Monday 27 July 2015

लल्याची पत्रं (२२) …'कहीं दीप जले कहीं दिल…'

लल्यास,

आठवी नववीत असेन मी, तेंव्हा पाहिलेला 'बीस साल बाद' म्याटीनीला (ती मॉर्निंग, म्याटीनीची मजा संपल्याचं दु:खं मात्रं अतोनात आहे). रामसे बंधू जाम हसवतो भुताखेताचे पिक्चर काढून. हा पहाताना मात्रं उसवली होती. टायटलला तो नुसता हात फिरतो ना टायटल्स चालू असताना तेंव्हा धना डायरेक्ट घरी गेला होता तेवढं बघूनच. होन्टिंग सॉंग लिहायला मोठी अवघड असतात. त्या स्टोरीशी रिलेटेड, रहस्यं फुटणार नाही अशा बेताने ते लिहावं लागतं एकतर आणि सुरेल चाल लागते कारण ते चित्रपटात एकापेक्षा जास्ती वेळा येतं त्यामुळे ते रद्दड असेल तर पब्लिक बोअर होऊ शकतं. 'बीस साल बाद-कहीं दीप जले कहीं दिल' (मूळ कथा आर्थर कॉनन डायल), 'महल-आयेगा आनेवाला' आणि 'गुमनाम-गुमनाम है कोई' (मूळ कथा अगाथा ख्रिस्ती) हिट होण्याची कारणं नुसती कथा नव्हती तर ही गाणी पण होती.

कृष्णधवल 'बीस साल बाद' मात्रं या गाण्याने अंगावर येतो. थ्रिलरमधे सतत काहीतरी घडेल असं वाटणं मस्ट असतं. यात ते वाटायचं. रहस्यपट काढणं फार रिस्की काम बघ. एकदा पाहिल्यावर रहस्यं समजलं की रिपीट ऑडीयंस ही. त्यात काही आचरट किंवा मुर्ख माणसं दात विचकून खुनी किंवा एंड सांगतात आणि माती करतात (विधू विनोद चोप्राचा अप्रतिम थ्रिलर 'खामोश' बघायला निघालो होतो, चौकात एकाला म्हटलं तर तो म्हणाला, 'अरे, तो xxxxx खून करत असतो'. तो 'खामोश' होईपर्यंत मी त्याला अर्वाच्च शिव्या दिल्या होत्या). 'बीस साल बाद', 'गुमनाम' मात्रं परत बघितले जातात कारण त्यातली गाणी सरस होती.मनोजकुमार, विश्वजीतला परत पैसे टाकून बघायचं म्हणजे अत्याचारच की. पण गाणी सुरु झाली की डोळे आणि कान उघडायचे बाकी वेळ चालू दे पडद्यावर काय ते.   

मुळात 'बीस साल बाद'  हेमंतकुमारच्या घरचं कार्य. प्रोड्युसर, म्युझिक, गायक तोच. खर्च कमी होतो आणि शिनेमा हिट झाला तर सगळा नफा त्याचाच. त्यामुळे सगळ्या चाली सरस आहेत (बेकरार करके हमे, जरा नजरोंसे कह दो, सपने सुहाने, ये मोहब्बतमें आणि कहीं दीप जले कहीं दिल). या गाण्याला गीतकार शकील बदायुनी आणि गायिका लता दोघांना फिल्मफ़ेअर मिळालंय म्हणून ते चांगलं आहे असं नाही. अनेकवेळा हे गाणं मी ऐकलंय, सगळी कडवी सुरेख आहेत पण शेवटचं कडवं मात्रं मला जास्ती आवडतं, ते कालातीत आहे, सिनेमापुरता मर्यादित अर्थ त्याला नाही. 'दुश्मन हैं हज़ारों यहाँ जान के, ज़रा मिलना नज़र पहचान के, कई रूप में हैं कातिल'.

बघ ना, अनेक माणसं आपल्या आजूबाजूला वावरत असतात. ओळख होते, वाढते, आपल्याला तो आपला वाटू लागतो. मनुष्यं प्राण्याला सगळ्यात वाईट सवय काय असेल तर कुणाला तरी काहीतरी लगेच सांगावसं वाटणे (मी तेच करतोय म्हणा आत्ता :) ) पण एखादा माणूस ओळखीचा झाला म्हणजे लगेच रहस्यं, मनातलं सांगू नये. माणसं ओळखीची असावीत पण त्यांना 'ओळखून' असावं. हसत हसत बोलणारी माणसं कधी घात करतील सांगता येत नाही. कमी बोलणारी माणसं अंतर राखून असतात, तसं रहावं. शत्रू, घात करणारा, फसवणारा परकाच हवा असं नाही आताशा, माहितीतलाच असतो हल्ली, आपण शकील बदायुनी म्हणतोय ते लक्षात ठेवायचं 'कई रूप में हैं कातिल'. खांद्यावर विश्वासानी मान ठेवावी असे किती खांदे उरलेत, 'खांदे' द्यायलाच लोक आसुसलेले आहेत.

तात्पर्य, जपून रहा. पुढच्या पत्रापर्यंत यातलंच 'मेरा गीत मेरे दिल की पुकार है, जहाँ मैं हूँ वहीं तेरा प्यार है, मेरा दिल है तेरी महफील' ऐक.   
 
--जयंत विद्वांस 

****************************************
कहीं दीप जले कहीं दिल
ज़रा देख ले आ कर परवाने
तेरी कौनसी है मंज़िल

मेरा गीत मेरे दिल की पुकार है
जहाँ मैं हूँ वहीं तेरा प्यार है
मेरा दिल है तेरी महफील

ना मैं सपना हूँ ना कोई राज़ हूँ
एक दर्द भरी आवाज़ हूँ
पिया देर ना कर आ मिल

दुश्मन हैं हज़ारों यहाँ जान के
ज़रा मिलना नज़र पहचान के
कई रूप में हैं कातिल

(बीस साल बाद, शकील बदायुनी, हेमंत कुमार, लता मंगेशकर)
*****************************************





No comments:

Post a Comment