Wednesday 27 May 2015

जनाकाका…….

त्याचं पूर्ण नाव जनार्दन विनायक जोशी. पण सगळा वाडा त्याला जनाकाकाच म्हणायचा म्हणून वाड्यात जन्माला आलेलं पोरसुद्धा बोलता येऊ लागलं की त्याला ए जनाकाका असंच म्हणायचं. कुणाच्याही नात्यातला नसलेला पण सगळ्या वाड्याचा नातेवाईक, असा होता तो. वाड्यातली प्रत्येक घरातली माणसं सोडा त्यांचे सगळे नातेवाईक पण जनाकाकाला माहित होते आणि त्यांना हा चक्रम माणूस माहित होता.

घारे डोळे, दणकट शरीरयष्टी, पाच फुटाची उंची, हातात सतत पिशवी, त्यात असंख्य पेपर (शब्दकोडं नसेल तर तो पेपर भिकार), विडी बंडल, दोन तीन माचिस (संपलेल्या पण असायच्या एक दोन, आपण फेकू लागलो की चिडायचा 'राहू दे रे खायला मागतायेत का तुला, पावसात उपयोगी येतात सादळल्या बाकीच्या की'), प्यांट राजकपूर सारखी कधी लांडी तर कधी चप्पल झाकेपर्यंत, शर्टला इस्त्री वगैरे भानगड बापजन्मात नाही, दोरीवरचा वाळलेला शर्ट अंगात घालणे इतकी सोपी क्रिया, झालर लावल्यासारखे केस आणि मधे अगदी सागरगोट्यासारखं तुळतुळीत डोकं, मानेभोवती कायम उपरणं कापून त्याचे केलेले मोठ्ठाले रुमाल, उजव्या हातात एचएमटीचं घड्याळ, भुवयांच्या मधे लावलेलं बोटभर उंचीचं लालगंध आणि तोंडात विडी नाहीतर शिव्या.  

एकेकाळी वाड्याला भलामोठा दरवाजा होता, दिंडी दरवाजा पण होता. तिथून आत शिरल्यावर डाव्या बाजूला कट्ट्यावर एक दहा बाय दहाची कोंदट, अंधारी खोली होती, ती जनाकाकाची. तो त्याला मठी म्हणायचा. माझा बालपणाचा बराच काळ त्या मठीत गेलाय. त्याच्या खोलीला कुलूप नसायचंच कधी. कुणीही कधीही जाऊ शकायचं उघडून. आम्हां मुलांना भारी वाटायचा तो प्रकार. 'अरे नेणार काय चोरून? रद्दी?' म्हणायचा तो. एक भिंतीच्या कडेला खरोखर असंख्य पेपर आणि जुनी मासिकं आणि असंख्य पुस्तकं ढिगानी पण व्यवस्थित लावलेली असायची. रसरंग, रविवारची जत्रा, स्पोर्ट्स्टार, फिल्मफ़ेअर, स्क्रीनचे अंक, विचित्रं विश्वं, किशोर, आनंद, चांदोबा डेट वाईज लावलेले असायचे, कुणी त्यात रस दाखवला, माहिती मागितली की जनाकाका फुलायचा. मग एकदम स्पेशल ट्रीटमेंट त्याला. तो स्वत: चहा करणार मग त्याच्यासाठी. कडू, कमी साखरेचा काढाच तो पण नावं ठेवलीत तर पुढच्या वेळेला थेंब सुद्धा मिळणार नाही, तुमच्या समोर तो एकटा पीत बसेल. 

अप्पा बळवंतला एका पुस्तकाच्या दुकानात तो काम करायचा. नवाला दहा मिनिट आधी तो तिथे हजार असायचा आणि पाच वाजले की दुकानाला आग लागू दे मी थांबायचो नाही असं म्हणत निघायचा. आजारी पडला तरच सुट्टी, उशीर नाही, अफरातफर नाही, वाचनाचा प्रचंड नाद असून कामाच्या वेळेत वाचणार नाही, निम्मा पगार तिथून पुस्तकं, मासिकं विकत घेण्यातच संपायचा. साताठ मिनिटात जेवायचा तो. मालक असल्या फटकळ माणसाला एक शब्दं बोलायचे नाहीत कारण जनाकाकामुळे येणारं गि-हाईक जास्ती असायचं. पुस्तकाचं नाव काढायची खोटी तो बरोब्बर काढायचा, संपलेला स्टोक त्याला पाठ असायचा, मग गि-हाईकासमोर तो श्रद्धापूर्वक मंत्र म्हणावेत तशी त्या प्रकाशनाची आई बहिण काढायचा. नविन पुस्तकं आली की कुणाला कोणतं आवडतं हे त्याला पाठ असायचा, हातोहात संपवायचा तो. येताना तो कोपरकरबुवांकडे जायचा. ते किर्तन शिकवायचे. विद्यार्थ्यांसाठी पूर्वरंग, उत्तररंग ते त्यांच्या अक्षरात लिहून काढायचे ते हा मोत्यासारख्या अक्षरात लिहून द्यायचा, नसेल काही काम तर तडक घरी. बरं, हे सगळं काम फुकट, कधी काळी अडचण आली तर वर्षाकाठी पन्नास शंभर मागणार. 

मी थोडा मोठा झाल्यावर त्याला म्हणालो होतो, 'अरे, फुकट कशाला करतोस, किंमत रहात नाही'. तो म्हणाला. 'अरे त्या कोपरकरचं अक्षर बघ एकदा, ते विद्यार्थी जीव देतील लकडीपुलावरून. गंमत जाऊ दे रे पण कोपरकर ती कला जिवंत ठेवतोय, आपल्याला जमेल तेवढं आपण करावं, माझे वडील कीर्तन करायचे वर्षातून दोनदा बोरवाडीस उत्सवात, माणूस जागचा हलायचा नाही, एकपात्री करायचे रे अक्षरश:. मला पण हौस होती पण नाही जमलं बघ. अजून पन्नास वर्षांनी कीर्तनकार राहील का बघ आणि असलाच चुकून एखादा तर ओंकारेश्वराला कीर्तन करायला सांग, माझ्या आत्म्याला शांती लाभेल'. जनाकाका सहसा उलगडायचा नाही पण गावची आठवण झाली की एकदम शांत व्हायचा. जूनच्या सुरवातीला वाड्यातल्या सगळ्या मुलांच्या वह्या पुस्तकांना कव्हरं घालून त्यावर स्केचपेननी सुबक नावं टाकून द्यायचा तो. अर्थात सगळ्या वाड्याची वह्या पुस्तकं तो त्याच्या दुकानातूनच आणायचा. हातात देताना म्हणायचा 'रांडेच्यानो टिकवा नीट वर्षभर, बाप घाम गाळून पैसा आणतोय, मटक्याच्या अड्ड्यावरून नाही. कव्हर निघालं किंवा पानं दुमडलेली दिसली ना तर ढुंगणं जांभळी करेन फोडून'. पुस्तकाची अवहेलना, हेळसांड त्याला सहन व्हायची नाही. तळमळून म्हणायचा, 'वाचावं रे सतत काहीतरी, वाया जात नाही. टे-या उडवून नाचताय ट ला ठ जोडलेल्या गाण्यांवर, ते उपयोगाला नाही यायचं'. मी पाचवीला गेल्यावर मला त्यानी रेन मार्टिन आणि विरकर डिक्शनरी दिली होती. माझ्याकडून पाचशे इंग्लिश शब्दं पाठ करून घेतलेले त्यानी सुट्टीत.      

जनाकाका रांगोळ्या सुरेख काढायचा. पण ते ठिपके प्रकरण नाही जमायचं त्याला. सहा बाय सहा फुट मिनिमम साईझ. हनुमान, मोर, रामपंचायतन, देखावा, शिवाजी किंवा फ्री ह्यांड जे सुचेल ते, आधी खडूनी काढून घ्यायचा मग रंग भरायचा. कणभर रंग बाहेर गेला खडूच्या की मागून त्या मुलाचा/मुलीचा उद्धार व्हायचा. मुलगा असेल तर 'भोसडीच्या ते केस मागे घे, हात सारखा सारखा भांग पाडताना कसा फिरतो तसा स्मूथ फिरू दे ' आणि मुलगी असेल तर 'ताराराणी, दमलात का आपण? विश्रांती घ्या हवं तर, माझा मोर उद्या नाचला तरी चालेल'. एकही पोर दुर्मुखायचं नाही, त्याच्या शिव्या खाण्यात पण मजा होती. गणेश विसर्जनाला वाड्याच्या मधल्या भागात सगळ्यांची पंगत बसायची, फुटपट्टीनी काढल्यासारख्या सरळ रेषेत तो चार बोट नाचवत रांगोळी काढायचा. उदबत्ती लावायला बटाट्याचे काप सुद्धा आकर्षक आणि वेगवेगळ्या आकारात कापायचा. त्याच्या अंगात कला उपजत होती. 

माझ्या लॉगटेबल वर चिकटवायला गावसकर त्यानी राज्यं दान दिल्याच्या अविर्भावात दिला होता. 'हवं तर अख्खा पेपर घे, पण तो फाडू नकोस. काहीतरी हरवल्यासारखे वाटत रहाते मग तो कापलेला तुकडा दिसला की'. काहीवेळेस तो संध्याकाळचा दिवा न लावताच खुर्चीत बसायचा. समोरच्या स्टुलावर पाय ठेवून कडेच्या छोट्या स्टुलावर टेप ठेवायचा आणि नाट्यसंगीत लावायचा. तान, हरकत जितकी जोरकस तितका विडीचा झुरका दमदार. खोली निकोटीनच्या वासानी भरायची अगदी पण हा तासंतास बसायचा गाणी ऐकत. एकदा मी विचारलं तीच तीच गाणी ऐकून कंटाळा कसा येत नाही तुला? तो म्हणाला. ' गाणी नाहीयेत रे ही, आठवणी आहेत. ऐपत नसताना वडिलांनी आणला होता हा टेप, कुणी आलं मुंबईहून की गाण्याच्या क्यासेट आणायला सांगायचे. वद जाऊ कुणाला शरण… ऐकलंयेस? आई फार सुंदर म्हणायची. जेवणं झाली की बाबा तिला अधून मधून म्हणायला लावायचे आणि कौतुकानी तिच्याकडे बघत बसायचे. बाबांचा आवाज ही गोड. मर्मबंधातली ठेव ही…. अप्रतिम म्हणायचे. गाणं संपलं की डोळे टिपायचे. क्यासेट मधल्या गाण्यांचा क्रम, हरकती सगळं तेच आहे पण हे सगळं मी परत परत अनुभवतो'.

गावाला त्याचं कुणीही नव्हतं आता. पोटासाठी पुण्यात आला आणि इथलाच झाला. तुटपुंजा पगार, आजारी आई वडील यामुळे त्यानी लग्नं केलंच नव्हतं. त्याला सगळा स्वयंपाक यायचा. तल्लख बुद्धी, तिरकस भाषा, अफाट वाचन, दुस-याला चांगलं सांगण्याची तळमळ आणि स्वच्छ चारित्र्यं अशा सगळ्या गुणावगुणांसकट तो वाड्याचा झाला होता. वाड्याचा रखवालदारच तो. मधलं अंगण रोज सकाळी झाडून काढताना पुटपुटल्यासारखे मनाचे श्लोक म्हणायचा. माझे बाबा त्याला कोकणी रामदास म्हणायचे. सुट्टीत रात्री जागवायचा पोरात पोर होऊन. कोडी घालायचा, भसाड्या आवाजात मराठी न ऐकलेली गाणी, श्लोक म्हणायचा. कदाचित त्याचं हरवलेलं बालपण शोधायचा. केवळ शालेय शिक्षण नसलेला हा तल्लख ब्रम्हचारी आम्हांला काय काय देऊन गेला याची यादी नाही करता येणार. वाचा, ज्ञान मिळवा, वाया जाणार नाही हे सांगतानाची त्याची तळमळ आता कुणात दिसत नाही.  

वयं वाढत गेली. वाटा बदलत गेल्या. वाडा आणि माणसं म्हातारी झाली, काही संपली, काही दुसरीकडे गेली, जनाकाका आहे तिथेच आहे. आम्हीही वाडा सोडला, कोथरूड वरून हल्ली गावात येणं होत नाही फार. परवा वाड्याच्या मालकांनी बोलावलं होतं, वाडा बिल्डरला द्यायचा म्हणून मिटिंग होती. वाड्यात ब-याच वर्षांनी गेलो. मिटिंग झाली. जनाकाकाही होता. 'घर घेऊन करू काय? मला पैसे द्या. माझ्यासाठी नकोत, अनाथ विद्यार्थी गृहाला देणगी द्या तेवढ्या रकमेची ग्रंथालयासाठी. माझी भाजी भाकरीची तजवीज मी केलीये.' वाड्याच्या मालकांचा मुलगा आला होता मिटींगला. त्याच्या चेह-यावर आश्चर्याचे भाव होते. सगळं असून सुद्धा वाटा मागायला आलेलो आम्ही जनाकाका पुढे पार खुजे ठरलो. 

निघताना त्याच्या घरात गेलो. डोक्याचा पार सागरगोटा झालेला. ह्यांगरला लावतात तसा शर्ट दिसत होता त्याच्या अंगावर. बस म्हणाला. 'सिगरेट असेल तर दे, विडीनी त्रास होतो'. मी सिगरेट दिली. 'कसा आहेस'? 'आहे अजून, एवढंच. आता वाचन होत नाही. डोळ्यातून पाणी येतं चष्मा लावून पण. ऐकूही थोडं कमी येतं. पण ऐकतो गाणी, टेप बंद झाला तरी कळत नाही पण माझ्या कानात ती वाजत असतात. वाचतोस की नाही काही रोज? का फक्तं पेपर हेच वाचन? वाचत जावं रे रोज चार ओळी तरी. माझं आयुष्यं संपत आलंय, शेवटची पानं राहिलीत. मला वाटलं संपेल लवकर पण खंड दिसतोय बहुतेक. असो! येत जा रे अधून मधून, तेवढंच बरं वाटतं. जूनला ये, पोरांच्या वह्या पुस्तकांना कव्हरं घालून देतो, सकाळचेच या, जेवा आणि जा दुपारी.' मला हुंदका आवरला नाही. माझ्या पाठीवरून हात फिरवून म्हणाला, 'अरे, रडतोस कशाला. तुला माया आहे म्हणून ये म्हटलं. आता तुमची ती ई-बुक की काय आली एकदा शाळेत की कशाला कव्हरं लागतील मग. काळाचा महिमा. असो! येत जा, उलथलोय की नाही ते कळणार कसे नाहीतर तुला?' 

मी उठून पाया पडलो आणि येतो रे म्हणून निघालो आणि नात्यागोत्याच्या नसलेल्या माझ्या काकासाठी वाड्याबाहेर येउन हमसाहमशी रडलो फक्तं. 


--जयंत विद्वांस

No comments:

Post a Comment