Monday 27 July 2015

गझलरंग (२६/०७/१५).....

"कालच्या गझलरंगला गेलो होतो. आपल्याला ज्यातलं फार कळत नाही तिथेही मी जातो. कानावर पडून कधी काळी काही समजेल या आशेने जातो. त्यांचे चार पाच कार्यक्रम बघितलेत मी. कविता, गझल हा माझा प्रांत नाही, लिहिण्याचा सोडाच, फार समजण्याचाही नाही" असं मी मागच्या गझलरंग कार्यक्रमावर लिहिलं होतं त्यात अजूनही बदल झालेला नाही. पण तरीही मी जातो, या कार्यक्रमाचे अनेक फायदे आहेत मला वैयक्तिक. चकाट्या पिटायला मिळतात कार्यक्रमाच्या आधी आणि नंतर, कार्यक्रम मात्रं मुकाट बघतो मी तीन तास, अण्णा फुलं जास्तीची असली की कशाला वाया घालवा खर्च म्हणून अनाउन्स करून मला देतात ते तर जामच भारी काम. 

मी अमर अकबर, शोले, मुकद्दर का सिकंदर (बाकी यादी इंबोक्सात), मधुबाला, रेखा, आरशात माझा चेहरा (कसाही असो, मी माझ्या प्रेमात आहे, सो तो मला प्रिय आहे) आणि गझलरंग वारंवार का बघतो? नेमकं नाही सांगता येणार. स्टेजवरचे नव्वद टक्के लोक तेच असतात, एखाद दुसरा नविन असतो (जो पहिल्यांदा किंवा दुसऱ्यांदा येतोय स्टेजवर असं सांगितल्यावर खरं वाटत नाही, असे तयारीचे असतात). तर या गझलकारांची शैली माहितीये, साधारण आवडीचे, ताकदीचे विषय माहितीयेत, दाद मिळण्याची जागा वगैरे हळूहळू कळायला लागलंय, माहित झालंय. तरीपण जातो. पुण्यात फुकट प्रोग्राम म्हणजे पर्वणीच (तुम्ही काही म्हणा पण कार्यक्रमाला तिकीट नाही, पार्किंगलासुद्धा पैसे द्यायचे नाहीत हा जो बाहुबलीतल्या धबधब्यासारखा आनंद चेह-यावरून सांडतो ना तो क्यानननी टिपायला हवा, अण्णांना वाटतं कार्यक्रमाचा परिणाम आहे), पुणेकर गर्दी करणारंच असं काही मत्सरी लोक म्हणतात, म्हणू देत, आपण लक्ष नाही द्यायचं.

आनंदाची व्याख्या करता येत नाही, त्याचं नेमकं कारण सांगता येत नाही कधी माणसाला, येऊही नये. त्याचं कारण सापडलं तर तो क्षणिक आनंद असतो. म्हणून मला गझलरंगला का जातो याचं नेमकं कारण सांगता येणार नाही. इथे मी काल कुठल्या गझला सादर झाल्या, कुठले शेर होते ही वाण्याची यादी देणार नाही कारण ती वाचून तुम्हांला त्यातली मजा येणार नाही, तो अनुभवायचा विषय आहे, वृत्तांताचा नाही. सुरेशचंद नाडकर्णींच्या निवडक लेखांच्या संग्रहाचं प्रकाशन काल झाल्यामुळे दुस-या राउंडला एकेक गझल कमी झाली हाच काय तो दु:खाचा भाग, खोड काढायचीच झाली तर.

काल स्वप्नील शेवडे, योगिता पाटील, दास पाटील आणि शिवम पिंपळे पहिल्यांदा ऐकले. बाकी दिग्गज राहुल द्रविड-सदानंद बेंद्रे, होतकरू अजिंक्य रहाणे-सुशांत खुसराळे. डेल स्टेन-सुधीर मुळीक, भरवशाचा कोहली-सतीश दराडे, अष्टपैलू रैना-ममता ही टीम होतीच. अण्णांची बेंच स्ट्रेंग्थपण ऑस्ट्रेलियासारखी मजबूत आहे. समोर सुप्रिया, मनीषा, पूजा फाटे, वैभव देशमुख आणि वैभव जोशी हे सादर करणारे लोक पण हजर होते. मजा आली.

आयुष्यात आनंद मिळवणं फार सोप्पं आहे हो मनात आणलं तर. ब्यागपायपरच्या जाहिरातीत सांगितलंय तसं 'मिल बैठेंगे जब चार यार' असे मित्रं आजूबाजूला हवेत त्यात चाफ्याची फुलं आणणा-या रुचा पाठक, सिटींग व्यवस्था बघणारी आमची रुची, मुंबईहून आलेला विज्या उतेकर, औरंगाबादहून आलेली  अंजली दिक्षित, हसमुखराय वैशाली शिरोडकर आणि असे बरेच स्थानिक दोस्त लोक, स्टेजवर आपलेच दोस्त लोक आहेत, ते सादर करतायेत, कधी अंगावर काटा येतोय, कधी शांतता पसरेल तर कधी हसू फुटेल असे शेर ते फेकतायेत, कधी अस्वस्थ करून जातायेत असा माहोल आहे. अण्णा असे मिश्किल बोलताहेत, त्यांचा दहा जीबीचा RAM चालू आहे आणि हव्या त्या ओळी ते जिभेच्या डेस्कटोपवर आणतायेत आणि आपण त्यांच्याकडे बघत रहातोय.

कशाला हवंय विश्लेषण, समालोचन, वृत्तांत. तिथे या येत्या १३ तारखेला आणि बघा. तेंडूलकरचा कव्हर ड्राईव्ह बघावा, टोनी ग्रेगनी सांगू दे नाहीतर अजून कुणी ती दुधाची तहान ताकावर असंच शेवटी.

--जयंत विद्वांस 

No comments:

Post a Comment