Thursday 14 January 2016

टेलीशॉपिंग…

टेलीशॉपिंग…
 
मी सिरिअल्स बघत नाही त्यामुळे टीव्ही बघितला तर इ.स.२००० पू.चा हिंदी सिनेमा, इंग्लिश मारधाड, जुनी गाणी किंवा म्याच असेल तरंच बघितला जातो. काहीच नसेल तर आधी बातम्या बघायचो, आता त्याही सोडल्या. त्यापेक्षा मग अर्धा एक तास टाईमपास म्हणून चोवीस तास टेलीशॉपिंगला वाहिलेले च्यानल्स बघतो. धमाल येते. ते च्यानल बघण्यात मला तर फायदे आणि मानले तर काही किरकोळ तोटे दिसत आलेत. फायदे बघा :

०१) बाजारात काही नवं असेल तर कळतं
०२) बाहेर विकत घ्यायचं असेल तर किंमतीचा साधारण अंदाज येतो
०३) भिकार वस्तूचं आकर्षक मार्केटिंग कसं करावं ते कळतं
०४) आपल्याला आपल्या जवळ असलेल्या वस्तूचा दुकानदार म्हणून किंमत सांगताना, त्या वस्तूचं कौतुक करताना न्यूनगंड वाटू शकेल अशी वस्तूसुद्धा विकणेबल आहे हे समजतं
०५) कुठलीही वस्तू विकत न घेता कल्पनेत आपण ती वापरली तर जगणं किती सुखकारक होईल या आनंदानी फील गुड की काय ते वाटू लागतं (एक दमडा खर्च न करता हे अतीव आनंदाचं, कारण जन्म पुणे)

काही काही प्रॉडक्ट मला पाठ झालीयेत कारण मी त्यांचा रेग्युलर(?) कस्टमर नसलो तरी रेग्युलर व्ह्यूअर आहे. पुलं म्हणाले होते तसं असतं यांचं सगळं, मुलगी धडधाकट आहे, घरातलं सगळं करते म्हणजे शिक्षण कमी (हे आपण ओळखून घ्यायचं असतं). तसे यांचे पोपट आणि पोपटीणी असतात. मूळ प्रॉडक्ट कसा उपयुक्त आहे असल्या क्षुल्लक गोष्टी सांगण्यात ते फार वेळ घालवत नाहीत. तुम्ही कधीही बघा, शेवटचे गिनेचूने नग राहिलेले असतात, त्वरा केली नाही तर इच्छुकांच्या पदरी किती घोर निराशा येत असेल या कल्पनेनीच मी कासावीस होतो. निकटच्या हजाराला एक रुपया कमी असलेली किंमत असते, हा शोध ज्यानी लावला तो मानसोपचार तज्ञ असणार. 'फक्तं', 'ONLY' या शब्दांचे अर्थ इथे पटकन कळतात. रुपये दहा हजार नऊशे नव्व्याण्णव फक्तं. नुसतं ऐकून पण मला खजील व्हायला होतं. मला मोठ्ठी वाटणारी रक्कम जगाला 'फक्तं' वाटतीये हे उमजून मी काळाच्या मागे आहे या बायको (माझ्या) आणि मुलीच्या मताला दुजोरा मिळतो आणि त्या दोघी आनंदी होतात.   

त्यांच्या काही प्रॉडक्टवर मात्रं माझा जीव जडलाय. एक ते रोटी मेकर. नुसती लाटी आत सारायची, झाकण दाबायचं, कंपास घेऊन मोजावी अशी गोल पोळी तयार, पलटी मारली की झाकण अलगद सोडायचं, भटू-यासारखी टम्म फुगलेली पोळी तयार. ते झाकण जे स्लो मोशनमधे वर येतं ना ते बघायला मला जाम आवडतं. दबावाविरुद्ध उफाळून येण्याचा गुणधर्म कणकीच्या गोळ्यात पण असतो हे ज्ञान मिळतं. बरं त्याच्या बरोबर पीठ मळायचं भांडं फुकट असतं. या सगळ्या जाहिरातीत सगळ्यात जास्ती जोर कशावर असेल तर तुमचे किती पैसे वाचतील, सोबत मोफत किती आणि काय काय आहे, तुमच्या आयुष्यात काय काय बदल घडतील आणि तुम्ही कसे सुखी व्हाल यावर असतो. 


दुसरं एक ते सिक्स प्याक उर्फ पोटावर आयत बनवायचं मशिन. काय एकेक बायका असतात त्यात. त्या मशीनची गरज म्हणून पोट दाखवतात हे समजू शकतो पण अत्यंत कमी कपड्यात त्या मशिनवर व्यायाम करताना जे काही आळोखे पिळोखे देतात ना तेंव्हा त्यांच्या पोटाकडे लक्षच जात नाही आणि मग ती जाहिरात परत बघावी लागते. त्यात पण ते आधीचं भोपळा पोट आणि नंतरची पोटावरची शिल्पाकृती जेवढ्या सेकंदात दाखवतात न तेवढ्या सेकंदात जादू होणारं मशिन यायची मी वाट बघतोय. सगळे बाप्ये आणि बाया लोक हेवा वाटावा अशा कमावलेल्या शरीराचे असतात. माझ्या पोटाकडे बघून एवढं जादुकारी मशिन आपल्याकडे नाही याची खंत वाटते. समजा आणलं आणि झालो बिस्किटपोट्या तरी शेजारी जाहिरातीतल्या बाईएवढ्या कमी कपड्यात कुणीही उभं रहाणार नाहीये याची खात्री असल्यामुळे मी अजून त्याची ऑर्डर नोंदवलेली नाहीये.

याचाच एक उपप्रकार म्हणजे वजन कमी करणा-या प्रॉडक्टसच्या जाहिराती. फार मजेशीर प्रकार आहे तो सगळा. पोटाला अमूक एक तेल लावून गरम पाण्यानी शेका, संत्र्याची साल सोलावी तशी सहजरीत्या चरबी कमी होईल. अमका हर्बल टी प्या (एक्झरसाईजची गरज नाही हे वाक्यं रिपीट असतं त्यात, घेणारच की मग पब्लिक) आणि शेवग्याची शेंग व्हा. तुम्हांला पोटाशी, मांड्यांशी (चरबी जास्ती आहे तिथे, थोडक्यात) गदागदा हलवणारं एक मशिन असतं, पाच मिनिटात तुम्ही मुंबईच्या उन्हात उभे असल्यासारखे घामेजता. त्यामुळे मुंबईला एकही माणूस ओव्हरवेट नसणार असं मला वाटत आलंय. कुठलंही काम करताना ते वापरता येतं म्हणे. एका 'विशिष्ठ' क्रियेत कमरेला ते मशीन लावल्यावर त्याचं व्हायब्रेशन उपयोगी येईल का असा मला एक वात्रट प्रश्न पडलेला आहे. असो! याच्या उलट उंची, वजन वाढवायच्या भुकट्या आणि गोळ्या विक्रेते असतात. आयुष्यात वजन नाही म्हणून लग्नं ठरत नाहीत, मैत्रिणी हसतात, न्यूनगंड येतो वगैरे सगळे प्रॉब्लेम्स चार पाच हजारात सुटू शकतात. बरं ती भुकटी खाऊन नुसतं वजन नाही वाढत, मसल्स एकदम अर्नोल्ड लाजेल असे होतात. एकदा आणेन म्हणतोय ते. 

असे अनेक विनोदी प्रकार त्यावर आहेत. एक तो चायनीज की कोरियन टकला माणूस डोक्यावर पीक काढल्यासारखे केस उगवून दाखवतो (शेतक-यांनी ट्राय केलं तर मायंदाळ पीक येउन आत्महत्या तरी करणार नाहीत), रु.२४९९/- 'फक्तं' मधे दोन शूज, एक स्लीपर, एक गॉगल, एक घड्याळ, एक टी शर्ट, एक डफल ब्याग, रु.४९९९/- 'फक्तं' (कृपया हा शब्दं विसरू नये) मधे आयफोन स्वत: दगडावर जाउन स्क्रीन फोडून घेईल असे फिचर्स असलेला स्मार्टफोन असतो, घाण टाकायची आणि ती सेकंदात साफ करायचा मॉप असतो (तसं खरंच होत असेल तर मलासुद्धा साफसफाई जमेल या भीतीपोटी मी तो घेणार नाहीये), होलमधून हनुमान चालीसा वाचता येईल असा खास आपल्याकरिता तयार केलेला  मंतरलेला चांदीचा सर्वसंकटनाशक हनुमान असतो, घरात कुठेही भोक पाडू शकेल असं ड्रिल मशिन, ड्रिल, स्प्यानर, स्क्रू ड्रायव्हर सेट अत्यंत अल्पं किंमतीत असतो, ज्याच्यावरून ट्रक नेला तरी फरक पडत नाही असा हवा भरून तयार होणारा सोफा, बेड आहे, काठीला फडकं गुंडाळल्यासारख्या दिसणा-या बायका आणि जॉर्जेटच्या साड्या आहेत, डिनर सेट आहेत, भांडी कुंडी आहेत. एकूण सगळं 'अच्छे दिन आये' असं वाटायला लावणारं आहे.  

खरंतर या सगळ्यात खरोखर उपयोगी असणा-या किंवा काम हलकं करणा-या वस्तू फार कमी आहेत अस आपलं माझं मत आहे. जाहिरात ही कला आहे हे टेलीशॉपिंगचे च्यानल बघितलं की कळतं. सगळं दुष्टंचक्र आहे. न लागणा-या वस्तू विकत घ्या, पैसा असो नसो, क्रेडीट कार्ड आहे की. रक्कम फुगली की त्याचे हप्ते करून घ्या आणि तीस टक्क्यानी ते फेडा म्हणजे मूळ स्वस्तात मिळाली अशी वाटणारी वस्तू खरंच आपल्याला कितीला पडली हे कुणीच बघत नाहीये. नितांत गरज असताना बराच काल प्रतिक्षा करून वस्तू आली की ती प्राणप्रिय होते, वाटते. निर्जीव वस्तूवर पण माया जडते. आता वस्तू मुबलक झाल्या, वापरा, फेजून द्या, आवडल्या नविन किंवा अपग्रेडेड काही आलं तर तर जुन्या चांगल्या असतील तरी बाद करा, त्यात अडकून राहू नका असा मंत्र आहे आजचा. 'जुने जाऊ द्या मरणालागूनी' ते आपण चुकीच्या विचारांना, प्रथांना लागू करत नाही, चांगल्या गोष्टींना मात्रं लगेच करतो.

एक बरंय त्यावर अजून सुख, आनंद विकायला नाहीये, तो आपला आपल्याला छोट्या छोट्या गोष्टीत मिळवता येतोय, यायला हवा. त्यांची ती पोपटपंची, भलावण निर्हेतुकपणे ऐकणं, बघणं हा ही माझ्या छोट्या गोष्टीतून आनंदी होण्याच्या भागच आहे. बाकी आडिश (आमरणच्या धर्तीवर) ही करमणूक चालूच राहील.  

जयंत विद्वांस

No comments:

Post a Comment