Thursday 16 July 2015

विनोदी नटसम्राट.....

पंधरा एक वर्ष झाली. माझ्या नात्यातल्या दोन माणसांनी काम केलेल्या हौशी संचाचा 'नटसम्राट'चा प्रयोग होता चिंचवडला. मी दत्ता भट, लागूंचं पाहिलंय. त्यामुळे ते डोक्यात फिट होतं. याचा अर्थ नविन बघायचं नाही, असं नाही. तुलना नकळत होतेच पण ती बाजूला ठेऊन ही बघता येतं. तर त्यांचे आधी साताठ प्रयोग झाले होते. पास मिळत असतानाही मी आणि बायको पुढचं तिकीट काढून गेलो होतो. कुणी हौसेपोटी पदरमोड करून काही करत असेल तर आपण तोशीस लावून घ्यायला हवी असं माझं मत. सगळी कलाकारांच्या ओळखीतली माणसं होती आलेली प्रेक्षक म्हणून. एखाद दुसरा बाहेरचा जाहिरात बघून आलेला. जेमतेम पन्नास माणसं असतील. पहिल्या तीन रंग कशाबशा भरतील एवढी.

एकतर नाटक अर्धा तास उशिरा चालू झालं तिथेच माझं डोकं फिरलं होतं. इतर पब्लिकही लग्नाला जमतात तसे ग्रुप करून गप्पा मारू लागलं होतं एव्हाना. नाटक सुरु झालं. सेट फार नव्हताच. माझ्या मेव्हण्यानी त्यात बेलवलकरांच्या मुलाचं आणि भाचीनी मुलीचं काम केलं होतं. त्यामुळे त्यांच्या एन्ट्रीला मी टाळ्याही वाजविल्या. पहिल्या पंधरावीस मिनिटात लोकांना कलाकारांची कुवत समजल्याने कुजबुज सुरु झाली. मग चुका दिसायला सुरवात झाली. मला स्वत:ला स्टेज फिअर आहे त्यामुळे कुणी मॉबसमोर काही सादर करत असेल तर मला त्या माणसाचं कौतुक वाटतं. पण काही गोष्टी प्रेक्षक म्हणून जशा मला कळतात तशा त्या कलाकार म्हणून स्टेजवरच्या माणसालाही कळायला हव्यात. 

तुम्ही उभी करत असलेली व्यक्तिरेखा आणि तिचं नाटकातलं वय, दाखवलेली शैक्षणिक पात्रता, इतर व्यक्तिरेखांशी असलेलं नातं, त्यानुसार बदलणारा टोन, त्या पात्राचा आब दिसायला हवा. सगळेच कलाकार गप्पा मारतो तसे क्याजुअल संवाद म्हणत होते त्यामुळे सगळा सिरीयसनेस संपला. मुलगा नाटकात फोन करतो, जुन्या काळातला बोट घालून फिरवायचा काळा फोन. एकतर त्यानी चारपाच वेळाच ती तबकडी फिरवली आणि ती जागेवर यायच्या आत त्यानी बोलायला सुरवात केली त्यामुळे पब्लिक नकळत हसायला लागलं. त्याकाळी फोन एवढे फास्ट लागायचे का? त्यांच्या घराचा सेट होता, वेगळा दरवाजाही दाखवला होता म्हणजे विंग ही भिंत गृहीत धरायला हवी. सगळी पात्रं विंगेतून जा ये करत होती, दरवाजा त्यांच्या खिजगणतीतही नव्हता. 

नटसम्राटाचं काम करणारा आमचा निळूभाऊ काय तो सगळ्या जाणीवा शाबूत असलेला होता. चोख पाठांतर, ब-यापैकी अभिनय, वयाचं, भूमिकेचं बेअरिंग असलेला. बाकी सगळ्यांनी मिळून मात्रं त्याला पार झोपवला. बरेचवेळा पात्रं संवाद विसरायची आणि रसभंग व्हायचा. सरकारचं काम करणारी निर्मात्याची पत्नी होती. ती मधूनच वाकून चालायची, थरथरत्या आवाजात संवाद म्हणायची, ते लक्षात नाही राहिलं की सरकार एकदम तरुण व्हायच्या आणि अप्पासाहेबांनी म्हातारपणात दुसरा विवाह केला की काय अशी बघणा -याला शंका यायची. त्या नाटकातली स्वगतं ऐकताना अंगावर काटा येतो, नैराश्यं येतं त्यांची असहाय्य अवस्था बघून. खूप काळ इफेक्ट रहातो एवढी ती परिणामकारक आहेत. त्या सगळ्याची माती झाली. 

निळूभाऊ अतिशय तन्मयतेने सुरु झाले. दोन स्पॉटलाईट होते. वरचा माणूस नवखा असावा. काहीतरी गडबड झाली त्याची. निळूभाऊ उभे होते त्याच्या उलट्या बाजूचा स्पॉटलाईट लावला त्यानी. याला स्टेज वरून सांगता पण येईना, वरचा ठोंब्या वैरी असावा. तरी एकदा स्वगत थांबवून त्यानी वर हात केला, 'ऑन होत नाहीये, तेच करतोय' हे सगळ्या थेटरला ऐकायला गेलं. निळूभाऊ समंजसपणानी दुस-या चालू असलेल्या स्पॉटलाईटखाली गेले आणि स्वगत चालू केलं. वरच्या पठ्ठ्यानी दोन्ही चालू केले, चूक लक्षात आल्यावर जिथे नटसम्राट उभे होते, तोच बंद केला. निळूभाऊ प्रवासी स्वगत म्हणत होते. बरं हे एकदा झालं तर ठीक, सगळ्या स्वगताला 'हा खेळ सावल्यांचा'. पब्लिक लोटपोट इकडे. सगळ्यात हाईट म्हणजे निर्मात्याची मुलगी होती पाचेक वर्षांची. 'सरकार' तिची आई. त्यामुळे ती चार ते पाच वेळा एका विंगेतून आली आणि स्टेज वरून पलीकडच्या विंगेत गेली. 

यथावकाश धापा टाकत नाटक संपलं. सगळ्या कॉमेंटस आणि हशे सांगण्यात हशील नाही. मला निळूभाऊचं खूप वाईट वाटलं. नाटक संपल्यावर त्याला भेटलो आणि अभिनंदन केलं. हिरमुसल्या चेह-यानी त्यानी ते स्विकारलं. हौस असावी पण आपण त्या कलाकृतीचा, नाटककाराचा अपमान करतोय याचीही जाण असावी. 

--जयंत विद्वांस  
 
 

No comments:

Post a Comment