Friday 31 October 2014

शिकार.....

शिकार..... 

जिवाच्या आकांतानी सैरावैरा पळतोय मी, अर्धा तास झाला. मेलेलं परवडलं पण यमाच्या झडपेची वाट बघणं फार वाईट. पुढे पळताना अंगावर त्याची सावली पडली तरी थरकाप होतोय, त्राण जातात हातापायातले. एकदा डोळे मिटून जागीच थांबलो मेल्यासारखा, त्याला दया येईल ही आशा किंवा मेलो तर या ताणातून सुटका तरी होईल अशी भितीयुक्त आशा. पण तो क्रूर आहे. गोल रिंगण केलंय त्यानी भोवती, काठावरून उडी मारून मी सुटू शकतो खरंतर पण मांजर जसं उंदराला खेळवत मारते ना तसा तो मला मानसिक खच्ची करतोय आधी मग मी गलित गात्रं झालो की एका घावाची गरज फक्तं. तो मला पळू देतो, मला वाटतं सुटकेपासून मी बोटभर लांब आहे फक्तं, मनातल्या वाढत्या आशेनी सुटकेचा किरण दिसतो, जवळपास मी अठ्याणव टक्के भिंत चढलेली असते, कडेवरून उडी मारायची, दोन चार हाडं मोडली तरी चालतील इतपत माझी तयारी आहे. मग तो परत मला बखोटीला धरून मूळ जागी आणून ठेवतो. तावडीतून सुटलो की जिवाच्या आकांतानी पळेन. कुठल्याही आडोशाला निदान क्षणिक सुटकेचा का होईना श्वास घेईन. अशी आशा मातीमोल होते. 

असं काय चुकलंय माझं खरंतर? मी दुर्बल आहे त्याच्यापेक्षा, ही चूक आहे? दुर्बलांनी असंच मरायचं? कुणाची इच्छा झाली की. आपण त्याला त्रास दिला असो नसो, त्याला वाटलं की संपलो आपण. शब्दश: माझ्या डोळ्यात दाटून आलेले प्राण त्याला दिसत नाहीयेत? काय मिळतंय त्याला असं करून? असुरी आनंद की विकृत आनंद? मला सोडून दिलं तर काय मिळणार म्हणा त्याला. मी निष्कांचन आहे, परतफेड, खंडणी असं काहीही देऊ शकत नाही. नुसते मनापासून आभार मानेन, चांगलं चिंतेन त्याचं. पण अशा गोष्टींना कुठे किंमत आहे हल्ली. 

आणि समजा बाजू उलट्या असत्या तर? निश्चितच मी नसतं असं केलं. मी कशाला त्याच्या वाटेला गेलो असतो आणि मारायचं तर मारून टाकलं असतं, असं खेळवत नसतं मारलं मी. पण हे सगळे विचार म्हणजे वंध्यामैथुन आहे. शक्तीहीन, असहाय्य व्यक्तिच्या रुदनाला रडगाणं म्हणतात हे माहितीये मला. कुणाच्यातरी जिवाशी खेळ हा दुस-यासाठी आनंदाचा विषय होऊ शकतो. माझंच नशिब फुटकं, पण मी प्रयत्नं सोडणार नाहीये. शेवटचं एकदा जीवाच्या आकांतानी धावेन म्हणतो.

****   
"आदित्यं, अभ्यासाला बस बरं का, अर्धा तास झालाय त्या मुंगळ्याशी खेळतोयेस तू आणि उगाच मारू नकोस त्याला, बागेत नेउन सोड."
"हो, सोडतोय, ओरडू नकोस गं सारखी"
जयंत विद्वांस 


No comments:

Post a Comment