. मानवी स्वभावाचे नमुने पेश करण्यात चेसचा हातखंडा आहे, एकाच माणसाची बदलती रूपं तो सरस दाखवतो. पुस्तकाचा एंड फास्ट उरकल्यासारखा आहे, १९६९ म्हणजे कदाचित त्याच्या सुरवातीच्या काळातलं पुस्तक असावं असा माझा समज आहे. 

पांगळा अब्जाधीश स्वतचं अंडरग्राउंड म्युझिअम राखून आहे. शे एकरात पसरलेली इस्टेट, तिचा सांभाळ करणारे झुलू, इलेक्ट्रानिक करामती असलेलं म्युझिअम  (तेंव्हा ६९ ला सी.सी.टी.व्ही.म्हणजे इंग्रज खरंच प्रगत होते) आणि त्यात ठेवलेल्या अनेक मुल्यंवान वस्तूंपैकी एक सीझर बोर्गिया अंगठी. जिच्यामध्ये विष भरता येतं आणि हस्तांदोलन करताना समोरच्याला ते टोचून जीवे मारता येतं. यानेही ही रिंग चोरलेलीच आहे. मूळ मालकाला ती परत ताब्यात हवीये. 

अर्मो शालिक कडे ते काम आलंय. तो चौघांची टिम तयार करतो. प्रत्येक पात्रं कोरून काढल्यासारखं चेस उभं करतो. ती माणसं आपल्या ओळखीची आहेत, आपण त्यांना कुठेतरी पाहिलेलं आहे (चेह-यानी नाही, गुणावगुणांनी) असं वाटू लागतं. नेहमीप्रमाणे एक कमनीय बाई आहे, दिलदार मित्रं आहेत, गुलामगिरी भिनलेले आहेत, उलट्या काळजाचे लोक आहेत जे एखाद्या क्षणी हळवे होतात आणि आपल्यालाही हळवं करतात. तर इथेही चेसच्या ब-याच पुस्तकांप्रमाणे वेलप्लान्ड उद्योग सक्सेसफुल होत नाही. पण गंमत त्यात नाहीये . 


ते चौघं चोरी करायला येणार हे त्या विक्षिप्त माणसाला आधीच माहित असतं, मग सुरु होतो उंदीर मांजराचा खेळ. तो त्यांना प्रवेश करू देतो पण जाणं त्याच्या मर्जीनुसार आहे. रिंग घेऊन जायची परवानगीही देतो आणि मग सुरु होतो पाठलाग. इन्कारमधे कसा अमजद पळतो आणि मागे विनोद खन्ना त्या धर्तीवरचा. कुणाच्या नशिबात काय लिहून ठेवलंय हे सांगता येत नाही. काहीही घडणार नाही याची खात्री असताना अनपेक्षित काहीतरी घडेल या आशेवर तर आपण जगत असतो. किती मरतात, किती जगतात? रिंग कुणाला मिळते? ज्याला मिळते त्याला लाभते? कुणाचं भाग्यं फळफळतं? 'But Reader is a IMpatient Bird' वाचकांची जातच चिवट. :)  

--जयंत विद्वांस

Monday 9 March 2015

वन्स अपॉन अ टाईम (१३).....

शस्त्रानी दाखवली जाते ती भीती आणि नजरेने बसते ती दहशत. तो तसाच होता. त्याच्या पळण्यात, तिरक्या बॉलिंग रनपमधे दहशत होती. त्याचा बाउंसर खतरनाक होता. साडेसहा फुटाच्या वेस्टइंडियन बॉलरमधे हा पाच फूट अकरा इंच म्हणजे बुटकाच वाटायचा. माल्कम मार्शलचा राग येईल इतका तो फास्ट होता. एवढं असूनही भारतीयच नव्हे तर समस्तं क्रिकेट जग अजूनही वेस्टइंडियन क्रिकेट बद्दल ममत्वं राखून आहे कारण जिगरबाज, खुल्या दिलाची माणसं होती ही सगळी. खेळाची मजा लुटणारे फक्तं तेच एक होते, बिनधास्तं खेळायचे सगळे. 
 
१९८३च्या वर्ल्डकप पराजयानंतर विंडीज आपल्याकडे आलेली. धुमसत होते नुसते, वर्ल्डकपची हातातोंडाशी आलेली ह्याट-ट्रिक आपल्यामुळे गेली होती. आपल्या गल्लीत येउन त्यांनी आपल्याला मरेस्तोवर मारले अगदी. त्यांनी पाच टेस्टमधे ३-० (दोन अनिर्णीत) आणि वनडेमधे ५-० धुतलं आपल्याला. माणसाची महानता आकड्यांवर कधी बघू नये, समोर कोण होतं, परिस्थिती काय होती त्यावर ठरवावी. महानता समजण्यासाठी, उजेडात येण्यासाठी प्रतिस्पर्धी पण तगडा असावा लागतो, तुमची महानता उजळायला त्याची मदतच होते. गावसकर विंडीजचा त्याअर्थानी ऋणी आहे, असायला हवा. गावसकरनी दिल्लीला ब्र्याडमनला इक्वल केलं होतं त्या सिरीजला आणि मद्रासला ओव्हरटेक. इक्वलचं एकोणतिसावं शतक मी पाहिलंय. हेल्मेट नाही, मार्शल राउंड द विकेट यायचा. गावसकरनी ब-याच कालावधीनंतर हूक मारत चौकार मिळवले होते. स्वत:च्या स्टाईलला काळिमा फासत त्यानी ९४ चेंडूत शतक काढलं होतं (त्याचं सगळ्यात जलद). समोर वेन ड्यानिअल, विन्स्टन डेविस, होल्डिंग आणि मार्शल. मार्शल, होल्डिंग समोर जलद शतक काढणं म्हणजे खायचं काम नाही. गावसकरला इझीली मिळालं नाही म्हणून तो महान आणि ते इझीली मिळू दिलं नाही म्हणून तेच मार्शललाही लागू. 

त्या दौऱ्यात त्यानी ३३ विकेट्स घेतल्या. फक्तं बाउंसर टाकून विकेट नाही मिळत. तो दोन्ही स्विंग, इनस्विंगिंग यॉर्कर, लेगकटर पण टाकायचा. आधी तो तिरका रनप, मग वेग, मग स्विंग. आउट होणं किंवा धाव घेऊन समोर उभं रहाणं या दोन गोष्टीच सुखकारक होत्या. एकतर त्या टीममधे चार ते पाच आग्यावेताळ एकावेळी खेळायचे, त्यात दुस-याला पडायच्या आधी डल्ला मारल्यासारख्या विकेट पदरात पाडून घ्याव्या लागायच्या. न कुथता त्यानी ८१ टेस्ट मधे ३७६. १३६ वनडेमधे १५७ आणि फर्स्ट क्लास मधे २१७२ विकेटस काढल्यात. वाचून छाती दडपायला होते. त्याच्या डेब्यू म्याचला तो ब्याटिंग करत असताना वेंगसरकर स्लीप मधून काहीतरी लागेल असं त्याला बोलला, ती खुन्नस त्याने जाहीरपणे शेवटपर्यंत ठेवली. तो पळत यायचा तेंव्हाच जीव घेतो की काय फलंदाजाचा असं वाटायचं. माईक ग्याटिंगचं नाक मोडलं होतं त्यानी बाउंसरवर, मार्शलला त्याच्या नाकाच्या हाडाचा तुकडा चेंडूला चिकटलेला  मिळाला असं वाचलंय.


पण माणूस चांगला होता. तेंव्हा बंदी असलेल्या दक्षिण आफ्रिकेला जाणा-या बंडखोर विंडीज टीममधे सहभागी होण्यासाठी दहा लाख युएस डॉलर्स नाकारणारा मार्शल. त्याला कर्करोग झाला. शेवटी चार नोव्हेंबर नव्याण्णवला वयाच्या अवघ्या एक्केचाळीसाव्या वर्षी तेंव्हा कसबसं पंचवीस किलो वजन भरेल असा नशिबापुढे हतबल झालेला बावीस यार्डातला टेरर माल्कम मार्शल शेवटचा आउट झाला. 
 
--जयंत विद्वांस

वन्स अपॉन अ टाईम (१२).....

क्रिकेटवर प्रेम करणा-या लोकांना हेरोल्ड डेनिस बर्ड एवढ्या नावावरून अंदाज येईल कोण असेल ते पण 'डिकी' बर्ड म्हटलं की तो टोपी घातलेला सज्जन अंपायर कसा झटकन डोळ्यासमोर येतो. अम्पायरिंग हा खरं तर थ्यांकलेस जॉब. पण डिकीनी मिळवलेला रिस्पेक्ट फार कमी जणांनी मिळवला. डिकीनी आउट दिलंय म्हणजे असणारच आउट असं फलंदाजाला वाटायचं यातच सगळं आलं. त्याच्याच देशाचा १११, २२२, ३३३ धावसंख्येला नेल्सन अशुभ म्हणून विचित्र उडी मारणारा डेव्हिड शेफर्ड, सायमन टोफेल, स्वरूप किशन, अलीम दर, कुमार धर्मसेना हे जे चांगले अंपायर आहेत ना ते सगळे स्वत: क्रिकेट खेळलेले आहेत. त्यामुळे त्यांना अपील केल्यावर त्यातला खरेखोटेपणा लवकर उमगत असावा. 

आज ८१ वर्षाचा हा तरुण बुजुर्ग आहे. क्रिकेटचा एवढ्या वर्षांचा काळ बघितलेला तो एकमेव जिवंत माणूस असावा. अकरावी नंतरच्या परीक्षेत तो फेल झाला आणि स्पोर्ट्स मधे करिअर करायचं त्यानी ठरवलं. गुडघ्याच्या दुखापतीमुळे त्याला फुटबॉल सोडून क्रिकेटकडे वळावं लागलं. यॉर्कशायरकडून फलंदाज म्हणून तो खेळला. अंपायर व्हायच्या आधी लीग क्रिकेट आणि कोचिंगचा उद्योगही त्यानी केला. संघाचे लोक प्रचारा करता जसे अविवाहित रहातात तसाच हा बर्ड. क्रिकेट प्रेमापोटी अविवाहित राहिला. त्याच्या श्वासात, धमन्यात क्रिकेट वहायचं फक्तं. त्याला पुढे ऑनररी डॉक्टरेट, मेंबर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटीश एम्पायर आणि ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटीश एम्पायर असे सन्मानही मिळाले. त्याचा जन्मस्थानाजवळ त्याच्या सन्मानार्थ त्याचा पुतळाही उभा केला गेलाय.        

एरवी बस मधे रोज भेटणारा कंडक्टर, पोलिस, सिक्युरिटी गार्डस आपल्याला रोज युनिफॉर्ममधे बघायची  झालेली असते. त्यांची जागा सोडून ते दुस-या पेहरावात दिसले की आपल्याला पटकन ओळखता येत नाही. पहिल्या वर्ल्डकप नंतर एकदा बसमधून जात असताना डिकीला कंडक्टरच्या डोक्यावर त्याची टोपी दिसली. त्यानी त्याला विचारलं कुठे मिळाली तुला ही टोपी? त्याचं उत्तर मोठं गंमतीशीर होतं "डिकी बर्ड नाव ऐकलंयेस कधी? मी त्याच्या डोक्यावरून काढून घेतली ती. वर्ल्डकप फायनलला आम्ही सगळे मैदानावर पळालो आणि येताना मी शर्यत जिंकलो". कुणालाही आवडेल अशी चोरी होती ती. क्रिकेटचं पावित्र्यं, सभ्यता जपणारा खराखुरा इंग्रज होता तो. सत्तेनी, ताकदीनी निर्माण झालेला दबदबा कायम रहात नाही पण कर्तुत्वानी दबदबा निर्माण झाला की तो चिरंतन असतो, डिकीचा दबदबा तसा आहे. चिरंतन टिकणारा. 

आपल्याला सगळ्यात जास्ती जी गोष्टं करायला आवडते, ती आता उद्यापासून करता येणार नाही म्हणजे एकप्रकारे मरणाची सेमिफायनलच ती. १९९६ ला भारत इंग्लंड मधल्या पहिल्या टेस्टला त्याच्या साहसष्ठाव्या टेस्ट मधे शेवटचा उभा रहाण्यासाठी तो बाहेर आला तेंव्हा दोन्ही टीमनी त्याला गार्ड ऑफ ऑनर आणि प्रेक्षकांनी उभे राहून मानवंदना दिली त्यावेळेस या इंग्रज रामशास्त्र्याच्या डोळ्यात पाणी तरळलं. आक्रमक अपील केल्यावर भेदरलेले अंपायर बघितले की तू आठवतोस. तू नाही म्हणाल्यावर परत ओरडायची, नाखुशी दाखवायची हिंमत व्हायची नाही गोलंदाजाची.  एकूणच तो जंटलमन गेम आता 'गेम' झालाय. आमचं भाग्यं आम्ही तुला थोडं बघितलंय, तुझ्या बदल वाचलंय ते. 

मैदानाबाहेर आयुष्याची सेन्चुरी मारशीलच तू. अर्थात 'त्या' अंपायरचं बोट वर झालं की संपलं सगळं, संघ अडचणीत असो नसो, आपली खेळी संपली की ब्याट काखेत मारायची आणि निघायचं, एवढंच आपल्या हातात.  

--जयंत विद्वांस

Wednesday 4 March 2015

लल्याची पत्रं (२०) ..... जिया बेकरार है.....

लल्यास,

खूप दिवसात पत्रं नाही जमलं. काल असंच च्यानल बदलता बदलता अख्खी 'निम्मी' दिसली आणि ठेचाळल्यासारखा तिथेच थांबलो. 'बरसात'चं 'जिया बेकरार है' लागलं होतं. राजकपूरला त्याचा एका हातावर नर्गिस आणि एका हातात व्हायोलीन हा सिम्बॉल सापडला तोच 'बरसात'. उत्खनन केल्यावर जुनी शहरं, तिथली भांडी, शस्त्रं सापडतात तसं ही गाणी सापडतील शेकडो शतकांनी कुण्या नशीबवान माणसाला. तो काम थांबवून वेड लागल्यासारखी ती ऐकत बसेल आणि वेडा होईल. पण गंमत म्हणजे त्याचं मूल्यंमापन तेंव्हाचे पुरातत्वशास्त्रज्ञ कुठल्या निकषांवर करतील असा मला प्रश्नं आहे.

तेंव्हाची गाणी सुंदर का व्हायची माहितीये का तुला? ते लोक एरवीही एकत्रं असायचे, गप्पा मारायचे, कुणाला काहीतरी सुचून जायचं आणि अफलातून काहीतरी घडायचं. राजकपूर हा मुळात अड्डाप्रिय माणूस, तो स्वत: सुंदर गायचा, अकोर्डीयन, व्हायोलीन वाजवू शकायचा त्यामुळे त्याची गाणी इतरांपेक्षा सरस असायची, होती, रहातील (जाने कहा…. ची ट्यून त्याचीच होती). त्यानी जमवलेली सगळी रत्नं होती, सगळं चांगलं आपल्या चरवीत त्यानी हुशारीनी ओढून घेतलं. योग जुळून आले होते हेच खरं, घटकपदार्थ तेच असले तरी आचा-याचं कसब असतंच चव येण्यासाठी. राजकपूर हा संजीव कपूर होता. पहिल्या पहिल्यांदा तो चविष्ट पदार्थ बनवायचा, जोकरच्या अपयशानंतर तो आकर्षक, स्पायसी बनवायला शिकला. 

बरीचशी गाणी लोकगीतातून यायची पहिल्यांदा, तो ग्रामीण गोडवा पॉलिश झाला की अजून देखणा दिसायचा. त्यांच्या चालीही लोकगीतांवर आधारित असायच्या (हृदयनाथ, आरडी, सलील चौधरी, शंकर जयकिशन सगळेच माहीर होते यात) इन्ही लोगोने, रंग बरसे, पान खाओ सैय्या हमारो ऐक, कसा कच्च्या कैरीचा फील आणतात ते. तर रिकाम्या वेळात शंकर एक पंजाबी लोकगीत म्हणत बसला होता 'अम्बुआकी पेड है, छाई मुंदेर है, आजा मोरे बालमा, तोरा इंतजार है'. त्या लोकगीतातली चव आरकेनी नेमकी ओळखली. सिद्धहस्तं हसरत जयपुरीनी पहिली ओळ बदलली फक्तं आणि पुढे ओघवतं, सुटसुटीत, अर्थपूर्ण गाणं लिहीलं. संपूर्ण गाण्यात बदरिया, बलमवा आणि आनेवाले एवढे तीनच शब्दं चार अक्षरी आहेत, बाकी सगळे एक, दोन, तीन अक्षरी. बाकी गाण्यात न कळण्यासारखं अवघड काहीही नाहीये. सिंपल, स्ट्रेट फ्रॉम द हार्ट, हल्ली दुर्मिळ झालेला भोळं भाबडं गाणं.
  
इथे 'तुझको नज़रे ढूँढ रही हैं, मुखड़ा तो दिखला जा, रस्ते पर हूँ आस लगाये, आनेवाले आ जा' मधे जी आग, विरह, ओढ आहे तीच आग 'मौसम है आशिकानाच्या' 'ऐ दिल कहिसे उनको ऐसेमें धूंड लाना' मधे होती बघ. 'सुहाग'मधलं 'अठरा बरस की तू होनेको आई' आठवतंय?  त्यातल्या मेरे घुंगरू सलामत, हजारो कदरदान है, एक तू ही नही दिलमें, लाखो मेहमान है' ला या गाण्याची चाल आहे. असे तुकडे ऐकताना जाम मजा येते. मागे म्हटलं होतं बघ तुला 'मुकद्दर का सिकंदरच्या' 'दिल तो है दिल' मधे कडवं संपलं की 'ये दोस्ती' एवढंच वाजतं आणि 'ये दोस्ती' संपताना तिसरी मंझीलचं 'आहा आजा' माउथऑर्गन वर वाजतं. चल, पुढच्या पत्रापर्यंत बाय, तोपर्यंत ऐका 'जिया बेकरार है'

-- जयंत विद्वांस

--------------------------------------

जिया बेकरार है, छाई बहार है
आजा मोरे बालमा, तेरा इंतजार है

सूरज देखे, चंदा देखे, सब देखे हम तरसे
जैसे बरसे कोई बदरीया, ऐसे अखियाँ बरसे

नैनों से एक तारा टूटे, मिट्टी में मिल जाये
आँसू की बरसात बलमवा, दिल में आग लगाये 

तुझ को नज़रे ढूँढ रही हैं, मुखड़ा तो दिखला जा
रस्ते पर हूँ आस लगाये, आनेवाले आ जा
(बरसात, हसरत जयपुरी, शंकर जयकिशन, लता मंगेशकर)