Monday 25 May 2015

वन्स अपॉन अ टाईम (१८).....

स्थानिक मैदानावर तो बॉलिंग करत होता रस्त्यावरून इम्रानखान नियाझी चालला होता गाडीतून. त्यानी त्या पोराचा पेस बघितला आणि त्याला तिथून डायरेक्ट टीममधे घेतला. पाकिस्तानकडे जलद गोलंदाज कायम भन्नाट असायचे. सिकंदर बख्त, सर्फराज नवाझ, स्वत: इम्रान, वकार, थोटा अझीम हफीज, शोएब अख्तर आणि असे अनेक. वेस्टइंडीज कडे थ्री डब्ल्यूज् होते वारेल, विक्स, वालकाट तसे हे पाकचे टू डब्ल्यूज् - वकार युनुस आणि वसिम अक्रम. आमचा एक मित्रं बेक्कार युनुस आणि वसिम चक्रम म्हणायचा त्यांना. प्रेमापोटी दिलेली शिवी जास्ती प्रेमळ असते. धर्म, देश, राजकारण बाजूला ठेऊन आपण क्रिकेट बघितलं तर धमाल असते. स्विंगचे हे दोन बादशाह अफाट होते.

माणसाला मधेच चक्कर येउन तो जसा पडतो ना तसा त्यांचा स्विंग होता. 'अगं बाई, भाजी घ्यायची राहिलीच की' असं म्हणत भाजीवाला दिसल्यावर बायका जशा हात, इंडिकेटर न दाखवता गाडी वळवतात आणि मागच्या पब्लिकच्या कपाळात घालवतात तसा यांचा स्विंग विचार बदलल्यासारखा लेन बदलायचा. मग जी काय तारांबळ उडायची ती प्रेक्षणीय असायची. गावसकर म्हणायचा चेंडूची लकाकी आणि बॉलरचा हात यावर लक्ष ठेवायचं की काय पडणार त्याचा अंदाज येतो. अरे बाबा, तू ग्रेट होतास, बाकीच्यांनी काय करायचं? हाताकडे, लकाकीकडे लक्ष देई पर्यंत चेंडू पोचतोय इथे. मग गणेशोत्सव चालू व्हायचा, फुल लेझीम, फुगड्या, बसफुगड्या, लोळपाटणी, सगळे खेळ.

अक्रम दोन्ही स्विंग करायचा, बास होतं की एवढं खरंतर. स्पीड होता पण ऐकायचं म्हणून नाही. गरीब माणूस जसा प्यांट जुनी झाली की तिची बर्मुडा करतो, पायांच्या कापडात पिशव्या करतो आणि बर्मुडा लाजलावणी झाली की तिचं पायपुसणं करतो तसा हा अत्यंत गरीब आणि काटकसरी माणूस. मूळ सर्फराज नवाझनी शोधून काढलेला (गावसकर परवा म्हणाला, खरं तर त्याच्या सन्मानार्थ त्या स्विंगचं वर्णन करताना 'ही इज सर्फरायझिंग द बॉल' असं म्हटलं पाहिजे) रिव्हर्स स्विंग यानी प्रचलित केला, वापरला आणि गावभर शिकवला. डेथ ओव्हर मधे अक्रमच्या तोडीचा कुणीच नव्हता, नसणार. याचा यॉर्कर माफिया लोक जसे गद्दाराला किंवा दुश्मन पार्टीला शिक्षा देताना, कबूल करून घेताना बोटं कापतात, हातोडीनी बोटं ठेचतात तसा हा पायाची बोटं ठेचून फलंदाजाचा पायीस्तेखान करायचा. एकतर दोन्ही स्विंग, त्यात हा डावखुरा म्हणजे बाहेर जाणारा चेंडू आधीच खतरा, त्यात तो पक्ष बदलून आत आला तर काठीचा आवाज, नडग्यांना आयोडेक्स, नाहीतर भन्नाट बूटचेप्या यॉर्कर. गप सिंगल काढावी आणि समोर जावून उभं रहावं. काय मजा बघायचीये ती तिथून बघावी. 

म्याचफिक्सिंग, राजकारण, दुही अशा अनेक गोष्टींचा ताण आला आणि त्याला ऐन तिशीत मधुमेह झाला. पण त्याचं भांडवल न करता तो जोमानी फिट राहिला आणि खेळत राहिला. वन डे आणि टेस्ट दोन्हीत प्रत्येकी चारशेच्यावर विकेट घेणा-यात फक्तं तो आणि मुरली आहेत. हल्ली तो भारतातच जास्ती असतो. त्याची बायको २००९ ला चेन्नईला गेली. कोलकाता नाईट रायडर्सचा तो कोच आहे. तो उत्तम समालोचन करतो. अति बोलत नाही पण बौद्धिक बोलतो. कुणी शमीसारखा नवखा विचारायला गेला काही तर तो नेटमधे जाऊन मार्गदर्शन करतो. आकडेवारी काय आज लक्षात राहील ती मागे पडेल काळाच्या ओघात. फलंदाज बीट झाल्यावर कमरेवर हात ठेऊन त्याच्याकडे मिस्किल पहाणारा घामाघूम अक्रम लक्षात राहील. बाकी देश अन जात काय करायचीये. माणूस चांगला आहे, मग झालं तर.

--जयंत विद्वांस

No comments:

Post a Comment