Tuesday 21 July 2015

मुंगेरीलाल के हसीन सपने.....

अंतर्नाद आणि सप्तर्षी - दोन्ही मिळून कथास्पर्धेत पहिला क्रमांक आला तर दिवाळीला साधारण वीस हजाराची सोय होऊ शकेल. सकाळ आणि स्वरूपाचं 'साद' मासिक धन्यवाद मधलं काम आहे, सकाळनी गुढकथा स्पर्धा ठेवलीये दिवाळी अंकासाठी आणि पहिले तीन क्रमांक ते त्यात छापणार हेच मानधन समजायचं. मार्च एंडला अकौण्टन्ट लोक बिझी असतात तसे लेखक लोक दिवाळीच्या आधी बिझी असतात असं सुप्रसिद्ध लेखक (दिवाळी अंक स्पेशालिस्ट) श्रीनिवास नार्वेकर यांच्या सांगण्यावरून समजलं. 


माझं महाराष्ट्राच्या रणजीपटूसारखं आहे, झिंबाब्वे दौ-यात निवड झाली तरी त्याला भरून येतं, आयुष्याचं सार्थक झाल्यासारखं वाटतं. सगळे नातेवाईक भेटायला येतात. वेळात वेळ काढून तो कुलदैवताला, सासुरवाडीला जाऊन येतो, सकाळ, प्रभात, केसरी अशा प्रचंड खपाच्या (पुण्यात) दैनिकात त्याचा त्यातल्या त्यात बरा दिसणारा फोटो आणि प्रचंड आशावादी मुलाखत झळकते. बायको ९९ एकर्सची साईट बुकमार्क करून ठेवते कारण पाठोपाठ आयपीएल निवड डोळ्यापुढे असते. यथावकाश दौरा पार पडतो. सकाळी घेतलेला हार जसा संध्याकाळी कोमेजतो तसा चेहरा दौ-यावरून परत येताना असतो. एकाच एकदिवसीय (फलंदाजीची वेळ येत नाही किंवा आली तर आत जाताना ७/८५ किंवा १२ चा रनरेट हवाय अशी परिस्थिती असते) आणि सराव सामन्यात (पंधरा ते वीसवर आउट) संधी मिळते. सगळी स्वप्नं तुटलेल्या अवस्थेत असतात. खेळण्यापेक्षा ब्यागा उचलून जास्ती दमायला होतं. मग रणजी आणि चुकून झालीच निवड आयपीएलला तर सुटतात काही पैसे नाहीतर मग डायरेक्ट निवृत्तीनंतर प्रशिक्षकपद (संजय बांगर, विजय दहियाच्या पत्रिका मिळाल्या पाहिजेत एकदा).   


मलाही अशी स्वप्नं पडतायेत लेखक झाल्यापासून (डोक्युमेंट कशी सेल्फ सर्टीफाईड लागतात हल्ली ब्यांकेत, त्याच धर्तीवर हे). मला सतत फोन येतायेत. मंजुळ आवाजाच्या बायका फोनवरून 'लिहाल का तुम्ही आमच्यासाठी' असं विचारत आहेत. मी - 'कशावर'? ती - 'तुम्ही लिहा काहीही, चालेल आम्हांला, तुमचं नाव बोल्ड टाकलं की झालं, वाचकांच्या उड्या पडतील'. त्यानंतर मी लाईटवेट होतो आणि पिसासारखा तरंगू लागतो. मी - 'कळवतो, इतक्या अंकांसाठी लिहितोय ना, रिपीट नको व्हायला विषय, माझी पीए आली की चेक करतो आणि सांगतो, हाच नंबर ना, सेव्ह करून ठेवतो, बाsssय'. सगळ्या अंगाला नुसत्या मुंग्या. दिवाळीच्या आधी रायटर्स कॉपी म्हणून माझ्याकडे टेबलावर पाचपन्नास अंक येउन पडलेत. माझी पीए रोज ब्यांकेत किती जमा झालेत ते सांगतीये. विशेष आवृत्त्यांसाठी आलेले विनंतीचे मेल्स प्रिंटआउट काढून माझ्या टेबलवर धूळ खात पडलेत आणि मी तिला सांगतोय, 'नो, आता फक्तं विश्रांती, खूप दमलोय मी, तू ही सुट्टी घे, हा तीन हजाराचा चेक तुला (तीनदा फाडला, आधी बाराचा मग दहाचा आणि साताचा).  


पण कसचं काय नी कसचं काय. असलं काहीही घडणार नाही पण स्वप्नं बघायला काय हरकत आहे मी म्हणतो. आणि समजा लागलंच बक्षीस आणि समजलं आधी तसं तरी मी आधीच कर्ज काढून खर्च करणार नाहीये. कारण मागचे अनुभव बघता पैसे साधारण होळीच्या आसपास मिळतात अशी वहिवाट आहे. ते ही तुम्ही मागे लागलात तर नाहीतर मागे पडता तुम्ही. अर्थात मूळ हेतू पैसे मिळविणे हा नसतो म्हणा. आधी नाव व्हायला हवं मग पैसे न मागता मिळतात हे खरं. बाकी तोपर्यंत मुंगेरीलाल अजरामर…… 

--जयंत विद्वांस  




No comments:

Post a Comment