Saturday 30 January 2016

सत्तर एमएम चे आप्तं (१२)… केश्तो मुखर्जी…

सत्तर एमएम चे आप्तं (१२)… केश्तो मुखर्जी…
 
सुंदर निखळ विनोद करणं मोठं अवघड काम असतं, तो जमला नाही तर हसू येत नाही, हसं होतं. अनेक विनोदवीर होऊन गेले. कुणी शब्दं खेळ करून हसवलं, कुणी आचरटपणा करून हसवलं (राजेंद्रनाथला तोड नाही यात), कुणी अंगविक्षेप न करता हसवलं (उत्पल दत्त, देवेन वर्मा, सुधीर जोशी), कुणी टायमिंगवर हसवलं (अशोक सराफ नं १ ते १०, परेश रावल, अर्शद वारसी), कुणी आवाजाच्या लकबीवर हसवलं (जॉनीवॉकर, ओमप्रकाश) आणि ज्यांना पाहिलं की मला हसू येतं असे म्हणजे राजपाल यादव, जगदीप, केश्तो मुखर्जी. जुही चावला, फरीदा जलाल, आगा हे मला त्यांच्या भन्नाट सेंस ऑफ ह्यूमर साठी आवडत आलेत. यांच्या चेह-यावर आगामी विनोदाची जी हालचाल होते ना ती मोठी बघणीय असते. दिग्दर्शक चांगला असेल तर काहीजण उत्तम विनोद करू शकतात (सुनील आणि अक्षय - हेरा फेरी आणि फिर हेराफेरी).  अशी यादी देत बसलो तर संपणार नाही.

तर काही काही रोलवर काही काही माणसांचे ठसे असतात, नाच्या म्हटलं की गणपत पाटील तसं दारुडा म्हटलं की दारूचा एकही थेंब आयुष्यात न पिता अट्टल दारुड्याचं काम करणारा केश्तो मुखर्जी. केश्तोचे फार सिनेमे मी पाहिलेले नाहीत किंवा पाहिले असतीलही पण लक्षात नाहीत. 'शोले'तला हरिराम नाई, 'बॉम्बे टू गोवा' मधला झोपलेला दारुडा, 'पडोसन' मधला किशोरचा दोस्त, 'इन्कार'मधला साब, पानीमें आग, आगमें पानी' म्हणणारा दारुडा आणि 'जंजीर'मधे अमिताभला लटकावणारा गंगू - हे मात्रं मी विसरू शकत नाही. काटकोळी शरीरयष्टी, कायम नशा न उतरलेला चेहरा, चाप्लीनसारखी मिशी आणि लेट करंट असल्यासारखं त्याचं ते मंद माणसासारखं बघणं, ते डोळे फिरवणं, खालचा ओठ दाबत ते मान तिरकी करून लाचार बघणं याची कॉपी नाही झाली कधी कारण ते सगळं ओरिजिनल होतं. त्याला हशा निर्मितीसाठी बोलायची गरज नव्हती. त्यानी डोळे उघडले तरी लोक हसायचे. 


रवीना टंडनचा मामा म्याकमोहन उर्फ सांभा नाराज होता सिप्पीवर, रोल कट केला म्हणून. सिप्पीनी त्याला सांगितलं होतं, रिलीज होऊ दे मग सांग. त्यातला अंग्रेजोके जमानेका जेलर असरानी आणि खब-या हरिराम नाई केश्तो पाच दहा मिनिटच असतील एकूण पडद्यावर पण त्यांनी धमाल केलीये. बच्चन धर्मेंद्रला प्लान सांगतो पिलरच्या आड, तेंव्हा चोरून ऐकताना केश्तोच्या चेह-यावर जे उमटलंय ते बघाच, त्याची ती बिरबलची अर्धवट दाढी ठेवून जेलरकडे जाण्याची टिपिकल चुगलखोर माणसाची असते तशी घाई, तिथे खबर देताना चेह-यावर असलेली मतलबी लाचारी, असरानी राउंड घेतो तेंव्हा आता कसे पकडले जाणार याचा आनंद त्याच्या चेह-यावर बघावा, तो केश्तोपाशी थांबतो तेंव्हा डोळ्याने कडेच्या माणसाकडे खुणावणं, आपलं बिंग उघडं पडेल याची भीती. अनंत वेळा शोले बघताना काय घडणार हे माहित असूनही मला कायम हसू फुटलेलं आहे.

'बॉम्बे टू गोवा' मधला झोपलेला दारुडा म्हणजे विनोदाचा 'मूक'प्रकार होता. बसला धक्का मारताना तो हवेत हात टेकवून ढकलत असतो. बसमध्ये काय काय घडत असतं पण हा पठ्ठा सदानकदा झोपलेला. सतत बेअरिंग सांभाळणं मोठं अवघड काम आहे. 'परिचय'मधला ज्याला मुलं पळवून लावतात तो मास्तर होता तो. 'इन्कार'मधे मासे पकडायला बसलेला असतो तो. विडी पेटवून पाण्यात टाकलेल्या काडीनी आग लागल्यावर केश्तोच्या चेह-यावर कपाळात गेल्याचा भाव आहे. तो पळत जातो आणि चौकीत जे असंबंद्ध बडबडतो ते हसू फुटणारंच आहे. 'पडोसन'मधल्या 'मेरे सामनेवाले खिडकी'ला खराट्यावर कंगवा फिरवणारा केश्तो, किशोरचा मित्रं होता. त्याचं ते ओठ दाबून बघणं, ती डोक्यावर उभी असलेली बट, हसू आणते.  


'जंजीर'मधला गंगू त्या मानानी मोठा होता. त्याचं ते अमिताभला 'आईये ना' म्हणणं अगदी गळ्यात पडणारं होतं, गरीबाच्या घरी कुणी मोठा माणूस येत असला की त्याची एक वेगळीच लगबग असते. आपलं दारिद्र्य त्याला दिसू नये म्हणून मोठा पाहुणचार करतात मग ते, तशी त्याची लगबग बघावी त्यात. त्याला पकडून दिल्यावर त्याची ती शरमेने खाली गेलेली मान शॉटमधे जे कदाचित लिहिलेलं नसावं आणि असलं तर ते त्यानी ते शंभर टक्के पोचवलंय. प्राण बरोबर ट्रेनमधून जाताना त्याच्या चेह-यावरची भीती बघा. असल्या अभिनयाला बक्षीस नाही मिळत हे दुर्दैवं. क्रिकेटमधे फोर सिक्स मारणारे जास्ती फेमस असतात पण इमाने इतबारे धावा करणारे यशपाल शर्मा, ख्रिस हरीस, गेव्हीन लार्सन, रहाणे मागे पडतात तसंच असतं या लोकांचं. कमीतकमी वेळात चमकीतला हिरा चमकावा तसे चमकून जातात पण त्यांचं अस्तित्व मोठा उजेड पडला की काजव्यासारखं पटकन संपतं.  

त्याचा मुलगा बबलू मुखर्जी काही मालिका आणि चित्रपटातून चमकला पण तो देखणा, गोलमटोल होता. केश्तोला कायम आर्थिक चणचण असायची असं वाचलं होतं. फुटकळ भूमिकातून किती पैसे मिळणार म्हणा. दिग्गज बंगाली दिग्दर्शक ऋत्विक घटकच्या मर्जीतला होता तो, त्यामुळे त्याच्या चित्रपटात छोटा पण महत्वाचा रोल त्याला मिळायचाच. ८१ ला मरायच्या एक वर्ष आधी त्याला बेस्ट कॉमेडीयनचं फिल्मफेअर पण मिळालं, एवढंच काय ते बक्षीस.  

दारू पिणारे बिचारे आपण शुद्धीत आहोत हे दाखवण्यासाठी किती खटाटोप करतात आणि तरीही पितळ उघडं पडायचं ते पडतंच, इकडे हा आणि 'जॉनीवॉकर' बद्रुद्दिन काझी मात्रं थेंबाला स्पर्श न करता अट्टल दारुडा उभा करतात. अभिनय म्हणजे वेगळं काय असतं, जे आपण वास्तवात नाही ते पात्रातून उभं करणं. केश्तो, जबतक शोले और जंजीर देखुंगा तबतक तेरा हरिराम नाई और गंगू भूलुंगा नही! हसता हसता कृतज्ञेतेने डोळ्यात पाणी येईल एवढं निश्चित. 
 
जयंत विद्वांस 
 

No comments:

Post a Comment