Sunday 3 January 2016

एकपात्री 'नटसम्राट'….


एकपात्री 'नटसम्राट'…. 
 
एकपात्री प्रयोग तसा सोप्पा नसतो. स्वत:च्या खांद्यावर सगळं पेलण्याची जबाबदारी असते, मोठी रिस्क असते, हसं होण्याचे चान्सेस असतात. पण अनेक पात्रं असतानाही एकपात्री करणं अजून अवघड असतं. नानानी एकपात्री केलाय 'नटसम्राट'. बाकीचे कलाकार कमी आहेत म्हणून तो ग्रेट वाटलाय असं आहे का? तसंही अजिबात नाहीये. सुनिल बर्वे, नेहा पेंडसे, मृण्मयी देशपांडे, परब सुसह्य आहेत, कामं चांगली केलीयेत.

थोड्या खटकलेल्या गोष्टींवर आधी  बोलून घेतो. मेधा मांजरेकरही वाईट नाही, ती खटकत नाही, दोन तीन प्रसंगात ती छान बोललीये (फक्तं पहिल्या शॉटमधे तिची नऊवारी रेडीमेड तिच्या मापाची असावी का अशी एक शंका येईल एवढी ती ऑकवर्ड दिसलीये). मूळ नाटकात नसलेला विक्रम गोखले आहे म्हणून खटकत नाही, नसता तरी अडलं नसतं. पण त्यानी वडिलांसारखं स्टेजवर नटसम्राट करायला हरकत नाही. काळ जुना दाखवलाय, नंबर प्लेट एमएलयू आहे, लग्नातली गाडी पण जुन्या काळातली आहे आणि चोरीचा संशय येतो ते पैसे पाचशेच्या हल्लीच्या पिवळ्या नोटांमध्ये आहेत. मध्यंतरापर्यंत जरा ढिल्ला वाटतो. नटसम्राट दारुडे होते की काय असं वाटेल नविन पिढीला असे प्रसंग आहेत. असो!


किरण यज्ञोपवीतचे संवाद अप्रतिम. कुसुमाग्रजांना लाज आणतील असं काहीही त्यात नाही. नाटकाचा सिनेमा मात्रं सुंदर केलाय. पटकथा प्रवाही आहे. मुळात मूळ कलाकृतीचं संचित पाठीशी आहे, त्यामुळे त्याचं बोट धरून जरी चाललं तरी प्रवास सुखकर होऊ शकेल असं असतानाही कुठे ताल सुटला तर सगळं चांगलं मातीत जाईल अशी भीतीही आहे. महेश मांजरेकरनी ती कसरत दोरीवर चालणा-या डोंबारणी सारखी छान पेलली आहे यात शंका नाही. डायरेक्टर डोकावतो तेंव्हा चित्रपट काही ठिकाणी अंगावर येतो. ५४ इंचीला सुद्धा बघण्यात मजा नाही, थेटरच पाहिजे असा सुंदर केलाय त्यानी. लागू, दत्ता भट, यशवंत दत्त, चंद्रकांत गोखले, मोहनदास सुखटणकर, राजा गोसावी, लक्ष्मण देशपांडे (द्विपात्री), गिरीश देशपांडे यांना ज्यांनी पाहिलं नसेल त्यांनी हा नटसम्राट बघावा.  

आता उरला नाना. त्याच्या कौतुकासाठी किती लिहावं हा प्रश्न पडलाय. तिरंगा, यशवंत, क्रांतिवीर, अंकुश, अब तक छप्पन आणि इतर कुठलाही नाना यात डोकावत नाही एवढं लिहिलं तरी पुरेसं आहे. नटाला ते पात्रं कळलं की त्यासारखी मजा नाही. तो त्या पात्राच्या प्रेमात पडायला हवा मग ते त्याला जमलं की तो स्वत:च्या प्रेमात पडतो आणि मग चालू होतो तो नट आणि त्या पात्राचा रोमांस. मग आजूबाजूला कुणी आहे, नाही याचं भान उरत नाही आणि तो ते पात्रं जगत जातो, आतून बाहेर काढतो आणि अजरामर करतो. मूळ नाटक नानासाहेब फाटकांना डोळ्यापुढे ठेऊन लिहिलं गेलं होतं कारण तो आवाजाचा बादशहा होता. संगीत नाटकात तीन सप्तकात फिरणारा गळा हवा असतो तसा गद्य नाटकातला तो तीन सप्तकात फिरणारा बुलंद आवाज होता असं ऐकलय. त्यांचं आत्मचरित्र वाचलंय मी, यातली स्वगतं त्यांच्या अनेक नाटकात केलेल्या भूमिका डोळ्यापुढे ठेऊन लिहिली गेलीयेत. 

मूळ नाटककाराला अभिप्रेत असणारा नटसम्राट कदाचित वेगळा असेल पण फाटक गेले आणि लागूंनी तो केला, त्यांनी पहिला केल्यामुळे नंतरच्या लोकांना तुलना नशिबी आली आणि त्यात गैर काहीही नाही. नाना बघायला जाण्याआधी तुमची पाटी कोरी असो नसो, त्याचं नाव लिहिण्यात तो यशस्वी झालाय. या अजरामर शोकांतिकेतले भाव त्यानी मेहनतीनी पोचवलेत. विषण्णता, हतबलता, उद्वेग, सात्विक संताप, चीड, हळवेपणा, कातरता, वैराग्यं, द्वेष, कटुतेच्या पलीकडे गेलेलं म्हातारपण, सरकार गेल्यावर सर्वस्वं हरवणं म्हणजे काय ते त्यानी अफाट दाखवलंय. त्याचं चालणं, पडलेले खांदे, प्रत्येक प्रसंगातली वेगळी देहबोली, डोळ्यांचा अप्रतिम वापर, त्याच्या चेह-यावर उमटणा-या प्रतिक्रिया परत परत पहाव्या अशा आहेत. 

मुलीला रागानी हाक मारताना लागलेला आवाज आणि ते स्वगत अंगावर काटा आणतं. राजा त्याला विचारतो 'नाटक पाहिलंय का कधी?' तेंव्हा, कावेरी म्हणते, 'ती सुया शोधत नव्हती', तेंव्हाचा त्याचा चेहरा बघा. नाटकावर तो पोटतिडीकीनी जितेंद्र जोशीला बोलतो तेंव्हाची त्याच्या आवाजातली तळमळ ऐका, त्याचं थेटरातलं स्वगत ऐका, जळलेल्या थेटरात त्याच्या अंगात शिरणा-या पात्रावर तो स्वार होतो तेंव्हाची त्याची तडफ आणि तो आवेग ओसरल्यावर गलितगात्र झालेला नाना बघा. वयानी आलेली हतबलता आणि वय विसरून आलेला राग क्षणात दाखवलेत, ते बघाच एकदा थेटरात जाउन. परत बघितला की परत लिहीन त्याच्यावर अजून.  नाना आणि विक्रम गोखलेंनी ते स्टेजवर करावं अशी एक वेडी इच्छा आहे. काय धाय मोकलून रडायचं राहिलंय ते एकदा  रडून घेईन, ती स्वगतं ऐकून मोहरून जाईन, तोंड फाटेस्तोवर किंवा समोरचा बंद करेस्तोवर त्यावर बोलेन आणि त्यांच्या पायावर डोकं ठेवेन एकदा, इतक्या क्षुल्लक अपेक्षा आहेत माझ्या.  

काळ बदलेल, आपणही म्हातारे होऊ, मुलं विचारत नाहीत ही शोकांतिका वाटणार नाही अजून काही वर्षांनी, इतकं ते प्रथा असल्यासारखं घडत राहील, त्यामुळे आज घळाघळा पाणी आलं तेंव्हा तसं येईल न येईल माहित नाही, तेंव्हा नटसम्राटची कथा कालबाह्य होईलही पण ती स्वगतं रहातील, शेक्सपिअर राहील तसे शिरवाडकर पण रहातील. लागू रहातील, नाना राहील, नविन कुणीतरी बेलवलकर म्हणून उभाही राहील. तेंव्हा तो त्याच्या पद्धतीने करेल हे सगळं. एखादा माणूस सांगेल त्याला 'मागे विश्वनाथ पाटेकर नावाच्या बापमाणसानी सुंदर केलं होतं, ते बघ एकदा म्हणजे तुझं तुला नवीन काही सापडायचं राहिलं असेल ते सापडेलही'.

जयंत विद्वांस 
 
   

1 comment: