Wednesday 27 May 2015

जनाकाका…….

त्याचं पूर्ण नाव जनार्दन विनायक जोशी. पण सगळा वाडा त्याला जनाकाकाच म्हणायचा म्हणून वाड्यात जन्माला आलेलं पोरसुद्धा बोलता येऊ लागलं की त्याला ए जनाकाका असंच म्हणायचं. कुणाच्याही नात्यातला नसलेला पण सगळ्या वाड्याचा नातेवाईक, असा होता तो. वाड्यातली प्रत्येक घरातली माणसं सोडा त्यांचे सगळे नातेवाईक पण जनाकाकाला माहित होते आणि त्यांना हा चक्रम माणूस माहित होता.

घारे डोळे, दणकट शरीरयष्टी, पाच फुटाची उंची, हातात सतत पिशवी, त्यात असंख्य पेपर (शब्दकोडं नसेल तर तो पेपर भिकार), विडी बंडल, दोन तीन माचिस (संपलेल्या पण असायच्या एक दोन, आपण फेकू लागलो की चिडायचा 'राहू दे रे खायला मागतायेत का तुला, पावसात उपयोगी येतात सादळल्या बाकीच्या की'), प्यांट राजकपूर सारखी कधी लांडी तर कधी चप्पल झाकेपर्यंत, शर्टला इस्त्री वगैरे भानगड बापजन्मात नाही, दोरीवरचा वाळलेला शर्ट अंगात घालणे इतकी सोपी क्रिया, झालर लावल्यासारखे केस आणि मधे अगदी सागरगोट्यासारखं तुळतुळीत डोकं, मानेभोवती कायम उपरणं कापून त्याचे केलेले मोठ्ठाले रुमाल, उजव्या हातात एचएमटीचं घड्याळ, भुवयांच्या मधे लावलेलं बोटभर उंचीचं लालगंध आणि तोंडात विडी नाहीतर शिव्या.  

एकेकाळी वाड्याला भलामोठा दरवाजा होता, दिंडी दरवाजा पण होता. तिथून आत शिरल्यावर डाव्या बाजूला कट्ट्यावर एक दहा बाय दहाची कोंदट, अंधारी खोली होती, ती जनाकाकाची. तो त्याला मठी म्हणायचा. माझा बालपणाचा बराच काळ त्या मठीत गेलाय. त्याच्या खोलीला कुलूप नसायचंच कधी. कुणीही कधीही जाऊ शकायचं उघडून. आम्हां मुलांना भारी वाटायचा तो प्रकार. 'अरे नेणार काय चोरून? रद्दी?' म्हणायचा तो. एक भिंतीच्या कडेला खरोखर असंख्य पेपर आणि जुनी मासिकं आणि असंख्य पुस्तकं ढिगानी पण व्यवस्थित लावलेली असायची. रसरंग, रविवारची जत्रा, स्पोर्ट्स्टार, फिल्मफ़ेअर, स्क्रीनचे अंक, विचित्रं विश्वं, किशोर, आनंद, चांदोबा डेट वाईज लावलेले असायचे, कुणी त्यात रस दाखवला, माहिती मागितली की जनाकाका फुलायचा. मग एकदम स्पेशल ट्रीटमेंट त्याला. तो स्वत: चहा करणार मग त्याच्यासाठी. कडू, कमी साखरेचा काढाच तो पण नावं ठेवलीत तर पुढच्या वेळेला थेंब सुद्धा मिळणार नाही, तुमच्या समोर तो एकटा पीत बसेल. 

अप्पा बळवंतला एका पुस्तकाच्या दुकानात तो काम करायचा. नवाला दहा मिनिट आधी तो तिथे हजार असायचा आणि पाच वाजले की दुकानाला आग लागू दे मी थांबायचो नाही असं म्हणत निघायचा. आजारी पडला तरच सुट्टी, उशीर नाही, अफरातफर नाही, वाचनाचा प्रचंड नाद असून कामाच्या वेळेत वाचणार नाही, निम्मा पगार तिथून पुस्तकं, मासिकं विकत घेण्यातच संपायचा. साताठ मिनिटात जेवायचा तो. मालक असल्या फटकळ माणसाला एक शब्दं बोलायचे नाहीत कारण जनाकाकामुळे येणारं गि-हाईक जास्ती असायचं. पुस्तकाचं नाव काढायची खोटी तो बरोब्बर काढायचा, संपलेला स्टोक त्याला पाठ असायचा, मग गि-हाईकासमोर तो श्रद्धापूर्वक मंत्र म्हणावेत तशी त्या प्रकाशनाची आई बहिण काढायचा. नविन पुस्तकं आली की कुणाला कोणतं आवडतं हे त्याला पाठ असायचा, हातोहात संपवायचा तो. येताना तो कोपरकरबुवांकडे जायचा. ते किर्तन शिकवायचे. विद्यार्थ्यांसाठी पूर्वरंग, उत्तररंग ते त्यांच्या अक्षरात लिहून काढायचे ते हा मोत्यासारख्या अक्षरात लिहून द्यायचा, नसेल काही काम तर तडक घरी. बरं, हे सगळं काम फुकट, कधी काळी अडचण आली तर वर्षाकाठी पन्नास शंभर मागणार. 

मी थोडा मोठा झाल्यावर त्याला म्हणालो होतो, 'अरे, फुकट कशाला करतोस, किंमत रहात नाही'. तो म्हणाला. 'अरे त्या कोपरकरचं अक्षर बघ एकदा, ते विद्यार्थी जीव देतील लकडीपुलावरून. गंमत जाऊ दे रे पण कोपरकर ती कला जिवंत ठेवतोय, आपल्याला जमेल तेवढं आपण करावं, माझे वडील कीर्तन करायचे वर्षातून दोनदा बोरवाडीस उत्सवात, माणूस जागचा हलायचा नाही, एकपात्री करायचे रे अक्षरश:. मला पण हौस होती पण नाही जमलं बघ. अजून पन्नास वर्षांनी कीर्तनकार राहील का बघ आणि असलाच चुकून एखादा तर ओंकारेश्वराला कीर्तन करायला सांग, माझ्या आत्म्याला शांती लाभेल'. जनाकाका सहसा उलगडायचा नाही पण गावची आठवण झाली की एकदम शांत व्हायचा. जूनच्या सुरवातीला वाड्यातल्या सगळ्या मुलांच्या वह्या पुस्तकांना कव्हरं घालून त्यावर स्केचपेननी सुबक नावं टाकून द्यायचा तो. अर्थात सगळ्या वाड्याची वह्या पुस्तकं तो त्याच्या दुकानातूनच आणायचा. हातात देताना म्हणायचा 'रांडेच्यानो टिकवा नीट वर्षभर, बाप घाम गाळून पैसा आणतोय, मटक्याच्या अड्ड्यावरून नाही. कव्हर निघालं किंवा पानं दुमडलेली दिसली ना तर ढुंगणं जांभळी करेन फोडून'. पुस्तकाची अवहेलना, हेळसांड त्याला सहन व्हायची नाही. तळमळून म्हणायचा, 'वाचावं रे सतत काहीतरी, वाया जात नाही. टे-या उडवून नाचताय ट ला ठ जोडलेल्या गाण्यांवर, ते उपयोगाला नाही यायचं'. मी पाचवीला गेल्यावर मला त्यानी रेन मार्टिन आणि विरकर डिक्शनरी दिली होती. माझ्याकडून पाचशे इंग्लिश शब्दं पाठ करून घेतलेले त्यानी सुट्टीत.      

जनाकाका रांगोळ्या सुरेख काढायचा. पण ते ठिपके प्रकरण नाही जमायचं त्याला. सहा बाय सहा फुट मिनिमम साईझ. हनुमान, मोर, रामपंचायतन, देखावा, शिवाजी किंवा फ्री ह्यांड जे सुचेल ते, आधी खडूनी काढून घ्यायचा मग रंग भरायचा. कणभर रंग बाहेर गेला खडूच्या की मागून त्या मुलाचा/मुलीचा उद्धार व्हायचा. मुलगा असेल तर 'भोसडीच्या ते केस मागे घे, हात सारखा सारखा भांग पाडताना कसा फिरतो तसा स्मूथ फिरू दे ' आणि मुलगी असेल तर 'ताराराणी, दमलात का आपण? विश्रांती घ्या हवं तर, माझा मोर उद्या नाचला तरी चालेल'. एकही पोर दुर्मुखायचं नाही, त्याच्या शिव्या खाण्यात पण मजा होती. गणेश विसर्जनाला वाड्याच्या मधल्या भागात सगळ्यांची पंगत बसायची, फुटपट्टीनी काढल्यासारख्या सरळ रेषेत तो चार बोट नाचवत रांगोळी काढायचा. उदबत्ती लावायला बटाट्याचे काप सुद्धा आकर्षक आणि वेगवेगळ्या आकारात कापायचा. त्याच्या अंगात कला उपजत होती. 

माझ्या लॉगटेबल वर चिकटवायला गावसकर त्यानी राज्यं दान दिल्याच्या अविर्भावात दिला होता. 'हवं तर अख्खा पेपर घे, पण तो फाडू नकोस. काहीतरी हरवल्यासारखे वाटत रहाते मग तो कापलेला तुकडा दिसला की'. काहीवेळेस तो संध्याकाळचा दिवा न लावताच खुर्चीत बसायचा. समोरच्या स्टुलावर पाय ठेवून कडेच्या छोट्या स्टुलावर टेप ठेवायचा आणि नाट्यसंगीत लावायचा. तान, हरकत जितकी जोरकस तितका विडीचा झुरका दमदार. खोली निकोटीनच्या वासानी भरायची अगदी पण हा तासंतास बसायचा गाणी ऐकत. एकदा मी विचारलं तीच तीच गाणी ऐकून कंटाळा कसा येत नाही तुला? तो म्हणाला. ' गाणी नाहीयेत रे ही, आठवणी आहेत. ऐपत नसताना वडिलांनी आणला होता हा टेप, कुणी आलं मुंबईहून की गाण्याच्या क्यासेट आणायला सांगायचे. वद जाऊ कुणाला शरण… ऐकलंयेस? आई फार सुंदर म्हणायची. जेवणं झाली की बाबा तिला अधून मधून म्हणायला लावायचे आणि कौतुकानी तिच्याकडे बघत बसायचे. बाबांचा आवाज ही गोड. मर्मबंधातली ठेव ही…. अप्रतिम म्हणायचे. गाणं संपलं की डोळे टिपायचे. क्यासेट मधल्या गाण्यांचा क्रम, हरकती सगळं तेच आहे पण हे सगळं मी परत परत अनुभवतो'.

गावाला त्याचं कुणीही नव्हतं आता. पोटासाठी पुण्यात आला आणि इथलाच झाला. तुटपुंजा पगार, आजारी आई वडील यामुळे त्यानी लग्नं केलंच नव्हतं. त्याला सगळा स्वयंपाक यायचा. तल्लख बुद्धी, तिरकस भाषा, अफाट वाचन, दुस-याला चांगलं सांगण्याची तळमळ आणि स्वच्छ चारित्र्यं अशा सगळ्या गुणावगुणांसकट तो वाड्याचा झाला होता. वाड्याचा रखवालदारच तो. मधलं अंगण रोज सकाळी झाडून काढताना पुटपुटल्यासारखे मनाचे श्लोक म्हणायचा. माझे बाबा त्याला कोकणी रामदास म्हणायचे. सुट्टीत रात्री जागवायचा पोरात पोर होऊन. कोडी घालायचा, भसाड्या आवाजात मराठी न ऐकलेली गाणी, श्लोक म्हणायचा. कदाचित त्याचं हरवलेलं बालपण शोधायचा. केवळ शालेय शिक्षण नसलेला हा तल्लख ब्रम्हचारी आम्हांला काय काय देऊन गेला याची यादी नाही करता येणार. वाचा, ज्ञान मिळवा, वाया जाणार नाही हे सांगतानाची त्याची तळमळ आता कुणात दिसत नाही.  

वयं वाढत गेली. वाटा बदलत गेल्या. वाडा आणि माणसं म्हातारी झाली, काही संपली, काही दुसरीकडे गेली, जनाकाका आहे तिथेच आहे. आम्हीही वाडा सोडला, कोथरूड वरून हल्ली गावात येणं होत नाही फार. परवा वाड्याच्या मालकांनी बोलावलं होतं, वाडा बिल्डरला द्यायचा म्हणून मिटिंग होती. वाड्यात ब-याच वर्षांनी गेलो. मिटिंग झाली. जनाकाकाही होता. 'घर घेऊन करू काय? मला पैसे द्या. माझ्यासाठी नकोत, अनाथ विद्यार्थी गृहाला देणगी द्या तेवढ्या रकमेची ग्रंथालयासाठी. माझी भाजी भाकरीची तजवीज मी केलीये.' वाड्याच्या मालकांचा मुलगा आला होता मिटींगला. त्याच्या चेह-यावर आश्चर्याचे भाव होते. सगळं असून सुद्धा वाटा मागायला आलेलो आम्ही जनाकाका पुढे पार खुजे ठरलो. 

निघताना त्याच्या घरात गेलो. डोक्याचा पार सागरगोटा झालेला. ह्यांगरला लावतात तसा शर्ट दिसत होता त्याच्या अंगावर. बस म्हणाला. 'सिगरेट असेल तर दे, विडीनी त्रास होतो'. मी सिगरेट दिली. 'कसा आहेस'? 'आहे अजून, एवढंच. आता वाचन होत नाही. डोळ्यातून पाणी येतं चष्मा लावून पण. ऐकूही थोडं कमी येतं. पण ऐकतो गाणी, टेप बंद झाला तरी कळत नाही पण माझ्या कानात ती वाजत असतात. वाचतोस की नाही काही रोज? का फक्तं पेपर हेच वाचन? वाचत जावं रे रोज चार ओळी तरी. माझं आयुष्यं संपत आलंय, शेवटची पानं राहिलीत. मला वाटलं संपेल लवकर पण खंड दिसतोय बहुतेक. असो! येत जा रे अधून मधून, तेवढंच बरं वाटतं. जूनला ये, पोरांच्या वह्या पुस्तकांना कव्हरं घालून देतो, सकाळचेच या, जेवा आणि जा दुपारी.' मला हुंदका आवरला नाही. माझ्या पाठीवरून हात फिरवून म्हणाला, 'अरे, रडतोस कशाला. तुला माया आहे म्हणून ये म्हटलं. आता तुमची ती ई-बुक की काय आली एकदा शाळेत की कशाला कव्हरं लागतील मग. काळाचा महिमा. असो! येत जा, उलथलोय की नाही ते कळणार कसे नाहीतर तुला?' 

मी उठून पाया पडलो आणि येतो रे म्हणून निघालो आणि नात्यागोत्याच्या नसलेल्या माझ्या काकासाठी वाड्याबाहेर येउन हमसाहमशी रडलो फक्तं. 


--जयंत विद्वांस

Monday 25 May 2015

दो बिघा जमीन.....

शंभू महातो, त्याची बायको पारो (निरुपा रॉय) आणि मुलगा कन्हैया एवढं कुटुंब. गावाच्या जमीनदाराचं (मुराद) कर्ज असतं त्याच्यावर. त्याला त्याच्या जागेवर मिल काढायची आहे पण नेमकी मध्यात शंभू महातोची जमीन आहे. शंभूनी त्याच्याकडून पैसे उसने घेतले आहेत त्यामुळे तो ती जागा आपल्याला देईल याची त्याला खात्री आहे. शंभूच्या जगण्याचा एकमेव सहारा ती जमीन आहे. मुराद त्याला उद्याच्या उद्या पैसे परत दे नाहीतर जमिनीचा लिलाव करेन म्हणतो. बरं हिशोबानी कर्ज किती, तर एकूण रुपये ६५ फक्तं. शंभू घरातल्या वस्तू, बायकोचं कानातलं विकून ६५ रुपये गोळा करतो आणि त्याच्याकडे जातो. फुगवलेली रक्कम असते २३५ रुपये. कोर्टात ती रक्कम तीन महिन्यात फेडण्याची सवलत त्याला दिली जाते. शंभू आणि त्याच्या बरोबर हट्टानी, फसवून आलेला त्याचा मुलगा कन्हैय्या कलकत्त्याला जातात. रिक्षा चालवून पैसे गोळा करायचे आणि जमीन वाचवायची यासाठी.

शंभू नझीर हुसेनची रिक्षा चालवतो, हमाली करतो, त्याचा मुलगा जगदीप बरोबर बूट पॉलिश करतो. तिसरा महिना संपत आलाय. जास्तीत जास्ती पैसे गोळा करण्यासाठी तो पैशेवाल्याच्या हौसेसाठी रिक्षाची रेस लावतो, त्यात चाक निघतं आणि त्याला अपघात होतो. बापाची हालत बघून कन्हैया पाकीटमारी करतो. इकडे काही वार्ता नाही म्हणून काळजीत पडलेली पारो कलकत्त्याला येते. तिच्यावर बळजबरीचा प्रयत्नं होतो. तिथून पळताना ती गाडीखाली येते आणि  तिला दवाखान्यात नेण्यासाठी कडेनी जाणारी रिक्षा नेमकी शंभूचीच असते (मनमोहन देसाईला नावं ठेऊ नका आतातरी). कन्हैय्या इकडे पैसे चोरतो. आईला दवाखान्यात बघून त्याला वाटतं चोरीबद्दल देवानी शिक्षा दिली म्हणून तो ते पैसे फाडून टाकतो. शंभूची सगळी पुंजी पारोवर खर्च होते. इकडे गावात त्याच्या जमिनीचा लिलाव होतो. तिघे गावाकडे येतात आणि स्वत:च्याच जमिनीवर परके होतात. तिथली मुठभर माती घेणा-या वेड्या शंभूला रखवालदार मनाई करतो. जगण्यासाठी जगाच्या पाठीवर ते दिशाहीन निघतात आणि चित्रपट संपतो.

साधारण २/३ एकर म्हणजे दोन बिघे. साधारण ६२ वर्ष झाली या सिनेमाला. तेंव्हाही जागेला किंमत होती आणि आजही आहे. आता जागा बळकावण्याची पद्धत बदलली , एवढाच काय तो फरक. ४८ च्या बायसिकल थिव्हज वरून प्रेरित होऊन हा सिनेमा काढला असं वाचलंय, पण तो मी काही पाहिलेला नाही. Top 25 Must See Bollywood Films मधे दो बिघा जमीन आहे. अर्थात त्यात दिलंय म्हणून मी तो पाहिलेला नाही, न कळत्या वयात तो मी टी.व्ही.वर पाहिला होता. उर फुटस्तोवर रिक्षा चालवणारा माणूस म्हणजे अजय उर्फ परिक्षित सहानीचा बाप बलराज सहानी, इंग्लिश साहित्यात मास्टर आणि हिंदी साहित्यात पदवी घेतलेला एक उच्च शिक्षित माणूस आहे असं बघताना एका कळत्या माणसानी सांगितलं. तेंव्हा अभिनय वगैरे म्हणजे काय हे कळायचं वय नव्हतं. पण एवढं शिकून पण रिक्षा चालवतो म्हणजे हा माणूस फार भारी आहे हे मत कायम झालं. पुढे वक्त मधला 'ऐ, मेरी जोहराजबी' गाणारा, काबुलीवालामधे रडवणारा बलराज सहानी, कठपुतली मधे सुबीरसेनच्या आवाजात पियानोवर बसून 'मंझील वोही है प्यार की' म्हणणारा, सीमा मधला खुर्चीत बसून 'तू प्यार का सागर है' म्हणणाता बलराज सहानी आवडत गेला.
 मागच्या वर्षी मी एका च्यानलवर हा चित्रपट बघितला. डिप्रेशन आल्यासारखं झालं. आपल्याला लहानपणी ज्या गोष्टी सांगतात त्या बदलल्या पाहिजेत. चांगल्याचं चांगलं होतं, देव संकटात मदत करतो वगैरे बदलायला हवं सगळं असं वाटून गेलं. सगळी पात्रं अभिनयानी जिवंत केली, ते त्या भूमिका जगले वगैरे सगळं नाही आठवलं मला हा चित्रपट बघताना. पैसे गोळा करण्यासाठी राब राब राबणारा, मुलगा आजारी पडल्यावर चिंताक्रांत झालेला, आपल्याच जमिनीकडे सर्वस्वं हरवल्यासारखा बघणारा बलराज सहानी आपला कुणीतरी जवळचा वाटून गेला. पैशाकडेच पैसा जातो हेच खरं. सगळीकडे कंपन्या काढून खायला उगवण्यासाठी जमीन उरणार नाही अशी भीती वाटते. मिडास राजाची गोष्टं खरी होईल कदाचित. हात लावाल तिथे सोनं लागेल पण सोन्याचा घास कदाचित मिळणार नाही.   

हरियाला सावन ढोल बजात आया, आजा री आ निंदिया आणि धरती कहे पुकारके ही तिन्ही गाणी मला आवडतात यातली. अपनी कहानी छोड जा,  चुनरी सम्हाल गोरी आणि ए भाय चं शेवटचं कडवं (आणि अर्थात अशी अनेक गाणी) मन्नाडेनीच म्हणावीत.  'धरती कहे पुकार के, बीज बिछा ले प्यार के, मौसम बिता जाय' या गाण्यातला आशावाद आता साहित्य म्हणून उरलाय किंवा त्या अर्थानीच वाचायचा. कसला आलाय पापभिरूपणा असं वाटणं आता दृढ होत चाललंय. आतापर्यंतच आयुष्यं पापपुण्याच्या, समाजाच्या, संस्काराच्या भीतीनी स्वत:च्या इच्छेप्रमाणे मला किंवा अजून कुणाला जगता आलंय? आयुष्यं सरायची वेळ आली तरी राहून गेलेल्याची यादी खूप मोठी रहाते आणि मग एखाद्या क्षणी आपणच बाळगलेल्या तत्वांचा आपल्याला राग येतो. हताशपणा वाढतो, चीड येते पण काहीही करू शकत नाही याची जास्ती चीड येते. धनदांडग्याच्या मनाप्रमाणे वागायचं किंवा मग धनदांडगे व्हायचं एवढेच दोन पर्याय उरतात. दो बिघा… अस्वस्थ करतो. निरुपा रॉय, बलराज सहानी, त्याचा बाप, कन्हैया यांच्या घरावर, चेह-यावर, कपड्यांवर चिकटलेली ती गरिबी, लाचारी नकोशी वाटते. 

ते तिघं परत जातात तेंव्हा ह्या ओळीनी मात्रं पाणी आलं डोळ्यात. 'अपनी कहानी छोड जा, कुछ तो निशानी छोड जा, कौन कहे इस ओर तू फिर आये ना आय'. जिथे जन्माला आलो तिथून बेघर व्हायचं २३५ रुपयांसाठी? परत दिसेल ती भूमी की मेले असतील असेच कुठेतरी अज्ञातात? जगले असतील भिका-यासारखे खूप वर्ष सचोटीने की जगले असतील मनाप्रमाणे अल्पकाळासाठी जग वाईट म्हणतात त्या मार्गाला लागून? कोण कुठला शंभू महातो, मेला काय, जगाला काय, नाहीसा झाला काय, कोण नोंद ठेवणार? असे असंख्य महातो जगाच्या पाठीवर चरफडत असणार, उध्वस्त होत असतील, मातीवर प्रेम करताना माती होत असतील, जाना देव. रोज थोडं थोडं मरायचं आणि मरेपर्यंत त्याला जगणं म्हणायचं, थूत असल्या जिंदगी वर.

--जयंत विद्वांस

वन्स अपॉन अ टाईम (१८).....

स्थानिक मैदानावर तो बॉलिंग करत होता रस्त्यावरून इम्रानखान नियाझी चालला होता गाडीतून. त्यानी त्या पोराचा पेस बघितला आणि त्याला तिथून डायरेक्ट टीममधे घेतला. पाकिस्तानकडे जलद गोलंदाज कायम भन्नाट असायचे. सिकंदर बख्त, सर्फराज नवाझ, स्वत: इम्रान, वकार, थोटा अझीम हफीज, शोएब अख्तर आणि असे अनेक. वेस्टइंडीज कडे थ्री डब्ल्यूज् होते वारेल, विक्स, वालकाट तसे हे पाकचे टू डब्ल्यूज् - वकार युनुस आणि वसिम अक्रम. आमचा एक मित्रं बेक्कार युनुस आणि वसिम चक्रम म्हणायचा त्यांना. प्रेमापोटी दिलेली शिवी जास्ती प्रेमळ असते. धर्म, देश, राजकारण बाजूला ठेऊन आपण क्रिकेट बघितलं तर धमाल असते. स्विंगचे हे दोन बादशाह अफाट होते.

माणसाला मधेच चक्कर येउन तो जसा पडतो ना तसा त्यांचा स्विंग होता. 'अगं बाई, भाजी घ्यायची राहिलीच की' असं म्हणत भाजीवाला दिसल्यावर बायका जशा हात, इंडिकेटर न दाखवता गाडी वळवतात आणि मागच्या पब्लिकच्या कपाळात घालवतात तसा यांचा स्विंग विचार बदलल्यासारखा लेन बदलायचा. मग जी काय तारांबळ उडायची ती प्रेक्षणीय असायची. गावसकर म्हणायचा चेंडूची लकाकी आणि बॉलरचा हात यावर लक्ष ठेवायचं की काय पडणार त्याचा अंदाज येतो. अरे बाबा, तू ग्रेट होतास, बाकीच्यांनी काय करायचं? हाताकडे, लकाकीकडे लक्ष देई पर्यंत चेंडू पोचतोय इथे. मग गणेशोत्सव चालू व्हायचा, फुल लेझीम, फुगड्या, बसफुगड्या, लोळपाटणी, सगळे खेळ.

अक्रम दोन्ही स्विंग करायचा, बास होतं की एवढं खरंतर. स्पीड होता पण ऐकायचं म्हणून नाही. गरीब माणूस जसा प्यांट जुनी झाली की तिची बर्मुडा करतो, पायांच्या कापडात पिशव्या करतो आणि बर्मुडा लाजलावणी झाली की तिचं पायपुसणं करतो तसा हा अत्यंत गरीब आणि काटकसरी माणूस. मूळ सर्फराज नवाझनी शोधून काढलेला (गावसकर परवा म्हणाला, खरं तर त्याच्या सन्मानार्थ त्या स्विंगचं वर्णन करताना 'ही इज सर्फरायझिंग द बॉल' असं म्हटलं पाहिजे) रिव्हर्स स्विंग यानी प्रचलित केला, वापरला आणि गावभर शिकवला. डेथ ओव्हर मधे अक्रमच्या तोडीचा कुणीच नव्हता, नसणार. याचा यॉर्कर माफिया लोक जसे गद्दाराला किंवा दुश्मन पार्टीला शिक्षा देताना, कबूल करून घेताना बोटं कापतात, हातोडीनी बोटं ठेचतात तसा हा पायाची बोटं ठेचून फलंदाजाचा पायीस्तेखान करायचा. एकतर दोन्ही स्विंग, त्यात हा डावखुरा म्हणजे बाहेर जाणारा चेंडू आधीच खतरा, त्यात तो पक्ष बदलून आत आला तर काठीचा आवाज, नडग्यांना आयोडेक्स, नाहीतर भन्नाट बूटचेप्या यॉर्कर. गप सिंगल काढावी आणि समोर जावून उभं रहावं. काय मजा बघायचीये ती तिथून बघावी. 

म्याचफिक्सिंग, राजकारण, दुही अशा अनेक गोष्टींचा ताण आला आणि त्याला ऐन तिशीत मधुमेह झाला. पण त्याचं भांडवल न करता तो जोमानी फिट राहिला आणि खेळत राहिला. वन डे आणि टेस्ट दोन्हीत प्रत्येकी चारशेच्यावर विकेट घेणा-यात फक्तं तो आणि मुरली आहेत. हल्ली तो भारतातच जास्ती असतो. त्याची बायको २००९ ला चेन्नईला गेली. कोलकाता नाईट रायडर्सचा तो कोच आहे. तो उत्तम समालोचन करतो. अति बोलत नाही पण बौद्धिक बोलतो. कुणी शमीसारखा नवखा विचारायला गेला काही तर तो नेटमधे जाऊन मार्गदर्शन करतो. आकडेवारी काय आज लक्षात राहील ती मागे पडेल काळाच्या ओघात. फलंदाज बीट झाल्यावर कमरेवर हात ठेऊन त्याच्याकडे मिस्किल पहाणारा घामाघूम अक्रम लक्षात राहील. बाकी देश अन जात काय करायचीये. माणूस चांगला आहे, मग झालं तर.

--जयंत विद्वांस

वन्स अपॉन अ टाईम (१७).....

निखळ कौतुक ऐकायला नशिबात लागतं. 'याचा चेंडू आत्ता वळेल मग वळेल याला कंटाळून फलंदाज आउट होतो. शेवटचा कधी वळलेला रे? याला लेग स्पिनर का म्हणतात? मुनाफ पटेलचा स्पीड एवढाच आहे की' असे आणि इतर अनेक कुत्सित टोमणे त्यानी ऐकले आणि कानामागे टाकले. मुळात तो मिडीयम पेस टाकायचा (उंची ६' २") आणि कोर्टनी वाल्श (उंची ६' ६") लेगस्पिन टाकायचा. दोघांच्या कोचला सुबुद्धी सुचली आणि त्यांनी खांदेपालट केला. म्हणून वाल्शच लेगकटर खतरा होता आणि याचा गुगली.

मला वेस्ट इंडीज विरुद्धची एका कपची फायनल आठवतीये. त्यानी १२ मधे सहा घेतलेल्या. अम्ब्रोजला बोल्ड काढलेलाबॉल भन्नाट स्पीडचा यॉर्कर होता, कुणीही आउट झालं असतं. तो जिगरबाज होता, न कंटाळता गोलंदाजी करायचा. त्यानी एका डावात काढलेल्या दहा विकेट मी पाहिल्यात. खतरा बॉलिंग होती. जबडा फ्र्याक्चर असतानाही तो खेळायला उतरला होता वेस्टइंडीजमधे आणि तो सामना आपण वाचवला होता. भारतात त्याच्या सोबतीने अजूनही काही लोक पैसे कमवून गेले सॉरी टेस्ट खेळून गेले (राजू, फेकी राजेश चौहान) कारण टेस्ट आपण भाराभर जिंकायचो इथे. वार्नच्या स्पिनची दहशत होती तशी याच्या स्पीडची आणि गुगलीची. भल्याभल्यांना मी स्टंप समोर माती खाताना बघितलंय, प्लम एलबी. कुणाच्या नशिबात काय रेकॉर्ड असेल सांगता येत नाही. चामिंडा वाझनी ९६ टेस्टनंतर शतक काढलं होतं यानी ११८ सामने घेतले शतक काढायला. भारताचा कप्तान झालेला तो एकमेव लेगस्पिनर आहे.

भारतातर्फे खेळलेल्या काही सभ्य लोकांपैकी हा एक होता. तो, लक्ष्मण, सचिन, द्रविड, गांगुली एकावेळी खेळले हा मात्रं अत्यंत सुंदर योग होता भारतीय क्रिकेटच्या इतिहासातला. अत्यंत सभ्यं, आल तेंव्हा चष्मा लावणारा, अभ्यासू, कमी बोलणारा, अथक मेहनती माणूस होता तो. शेवटपर्यंत तसाच राहिला तो, चष्मा गेला फक्तं, लेन्स आल्या एवढाच काय तो फरक. एक उत्तम माणूस, चारित्र्यसंपन्न खेळाडू म्हणून तो कायम लक्षात राहिला. त्यानी जिंकायची सवय लावली, म्याच विनिंग बोलर, विकेट टेकिंग बॉलर ब-याच कालावधीनंतर लाभला होता. तो बी.ई.(मेक्यानिकल) आहे. आधीची एक मुलगी असलेल्या मुलीशी त्यानी लग्नं केलंय. केरळमधल्या कुंबळा गावात त्याच्या नावाचा रोड आहे.

नका का त्याचा चेंडू वळेना. शिस्तं आणि अचूकता याच्या जोरावर त्यानी टेस्ट/वनडे/फर्स्टक्लास मधे अनुक्रमे ६१९/३३७/११३६ विकेट्स घेतल्यात. त्यानी एकूण ४०८५० चेंडू टाकलेत टेस्ट मधे (मुरलीधरन ४४०३९), खायचं काम नाही महाराजा. चेंडू वळत नाही तर ही परिस्थिती, वळला असता पंचेचाळीस अंशात तर? रिझल्ट बघा रे, तीन नंबरला आहे तो, चेंडू वळत नाही म्हणे….

--जयंत विद्वांस

Wednesday 20 May 2015

गझलरंग.....

कालच्या गझलरंगला गेलो होतो. आपल्याला ज्यातलं फार कळत नाही तिथेही मी जातो. कानावर पडून कधी काळी काही समजेल या आशेने जातो. त्यांचे चार पाच कार्यक्रम बघितलेत मी. कविता, गझल हा माझा प्रांत नाही, लिहिण्याचा सोडाच, फार समजण्याचाही नाही.
आधी कोकणी गझलगायन झालं. भाषा फार समजत नसली तरी आधी मराठीत कोकणी गझलेचा भावार्थ सांगितल्यामुळे समजायला सोप्या गेल्या. राधा भावे त्यांच्या काप-या आवाजात गझल छानच वाचतात, त्यांची अस्तुरीची गझलही सुंदर होती. एक तबला, एक हार्मोनियम आणि दोन गायक पण मैफिलीची मजा देऊन गेले. खणखणीत आवाज होते दोन्ही नाईक मंडळींचे आणि चालीही ऐकताना सोप्या वाटणा-या पण म्हणायला अवघड होत्या. त्यानंतर नेहमीचा कार्यक्रम सुरु झाला.

अण्णा वैराळकर! कार्यक्रम वेळेत सुरु करणारा आणि संपवणारा विरळ माणूस. अण्णांनी त्यांचा जीव गझलवरून वैराळून टाकलाय. अण्णा रमाकांत आचरेकर आहेत. भुछत्रासारखे उगवणारे आणि लवकर नाहीसे होणारे तेंडूलकर ते बाळगत नाहीत. नवीन चेहरे स्टेजवर नेतात. त्यांचं कौतुक करतात, सांभाळून घेतात, पाय जमिनीवर राहू द्यात तर आकाश गाठाल असा स्पष्टं इशारा ते स्टेजवरून देतात. समान व्यसनी, समान शील, समवयस्कं लोकांशी मैत्री लवकर होते असं म्हणतात. अण्णांना वय आड येत नाही. फेसबुकावर चांगले लिहिणारे ते शोधतात, त्यांना मंचावर आणतात. क्रिकेटमधे पदार्पणाच्या सामन्यात त्या खेळाडूला जेष्ठ खेळाडूच्या हस्ते मानाची टोपी देतात. अण्णांनी अनेकांना अशा टोप्या (पदार्पणाच्या) घातल्यात. दर्दी रसिकांच्या पुढे गझला सादर करणं काही खायचं काम नाही पण आजची तरुण पोरं हे सगळं आरामशीरपणे करतात.

भालचंद्र भूतकर आणि मनोज दसुरी हे काल पहिल्यांदाच मंचावर आले होते. दोघांनीही आत्मविश्वासपूर्ण वाचलं. भूतकर तर सराईत माणूस वाटला मला. हच का छोटा रिचार्ज सुशांत खुसराळे. वयाला, वजनाला  न शोभणा-या पण झेपणा-या वजनदार शेरांनी तो धमाल उडवून देतो. कौस्तुभ आठल्येनी पण त्याच्या वजनाप्रमाणेच वजनदार शेर आणि गझल पेश केल्या. पूजा फाटे आणि स्वाती शुक्लं पण 'दाद'णीय गझला सादर करून गेल्या. 

सदानंद बेन्द्रें म्हणजे जेष्ठ माणूस. 'आन - मेन अॅट वर्क' मधला तो मनोज तिवारी जसा नमस्कार करतो तसा हा दाद स्विकारताना करतो. गंभीर मुद्रेने सूचक शेर लिहितो, वाचतो आणि पिंगट डोळ्यांनी मजा बघत असतो. दराडे मास्तरांची शेराची दुसरी ओळ इतरांपेक्षा जास्ती भेदक असते (शेर म्हटल्यावर ती असायलाच हवी) आणि तो ती पोचवतोही उत्तम. तो अनुभवाची गझल लिहितो, शब्दांचे नुसते पिसारे नसतात तर प्रत्येक शेराला तो अर्थांची अनेक अस्तरं लावून आणतो. सुधीर मुळीक हा डेल स्टेन आहे. त्याचा म्हणून एक खास ढंग आहे गझल वाचण्याचा. पहिली ओळ टिपेला नेली की दुसरी तो हळुवार वाचतो. त्याला कागद फार लागत नाही. सगळं पाठ असतं आणि स्टेनच्या स्पीडनी तो गझल आणि शेर आपल्या अंगावर सोडतो. पहिला यॉर्कर कुठे पचवतोय तर तो लेट आउटस्विंग टाकतो. त्यामुळे आपण चेंडू अंगावर घेणं हे जास्ती सोपं काम आहे. 

एकूण हा कार्यक्रम नेहमीच रंजक असतो. समोर बसलेल्या मनीषा नाईक, सुप्रिया, ममता सपकाळ अशा गझलकारा दुस-याला पण दाद देतात आणि एकूणच अण्णांनी जमवलेली सगळी माणसं लोभापोटी येतात आणि एका अनौपचारिक आनंद देतात. अण्णा आणि त्यांच्या टीमला अनेकानेक शुभेच्छा. 

--जयंत विद्वांस