Thursday 15 September 2016

मन्या मराठे...

पावणेसहा फुटाच्या आसपासची उंची, गव्हाळ वर्ण, लबाड वाटणारे डोळे, सरळ नाक, शिडीशिडीत अंगकाठी आणि प्रथमदर्शी अबोल वाटेल असा हा गोष्टीवेल्हाळ माणूस माझा मित्रं आहे. चुकलो, त्यानी मला मित्रं मानलंय हा त्याचा मोठेपणा आहे, नाहीतर माझी त्याच्याशी बोलण्याची सुद्धा लायकी नाही असं त्याचं मत आहे. हा नावावरून वाटतो तेवढा साधा, सरळ माणूस नाही. फक्तं दिसायला सालस, भिडस्तं वाटू शकतो पण ओळख वाढली की वाट्टेल ते बोलेल, चारचौघात तुमची लाजही काढेल. मुळात तो अतिशय भावनाप्रधान माणूस आहे पण त्याचं प्रदर्शन करणं त्याला जमत नाही, त्याला गर्दीचा त्रास होतो, म्हणाल तर माणूसघाणा आहे आणि तुमचं मैत्रं जुळलं चुकून तर मात्रं तो अतिशय लाघवी माणूस आहे. अतिशय पराकोटीचा दुराग्रह एवढा दुर्गुण सोडला तर बाकीचे दुर्गुण सुसह्य आहेत किंवा त्यांची सवय झाल्यामुळे ते दुर्गुण आहेत हे आपण हळूहळू विसरतो. त्याचे गुण शोधावे लागतील इतके विरळ आहेत कारण स्वतःबद्दल जास्तीत जास्ती गैरसमज कसा होईल याची तो पुरेपूर काळजी घेतो.

फटकन, कुचकं बोलल्याशिवाय त्याला चैन पडत नाही. अतिशय घाणेरडं, मनाला लागेल असं तो शब्दं न शोधता बोलू शकतो. आता पन्नाशीला आलेला हा माणूस मनानी मात्रं अजून लहान आहे. रस्त्यानी जाताना बॉलिंग करेल, गाडीवरून जाताना मोठयांदा ओरडेल, समोरचा दचकला की आपण त्या गावचेच नाही असा चेहरा करेल, मागे रस्त्यात चालताचालता लंगडी पण घालायचा पण आता जरा आचरट चाळे त्यानी बंद केलेत. एकदा गंभीर चेहरा करून तो मला म्हणाला होता, 'तुझं वय काय रे?' 'तुझ्याएवढंच'. 'तुम्हांला भडव्योहो विचारलंय तेवढंच सांगता येत नाही, **त बोट घालायचं आणि मग वास येतो म्हणायचं'. 'बरं, सत्तेचाळीस, त्याचं काय आता'. 'तू काय म्यॅच्युअर्ड वाटतोस रे, काय करतोस एक्झॅक्ट्ली तसं वाटण्याकरता की मठ्ठ दिसत असल्यामुळे मॅच्युअर्ड वाटतोस?' असल्या प्रश्नांना उत्तरं द्यायची नसतात. तिस-या चौथ्या वाक्याला जर त्याला वास आला की आपण त्याचं बौद्धिक घेतोय तर मूळ विषय विसरून आपल्याला कशी अक्कल नाही याचा मोनोलॉग चालू होतो, मग आपण फक्तं श्रोते.

त्याला पडणारे प्रश्नं आपल्या बुद्धीच्या बाहेरचे असतात. तो कधी काय विचारेल ते तुम्ही सांगूच शकत नाही. 'कधी गांजा ओढला आहेस का?' माझे डोळे बाहेर आले. 'गांजाssss? छे, तू ओढला आहेस?' 'मी तुमच्यासारखी भिकारडी व्यसनं करत नाही, साला पण तो नवाबासारखा हुक्का आणून मागे लोडबिड लावून वर ती फरकॅप घालून ओढावा अशी माझी जाम इच्छा आहे'. त्याची बायको आणि मुलगी गरीब आहेत म्हणून हा तर्कट माणूस तरलाय. 'अरे पण बायको धूर काढेल की घरात असले उद्योग केलेस तर'. 'ती कशाला काय बोलेल, एकदा करून बघायचंय फक्तं, माझा काय त्रास आहे आणि त्यात, कोळसे माझे मी पेटवेन आणि मी काय मीनाकुमारीसारखं तिला 'इन्ही लोगोने' म्हणायला सांगतोय का? बरं ते मरू दे, पण साला एकदा ते लखनौला जाऊन आपण मुजरा बघून येऊ. आपल्याला काय हात धरायचा नाही, काही नाही, बघू तरी काय प्रकार आहे'. त्याच्या कुठल्याही बोलण्यापुढे गप्पं बसण्यासारखा सोनेरी उपाय नाही. कुठलीही वाईट गोष्टं जाणून घ्यायची त्याला हौस आहे, करणार काहीच नाही पण माहिती हवी.

तसा तो कामात वाघ आहे कारण नोकरीच्या ठिकाणी त्याची वट आहे. ऑफिसची कामं कधीही पेंडिंग न ठेवणारा हा माणूस घरात मात्रं अत्यंत बेशिस्त आहे. तेवढ्या एका कारणाकरता बायको त्याला सतत झोडते आणि हा चक्कं ऐकून घेतो. 'सुधार की लेका, पण मला कोडं आहे, तू ऐकून घेतोस याचं'. 'अरे, तिला पण आऊटलेट पाहिजे की, मला बोलल्याच्या आनंदात तिचे पुढचे किती तास सुखात जात असतील सांग'. मन्या माणसाला निरुत्तर करण्यात पटाईत आहे. बरेचजण त्याचं चटपटीत बोलणं ऐकण्यासाठी, शिव्या खाण्यासाठी त्याला मुद्दाम उकसवतात आणि मग पट्टा चालू झाला की अपमानसदृश कुचकं बोलणं समाधानानी ऐकतात. एकदा असेच आम्ही त्याच्या ऑफिसमध्ये बसलो होतो. त्याच्या एका कलीगचं लग्नं व्हायचं होतं. डोक्यानी थोडा कमी आणि चाळीशीच्या आसपासचा होता. एकतर दिसायला अतिशय कुरूप पण बाता सगळ्या 'किती सामानांना कसं कसं फिरवलं'. मन्या सगळं निमूट ऐकत होता. अति झाल्यावर म्हणाला, 'जोश्या, तू जेवढी स्वप्नं बघितली आहेत ना तेवढ्या वेळा मी झोपलोय सामानांबरोबर'. जोश्या बिचारा गार पडला. 'कशाला बोलायचं उगाच, थापा मारतोय तर मारू दे की, तुला काय करायचंय'. 'बाता माराव्यात पण इतक्या पण नको रे, आजारी पडेल अशाने, जे व्हायला हवंय ते नशिबात नाही त्याच्या, वेडा होईल अशानी'.  

मन्या विकतची दुखणी घेण्यात हुशार आहे. सल्ला मागायचा असेल तर मन्याकडे मागावा. कुठल्याही विषयवार तो सल्ला देऊ शकतो पण तुम्हांला रुचावं म्हणून तुमच्या सोयीचा सल्ला तो देणार नाही. तो लॉजिकली बोलतो, आपल्याला न सुचलेली शक्यता त्याला पहिल्यांदा सुचते. त्याचा सल्ला पहिल्यांदा पचनी पडत नाही त्यामुळे तो ऐकला जात नाही पण त्याचा त्याला राग येत नाही. फक्तं त्याचं भविष्य खरं झालं की तो पटाशीनी तासल्यासारखी आपली सालं काढतो. 'फुकट *वायला मिळालं की किंमत नसते, पैसे टाकून मिळालेला सल्ला शिरसावंद्य असतो'. आपण गप्पं बसायचं. 'काय काय हागून ठेवलंय ते सांग म्हणजे निस्तरायला'. मन्या मग त्याला जेवढं शक्यं आहे तेवढं करतो पण त्याचे आभार वगैरे मानलेले त्याला आवडत नाहीत. त्यांनी केलेल्या मदतीचा उल्लेख त्याच्या तोंडातून कधीच येणार नाही. अनंतवेळा पैसे बुडून सुद्धा तो लोकांना पैशाची मदत करतो. चिडला की शिव्या देतो, परत कुणाला उभं करायचं नाही वगैरे ठरवतो. ते अर्थात अल्पकाळ टिकतं.

मन्याचं एक मात्रं आहे. तो फसवत नाही कुणाला. एवढा तोंडाळ, उर्मट, फटकळ असूनही बायकांशी मात्रं त्याचं जास्ती पटतं. त्याला भडकवण्याकरता मी म्हटलं एकदा, 'मन्या, लफडी किती केलीस आत्तापर्यंत, खरं सांग'. 'दोन हाताची बोटं पुरतील, एवढी नक्की. पण कधीही कुणाला फसवलं नाही आणि माणूस आवडला, बोललो म्हणजे काय लफडं असतं का लगेच? कधी कधी नुसत्या गप्पा मारल्या तरी माणूस आवडतो'. 'पण मग कधी गुंतला नाहीस का?' 'गुंतलो की, समोरचा माणूस पण तसा हवा रे गुंतायला. माझं 'झोपणं' हे उद्दिष्टं कधीच नव्हतं त्यामुळे मी कुणाशीही डोळ्यात डोळे घालून मोकळेपणानी बोलू शकतो. बायकांना गोंडा घोळणारी माणसं आवडत नाहीत, तुम्ही लोक तिथेच मार खाता कारण तुमची ध्येयं ठरलेली असतात. कुठलीही गोष्टं सहज घडायला हवी, मॅनेज करता तुम्ही लोक'.

मन्या कसा का असेना एक माणूस म्हणून मला तो आवडतो. तर्कट आहे, विक्षिप्त आहे, माणूसघाणा आहे, उर्मट आहे पण मनानी लोण्यासारखा आहे, चटकन वितळणारा. सगळ्या गावाची दु:खं तो गंभीर चेह-यानी ऐकतो, त्यावर बोलतो, लिहितोही पण स्वतःबद्दल तो क्वचित बोलतो. एकदा बोलता बोलता तो म्हणाला होता, ''आपलं आपल्यापाशी, आणि आपण सांगताना नेहमी आपलं कसं बरोबर आहे हेच सांगतो. त्यामुळे जे काही असेल ते माझं माझ्याकडे, ते माझ्याबरोबर जाईल. त्यावर चर्चा कशाला? एकटा असलो की मी सगळं परत आठवतो सगळं. माझी आठवण कुणी काढत असेलच की आणि समजा नसेल काढत तर राहिलं, मग तक्रार कशाला? त्यामुळे मी माझ्या मते जे बरोबर वागलोय त्याची खंत मी करत नाही. मला कुणी फसवलं, खोटं बोललं की राग येतो पण मी त्या माणसाबद्दल कधी वाईट बोलत नाही'. सापडला सापडला वाटेपर्यंत हा माणूस कायम वाळूसारखा माझ्या हातातून निसटत आलाय.

पाय जमीनीवर ठेवायचे असतील तर मन्यासारखा दोस्तं हवा. तोंडावर शिव्या देऊन मागे कुणाकडे तरी कौतुक करणारा. परवाच त्याला म्हटलं. 'व्यक्तिचित्रं चांगली जमतात ना रे मला आता?' 'चांगली? माकडा, बरी असा शब्दं आहे त्यासाठी. चांगली हे लोकांनी म्हणायला पाहिजे. पुलंसारखी लोकांना तोंडपाठ आहेत ती? त्यातलं एखादं वाक्यं म्हटलं तर कशातलं आहे हे आठवतं लोकांना? एका वाक्यात तुझी लायकी सांगू? 'तू बरं लिहितोस, फक्तं इतरांपेक्षा चांगलं लिहितोस एवढंच'. कुणापेक्षातरी चांगलं यात रमू नकोस, आपल्यापुढे आहेत त्यांच्या लेव्हलचं जमतंय का हा ध्यास हवा'. खरंतर आपल्यात पण एक मन्या मराठे लपलेला असतोच, उर्मट, तिरसट, लोक काय म्हणतील याची काळजी न करणारा पण आपल्याला तसं वागता येत नाही म्हणून असली तिरपागडी माणसं आपल्याला आवडत असावीत. त्याला म्हटलं, 'तुझ्यावर लिहितो आता'.

मन्या म्हणाला, 'याचा अर्थ तुझ्याकडे विषय नाहीत. तुला काय माहितीये आणि माझ्याबद्दल? वरवरचं खोटं, नाटकी लिहिशील. आपल्या माणसाबद्दल लगेच लिहायचं नसते रे माकडा, उत्सुकता संपते'. मन्याकडे मी लक्ष देत नाही, तो 'आपल्या' माणसाबद्दल म्हणाला या आनंदात उरलेल्या आयुष्यात मी त्याच्या शिव्या हौसेने खात राहीन एवढं नक्की. :)

जयंत विद्वांस
 

No comments:

Post a Comment