Wednesday 15 October 2014

पितळी डबे.....

पितळी डबे.....
१९७९/१९८० साल असेल. वडिल दुकानात होते तेंव्हा. चितळे कुटुंब राहायचं डेक्कनला. चितळे आजी आल्या एका सकाळी. म्हणाल्या, ' माझे पितळी डबे वजन करायचेत, आणू का? साहजिकच आश्चर्य वाटलं. डब्याचं वजन का? मोडीत काढण्याची परिस्थिती असण्याची सुतराम शक्यता नाही. त्यांनीच उलगडा केला. त्यांचा मुलगा अमेरिकेला स्थायिक झाला. आई वडील पण कायमचे तिकडे निघाले. घरातल्या चमच्यांपासून ते मोठया वस्तूंपर्यंत सगळं विकायला काढलेलं. पैसे करणं यापेक्षा योग्यं, गरजू व्यक्तीला त्या मिळाव्यात हा स्वच्छ हेतू होता.
वडिल म्हणाले, मी घेतले डबे तर चालेल का? 'घ्या की, माहितीच्या माणसाला दिले तर मला जास्तं बरं वाटेल'. बावीस रुपये किलो मोडीचा भाव होता. त्यावेळेस ते पैसे सुद्धा उसने घेऊनच दिले असणार याची खात्री आहे. तो सोनेरी खजिना रिक्षानी घरी आणण्याचीही परिस्थिती नव्हती. सायकलवर आणले वडिलांनी एकेक करून.

त्यात एक कडीचा डबा आहे, आजपर्यंत कडी तसूभरही हललेली नाही. एक फुलं ठेवण्यासाठी सगळीकडून भोकं असलेला डबा आहे. सगळी होल्स एकसमान अंतरावर आहेत. प्रकाशात धरल्यावर मस्तं आकृत्या उमटतात. कपभरच पाणी बसेल अशी दोन सुबक झाकणा सहीत छोटी ठोक्याची पातेली त्यांनी वजन न करता तशीच दिली. माझ्या दोन्ही चुलत बहिणी त्यावर भातुकली खेळल्या. पातेली आहेत तशी आहेत.

आमच्याकडे आल्यास त्याला आजपर्यंत कल्हई केलेली नाही कारण ती शाबूत आहे. एकही डबा, झाकण तिरळलेलं नाहीये. डब्यावर 'लक्ष्मीबाई चितळे, १९४०' असं गोंदलय. आधीची माणसं काय, वस्तू काय, दोन्ही भक्कम. निर्जीव वस्तूंवर मायेचा सजीव हात फिरायचा आणि ती वस्तूही जबाबदारी असल्यासारखं सोबत करायची. आम्हांला देताना त्यांचा जीव किती गलबलला असेल माहित नाही, कुणी सांगावं, वडिलांच्या डोळ्यात दिसलं असावं कदाचित 'मी जपेन, विकणार नाही' असं. जिवंत असलो २०४० पर्यंत तर शतकोत्सव करायची इच्छाही आहे. आई, वडील नसतील कदाचित तोवर, लक्ष्मीबाई चितळे नसतीलच आत्ताही पण 'लक्ष्मीबाई चितळे, १९४०' हे मात्रं पुसटसं का होईना निश्चित असेल. 

बेघर झालेल्या वडिलांना कदाचित त्यांचं हरवलेलं जग त्यात दिसलं असावं. बोलता बोलता एकदा म्हणाले, ' दोन माणसं समोरासमोर बसून आंघोळ करू शकतील एवढं मोठ्ठ घंगाळं होतं घरी' आणि गप्पं झाले. गेलेली माणसं आणि वस्तू परत मिळत नाहीत, त्यासदृश जे असेल ते जपणं फक्तं आपल्या हातात आहे, हेच खरं. 

जयंत विद्वांस 


5 comments:

  1. छान लिहिलेत.
    मन जुन्या काळात गेले.
    पितळी भांड्यांना कल्हई लावताना पाहणे हा एक उत्सव असायचा तेंव्हा

    ReplyDelete
  2. Very Nostalgic..and sensible..

    ReplyDelete