Thursday 16 July 2015

सु.ब.क. .....

का जगतोय अजून आपण? कधी संपणार हे सगळं? गेली पंचवीस वर्ष हा प्रश्नं सुभाषला रोज पडायचा आणि उत्तर न सापडल्याने परत पडण्यासाठी उद्यावर जायचा. सुभाष बळवंत कवठेकर. लहानपणापासून मी त्याला ओळखतोय. माझ्याच वयाचा तो. एकाच वर्गात, कॉलेजात आम्ही शिकलो. कॉलेजमध्ये त्याला त्याच्या आद्याक्षरांवरून 'सुबक' नाव पडलं. टोपणनाव सोडलं तर आयुष्यात कसलाच सुबकपणा नव्हता त्याच्या. कसलंही ओढ नसलेलं आयुष्यं जगला आणि जगतोय. त्याच्या जगण्याला 'जगतोय' म्हणणं सुद्धा क्लेशकारक आहे, ओढतोय, ढकलतोय म्हणायला हवं. 

आम्ही एकाच वाड्यात रहायचो. त्याचे वडील बँकेत शिपाई होते. नोकरीची शेवटची साताठ वर्ष शिल्लक असताना त्यांनी तेंव्हा गावाबाहेर असलेल्या बिबवेवाडीला ब्लॉक घेतला आणि आम्ही दूर झालो. पण कॉलेजात आम्ही भेटायचो रोज. सुभाष होता मात्रं हरहुन्नरी. कॉलेजात असताना त्याच्याइतके व्याप कुणालाच नसायचे. तो साहित्यं, नाटक, टेबल टेनिस या आणि अशा अनेक समित्यांचा प्रमुख असायचा. साडेपाच फुटाची उंची, किडकिडीत शरीरयष्टीमुळे अजूनच उंच वाटायची, तेंव्हाच विरळ होत चाललेले आणि त्यामुळे वारा असो न असो, भुरभुरणारे केस, हडकुळेपणा झाकण्यासाठी घातलेले ढगळ कपडे (ज्यानी तो अजूनच विचित्रं दिसायचा), खांद्याला कायम समाजवाद्यांसारखी एक शबनम आणि रोजच्यारोज केलेल्या दाढीमुळे गुळगुळीत दिसणारा चेहरा असा सगळा अवतार होता. 

मी कॉमर्सला आणि तो आर्ट्सला होता. त्यात त्यानी जर्मन घेतलेली सेकंड ल्यांग्वेज आणि मेन सब्जेक्ट इंग्लिश लिटरेचर. त्याला एमेएमेड करायचं होतं आणि नंतर प्राध्यापकी. पण तो इंग्लिश मात्रं झकास बोलायचा, आम्हांला बोलायला भाग पाडायचा, तेंव्हा आम्ही त्याची खूप टर उडवायचो पण तो सराव करत राहिला आणि मराठीत विचार करून ट्रान्सलेटेड इंग्लिश नाही बोलायचा तो, जे बोलायचा ते अस्खलित इंग्लिश, आम्ही तिथेच राहिलो त्या बाबतीत, शब्दं शोधणारे, क्रियापद चुकणारे आणि शेवटी हिंदीवर मग मराठीवर येणारे. सुभाषमधे अनेक गुण होते. तो बासरी, हार्मोनियम सुंदर वाजवायचा, ती ही कुठेही न शिकता. बासरी फुंकताना जे काय त्याचे गाल फुगीर दिसायचे तेवढेच.

आम्ही दोघंही ग्राज्यूएट झालो आणि वाटा वेगळ्या झाल्या. मी वशिल्यानी बँकेत लागलो आणि त्यानी एमएला प्रवेश घेतला. भेटीगाठी कमी झाल्या. एखाद्याच्या आयुष्यात अमुक एक गोष्टी का घडतात याला काहीही उत्तर नाही. एमएचं पहिलं वर्ष अर्ध झालं होत नी त्याचे वडील रिटायर्ड झाले. पीएफ, ग्राच्यूईटी कर्जात वळती झाली, तरी पाच पन्नास हजार कर्ज शिल्लक होतं म्हणून ज्या काय किडूकमिडूक एफड्या होत्या त्याच बँकेत त्याच्यावर तुळशीपत्र ठेवून ते मिटवून टाकलं. याला नोकरी करणं गरजेचं होतं आता, पेन्शन अशी कितीशी येणार. तरी सुभाष सायकलवर जायचा सगळीकडे, व्यसन कुठलंच नव्हतं, त्यामुळे तो ही खर्च नाही, त्यानी मग चहा पण सोडला. पहिलं वर्ष झालं आणि त्याचे वडील गेले. आईही आता थकली होती त्याची. सुभाष एकतर उशिरा झालेलं अपत्यं होतं त्यामुळे तो एकटाच होता. हा जेमतेम एकवीस बावीस आणि आई पासष्ठीची. 

साडेसाती साडेसात वर्ष असते असा समज आहे. सुभाषला बाविसाव्व्या वर्षी लागली ती आजतागायत आहे. त्यानी एका फाईव्ह स्टार हॉटेलमधे संध्याकाळी पार्ट टाईम जायला सुरवात केली. इंग्लिशचा त्याला झालेला हा एकमेव फायदा. त्यात त्याच्या आईला प्यारालीसीस झाला आणि सुभाषच्या शिक्षणाला आणि आयुष्याला पण. हॉस्पिटलखर्च त्याच्या आवाक्याबाहेरचा होता. लोक मदत तरी किती करणार. त्याच हॉटेलने त्याला एकरकमी ते पैसे दिले, एवढाच काय तो दिलासा. आईला वरचेवर फ़िजिओथेरपीला न्यावं लागायचं त्यामुळे याने कायमची नाईट शिफ्ट घेतली. करन्सी एक्स्चेंजचं जबाबदारीचं काम याच्याकडे होतं. त्यामुळे संध्याकाळी सहाला जायचा ते सकाळी निघायला त्याला आठ व्हायचे. 

हा हा म्हणता बारा वर्ष अशीच गेली. दिवसभर आईचं करून, थोडी झोप घेऊन तो हॉटेलात निघायचा. कुणाकडे जाणं येणं नाही, हौस मौज नाही, सगळं कसं साचल्यासारखं झालं होतं. आयुष्याचं डबकं झालं पार त्याच्या. कसली हालचाल नाही, नुसतं शेवाळं. तुटपुंजा पगार, आजारी आई, सततची आर्थिक विवंचना, कर्ज, वाढतं वय, कायमची नाईट शिफ्ट या सगळ्यानी सुभाषचा 'पा' झालाय पार. तो पस्तिशीत असताना आई गेली आणि तो सुटला. सगळी उमेद संपली होती, प्राध्यापकी नाही आणि काही नाही. कसबसं त्यानी एमए पूर्ण केलं होतं एवढंच. लग्नाचा विचार करायला त्याला कधी उसंतच मिळाली नाही आणि आता विचार करायची त्याची इच्छाही नव्हती.         

परवाच त्याला भेटलो ब-याच महिन्यांनी. दोघांनाही सुट्टी होती, चारपाच तास बसलो होतो गप्पा मारत निवांत. माझ्याच वयाचा असूनही आपण एक वयस्कं माणसाशी बोलतोय असं वाटत होतं. दोघंही आता चाळीशी ओलांडून पन्नाशीकडे धावतोय. तो खूप मनापासून बोलला, मनातलं बोलला. म्हणाला, ' मी का जगतोय माझं मलाच कळत नाही. रहायला स्वत:चं घर आहे एवढाच आनंद आहे बघ आयुष्यात. मला कुठलं व्यसन नाही. ना बायको न पोरबाळ, न नातेवाईक, न फार मित्रं. मला कुणाकडे जायला वेळ नव्हताच कधी, माझ्याकडे कोण येणार मग. जागरणानी चष्मा सोडयाच्या बाटलीच्या काचेचा झालाय, त्यामुळे वाचन होत नाही. अरे कित्त्येक वर्षात मी नाटक, सिनेमा सोड साधा घरी आल्यावर टीव्ही पाहिलेला नाहीये. तो चालू आहे का बंद ते ही बघावं लागेल. वर्तमानपत्रं एवढंच वाचन शिल्लक राहिलंय.'

'तुला सांगतो, काय काय स्वप्नं होती रे माझी. मला सूट घालून फर्ड इंग्लिश बोलायचं, शिकवायचं होतं. एकदा सगळ्यांना म्हणजे कुटुंबाला घेऊन इंग्लंडला जाऊन शेक्सपिअरचं थडगं बघायचं होतं. त्याच्या नाटकांवर मला पीएचडी करायची होती. आई रडायची रे सारखी. मी जिवंत आहे म्हणून तूला जगता येत नाही म्हणायची. पण मला उलट वाटायचं नेहमी. आपल्यामुळे याचं आयुष्यं नासतंय याचं तिला वाटणारं दु:खं माझ्या दु:खापेक्षा मोठं होतं. ती सतत ती सल घेऊन जगली शेवटचा काळ. ती  गेल्यावर मी रडलो नाही कारण तिची त्या शल्यंयुक्तं जगण्यातून सुटका झाली याचा आनंद मोठा होता मला. घर कसलं रे पाठ टेकायला येतो इथे. इथे येण्याचा आनंद होत नाही मला, उलट कामावर जायचा होतो. इथे कोण वाट बघतंय, तिथे पाच मिनिट उशीर झाला तर निदान लोक विचारतात तरी, बरं वाटतं तेवढंच', डोळे मिचकावत तो म्हणाला. 

'आउटडेटेड झालो रे मी, एकंच काम करत राहिलो. नवीन काही शिकता आलं नाही. आता काळ पुढे गेला. इंग्लिश बोलणारी, फटफटा कॉम्प्युटर चालवणारी तरुण मुलं मुली ढिगानी आलीत रे आता. मी सोडली नोकरी तर त्यांचं काही अडणार नाहीये. प्रामाणिकपणा आणि सुट्टी नाही याच गुणांपोटी मी आहे अजून तिथे. काय गंमत असते बघ, मी कुठे जाणार आहे सोडून म्हणून ते निर्धास्तं आहेत आणि त्यामुळे मी ही. सुट्टी घेऊन करू काय, कुठे जाणार, सवयंच नाही रे कधी. जाग्रण, शारीरिक, मानसिक उपासमार आता डोकं वर काढतीये पण. हल्ली थकल्यासारखं होतं लगेच. अजून चार एक वर्ष करेन नोकरी. फंड, ग्राच्युईटी, सेव्हिंग सगळं धरून वीस एक लाख होतील, या ब्लॉकचे येतील पंचवीस. पन्नास धर अंदाजे चार वर्षांनी. आहे कोण रडायला मागे माझ्या. परवा एका वृद्धाश्रमाची जाहिरात वाचलीये. महिना पंधरा हजार घेतात. तेंव्हा वीस घेतील कदाचित. नऊ टक्के व्याज धर, तरी साडेचार लाख येतील वर्षाला, यांना दोनचाळीस गेले तरी दोनेक उरतील आजारपण, औषधासाठी. मेल्यावर सगळे पैसे त्यांना आणि अनेक आश्रमांना देऊन टाकेन. इंग्लंडला जाऊयात? मी काढतो तुझं तिकीट पण एकदा शेक्सपिअरच्या थडग्याजवळ बसून येउयात, सुखाने मरेन बघ'. 

मला काही अप्रूप नाही शेक्सपिअरच्या थडग्याचं पण जाउन येईन म्हणतो त्याच्या बरोबर. कधी कधी वाटतं, क्षुल्लक संकटांनी, अडचणींनी संसाराचा व्याप नकोसा होतो आपल्याला, सगळं व्यर्थ वाटतं पण सुखाच्या कणभर शिडकाव्यानी परत जगावंसं वाटतं. कुठल्यातरी सुखाच्या अपेक्षेनी जगत रहातो आपण, मुलाबाळांच्या आनंदात हरवतो, वाढलेल्या वयाच्या जाणीवेनी खंतावतो पण निदान रोज काहीतरी घडतं आयुष्यात. सुभाषचं जगणं काय जगणं नाही. त्याच्याकडे पाहिल्यावर आपलं आयुष्यं खूप सुखाचं वाटू लागतं.

पन्नाशीतच वृद्धाश्रमात जाणारा नव्हे नाईलाजानी जाणारा सुभाष. त्याचं त्यानंतरचं आयुष्यं तरी 'सुबक' जावो, अजून काय म्हणणार.   

--जयंत विद्वांस 

(मागच्या वर्षी इंटरव्ह्यूला माणूस आलेला. बीए (इंग्लिश), जर्मन, रशियन यायचं, फ्ल्यूट, हार्मोनियम वाजवायचा, चेस च्याम्पिअन होता कोलेजमधे, ट्रान्सलेटरचं काम केलेलं आणि हॉटेलला नोकरी - गेली वीस वर्ष नाईट शिफ्ट, कारणं हीच जवळपास, राहतं घर आहे, पंचेचाळीशीचा तो माणूस अजून आठवतो मला. पाठ दुखते, डोळे चुरचुरतात म्हणाला हल्ली, त्यांनी जॉब सोडा सांगितलंय नाईट नको असेल तर. मी शिकेन म्हणाला अकौन्टस. आपण खूप सुखी आहोत.)   
 
 
  

No comments:

Post a Comment