Thursday 15 September 2016

'दी'ज्, 'दा'ज्, 'अक्का'ज् आणि 'भैय्या'ज्...

पुरातन काळापासून जर फेबू असतं तर 'सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती', 'बहनाने भाई की कलाईपे प्यार बांधा है', 'फुलोंका तारोका सबका कहना है', वगैरे गाण्यांना मराठी, हिंदी चित्रपटसृष्टी मुकली असती. जिला भाऊ नाही ती चंद्राला ओवाळते म्हणे. एकूणच बहीण भावाचं नातं आपल्याकडे जरा वरच्या रँकलाच आहे. बहिणी बहिणी किंवा भाऊ भाऊ यापेक्षा बहीणभाऊ नातं म्हणजे एकदम डोळ्यातून पाण्याचे लोट, छातीत डाव्या बाजूला मायक्रॉन कळ वगैरे. बहिणीवरून दिलेली शिवी मारामारीला कारणीभूत ठरू शकते इतका तो जिव्हाळ्याचा विषय आहे. मला पण लहान असताना बहीण नसल्याने (अर्थात मी मोठा झाल्यावर पण नाहीये) इतर मुलांच्या हातांवर कासाराकडून हातभर चुडा भरून घेतल्यासारखी राख्या घातलेली मुलं पाहिली की वाईट वाटायचं. उतरत्या व्यासाचे स्पंज, वर एक प्लास्टिकचं कुठल्यातरी सिनेमाचं नाव आणि एक मणी असल्या राख्या इतिहासजमा झाल्या. आता ब्रेसलेट राखी असते. खरंतर गोंडा जेवढा शोभतो तेवढं दुसरं काहीही नाही. असो! तर या नात्यात मला चुलत, मामे, आत्ते वगैरे बायफरकेशन करणारे विचार मनाला कधी शिवले नाहीत, सगळ्या सारख्याच.

या सगळ्यात मानलेल्या हा प्रकार आला नंतर. त्यात वाईट काही नाही. ज्यांना बहीण नाही किंवा जिला भाऊ नाही त्यांनी काय करायचं. वडिलांना सांगून घरात मेंबर वाढवला तर ते रस्त्यावर येतील संख्या वाढल्यानी त्यापेक्षा हे जास्ती सोपं आहे. पण त्यापैकी कुणाला प्लॅनिंग किंवा अपघाताने असेल पण भाऊ/बहीण झाली की मग मानलेली नाती मान टाकताना पाहिलीयेत. वय वाढत गेलं की ती ओढ कमी होत असावी. काहीवेळेस इतर उद्योग करण्याकरता पण हे नातं उपयोगी पडतं. सगळ्यांना सगळं माहित असतं पण ते भाऊ बहीण असतात, अर्थात कुणी कुणाशी काय नातं ठेवायचं हा ज्याचा त्याचा प्रश्नं आहे (आपल्यात नाही दम तर काड्या कशाला घालतो मग जळक्या - परममित्रं मन्या मराठे). तर हे सगळं सांगायचं कारण म्हणजे फेसबुकावर हे नातं जेवढं उदयाला आलं तेवढं कुठेच नाही. एकदा कुणाला 'दा' म्हटलं की पुढचे संभाव्यं इनबॉक्सात येऊन लाळपतनाचे धोके टळतात हा फायदाही त्यात असेल, माहित नाही. पण हे नातं चिकटवलं जातं, मिरवलं जातं.

आदराने, वयाच्या मोठेपणाने दा, जी, अक्का, भैय्या, दादू, दद्दू वगैरे उपाध्या समजू शकतो, त्यात गैर काहीही नाही. वयाचा मान ठेऊन अशी उपाधी दिली की जवळीक वाटते हे ही आहे पण उगाच नाती चिकटवायला कशाला लागतात ते मला कळलेलं नाहीये. मुळात आपल्याकडे एक बाप्या, एक बाई जरा मोकळेपणानी बोलताना दिसले की प्रद्युम्न, अभिजित, दया बायनॉक्युलर घेऊन लगेच घटनास्थळी हजर असतात. 'कुछ तो गडबड है, दया'. त्यामुळे एकदा दा, तायडे म्हटलं की बरं पडतं, सी.आय.डी.मंडळी दुस-या घटनास्थळी धाव घेतात. नात जोडलं किंवा त्याला नाव दिलं म्हणजे नेमकं काय होतं? अर्थात ते ही मान्य केलं पण त्याचं ते नाटकी मिरवणं बघितलं की हसू येतं. काय एकेक उमाळे असतात. एवढं प्रेम जगात अस्तित्वात असतं तर प्रॉपर्टीची भांडणं झालीच नसती. सख्ख्या बहिणीला गावातल्या गावात भेटायला वेळ होत नाही पण फेबुवर बंधूज आणि भगिनीज एकमेकांवाचून सुकतात. काय एकेक स्टेटस असतात, वाचून मला तर आपण माणूस नाहीये अशीच शंका वाटायला लागते. 

'तायडे, कुठायेस? मिस यू'. तायडी पण लगेच मिसकुटी होते. नाहीतर ताईराजेंच्या गंभीर पोस्टवर आकाश कोसळल्यासारखं 'काय गं, काय झालं, फोन करू का?' अरे बाबा, तिचा प्रॉब्लेम एवढा मोठा असेल तर कर की फोन, जाहिरात कशाला? पण लगेच दद्दूला हमी देणारं स्पष्टीकरण कॉमेंटला येतं आणि दादासाहेब सुटकेचा निश्वास सोडतात. आता मी एक खत्रूड आहे ते जाऊ दे त्यामुळे माझ्या भाग्यात असला योग येण्याची शक्यता नाही (असल्या कुजकट पोस्ट लिहिल्यावर तुला फक्तं कानफटायला जवळ घेतलं जाईल - परममित्रं, दुसरं कोण) पण मला असं कुणी जाहीर ममत्वं दाखवलं तर मला भरून येईल, 'दे दे प्यार दे' गाण्यात स्मिता पाटील प्रेमळ वागते तेंव्हा अमिताभ जसा चक्रावतो तसं आपण चुकीच्या गल्लीत शिरलोय असं मला वाटेल. अव्यक्तं प्रेम जास्ती भावनाशील असतं असं माझं मत आहे, मग नातं कुठलंही असो. माझी चुलत बहीण जन्माला आल्याचा सगळ्यात जास्ती आनंद मला झाला होता कारण आता ती मोठी झाल्यावर मला राखी बांधेल हा माझा आनंद अमोजणीय होता.

कुणी सेलिब्रिटी गेला की त्याचं दिवसभर अथक दर्शन असतं, त्यादिवशी विनाकारण तो माणूस मला अप्रिय होतो, त्याच्यावर कितीही प्रेम असलं तरी. काही नाती निनावी ठेवा रे, नावं चिकटवून माती करू नका. आणि नाती तयार करा, जपा पण त्यांना रस्त्यावर गळे काढून ओरडत मिरवू नका. कृत्रिम फूल जास्ती आकर्षक असतं पण त्याला वास नसतो. अडचणीच्या वेळी 'मी आहे रे पाठीशी' हे आयुष्यात कधीही न बोलता जो/जी येऊन मागे 'रॉक ऑफ जिब्राल्टर' सारखा भक्कम थांबतो/थांबते ते नातं महत्वाचं मग त्याला नाव असायलाच पाहिजे असं नाही. आपण बनेल, मतलबी आहोतच पण या सगळ्यामुळे कृत्रिम होत जाऊ की काय अशी भीती वाटते.

अत्रे काय सुंदर लिहून गेलेत 'श्यामची आई' मधल्या 'भरजरी गं पितांबर'मध्ये 'द्रौपदी बोलली हरीची मी कोण?, परी मला त्याने मानीली बहीण, काळजाची चिंधी काढून देईन, एवढे तयाचेमाझ्यावर ऋण' आणि
खालच्या ओळी कालातीत आहेत, काळ बदलला तरी हे नातं राहिलंच पण त्यात या ओळीतली भावना असेल तर मजा आहे. बाकी नौटंकी तर चालूच राहील. 

'रक्ताच्या नात्याने
उपजे न प्रेम,
पटली पाहीजे
अंतरीची खूण,
धन्य तोची भाउ
धन्य ती बहीण,
प्रीत ती खरी जी
जागे लाभाविण

जयंत विद्वांस

(सदर 'शोधनिबंध - भाग (४)' हा 'फेसबूकीय मानसशास्त्रीय आजार - लक्षणं, परिणाम, कारणे, उपाय आणि उच्चाटन' या प्रबंधाकरीता मिळालेल्या शिष्यवृत्तीतून लिहिला आहे. कुणावर वैयक्तिक टीका करण्याचा हेतू नाही, कुणाला स्वतःला लागू होतंय असं वाटलं तर गेट वेल सून :P  )

भाग (१) - फेसबुकीय वाढदिवस
भाग (२) - मैं तो आरती उतारू रे
भाग (३) - ये दिल मांगे मोअर

No comments:

Post a Comment