Saturday 2 January 2016

नेव्ही कट…

नेव्ही कट… 
 
तुझा सहवास सुटल्याला किंवा सोडल्याला आज महिना झाला. साधारण २८-२९ वर्षाचा सहवास म्हणजे काही कमी काळ नाही. अधेमधे दुरावा निर्माण झाला म्हणा काहीवेळा पण तो तात्पुरता होता. सवय सततची झाली की ती सवय रहात नाही, त्याला व्यसन म्हणतात. माणूस एकदा प्रेमात पडला की त्याला समोरच्याचे दुर्गुण दिसत नाहीत असं म्हणतात, तसंच तुझ्याबाबतीत झालं. दु:खाच्या क्षणी, ताण आल्यावर तुझी आठवण झाली वगैरे माझ्या बाबतीत कधी घडलं नाही कारण तुझ्या सहवासामुळे तो दूर होतो हे मला कधीच पटलेलं नाही. तुझा संग केल्याचे दुष्परिणाम माहित नव्हते? माहित होते, उगाच खोटं कशाला बोला पण फार परिणाम होईल एवढा आपला संग कधीच नव्हता. 

तुझं आकर्षण प्रत्येकाला असतं. कधी आपल्यापेक्षा मोठ्या वयाच्या माणसाला, फिल्मी हिरोला आपण फॉलो करायला जातो, कधी तुला जवळ केल्याने आपण आता मोठे झालो असं वाटतं, दोन बोटात, विडीसारखी चिमटीत, मुठीत (एकापेक्षा जास्ती) धरून जवळीक साधायचे आचरट प्रयत्नं होतात. फुशारक्या चालू होतात, पाणी घालून ताक वाढवावं तसं तासात किती, दिवसात किती वगैरे रेकॉर्डसचे आकडे  फुगवले जातात. आरशासमोर आधी पेन, काडी, उदबत्ती धरून सराव परीक्षा होते. एकदम भारी वाटायला लागतं. क्लिंट इस्टवूड, रजनीकांत, विडी फेकून उठणारा कुली अमिताभ वगैरे डोळ्यापुढे तरळत असतात. अनेक उपप्रकार असतात त्यात पुढे पुढे. आधी किंमत जास्ती ती ओढतात लोक. आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत असं दाखवायचं असतं. मग मेंथोल असलेली, तपकिरी रंगाची लांबसडक, स्टेट एक्स्प्रेस किंवा ५५५ या नावाची पडलेली भुरळ काही काळ चमकून जाते. किंग साईझ मित्रांत ओढताना खूप वेळ टिकते हे खरं कारण असतं. सगळी थेरं असतात. शेवटचा गोल्डन पफ नावाखाली मारलेला चटका बसणारा कोकणस्थी झुरका खरा. 

सगळी नाटकं होतात. तोंडाचा चंबू करून सर्कल काढायला शिकतात आधी, त्यात आपण ज्याला भेटण्याची सुतराम शक्यता नाही असा माणूस दहा बारा सलग सर्कल्समधून सरळ रेषेत धूर सोडून दाखवतो ही अठ्ठी अनेक पिढ्या अव्याहत चालू आहे, सांगणा-या माणसाचा तो सध्या दुरावलेला किंवा परगावी रहाणारा मित्रं असतो किंवा त्याला त्याच्या कुठल्यातरी मित्रानी सांगितलेलं असतं. पुढून लवंग किंवा मेंथोलचा तुकडा सारून, कधी घरी ओव्याची बनवून ओढली जाते. कुणी सांगतं थोडीशी ओलसर करायची म्हणजे कडक झुरका होतो (माझी भिजून लोळागोळा झालेली ओलसर करायला गेलो तर, कारण मी ती नळाखाली धरली होती, नाहीयेत एखाद्याला जजमेंट, हसू दे कुणी हसलं तर आपण लक्ष नाही द्यायचं). जो राख सांडेल त्यानी नवी घ्यायची असल्या गंमती असतात. रात्री संपल्यावर दुकानं बंद असतील तर जी घालमेल होते ती शब्दात सांगता येणार नाही. मग एसटी स्थानक, रेल्वेस्टेशन जवळची वाटतात. पहाटे कामाला जाताना जो पहिला उघडा ठेला दिसतो त्याचे आपण ऋणी वगैरे रहातो. 

कुणी विचारतं, "सिगार' ओढला आहेस का?" मग तो एकदा ओढून होतो. तोंडाला अत्यंत घाणेरडा वास येतो एकतर नाहीतर गाल आतून चिकटतील एवढा तो ओढावा लागतो, त्यात तो विझला तर त्याचा उग्र वास तोंडात नको होतो असा माझा अनुभव आहे. कुठलीही नशा वाईटच पण एकदा तरी अनुभवायला हवी प्रत्येक गोष्ट यापोटी मी पाईप, हुक्का, गांजा, चरस, ब्राऊन शुगर, हातभट्टी, देशी सोडून सगळे उद्योग करून बघितलेत.  तुझ्याएवढं फार कशात मन रमलं नाही. लोकांचे ब्र्यांड असतात. पिवळा हत्ती एकेकाळी फेमस होता. लोक पगार झाला की चार दिवस चारमिनार, पनामा, क्याप्स्टन, पिवळा हत्ती ओढायचे मग परत लाल धागा चालू व्हायचा. शिवाजी, संभाजीचं नाव ठेवलं म्हणून कधी कुणाला राग आल्याचं ऐकिवात नाही, ५०१ होती एक. यात पण कमी लेखणं आहेच, कार मधले टू व्हीलरवाल्यांकडे बघतात तसे गोल्ड फ्लेकवाले इतरांकडे तुच्छतेने बघायचे. बेन्सन हेजेस, रॉथमन्स ज्याच्या हातात तो माणूस अमीर आदमी, आय.टी.रिटर्न बघायची गरज नव्हती तेंव्हा.
 
'राम' अरुण गोविल म्हणे दिवसाला १०० 'स्टेट एक्स्प्रेस' ओढायचा, अजय देवगण आणि त्याची सासू तनुजा यांचं सतत अग्निहोत्र चालूच असतं म्हणे. त्यांचं त्यांच्यापाशी, यात त्यांचा हेवा वाटावा असं काही नाही. काही माणसं माझ्या लक्षात आहेत मात्रं. एक बदलापूरचा रजनदा, हाताला सहावं बोट असल्यासारखी तू त्याच्या हातात असायचीस. तो कुठेही असो, कायम हातात छोट्या फोरस्क्वेअरचं पाकीट आणि काडेपेटी. श्वास घेताना त्यात निकोटीन आढळलं नाही तर मेंदू त्याला श्वास रोखून धरायला लावायचा बहुतेक. सतत चालूच मुळी ते धुरांड, त्याचं बोलणं शब्दश:धुरकट होतं असं म्हणता येईल इतकं. आमचे बापट, विजय केतकर अगदी मन लावून गोरा चेहरा तांबूस होईल इतपत दमदार कश मारायचे. टोकाला तो ग्लो अगदी चिडल्यासारखा फिल्टरकडे धावायचा. लोक कश मारला की तो धूर आत घेतात, नाका तोंडावाटे व्हाल्व्ह गेल्यासारखा  चित्रपटात तो स्वप्नातल्या गाण्यात पांढरा दात धूर सोडतात ना तसा सोडतात आणि राख झटकून किती राहिली ते बघतात. पैसा वसूल कसा होणार बोलण्यात वेळ घालवला तर म्हणून अजून एक दमदार कश लगेच. कर्नल सोमण होते रविराजला. ते जेवण झालं की तो पांढरा पेपर काढायचे, त्यात तो क्याम्पातून आणलेला सेंटेड तंबाखू टाकून सुरनळी करायचे, मग जिभेवर ती फिरवून सीलबंद करायचे आणि सुखाचा आस्वाद घेतल्यासारखे तुला ओढायचे. त्यांच्या त्या धुरला पण एक सुगंध होता. ती संपूर्ण प्रोसेस ते अत्यंत तन्मयतेने उपभोगायचे. 

माझीही अनेक थेरं करून झाली. आधी फोरस्क्वेअर, मग काही काळ चेसरफिल्ड, बर्टन, चार्म्स, छोटी फोरस्क्वेअर वगैरे प्रकार झाले. पण मला आठवतंय ८५-८६ साल असेल, पासष्ठ पैशाला नेव्हीकट मिळायची (आता आठ रुपये, काय ही महागाई) आणि पाच पैशाला खुशबू किंवा बडीशोप पुडी. मी केवळ नेव्हीतले लोक ही ओढत असणार या अज्ञानापोटी तुझी निवड केली आणि ती चिरकाल टिकली. कावेरी विचारते ना. 'मैत्रिणी किती होत्या हो?' आणि अप्पासाहेब हसतात फक्तं. तसं काहीसं आहे, नेव्हीकट म्हणजे 'सरकार' होतं माझं.  


जयंत विद्वांस  
 

No comments:

Post a Comment