Thursday 15 September 2016

नमूने (६)…

जगात माणसाला सगळ्यात जास्ती सुख कशात मिळत असेल तर इतरांकडून स्वतःचं कौतुक करून घेणे यात आहे. अशा महाभागांना त्यांच्या सोबत रहाणारी माणसं सतततबकधारक मिळतात हे त्यांचं भाग्यं असतं. वडीलधा-यांबद्दल आदर हवाच पण जेंव्हा अती होतं तेंव्हा एकालाही त्यातला फोलपणा जाणवू नये, त्या विरोधात बोलण्याची इच्छा होऊ नये हा गंभीर प्रकार आहे. अर्थात अशा कौतुक करून घेणा-या लोकांना ती कौतुकज्योत सतत तेवत राहील याची काळजी घेणं बरोबर जमतं. त्यांना पहिल्यांदाच कुणीतरी फटकारायला पाहिजे होतं किंवा चांगलं हाणलं पाहिजे होतं. ते लहान मुलासारखं आहे, अंगठा तोंडात गेल्यावर हळुवार चापटी मारली, कडुनिंब लावला की हळूहळू हात तोंडाकडे जात नाही, एकदा सवय लागल्यावर मग अगदी चटका दिलात तरी उपयोग काही नाही.    

कोणे एकेकाळी म्हणजे तीसेक वर्षांपूर्वी आटपाट नगरात डेक्कन जिमखाना सुभ्यात चाळीत एक त्रिकोणी कुटुंब रहात होतं. कर्ता पुरुष भारत संचार निगममधे ऑफिसर होता. पिण्याची सवय त्या काळी फार कुणाला नसल्यामुळे कुटुंब खाऊन पिऊन सुखी होतं. नव-याबद्दलचं कौतुक बाईंच्या चेह-यावरून लिकेज्ड टाकीतून पाणी गळावं तसं सतत ओघळत असायचं. एकेदिवशी त्यांनी 'ह्यांचं' कौतुक सांगितलं ते ऐकून मी मूक, अबोल, म्यूट, दिग्मूढ असं बरंच काय काय झालो होतो मग नंतर खूप काळ हसत होतो. काकू वदल्या, 'आमच्याकडे दुधावरची साय आम्ही कुणी खात नाही, यांनीच सांगितलंय तसं, ते कमावतात ना एकटेच घरात, त्यांची तब्येत चांगली रहायला पाहिजे म्हणून ती फक्तं त्यांनाच द्यायची खायला'. कुणाला ही अतिशयोक्ती, अतिरंजित, धांदात खोटं वाटेल कारण असा विचार असू शकतो हे नवीन आहे पटायला. हे असले आजार उपायापलीकडचे असतात. आमचे अनिल अंबिके म्हणाले असते, 'त्याला हगायला काय गुलकंद होणार आहे का?'

कोणे एकेकाळी म्हणजे अडतिसेक वर्षांपूर्वी आटपाट नगरात सदाशिवपेठ प्रांतात एक उच्चमध्यमवर्गीय कुटुंब रहायचं. दारात फियाट असणारं, ड्रिंकिंग चॉकलेट वगैरे पिणारं, हम दो हमारा एक असं बेतशीर आयुष्यं जगणारं. तर मुलं मुलं खेळायची अंगणात. एकदा मुलं खेळत असताना पाचच्या सुमारास थकले भागले काका घरी आले आणि वरच्या बाईसारखीच सतत कौतुकोघळ वहाणा-या चेह-याची काकू मुलांना डाफरली, ' हे दमून आलेत, आवाज करू नका'. पोरं घाबरली. चिडीचूप आत बसली. काकूंनी सगळ्यांना पोहे दिले. मिस्टर आराम खुर्चीत अत्यंत थकलेल्या चेह-यानी, वर फॅन, हातात पोह्यांची डिश, कडेला चहा, हातात सिगरेट घेऊन बसते झाले आणि तेवढ्यात चपळाईने काकूंनी डोक्याला अमृतांजनचं बोट पण फिरवलं शेवटी नाकपुडीपाशी धरून मृदू आवाजात त्यांना जोरात श्वास घ्यायला लावला. शेजारचा पोरगा एवढी माया, काळजी बघून भांबावला, त्याचे वडील पण दमून यायचे पण त्याच्या घरात असलं दृश्यं कधी दिसलंच नव्हतं.

पोहे झाल्यावर ते गप्पा मारत बसले. त्यानी कौतुककुमारच्या मुलाला चेह-यावर न जाणवणा-या प्रचंड थकव्याचं कारण विचारलं. तो कौतुककुमारसूत म्हणाला, 'अरे आज पगाराचा दिवस असतो ना, बाबा मेन आहेत, जवळ जवळ चाळीसेक हजार मोजावे आणि वाटावे लागतात त्यामुळे खूप दमतात ते'. मान्यं आहे तेंव्हा पाचशे, हजारच्या नोटा नसतील निदान शंभरच्या नोटांनी केला पगार तरी शंभर गुणिले चार बंडल मोजायला एवढा थकवा? संतती कशी झाली हेच मोठं कोडं. तेंव्हा थकव्यानंतर अंगभर बाम, अमृतांजन लावलं असणार बहुतेक. मुळात जो माणूस कामावरच्या क्षुल्लक गोष्टी रोज घरी सांगतो तो माझ्या दृष्टीने महामूर्ख आहे आणि ऐकणारे मागच्या जन्मीचे घोर पापिष्ट. आता घरटी दोघंही कामाला जातात त्यामुळे कौतुक नसेल राहिलं पण तेंव्हा अशी कुटुंब होती. नवरा म्हणजे अगदी हरून अल रशीद, त्याच्या सगळ्या स्टो-या सुरस आणि त्या जीवाचे कान करून ऐकायच्या. कुठल्या जगात वावरतात लोक, काय माहित.    

कोणे एकेकाळी म्हणजे तेवीस वर्षांपूर्वी एका बँकेत मी कामाला होतो सहा महिने अप्रेंटीस म्हणून. एक स्लिम ट्रिम पर्मनंट कारकुंडा होता. एकारांती अर्क अगदी. कपडे, बूट, पट्टा सगळं मिळून ऐवज फार फार तर पंचेचाळीस किलो. नशीबवान होता पण लेकाचा. त्याला स्क्रोलला बसवलं की त्याची बदली करावीच लागायची. अतिशय घाणेरडं अक्षर आणि टोकनाचे घोळ घालायचा. कॅशला बसवलं की त्याची बोटं दुखायची बंडलं मोजून मग तो काउंटरसमोर तिरुपतीच्या रांगा लावायचा मग आरडाओरडा झाला की कुणीतरी त्याच्या मदतीला जायचं. आपली चार बंडलं मोजून होतील तेंव्हा हा कसबसं एक बंडल मोजेल आणि 'बघ रे एकदा परत हे, मला एक कमी लागतीये'. तिथेच डोकं आपटायला हवं होतं कुणीतरी पुढच्या काउंटरच्या जाळीवर. त्याला क्लिअरिंगला बसवलं तर टाचण्या लागून धनुर्वात होईल हे कारण दिलं होतं त्यानी. एक नंबर कामचुकार. तो सांस्कृतिक कार्यक्रम, वार्षिक सभा किंवा बँकेच्या इतर कार्यक्रमात स्वागत गीत, गणेश वंदना म्हणायचा. सुरेश वाडकरचं 'ओंकार स्वरूपा' तो त्याच्यापेक्षाही रटाळ म्हणायचा खरंतर.पण त्याच्या नशिबानी त्याची बाजू घेणारे, कौतुक करणारे जीएम होते तेंव्हा नाहीतर तो हाकलायच्या लायकीचाच होता    

कौतुक ही भीक मागून घ्यायची गोष्टं नाही. ती गुणांनी मिळवायची गोष्टं आहे. कर्तृत्व नसलं काही की ही असली कौतुकं चालू होतात. समोरच्याच्या डोळ्यात दिसतं ते कौतुक खरं, ह्या असल्या स्पॉन्सर्ड जाहिराती काय कामाच्या नाहीत एवढं खरं.

अन्याय करणारा जेवढा दोषी तेवढाच सहन करणाराही असं असेल तर मग कौतुकं करून घेणारा जेवढा दोषी त्यापेक्षा असली फालतू कौतुकं करणारे जास्ती दोषी आहेत. :)

जयंत विद्वांस

No comments:

Post a Comment