Friday 24 July 2015

लल्याची पत्रं (२३)…'तसवीर तेरी दिलमे…'

लल्यास,  

'माया' १९६१ चा,  मी काही पाहिलेला नाही, तू ही नसशील. यातली सगळी गाणी मात्रं मला आवडतात. कोई सोने के दिलवाला, जा रे, जा रे उड जा रे पंछी, ऐ दिल कहा तेरी मंझील (ट्यान्डम), फिर एक बार कहो, जिंदगी है क्या सून मेरी जान आणि तसवीर तेरी दिलमे. तेंव्हाचे संगीतकार एकाच चित्रपटात सगळी गाणी सुरेल द्यायचे, आता एखादं गाणं चांगलं असतं, तेवढंच वाजवतात जाहिरातीत. काळानुसार आकडे बदलतात, काल 'विश्वनाथ' बघत होतो सेट म्याक्सला त्यात माहिती दाखवली, तेंव्हा सात कोटी धंदा केला शत्रू आणि घईनी आणि आत्ताच्या भावात त्याची रक्कम होते २७९ कोटी, तेंव्हा आजच्यासारखे दर नव्हते, मिडिया पब्लिसिटी नव्हती, ढिगानी थेटर नव्हती. असं पाहिलं की अशी सतत क्वालिटी देणारे लोक फार कमी पैशात वापरले गेले असं वाटतं. तेंव्हा हिट गाण्यांच्या संख्येत क्वालिटी ठरायची आता खपाच्या फिगरवर ठरते. 

'माया'ची सगळी गाणी बघ, ऐक. आज एखाद्या सिनेमात अशी एकाचढ एक सुरेल आणि हिट होऊ शकणारी गाणी आली तर काय तुफान चालेल तो सिनेमा. सलिल चौधरी किशोरकुमार बद्दल म्हणाला होता. 'रस्त्याच्या या टोकाकडून समोरच्या माणसाला हाक मारण्याइतपत त्याचा आवाज चांगला आहे'. त्यांनी त्याच्याकडून अजरामर गाणी मात्रं गाउन घेतली. पण आज एखादा गाणी देतो म्हणून तो संगीतकार असलेला माणूस एखाद्या भिकार गायकाबद्दल (या विभागातसुद्धा हिमेश रेशमिया येत नाही) तरी असं विधान करू शकेल का? कमीत कमी वाद्यात, पैशात, अपु-या साधनांत त्या लोकांनी लखलखते हिरे बाहेर काढले. आता सगळा बेन्टेक्सचा जमाना. असो. 

कृष्णधवल चित्रपटांची जादू वेगळीच बघ. खात्यापित्या घरची टमटमीत गोड माला सिन्हा आणि ग्रेगरी पेक सारखी शर्टाची सगळी बटणं लावलेला स्वत:च्या प्रेमात पडलेला माझं डोकं फिरवणारा देवानंद. त्या 'लव्हम्यारेज'मधल्या 'कहें झूम झूम रात ये सुहानी'च्या गाण्यात तर मला खूप त्रास होतो. अवखळ आणि जबराट दिसणारी चिंच माला सिन्हा लताच्या टिपेच्या आवाजात सुंदर गाणं म्हणते आणि हे येडं वर्षानुवर्षे तेच हावभाव करतंय. एकंही हिरोईन राजकुमार सारखी फटकळ नसावी? की बाबा या पक्षाघाताबरोबर मी नाही काम करणार. ते जाऊ दे, तर मला हे गाणं जाम आवडतं. काहीवेळेस एक बरं असतं गाणं चांगलं नसेल तर माला सिन्हा बघायची, चांगलं असेल तर परत परत बघायचं, देवानंदकडे नाही बघायचं आपण.

भरकटायला होतं बघ माला सिन्हा म्हटलं की. तर हे गाणं आवडायचं सगळ्यात पहिलं कारण म्हणजे मागे वाजणारा अकोर्डीयन, नैनो का कजरा आणि रुक न सकेगा ला लागणारा लताचा टिपेचा आवाज आणि कडवं संपतानाचा ठेका आणि त्यानंतर तस्वीर तेरी दिल में घेताना वाजणारं अकोर्डीयन, पाण्यावर तरंग काढावेत तसं वाजतं बघ. बाकी सगळं गाणं सुंदर आहेच पण त्यातली एक ओळ मला चकित करून जाते - नैनो का कजरा, पिया तेरा गम. कधी सुचायचं आपल्याला हे असं. दु:खं टाकता येत नाही, नाकारता येत नाही, टाळता येत नाही पण त्याच्या काळ्या रंगाचा उपयोग काजळासाठी करायला प्रतिभाच हवी. काय सुंदर विचार करतात ना हे लोक.  

नुसतं लिहिणं आणि सोप्या शब्दात असं काहीतरी चमकदार लिहून जाणं यात खूप फरक आहे. चल पुढच्या पत्रापर्यंत तसवीर तेरी दिलमें……  

--जयंत विद्वांस 

 
तस्वीर तेरी दिल में, जिस दिन से उतारी है
फिरू तुझे संग ले के, नये नये रंग ले के
सपनों की महफ़िल में

माथे की बिंदीया तू है सनम, नैनों का कजरा पिया तेरा गम
नैन किए नीचे नीचे, रहू तेरे पीछे पीछे, चलू किसी मंज़िल में

तुम से नज़र जब गयी है मिल, जहा है कदम तेरे वही मेरा दिल
झुके जहा पलकें तेरी, खुले जहा जुल्फें तेरी, रहू उसी मंज़िल में

तूफ़ांन उठायेगी दुनिया मगर, रुक ना सकेगा दिल का सफ़र
यूँही नज़र मिलती होगी, यूँही शमा जलती होगी, तेरी मेरी मंज़िल में 
  
(मजरुह सुलतानपुरी, लता-रफी, सलील चौधरी, माया (१९६१))

No comments:

Post a Comment