Thursday 15 September 2016

ये दिल मांगे मोअर...

एकमेकांचं तोंडभरून कौतुक करणं हा प्रकार एकूणच विरळ झालाय. दुस-या मुलाचं कौतुक करताना माझ्या बबड्या/बबडीला काय काय येतं हे सांगताना थकणारे पालक मला पहावत नाहीत. त्या मुलाचं निखळ कौतुक करायला काय हरकत आहे. तुमच्या मुलाचं कौतुक करताना त्यांनी असं केलं तर यांच्या नाकावर लगेच तुरे उभे रहातील. मुळात हल्ली दुस-याला चांगलं म्हटल्यानी आपल्यात काहीतरी कमी आहे असा समज असतो. दाद देणं सगळ्यांनाच जमतं असं नाही. काहीवेळा संकोच होतो, वेळ होत नाही, काहीवेळा आपण बोललो तर चालेल का असं विनाकारण वाटतं, काहीवेळेस भिडस्तंपणा आड येतो आणि कौतुक करायचं राहून जातं. कित्त्येक लोक खूप हौशी असतात, काही चांगलं वाचलं, ऐकलं की लगेच कधी एकदा आपल्या ओळखीच्या माणसांना सांगतोय असं त्यांना होतं. ते अगदी भरभरून बोलतात. पहिल्यांदा लेखक किंवा कलाकार समोरासमोर भेटायचा योग दुर्मिळ त्यामुळे त्यांच्या लिखाणाविषयी मत, प्रतिसाद देणं व्हायचं नाही. एक अंतर असायचं.

फेसबुकावर ते एक काम सोपं झालं. लिहिणारे, वाचणारे जवळ आले. 'एकमेक प्रशंसा संघ' भूछत्रासारखे उगवले. समूह झाले. जातीत पोटजाती असतात तसे समूहात अनेक उपसमूहांचे दबावगट तयार झाले आणि मूळ हेतू बाजूला पडून निरर्थक वाद, खेचाखेची उद्योग सुरु झाले. खोट्या, नकली स्तुतींची खंडकाव्यं निघाली. बिल्डिंगमधे मयत झाल्यावर नाईलाजाने जावं लागतं तशी माणसं पोस्ट आवडो, न आवडो, पूर्ण न वाचताच लाईक कॉमेंटचा हार पोस्टच्या पायापाशी ठेऊन निघण्यात तरबेज झाली. एखादा माणूस कायम अफाट लिहितो, नि:शब्दं करतो तेंव्हा समजू शकतो की प्रत्येक वेळा काय दाद द्यायची पण 'मी हे वाचलंय बरं का' या नोंदीसाठी माणसं चिमूटभर उमटून जातात. प्रत्येक गोष्टीची फेज असते. माणूस लिहिता झाला की त्याचा लगेच आंबा होत नाही. प्रवास असतो, इवल्याश्या थेंबासारख्या कैरीपासून आंबा होईपर्यंत तो नुसताच पिकत गेला तर उपयोग नाही. कैरी म्हणजे सोळावं वर्ष. कौतुक, प्रशंसा यानी हुरळून जाणारं. पण एकदा आंबा झालात की तुम्ही पिकलात, मग कैरीसारखं लगेच हुरळून गेलात तर ते शोभणारं नाही.

कौतुकसुद्धा नम्र भावनेनी स्विकारता यायला हवं. कुणी केलंय म्हणून ते स्विकारावं जरूर पण मनात आपण त्या योग्यतेचे आहोत का असा विचार केला की हुरळणं कमी होतं, पाय जमिनीवर रहातात. सगळेच राग खरे नसतात तशीच सगळी कौतुकंही खरी नसतात. काहीवेळा प्रेमापोटी, भारावल्यामुळे कौतुक करताना अतिशयोक्ती अलंकार नकळत वापरला जातो. कुणी म्हणालं 'काय रे, तब्येत चांगली झालीये हल्ली' म्हणून आपण घरी जाऊन लगेच भिंतीवर बुक्क्या मारायला सुरवात करत नाही. फार फार तर जरा आरशात चारबाजूनी पोझ घेऊन स्वतःला पाहून खुश होतो. पण म्हणून फार वेळ आरशासमोर उभं राहू नये. त्यापेक्षा सतत चढती कमान ठेवण्यात वेळ गेला पाहिजे. मॅरेथॉन रनर मधे पाणी प्यायला जसे थांबतात तेवढंच थांबावं कौतुकापाशी. तिथे घुटमळलो तर मागे रहाणार हे नक्की. मधल्या टप्प्यावरचं कौतुक हे बाळगायचं नसतं, जिरवायचं असतं म्हणजे ताकद वाढते. आता हे सगळं सांगायचं कारण काय मुळात?      

तर फेसबुकावर काही लोक प्रेमापोटी कौतुकाच्या पोस्ट टाकतात. अमुक अमुक लोकांना जरूर वाचा, फॉलो करा. पोस्ट शेअर करतात, त्यात कौतुक लिहितात. मित्रमंडळींना आवर्जून टॅग करतात, मेसेज करतात आणि तुम्हांला जास्तीत जास्ती लोकांपर्यंत पोचवतात. त्यांचं हे काम कौतूकास्पद आहे. कुठलाही हेतू नसताना ते लोक कौतुक करतात. त्या लोकांबद्दल मला आदर आहे. पण ज्यांची नावं त्यात असतात त्यांच्या  प्रतिक्रिया वाचून मला हसू येतं. ज्यांनी हा सोहळा केला त्यांचे आभार मानलेत, अजून काही वाचनीय नावं सुचवलीत, इथे विषय संपावा खरंतर. पण मग आरशासमोर उभं रहायला सुरवात होते तिथे. 'अहो, मी मोठा नाही एवढा', 'अमुकतमुक बरोबर माझं नाव म्हणजे भाग्यंच' वगैरे नकली नम्रता सुरु होते. मग कुणीतरी 'तुम्ही मोठेच आहात' वगैरे लिहून थ्रेड वाढवतो मग त्याला उत्तर, नमस्कार वगैरे पाणी घालून तांब्याभर दह्याचं बादलीभर पारदर्शी ताक तयार होतं. त्यात परत दोन टॅगलेले दिग्गज एकमेक स्तोत्रपठण करतात तो सोहळा वेगळाच.

त्या रसिक माणसानी तुमचं कौतुक केलंय, आभार जरूर माना, जास्तीचे दोन शब्दं उमटा हवंतर पण रमताय कशाला? फेसबुक म्हणजे जागतिक वर्तमानपत्रं आहे, उद्या शिळं होणारं. आजची हेडलाईन उद्याची रद्दी असते. त्यामुळे हुरळू नका. 'ये दिल मांगे मोअर' पेक्षा 'ये पब्लिक मांगे मोअर फ्रॉम यू' असा विचार करून प्रगती केलीत तर ध्रुवतारा व्हाल नाहीतर  उल्का व्हायला फार कमी वेळ लागेल. :)

जयंत विद्वांस    

(सदर 'शोधनिबंध - भाग (३)' हा 'फेसबूकीय मानसशास्त्रीय आजार - लक्षणं, परिणाम, कारणे, उपाय आणि उच्चाटन' या प्रबंधाकरीता मिळालेल्या शिष्यवृत्तीतून लिहिला आहे. कुणावर वैयक्तिक टीका करण्याचा हेतू नाही, कुणाला स्वतःला लागू होतंय असं वाटलं तर गेट वेल सून :P , हुकलेल्यांसाठी पहिले भाग खालीलप्रमाणे)

भाग (१) - फेसबुकीय वाढदिवस
भाग (२) - मैं तो आरती उतारू रे

(हुकलेल्यांसाठी म्हणजे पोस्ट हुकलेल्या लोकांसाठी असा अर्थ घ्यावा )

No comments:

Post a Comment