Friday 22 January 2016

सत्तर एमएम चे आप्तं (११)… सी.रामचंद्र…

सत्तर एमएम चे आप्तं (११)… सी.रामचंद्र…


प्रत्येक चित्रपटसृष्टीचा एक विशेष असतो. हॉलीवूडला गाण्यांचा दुष्काळ तर आपल्याकडे गरज नसली तर कोंबतील. आपल्याकडेही परत अनंत प्रकार आहेत. साउथकडे पैलवान हिरोईनी, अतर्क्य फाईट सीन्स, भन्नाट डान्स स्टेप्स, लाउड अभिनय (यांचे रिमेक जास्ती चांगले वाटतात), मराठीत दोन टोकं, काहीवेळेस बांधेसूद पटकथा, उत्तम अभिनय तर कधी अश्रुधूराचा बाँब फोडतात नाहीतर मग हसू न येणारे विनोदी चित्रपट. पण हा झाला आत्ताचा काळ. साठ ते नव्वदच्या दरम्यान संगीत हा प्राण होता चित्रपटाचा, मराठी असो की हिंदी. हिरो पंजाबी गोरा, देखणा, हिरोईन साउथकडची चांगली डान्सर, चरित्र भूमिकेला मराठी लोक, गायला लता, आशा, संगीत बंगाली मॉब जास्ती (एसडी, हेमंतकुमार, सलील चौधरी, अनिल विश्वास) की झाला चांगला हिंदी चित्रपट. या सगळ्यात एक मराठी माणूस वेगळेपण  टिकवून राहिला - सी.रामचंद्र.

पुणतांब्याला १२ जानेवारी १९१८ ला जन्माला आलेला आणि ५ जानेवारी १९८२ ला स्वत:च्याच नावातला राम म्हटलेला हा रामचंद्र नरहर चितळकर नावाचा बेफाट, हुन्नरी आणि देखणा माणूस जगला असता तर आत्ता अठ्ठ्याणव वर्षांचा असता. मोठी गंमत असते. आपण ठरवतो ते आयुष्यात होतंच असं नाही किंबहुना न ठरवलेलं जास्ती होतं. आधी त्यांनी चित्रपटात केलं, मग तमिळ चित्रपटात संगीतकार झाले, अण्णासाहेब, राम चितळकर, शामू आणि सी.रामचंद्र अशी चार नावं लावून संगीत दिलं, मराठी चित्रपटात आर.एन.चितळकर असं नाव लावून कामं केली, गाणी म्हटली, चित्रपट काढले, 'माझ्या जीवनाची सरगम' नावाचं आत्मचरित्रं लिहिलं आणि या सगळ्याला बाजूला सारून लक्षात रहातील अशा अजरामर चाली दिल्या.

'अपलम चपलम, चपलाई रे' हे मी त्यांचं सगळ्यात पहिलं ऐकलेलं गाणं. संगीतकार, गीतकार, गायक कोण वगैरे काहीही कळायचं वय नव्हतं तेंव्हा ऐकलेलं. पुढे कळलं की या माणसाचं नाव सी.रामचंद्र. न कळत्या वयात मी त्यांचं आत्मचरित्र वाचलं होतं. भिकारदास मारुतीपाशी गोवित्रीकरांची लायब्ररी होती. त्यांच्याकडून घेऊन मामानी दिलं होतं. खूप वर्ष मी ते शोधतोय, मिळत नाहीये. 'आम्ही चौपाटीच्या वाळूवर रत झालो' असं काहीतरी वाक्यं त्यात होतं. 'रत' शब्दाचा अर्थ विचारल्यावर मामा म्हणाला होता, मोठा झालास की कळेल आपोआप. वयानी मोठा झालो आणि आणि जगण्यातले तोटे लक्षात येऊ लागले, तो तोट्यातला धंदा अजूनही चालूच आहे, अर्थ समजले, अज्ञानातली मजा गेली. माणूस मोठा कलाकार, हुन्नरबाज, असामान्य असला की वादग्रस्त असतो की वादग्रस्त माणसात हुनर असतो, हा मला कायमस्वरूपी पडलेला प्रश्नं आहे. आपण चांगलं ते बघावं, उचलावं, अनुकरण करावं. उगाच गुडघ्यावर शाल टाकून गायला बसलं म्हणजे कुणी भीमसेन होत नाही. आपण सोप्पं ते उचलतो. आज्जी म्हणायची, 'अरे, शेणसुद्धा रस्त्यावर पडलं तर उठताना माती घेऊन उठतं, आपण जिथे जातो तिथल्या माणसात चांगला गुण असेल तर चिकटवून घ्यावा'.

लोकांना त्यांची चांगली गाणी आठवणार नाहीत पण 'ए मेरे वतन के लोगो'ची स्टोरी पदरची चार वाक्यं घालून बोलतील. सत्यं हे मोहरी शोधण्यासारखं असतं, कोण कष्ट घेणार. मी वाचलंय एका ठिकाणी - नेहरू रडले वगैरे सगळं सपशेल खोटं आहे. ते रडले हे गाणं चांगलं असण्याचं सर्टिफिकेट आहे का? समजा ते रडले नसते तर आपल्याला आवडलं नसतं का? पण आपल्याला कुणा मोठ्या माणसाच्या नावाचा टेकू लागतोच. मुळात अचानक सादर करायला सांगितलेलं हे गाणं होतं म्हणे. प्रदीपनी या गाण्याची शंभर कडवी लिहीली होती म्हणे. अर्धवट माहितीवर छातीठोकपणे बोलण्यासाठी आपल्याला अभ्यास करावा लागत नाही. त्यामुळे शहाण्या माणसांनी ऐकावं सगळं पण ते पुढे पोचवताना तारतम्य ठेवावं ही पोच आपल्याला कधी येणार काय माहित. माणूस गेला की तो आरोपांना उत्तर देऊ शकत नाही त्यामुळे नंतर केलेले आरोप मूर्खपणाचे असतात. मोठ्ठी माणसं अशावेळी मौन धारण करतात आणि तेलपाणी घालतात, ज्यांना सत्यं माहित असतं ते घाबरून गप्पं बसतात. 'ये जिंदगी उसीकी है' 'मूर्तिमंत भीती उभी' वरून बेतलय हे स्वत: चितळकरांनी सांगितलं होतं, मग कशाला चिखलफेक हवी होती. पण शेवटी मातीचेच पाय असतात सगळ्यांचे. कसलातरी राग कुठेतरी काढत असावेत. त्यावर आधारित आहे म्हणून त्याची गोडी कमी होत नाही आणि मुळात त्यांनी ते लपवलेलंही नाही. अनेक चीजांपासून स्वत: गाणी बनवली की ती क्रिएटीव्हिटी आणि दुस-यांनी बनवली की ती चोरी असते. आरोप प्रथितयश माणसांनी केला की साला त्याला सुद्धा वजन असतं कारण लोक बोलतात पण दबक्या आवाजात, तिथे फावतं. असो!

अर्थहीन पण उच्चाराला -हिदम लटकलेले शब्दं चालीत बसवणं हे काम सी.रामचंद्रनी सुरु केलं असावं. 'आशा' मधलं 'इना मीना डिका' त्याची सुरवात होती. 'शिनाशिनाकी बुबला बू' अशा नावाचा चित्रपट पण त्यांनी केला होता. त्यांची सगळी गाणी मी काही ऐकलेली नाहीत. पण जी ऐकली आहेत ती अफाट आहेत. त्यांचा आझाद, नवरंग, अलबेला, अनारकली पुरेसे आहेत मला. राधा ना बोले ना बोले, तलत न आल्यामुळे म्हटलेलं 'कितना हसीं ही मौसम', जा री जा री ओ कारी बदरिया, अपलम चपलम - आझाद (आधी नौशाद कडे गेला होता 'आझाद' पण तीस दिवसात दहा गाणी पाहिजे म्हटल्यावर त्यांनी 'हे काय वाण्याचं दुकान आहे का' म्हणून निर्माता नायडूला हाकललं होतं), जा रे हट नटखट, आधा है चंद्रमा, कारी कारी अंधियारी, श्यामल श्यामल वरन, तू छूपी है कहा  - नवरंग, धीरेसे आ जारी अखियनमें , शोला जो भडके, शाम ढले खिडकी तले, किस्मत की हवा कभी नरम आणि एव्हरग्रीन भोली सुरत दिलके खोटे - अलबेला, जागे दर्द इश्क जाग, मोहब्बत ऐसी धडकन है, आजा अब तो आ जा आणि 'मूर्तिमंत भीती उभी' या नाट्यसंगीतावरून घेतलेलं 'ये जिंदगी उसीकी है' - अनारकली, निगार सुलतान आणि गोप वर चित्रित झालेलं सी.रामचंद्रनीच म्हटलेलं 'मेरे पिया गये रंगून'.


मला काही गाण्यातलं एवढं कळत नाही पण ' जा री जा री ओ कारी बदरिया' मधे दोन्ही 'ग' आहेत असा माझा समज आहे (चुकीचा असला तर असो बापडा) पण ती चाल बदलते ना तिथे आणि कडव्याच्या शेवटी शब्द आणि सुरांना अस्तर लावल्यासारखा ठेका येतो तिथे जीव टाकावा असा प्रकार आहे अगदी. 'अपलम चपलम'चा ठेका ऐका, अवीट गोडीचं गाणं, कितीही वेळा ऐका. त्यात 'काहे को ये आग लगाई रे, लगाई रे, लगाई रे, 'रोए, रोए, जान गवाई रे, गवाई रे, गवाई रे' आणि 'सुदबूद सब बिसराई रे' नंतर जी धावपळ आहे ना ती आणि ती शब्दांची जी पुनरावृत्ती आहे नं ती मला अत्यंत आवडून गेलेली आहे. एके ठिकाणी मी वाचलं होतं ' गायकाला गाता ठेवेल असा हवा, वरचढ नको'. आताच्या गाण्यात ठेका ऐका फक्तं, शब्दं समजून घ्यायच्या भानगडीत पडू नका. मोजक्या वाद्यात मजा येतेच की पण आहे घरात, ठेवून खराब होईल अशा भीतीनी वाजवतात हल्ली सगळी वाद्यं. त्यांच्या 'ये जिंदगी उसी की है'ला फुफ्फुसं गळ्यापाशी येतील म्हणायला गेलो तर आणि 'मोहब्बत ऐसी धडकन है' ला मोरपीस फिरेल. सगळा 'नवरंग' घ्या, सुरेल श्रवणीय गंमत सगळी (महिपाल आणि संध्या - नाही काही बोलत). 'नवरंग'चा रिमेक व्हायला हवा. 

एका संगीतकारानी सांगितलं होतं, 'स्वर सातच आहेत पण तुम्ही कुठल्या स्वरानंतर कुठला घेताय, कितीवेळा घेताय, तिथे किती रेंगाळताय यावर चालीचं वेगळेपण ठरतं'. चाल म्हणजे सुरांची कुठल्यातरी क्रमाने मांडलेली आरास नव्हे तर तो फ्लो आहे, उतारावरून पाणी जसं लयीत खाली येतं तशी हवी चाल, न अडखळता आलेली, धाप न लागलेली, प्रवाह न तुटलेली, मधे आलेल्या खड्यांना किंवा खडड्यांना ओलांडताना ठेका समजून त्याच्याशी गुजगोष्टी करून पुढे जाणारी. आताचा गोंगाट ऐकला की जुन्याची किंमत कळते, मेलडी म्हणजे काय ते कळतं. अनेक शोध लागतील, नवनवीन वाद्य निघतील पण चाल, सुरेलता यंत्रातून येत नाही, नाहीतर चाली करायचं मशिन किंवा सॉफ्ट वेअर निघालं असतंच की.

जोपर्यंत गणशोत्सव आणि लग्नाची वरात आहे तोवर तीन गाणी अजरामर आहेत 'नाच रे मोरा', 'मुंगडा मुंगडा' आणि 'भोली सुरत दिल कॆ खोटे'. झोपडपट्टीत कुणाच्या तरी लग्नात बेंजो आणि ढोलक वर वाजलेली ट्यून त्यांच्या डोक्यात होती. त्यांनी आणि भगवानदादांनी त्याला बोलावून त्याच्याकडूनच ती वाजवून घेतली ती. ज्याला चाली चोरायच्यात तो माणूस असं कशाला करेल. शेवटी शेवटी ते रग्गड प्यायचे एवढीच गोष्टं लक्षात ठेवण्यासारखी आहे त्यांची?

चितळकर, हल्ली एका चित्रपटात दोन (खूप होतायेत ना) सुरेल, शब्दं समजतील, गुणगुणावीशी वाटतील अशी गाणी सापडणं हा दुर्मिळ योग आहे आणि तुम्ही एकाच सिनेमात सगळी गाणी हिट देण्याची करामत करत होतात. खरं खोटं एक तुम्हांला आणि एक हयात व्यक्तीला माहित, माझ्यासाठी 'आझाद', 'नवरंग', अलबेला', 'अनारकली' 'पतंगा'ही वस्तुस्थिती आहे, बाकी काय करायचंय मला.  
जयंत विद्वांस 







    

No comments:

Post a Comment