Monday 11 August 2014

मला सुंदर दिसलेल्या ललना (९)…. "नूतन"……



'नूतन'. माहेरची नूतन समर्थ, नंतर बहल, हम आपके… च्या मोहनीश बहलची आई, तनुजाची बहिण, काजोलची मावशी या असल्या इतर ओळखींची तिला गरज भासणार नाही असं काम तिनी चौपन्नं वर्षाच्या आयुष्यात केलंय. नर्गिस सारखीच ती कॅन्सरनी गेली. फक्तं सत्तर चित्रपट केले तिनी. रुढार्थानी ती सुंदर नाही. मग खरं तर रुढार्थ आता बदलायला हवेत. पण हाय चिक बोन्स, तरतरीत नाक, सावळी असली तरी आकर्षक पण सोज्वळ चेहरा, अमिताभ सारखी इम्पेरियल स्लिम आणि पडद्यावरही जाणवणारी उंची आणि सहज वावर तिला सुंदर करून सोडतात. (आता नाविन्यं नाही राहिलं, तब्बू, सोनाली बेंद्रे सारखे बांबू भरपूर आले.) अभिनयाशी व्यस्तं असते का उंची? तसं असेल तर नूतन अपवाद. वास्तववादी, परीघाबाहेरचा, अमुक तमूक स्कूलच्या पठडी मधला असं कुठलंही लेबल न चिकटलेला अभिनय करायची. 

नूतनचे मोजकेच चित्रपट मी पाहिलेत ते लहान असताना, त्यातल्या त्यात मला सीमा, आणि अलीकडचे कर्मा आणि मेरी जंग लक्षात आहेत. मी सरस्वतीचंद्र, बंदिनी, सुजाता, मिलन, मैं तुलसी तेरे आंगनकी ही पाहिलेत पण आता लक्षात नाहीत. तिच्यात आणि अशोक कुमारमधे मला कायम साम्यं वाटत आलंय, दोघांनी मिळेल ती भूमिका समरसून केली.पटकन आठवायला गेलात तर तुम्हांला बुद्धीला ताण द्यावा लागेल त्यांचे खूप सिनेमे  आठवण्यासाठी. पण पडद्यावर ते तुम्हांला खटकणार नाहीत, त्या कथेतलं एक पात्रं म्हणूनच ते जाणवतात. हाच कदाचित त्यांचा दोष असावा.


किशोरकुमार बरोबर सी ए टी क्याट म्हणताना ती जेवढी सुंदर दिसली तेवढीच धीरगंभीर आणि सुंदर घालमेल बलराज सहानीच्या 'तू प्यार का सागर है' च्या पार्श्वभूमीवर तिनी दाखवली. नूतननी पण एकदा बिकिनी घातली होती दिल्ली का ठग मधे, शर्मिलानी एकदा बहुतेक इव्हिनिंग इन प्यारिस मधे, राखीनी एकदा शर्मिली मधे (हेमा मालिनीनी माझ्या माहितीप्रमाणे नाही, ईशा देवलनी कसर भरून काढली म्हणा).तिला गरज नव्हती अशा प्रसिद्धीची पण आपणही हे करू शकतो,  उगाच कुणाचा गैरसमज नको किंवा नूतन बिकीनीला घाबरते असं पसरायला नको म्हणूनही घातली असण्याची शक्यता आहे. शेवटपर्यंत तिचं कुणाशीही नाव जोडलं गेलं नाही. एक संसारी, वादात, लफड्यात न पडणारी सुसंस्कृत, मितभाषी उत्तम स्त्री अशीच तिची प्रतिमा मला तरी दिसत आली आहे. आई आणि बहिणीच्या पावलांवर न जाता तिनी संसार केला. भंकस मुलाखती नाहीत, मी अमुक एक चित्रपटाकरिता किती मेहनत घेतली असले किस्से नाहीत, तिच्या मौनात, अभिनयात काहीतरी खंत लपलेली आहे असं मला कायम वाटत आलेलं आहे.  




नूतनची 'सरस्वतीचंद्र'मधली  'मै तो भूल चली…', 'छोड दे सारी दुनिया.. .' 'चंदनसा बदन…' आणि 'फुल तुम्हे भेजा ही खतमें…' अविस्मरणीय आहेत.  'मै तो भूल चली….'.ती जेवढी गोड दिसलीये तेवढीच दु:खी ती 'छोड दे सारी दुनिया…' म्हणताना वाटते. पिक्चरची स्टोरी नसेना का लक्षात किंवा माहित बघणा-याला, नूतन अर्थ मात्रं पोचवते. 'मेरी जंग' आधी अमिताभ करणार होता आणि जावेद जाफरीची भूमिका अनिल कपूर. पुढे कास्ट चेंज झाली. वेडी झालेली नूतन आणि ज्वालामुखी बच्चन बघायला मजा आली असती. उंच आईचा उंच मुलगा. 
 
 

तिनी राजकपूर बरोबर अनाडी, छलिया, देवानंद बरोबर पेईंग गेस्ट, तेरे घरके सामने, अमिताभ बरोबर सौदागर, सुनील दत्त बरोबर सुजाता, खानदान, मिलन आणि उतारवयात दिलीपकुमार बरोबर एकंच चित्रपट केला 'कर्मा'. खरं खोटं देवाला माहित आणि त्या दोघांना. एका चित्रपटात ते दोघं होते. लव्ह सीन होता. दिलीपकुमार मुद्दाम डोक्याला जास्तं तेल लावून आला होता. तिच्या गालावर डोकं घासून तो मेकअप मुद्दाम बिघडवायचा. स्टारपणाची मस्ती. नूतननी दोन-तीन वेळा समजावलं मग शेवटी थोबाडीत ठेवून दिली. आत्मसन्मान राखला तिनी, सिनेमा गेला. मला या गुणामुळे ती जास्तं सुंदर वाटते.  




जयंत विद्वांस

Thursday 7 August 2014

वागणूक.....


ऐंशी सालची गोष्ट असेल. हल्लीच्या तरुण पिढीचे चाळे बघितले तर ही गोष्ट काळाच्या फार पुढची आहे आणि ती माणसंही अर्थात. माझ्या वडिलांनी सांगितलेली गोष्ट आहे ही. तेव्हा हसू आलं होतं. वाटलं असं कसं असू शकेल. पण कळायला लागल्यावर त्या वृद्ध जोडप्याची कुचंबणा लक्षात आली. आपल्या बाबतीत असं किंवा या सदृश्य काही घडलं तर आपण काय करू हा भिकार खेळ सुरु होतो मग. 

बाबा दुकानात काम करायचे. त्या काळचा तो डेक्कनचा मॉलच होता एकप्रकारचा. जोशी-अभ्यंकर खून खटल्यातले अभ्यंकर कुटुंबीय, प्रो.करमरकर, किर्लोस्कर, प्रतिभाताई पवार, शोभना रानडे, नृत्यांगना मनीषा साठे अशा दिग्गज लोकांची ये-जा असायची. अगदी घरगुती संबंध असल्यासारखं दुकान होतं. एकतर सगळी पॉश वस्ती. नुसते खाऊन पिऊन सुखी नाही तर चार पैसे चांगले राखून असणाऱ्या माणसांची वस्ती. 

एक दुकानात नेहेमी येणारे आजोबा रोज सकाळी आठच्या सुमारास दुकानात येऊ लागले. दहा साडेदहा पर्यंत गप्पा मारायचे आणि जायचे. पहिले दोन दिवस वडिलांना काही विशेष असं वाटलं नाही. नंतर जाणवलं की ते आठच्या ठोक्याला येतात आणि दहाला निघतात. कसं विचारायचं हा प्रश्न होता. आठवड्यानंतर धीर करून बाबांनी विचारलं. 'काका, काही प्रॉब्लेम आहे का?' आजोबांना रडूच फुटलं. सांगेन म्हणाले. बाबांनीही पुन्हा विषय काढला नाही. दोन चार दिवसांनी तेच म्हणाले बाबांना, या, चहा पिऊया शेजारच्या टपरीवर. 

आजोबांचं सांगून झाल्यावर हतबुद्ध होण्यापलीकडे बाबा काही करू शकले नाहीत. सल्ला द्यावा असं काहीच नव्हतं कारण त्यात. आजोबांनी सांगितलं - 'सांगताना सुद्धा लाज वाटतीय हो, पण काय करू, माझाच मुलगा आणि सून हल्ली जे वागतात ते माझ्या वयाला सहन होण्यापलीकडचं आहे. बाबा - छळ वगैरे करतात का? आजोबा - छे हो, तो परवडला असता. दोघेजण एकत्र आंघोळीला जातात. जाऊ देत पण फोन आला, कुणी आलं, कुठे आहेत असं विचारलं तर सांगताना माझी फार कुचंबणा होते. हे ही एक वेळ मान्य केलं पण सकाळी उठल्यापासून दोघेही जण घरभर अंतरवस्त्रात फिरतात. मुलाचं ठीक आहे, सुनेकडे बघायची सुद्धा मला लाज वाटते, सांगून पाहिलं तर म्हणे तुम्ही बघू नका ना. म्हणून मी बाहेर पडतो आणि ते गेले की घरी जातो. 

नंतर काही दिवसच ते आले दुकानात. कदाचित नंतर त्यांनी गल्ली बदलली असावी किंवा सून मुलगा सुधारले असावेत, माहित नाही. लक्षात घ्या. गोष्ट ३४ वर्षांपूर्वीची आहे. अजून सुद्धा घरात बायका अंतरवस्त्रात फिरत नाहीत. मुंबई सारख्या शहरात एका खुराड्यात चार चार जोडपी एकत्र राहतात त्यांना प्रायवसी नाही मिळत, ते सुद्धा असं वागत नाहीत. माणूस एवढा का बदलतो अचानक? आई वडिलांनी काय संस्कार केले नसतील का? मग असे अचानक जादू झाल्यासारखे गायब कसे होतात? काय करायचय ते बंद खोलीत करा की लेको. काळ बदललाय असं म्हटलं तरी ही गोष्ट अजून तरी आपल्या घरात घडत नाहीये, पुढचं कुणी सांगावं??? 

-- जयंत विद्वांस  

Tuesday 5 August 2014

बुगीची पत्रं (१०) - प्राविण्य आणि चिकाटी

बुग्यास,
 
खूप दिवसांनी पत्रं ना तुला! वेळच झाला नाही. मागच्या पत्रात काय लिहिलं आठवत नाही. नको आठवू दे म्हणा, आपलं हे पुराण काही विषयवार नाहीये आणि तशी गरजही नाही. असो! तू गाणं शिकतेस म्हणून तुला एक किस्सा सांगतो. शुक्रतारा….वाले अरुण दाते इंजिनिअरिंगच्या परीक्षेत एकदा नापास झाले. वडील रामुभैय्या दातेंना कसं सांगायचं हा यक्ष प्रश्नं होता त्यांना. शेवटी भीत भीत सांगितलंच त्यांनी. वडील पण अफाट. ते म्हणाले, ते राहू दे, नविन गझला कुठल्या शिकलास सांग आणि म्हणून पण घेतल्या. नंतर रडणा-या मुलाच्या पाठीवर हात ठेवून ते म्हणाले, 'अरे, इतकी मुलं पास झाली त्यात किती जणांना गाणं येतं?' मुलानीही पुढे वडिलांच्या विश्वासाचं चीज केलं.



आपली मुलं अभ्यास सोडून काहीतरी इतरही करतात हे सांगण्यासाठी पालक हल्ली मुलांना अब्याकस, डान्स, चित्रकला, गाणं, सिंथेसायझर, क्रिकेट शिकायला पाठवतात. किती जणं आवडीनी जातात? गाण्याची कितवी परीक्षा झाली आणि ग्रेड कुठली मिळाली याचा तोरा मिरवण्यासाठी त्या दिल्या जातात. तोंड उघडलं की समजतं ऐकणा-याला मार्क/ग्रेड कितपत योग्यं आहेत ते. अर्थार्जनासाठी कला ही विद्या म्हणून शिकली जाते, हे दुर्दैवं. त्यात गैर नाहीये काही पण तो मूळ हेतू झाल्यामुळे गंमत निघून गेलीये.

कट्यार… तू दोन तीन वेळा पाहिलंयेस. ते तुला कथा समजण्यासाठी नव्हतं दाखवलं तर गाणं शिकतेस म्हणून. दारव्हेकरांनी त्यात कला आणि विद्या यातला फरक फार सुंदर सांगितलाय. कला आतून बाहेर येते आणि विद्या बाहेरून आत येते. विद्या दुस-याला देता येते, कला देत येत नाही. कला तपकिरी सारखी उचलावी लागते, विद्या तंबाखू सारखी देता येते. क्लास मधे जाणारा माणूस जे गाणं वाजवणार नाही तेच गाणं रस्त्यावरचा माणूस मधल्या म्युझिक पिस सकट वाजवून जाईल. आता प्रत्येकाला नसणार अवगत हे ही मान्यं. पण जे शिकतीयेस ते मन लावून शिक. मार्क शून्यं पडले चालतील, ग्रेड सगळ्यात शेवटची चालेल पण गायला तोंड उघडलंस तर ऐकणा-यांनी अजून एक म्हण असं म्हणायला हवं. वसंतराव देशपांडे, भीमसेनजी हे काही परीक्षेत पास झाले म्हणून थोर गायक नव्हते. पु.लं.नी बालगंधर्वांबद्दल फार सुरेख म्हटलंय, ' ते मैफिलीतल्या प्रत्येकाला आपल्यासाठीच गातायेत असं वाटायचं'. ही फार पुढची स्टेप झाली पण एखाद टक्का जमला तरी पुष्कळ.

लहान असताना कसंही म्हटलंस तरी प्रोत्साहनाकरिता छानंच म्हणतात लोक. त्यामुळे थोडीशी मोठी झाल्यावर लोक नाकं मुरडतील, चुका काढतील, रामदासांनी सांगितलंय ते लक्षात ठेव 'अभ्यासोनि प्रगटावे'. कळावं, यावं, आनंद मिळावा, देता यावा म्हणून शिक, काय येतं हे दाखवण्यासाठी शिकू नकोस. लहान वयातलं क्षणिक कौतुकं आणि स्टेजवरची चमकोगिरी तेवढ्यापुरतीच असते हे ध्यानात ठेव म्हणजे झालं.
चला पुढच्या पत्रापर्यंत बाय.

--जयंत विद्वांस