Wednesday 24 August 2016

मैं तो आरती उतारू रे...

इसब, गजकर्ण या त्वचारोगात अंगाला प्रचंड कंड सुटते. त्यात पण ओला आणि कोरडा प्रकार असतो. एकदा खाज सुटली की माणूस थांबू शकत नाही, रक्तं आलं तरी चालेल पण खाजवावंच लागतं. तसा एक साहित्यइसब किंवा गजकर्ण आजार फेसबूक आणि इथून कॉपी पेस्टून व्हॉट्सॅपवर पसरला आहे. काही दिवसांनी इये मराठीचिये नागरी वाचक कमी आणि साहित्यिक जास्ती असा प्रकार होण्याची शक्यता आहे. मूळ हेतूचा पुढे कसा विपर्यास होतो किंवा कसे विभत्स स्वरूप पहायला मिळते याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे पुण्याचा गणेशोत्सव. तद्वत मार्करावांनी दिलेल्या उमटायच्या संधीचं झालं आहे. यात गंमत म्हणून काही ना काही स्टेटस टाकत रहाणारे, मजा घेणारे लोक येत नाहीत. जे वैद्य शिरवाडकर काढा (किंवा इतर कुठल्याही साहित्यिकाचा काढा) पिऊन इथे साहित्यिक होऊन पोट साफ करतात त्यांच्याबद्दलही हे मत नाही. हे मत आहे त्यावर लाईक, कॉमेंटचा जोगवा मागणा-यांविषयी. माणसं आपल्याला झेपेल ते का करत नाहीत? बांबू आहे म्हणून बायका लगेच पोलव्हॉल्ट करायला जातात का? उलट थोडा कापून धुणं वाळत घालायची काठी करतील. 

पाच वर्षांमागे मी फेसबुकावर आलो तेंव्हा खेड्यातलं पोर शहरात आलं की अचंबित नजरेनी सगळीकडे बघतं तशी माझी अवस्था होती. लोकांचे विचार किंवा साहित्यं वाचून मला न्यूनगंड यायचा. मुळात कविता किंवा इतर वाचन ही कमी असल्यामुळे हे चौर्यकर्म वगैरे आहे का हे समजायचं नाही. सदगदित व्हायचो अगदी. फेअर अँड लव्हलीची जाहिरात बघून काळी मुलगी जशी स्वप्नाळू होते तसा मी स्वप्नाळू व्हायचो. मला कधी जमेल असं लिहायला असं वाटायचं. पूर्वसुरींचा प्रभाव लिखाणावर असण्यात गैर काहीही नाही. आपली वाट सापडेपर्यंत त्या पाऊलवाटेवर चालण्यात कमीपणा नाही. पण चोरकाम वाईट. क्षणिक प्रसिद्धी आणि वाहवा मिळवून काय फायदा. एकदा पोस्ट टाकल्या टाकल्या मिनिटात एकाला तो व्हॉट्सॅपवर नाव काढून आल्याचं त्यानी मला सांगितलं. नाव काढून काय मिळतं? ना स्वतः:ला क्रेडिट ना दुस-याला. मग यात आनंदाचा भाग काय आहे? तर वाचणारे ते त्यानीच लिहिलंय असं समजून कौतुक करतात आणि टाकणारा 'नरो वा कुंजरो वा'च्या धर्तीवर फक्तं स्मायली किंवा धन्यवाद देतो. अशी होते सुरवात स्वआरतीची. 

तेंव्हा मी काहीही लिहीत नसल्यामुळे असेल पण एक अत्यंत हळवं, तरल वगैरे काव्यं लिहिणारी डबलग्राज्वेट कवयित्री माझ्या प्रेमात पडली होती पाच वर्षांपूर्वी. भेट वगैरे व्हायच्या आधीच तो अध्याय संपवला (त्यावर चर्चा नकोय). तर तेंव्हा तिचे दोनोळी किंवा चारोळी मेसेज यायचे. एकदा अशाच दोनोळी आल्या, सुरेख होत्या. हल्ली जमतंय तिला असं वाटून गेलं मला. मग एका समूहावर पर्दाफाश केला एका जाणकार माणसानी. इलाही जमादारांची एक गझल बाईंनी खाली स्वतःचं नाव कसं दिसतं हे बघण्यासाठी असेल पण स्वतः:चं नाव लावून पोस्ट केली होती. त्यावर तो माणूस तुटून पडला. मग सिरिअल किलरचा एक खून सापडल्यावर बाकी खून जसे पटापट उघडकीला येतात तशा तिच्या इतर चो-या लोकांनी उकरून काढल्या. मग तिनी जो पळ काढलाय तो आजतागायत, अर्थात दुस-या कुठल्या नावानी, फोटोनी दुकान चालू असेल तर सांगता येत नाही. काय मिळालं  या सगळ्यातून, माहित नाही, क्षणिक आरत्या झाल्या, एवढंच. काय समाधान मिळत असेल खोटेपणाचं हे मला कोडंच आहे. 

ग्रहणात मागितलेल्या दानासारखी लोक प्रशंसा, कौतुक मागत फिरतात तेंव्हा कीव येते. मागे एका व्हॉट्सॅप ग्रुपात होतो. एक उच्चशिक्षित मेंबर होता. बरं लिहायचा. मग त्याची तेवढीच उच्चंशिक्षित बायको सामील झाली. मग याच्या पोस्टी पण वाढल्या आणि एक दिवस त्याचा मेसेज आला, 'जरा कौतुक कर ना पोस्टचं, बायको पण वाचेल म्हणजे'. माणसं नि:शब्दं करतात :P . प्रॉडक्शनलाईनला पट्ट्यावर जशा वस्तू पुढे पुढे सरकतात तसे मेसेजेस वर वर जात नाहीसे होतात तिथे असल्या अपेक्षा कशाला हव्यात? माझ्या पोस्टला लाईक, कॉमेंट करा असे मेसेज वाचले की मला भोवळ येते. आपण हास्यास्पद होतोय हे कशामुळे कळत नसेल? असले जोगवा मागणारे लोक मला कंटाळतात लवकर. सूड म्हणून पोस्टी वाचतात फक्तं, लाईक, कॉमेंट करत नाहीत. ते एक बरंच आहे म्हणा. ही सगळी कंड सुसह्य करण्याचे मार्ग ही आहेत म्हणा. आपल्यासारखेच लोक जमवले की मग सगळं कसं छान छान. अच्छे दिन आ गये चा फील येतो. एका स्वयंघोषित दिग्गज व्यक्तिमत्वाच्या चांगल्या पोस्टवर मी मोठी कॉमेंट टाकली होती व्हॉट्सॅपला. रात्री दीडला मेसेज होता, 'मी एफबीला टाकलीये हीच पोस्ट, तेवढी हीच कॉमेंट तिकडे पण टाका ना'. म्हणजे माझं कौतुक पुरेसं नव्हतं कारण ते बुरख्यात होतं. ते तिथे अनेकांना दिसायला हवं होतं. मी आपला साधा माणूस, टाकली कॉमेंट तिथेही. तेंव्हापासून एकही कॉमेंट दिली नाही हा भाग वेगळा.   

अनंत ग्रुपात पोस्टायचं. बार्टर सिस्टीमनी देवाण घेवाण ठेवायची. सामूहिक झिम्मा खेळायचा. पहिल्या शोधनिबंधात लिहिल्याप्रमाणे संख्या महत्वाची, काही काही पोस्ट्सवरच्या कॉमेंट्ससुद्धा वाचनीय असतात. अशी क्वालिटी जोगवा फेम साहित्यिकांच्या पोस्ट्सवर दिसत नाही. माणसाला ओवाळून घ्यायची हौस फार. नसेल कुणी तयार तर मग ही वेळ येते. आपलं आपणच तबक तयार ठेवायचं आणि मान गोल फिरवायची, हाय काय अन नाय काय. माझ्या डोळ्यापुढे कायम लाडात बोलणारी कानन कौशल उर्फ इंदुमती पैंगणकर येते लगेच. समोर संतोषी मातेच्या जागी कौतुक करणारा माणूस आहे आणि इकडे पोस्टकर्ता अत्यंत भक्तिभावाने, नजरेत कौतुक थबथबलंय आणि मग तो ऑडिओ चालू करतोय, उषा मंगेशकर 'मैं तो आरती उतारू रे' म्हणतीये. मी बेशुद्ध पडतो लगेच. अर्धवट ग्लानीत मी असल्या देवळापासून विरुद्ध दिशेला पळत सुटलोय असं दिसायला सुरवात होते आणि सुरक्षित अंतर कापलं की मी शुद्धीवर येतो. 

या सगळ्या आजाराची लागण व्हायची नसेल तर तुमची जवळची माणसं चांगली हवीत. माझी बायको आणि मुलगी म्हणून प्रशंसनीय आहेत. दोघीही एका शब्दात कौतुक संपवतात, फार फार तर दोन शब्दं, त्यापेक्षा एखादा शब्दं अजून सांगण्याच्या लायकीची माझी पोस्ट नसते असा त्यांचं ठाम मत आहे, त्यामुळे माझे पाय आपोआप जमिनीवर रहातात. त्यामुळे आता घरी गेलो की त्यांना उभं करतो, कानन कौशल सारखं तबक घेतो, तेवढं मागून 'मैं तो आरती उतारू रे' म्हणा रे कुणीतरी. ;) :P 

जयंत विद्वांस 

(सदर 'शोधनिबंध - भाग (२)' हा 'फेसबूकीय मानसशास्त्रीय आजार - लक्षणं, परिणाम, कारणे, उपाय आणि उच्चाटन' या प्रबंधाकरीता मिळालेल्या शिष्यवृत्तीतून लिहिला आहे. कुणावर वैयक्तिक टीका करण्याचा हेतू नाही, कुणाला स्वतःला लागू होतंय असं वाटलं तर गेट वेल सून :P )

No comments:

Post a Comment