Friday 31 July 2015

वाणी सर.....

मार्च १९८८. पुण्याहून काका बदलापूरला घेऊन गेले बारावीसाठी. ८३ ला दहावी म्हणजे पाच वर्षाची ग्याप होती. दाढीसकट वजन पन्नास किलो पण मस्ती भरपूर. मी आता आयुष्यात पुढे काय करणार हा प्रश्नं मला एकट्यालाच नव्हता, अनेकांना पडला होता. पाचशे रुपये डोनेशनवर कुठलंही कारण न देता आदर्श विद्या मंदिर, कुळगांव, बदलापूरला दाखल झालो. शाळाच ती, ड्रेस होता, निळी प्यांट, पांढरा शर्ट. अभ्यासाची सवय सुटलेली, प्रचंड न्यूनगंड होता. सगळी मुलं, मुली सोळा सतराची, मी विशीचा. पहिला महिना कॉलेजला गेलोच नाही, घरातून जायचो, धूर काढत फिरायचो, घरी यायचो वेळेत. अंबरनाथपर्यंत चालत पण जायचो, वेळ जायचा. नेमकं काय करावं कळत नव्हतं. काका शिक्षक त्यामुळे त्यांना सगळेजण ओळखायचे. घरी निरोप आला मी येत नाही म्हणून. बोलणी खाल्ली. दुस-या दिवशी गेलो नाहीतर पुण्याला तिकीट तयार असणार, गेलो. 

एक वही, पेन, संपला विषय. सगळा वर्ग माझ्याकडे कुतूहलाने बघत होता. प्रेझेंटी घेताना शेवटचं नाव आलं अल्फाबेटिकली.  नव्हतोच महिनाभर त्यामुळे त्यांनी वर बघितलंच नाही आणि पहिल्यांदाच आवाज आला प्रेझेंट सर. त्यांनी वर बघितलं आणि हसले. 'सभ्य गृहस्थ'… आलात का? सगळा वर्ग हसला. मी शाळेच्या गेटच्या अलीकडे शिग्रेट विझावायचो. खिशात तंबाखू, चुना, परिस्थिती असेल तर गुटखा असायचा. अकरावी, बारावी - आर्ट्स, कॉमर्स. चार वर्ग फक्तं. सगळ्या मास्तर लोकांना मी माहित होतो. एक उर्मट, नालायक मुलगा, कदाचित वाया गेलेला पण त्रास काही नाही त्याचा म्हणून कुणी काही बोलायचं नाही. महिन्याभरात पहिली चाचणी. इकोनोमिक्समध्ये नापास झालो. क्षीरसागर बाईंनी नाव न घेता काडेपेटी, तंबाखू उल्लेख केले आणि पुढच्या वेळेस जे नापास होतील त्यांनी माझ्या तासाला बाहेर जावे सांगितलं. 

दुस-या चाचणीत सगळ्यात पास. वाणी आमचे वर्गशिक्षक, खानदेशी होते. रागीट. समीर धुवाडच्या कानफटात मारलेली वर्गात साठ-पासष्ठ मुलात. वर्ग टरकून असायचा. (एकदाच ते दोन दिवस सुट्टीवर होते तर आम्ही वर्गात कागद पेटवून धमाल केली होती - त्याबद्दल परत कधी). मी मागच्या बेंचवर झोपायचो नाहीतर गाणी गुणगुणायचो. एकदा वाणी अचानक आले पिरीयड नसताना, मी झोपलेलो. एक फुलस्केप होता फक्तं खिशात. शेजारच्याच मराठीचं पुस्तक पुढ्यात उघडे ठेऊन झोपलेलो. म्हणाले, 'काय चाललंय तुमचं'. 'मराठी पुस्तक वाचत होतो.' 'कुठला धडा?' 'बुलाखराव बापू'. ' विचारू काहीही?' 'विचारा, मला धडा पाठ आहे'. मराठीचं पुस्तक मी कायम घेतल्या घेतल्या पूर्ण वाचायचो, त्याचा फायदा झाला. 

सहामही आली. रिझल्ट होता. वाणी सलग दोन पिरीयड रिझल्ट सांगायला. प्रत्येक विषयाचे मार्क सांगून चिरफाड चालू होती, काही मोजकी डोकी सोडली तर बाकी सगळे द्रौपदी, सगळे कपडे, लायकी निघत होती. मी शेवटचा. त्यामुळे मला जाम धास्ती, सगळी मस्ती उतरणार होती. पोरी जाम खुश होत्या. मी उठलो, डोकं फिरलंच होतं, जास्ती काही बोलले तर निघून जायचं वर्गातून - ठरवलं होतं. समोर गेलो, खांद्यावर हात टाकून म्हणाले, किती विषयात. काही अंदाज? मी गप्पच. सगळा वर्ग माझ्याकडे बघतोय आणि मी पुढच्या पंचनाम्याची वाट पहात. 'सद्गृहस्थ वर्गात पहिले आलेत'. ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आलं. बाहेर नेलं, म्हणाले, ' मी तुला कधीच काही म्हणालो नाही, हुशार आहेस, झोपतोस, वर्गात नुसता बसतोस तरीही पहिला येतोस, माझी इच्छा पूर्ण करशील का? शाळेत मराठीत पहिला येशील? आर्ट्सचा आला तरी आनंदच आहे मला, मीच शिकवतो तिथेही पण कॉमर्सचा आला तर मला जास्ती आनंद होईल. 

खूप विचार केला. कानफटात माराव्यात अशा अनेक गोष्टी मी केल्या होत्या. त्या माणसानी माझी मन:स्थिती कदाचित ओळखली असेल. मारलं तर बिथरेल, हुशार आहे, येईल रुळावर असंही वाटलं असेल. बोर्डाच्या परीक्षेत काय होणार, धाकधूक होती. फेल झालो तर सकाळची पहिली गाडी आधीच ठरलं होतं. आदल्या दिवशी गजा मेहेंदळेच्या प्रेसमधे रिझल्ट मिळायचा एक रुपयात. माझी काही डेरिंग होईना. रुपया घालवून अवलक्षण. संदेश घाणेकर रुपया उडवून आला तीन वाजता. नाईलाजानी जेवायला बसलो होतो, डोक्यात टेंशन. पळतच आला होता तो, धापा टाकत, 'भिकारचोट पहिला आलास तू शाळेत'. परत जावून रुपया घालवावा म्हटलं, संदेश वेंधळा आहे. गजानी घेतला नाही. मिठी मारली, मग शाळेवर गेलो. बोर्डावर नाव होतं. 

पासष्ठ मुलात पहिला नंबर ही काही फार मोठी गोष्टं नाही. पण मला हुरूप द्यायचं मोठ्ठ काम त्यानी केलं. दुस-या दिवशी वाणींना भेटलो. 'सभ्य गृहस्था, तू वचन पूर्ण केलंस, शाळेत मराठीतही पहिला आहेस. ७३/१००. (पहिले चार फुलस्केप मी 'रम्यं ते बालपण' निबंध लिहिलेला, त्यानीच मला एवढे मार्क दिले, मला खात्री आहे) बाकीची मुलं मट्ठ असल्यामुळे असेल, परिक्षक दयाळू असला की घडतं असं कधी कधी,  आपण फार हुरळून नाही जायचं. न दिलेलं वचन चुकून पाळलं गेलं होतं. 

वाणी सर २६ वर्ष झाली, तुम्ही रिटायर झाला असाल निश्चित. तुम्ही माझा अपमान केला असतात, तुमच्या रागीट स्वभावानुसार हात उचलला असतात तर मी बारावी नसतो झालो कदाचित, वाहवतही गेलो असतो, माहित नाही. आता आलो की येईन शाळेत, तुमचा पत्ता घेईन आणि नमस्कार करायला येईन घरी. बाकी सगळे धंदे कधीच बंद केलेत मी शिग्रेट सोडून. तुम्ही उपहासानी म्हणायचात तसा 'सभ्य गृहस्थ' होण्यासाठी प्रयत्नं अनेक वर्ष चालू आहेत. यात मात्रं काही फार यश येईलसं वाटत नाही.  

--जयंत विद्वांस            



   

2 comments:

  1. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  2. Bulakh rao bappu ya dhadyache lekhak kon hote? anek varsh mala hi gosht vachaychi ahe

    ReplyDelete