Friday 29 January 2016

वर्तुळ...

वर्तुळ... 

नव्यानीच हौशी नाटक, सिनेमात काम करणा-या किंवा त्यासंबंधित क्षेत्रात काम करणा-या, गायक, वादक, नट लोकांची एक वेगळीच भाषा असते, त्यात नुसती मौखिक भाषा नाही तर देहबोली पण आली. त्याचं नाव झालेलं नसतं, त्यांना त्यांचा ग्रूप सोडून फार कुणी ओळखत नसतं आणि प्रसिद्धीची हौस तर तुंबलेली असते. आपल्याच क्षेत्रातला दुसरा माणूस हजर नसेल तर उपस्थित माणसांसमोर ते जास्ती खुलतात. त्यांना श्रोते हवे असतात. ते पण अचंबित होणारे, 'फार बाबा ओळख तुझी' अशा अर्थाचं कौतुकाने बघणारे, उगाच टाचणी लावून स्वप्नं फुगा फोडणारे श्रोते पुढच्यावेळी टाळले जातात. आपण काय करतो आणि मनात 'काय करता आलं असतं अजून' याची सरमिसळ झालेली असते त्याला वाचा फुटते अशा वेळी. सगळ्यांमध्ये एक साम्यं काय तर 'आपण इतरांपेक्षा किंवा अमुकतमुकपेक्षा कसे वेगळे आहोत' हे ठसवणं.

नाटकाच्या इंटरव्हलला या गप्पा ऐकाव्यात. एखाद्या प्रामाणिक माणसानी त्याला जे वाटतंय ते समजा प्रामाणिकपणे सांगितलं की बाबा, नाटक छान आहे, की त्याचा पार भुगा करतात हे लोक. 'यापेक्षा आम्ही सरस करतो', 'किती घाईत उरकलंय', 'तिची एंट्री तर धावत आल्यासारखी झाली, तिला सांगा रे कुणीतरी बालनाट्यात काम कर म्हणाव आधी', 'छ्या, त्यापेक्षा त्या ह्याला गेलो असतो तर बरं झालं असतं'. बरं, हे लोक अर्ध्यात निघून जात नाहीत, उरलेला भाग संपूर्ण बघतात. मनातून जे चाललंय ते आवडलेलं असतं पण पहिल्या भूमिकेशी ठाम राहायचं हे ठरलेलं असतं. मी एकदा विचारलेलं एकाला, 'का रे भंगार होतं तर थांबलास कशाला?' त्या बेडकानी मला चीतपट करणारं उत्तर दिलं होतं, 'नाटक कसं करायचं नाही याचा पण अभ्यास असतो रे, तुला नाही कळणार'. 

फलाणा नट, नटी, दिग्दर्शक किती जवळचा आहे हे सांगण्याची पण एक स्टाईल असते. मी एका बरोबर गप्पा मारत होतो एकदा, असेल साल ९४-९५. माणूस हौशी नाटकात काम करायचा म्हणजे असं त्यानीच सांगितलेलं. 'काय रे दिसला नाही बरेच दिवस?' 'अरे, xxxx करतोय सध्या त्यामुळे वेळ नाही, आत्ता पण लकीली भेट झाली. सवितानी सांगितलंय, 'भरत'ला येच, ब-याच दिवसात भेटलो नाहीये आपण, नऊला ये डॉट, तिकडेच निघालोय'. मी घरी आलो नी पेपर बघितला, 'भरत'ला 'चार दिवस प्रेमाचे होतं सहा वाजता. मला खात्री होती की सविता प्रभुणेनी याला अजिबात बोलावलं नसणार. एखाद्या नाटकाच्या वेळेस दोनचार शब्दं बोलली असेल एवढंच. छान काम करतोस एवढं म्हणाली असेल फार फार तर. पण मला दिपवून टाकण्यासाठी ते बोलणं त्याच्या दृष्टीने गरजेचं असावं. खरंतर नंतर 'काय म्हणाली सविता' किंवा त्याच वेळी 'मी पण येऊ का, सही घ्यायचीये फक्तं' असं बोलायचं असतं मला पण जीभ रेटत नाही माझी. मला खरं वाटावं हा त्याचा हेतू असफल झाला असता, कुणाचं स्वप्नं तोडायचं पाप नको उगाच. 

एकजण 'पंतां'च्या संस्थेत होता. कधीही बघा, माणूस 'लखोबा लोखंडे' तोच करत असल्यासारखा सगळा भाव असायचा. आतल्या स्टो-या, किस्से ऐकून आम्ही गपगार व्हायचो. हा गेला नाही तर प्रयोग होणार नाही असं आम्हांला वाटायचं. एवढं असून पण कधी पेपरातल्या जाहिरातीत नाव का येत नाही असा भाबडा आणि सहानुभूती वाटणारा प्रश्नं पडायचा. अनेक वर्ष मी बघत होतो. त्यांची अनेक नविन नाटकं आली सगळ्या नाटकात पण याचं नाव कधी जाहिरातीत नाही आलं. नंतर समजलं की पोस्टमन, नटीचा भाऊ, दीर, निरोप्या, नुसता बसणारा, एखाद दोन वाक्यं बोलणारा जज्ज अशीच कामं असायची. पण त्याचा जीव रमायचा एवढं खरं. खरंतर माझ्यासारख्या माणसाला त्या तालमीच्या प्रोसेसचं फार आकर्षण आहे. स्टेजवरच्या नाटकापेक्षा ते उमलत जाणारं नाटक बघण्यात जास्ती मजा आहे. ती प्रोसेस त्याला पण आवडायची म्हणूनच तो जायचा पण आपण काय असायला हवे होतो हे तो आम्हांला तो ते आहे असं सांगायचा. त्याचा जीव रमायचा हेच खरं.  

खरा अभ्यास करणारा माणूस विरळ असतो. अफाट वाचन वगैरे लांबच्या गोष्टी. ऐकीव माहितीवर आधारित स्वत:ची चार वाक्यं घालून हे लोक बोलतात मात्रं स्टायलिश. त्यांच्यापेक्षा बुद्धिमान माणूस आला तर हे म्यूट होतात. तो माणूस एकदा गेला की मग त्याची निंदा करण्यात वेळ घालवतात. 'नशीब आहे रे त्याचं', 'लाळघोटेपणा करत नाही ना आम्ही म्हणून मागे आहोत', 'एकदा स्टेजवर आला पाहिजे समोर, परत काम नाही करणार, मी असलो की', वगैरे हेडलाईन्स स्क्रोल होतात. त्यातला फोलपणा बोलणारा आणि ऐकणारा दोघांना जाणवत असतो. यांच्या नशिबात त्यांना कुणीतरी आदर्श मानेल असाही ही एक स्तर असतो. तुमची लिडरशीप, विधानं करण्याची पात्रता, दाखवायचा बिनधास्तपणा, आपल्याला काही फरक पडत नाही यावर भक्तगणसंख्या अवलंबून असते. हळूहळू डबकं तयार होतं, मग तोच समुद्र वाटायला लागतो हे वाईट आहे.

बिचारे जागरणं करतात, फुकट राबतात, दाढ्या वाढवतात, त्यांचा कुठला तरी आदर्श ओढतो ती आणि तशी सिग्रेट ओढतात, तंबाखूचे बार भरतात, दारवा पितात. खोट्या आश्वासनांवर विश्वास ठेवतात, डोळे उघडे ठेऊन बुर्ज खलिफा एवढ्या उंचीची  स्वप्नं बघतात. हळूहळू वास्तव कळायला लागतं. कुणी पॅराशुट लावून अलगद जमिनीवर येतात, कुणी दाणकन आदळतात. काहीजण स्विकारतात, काहीजण स्वप्नातच रमतात. प्रत्येक नव्या प्रयोगाला अंकुर फुटतो, नविन पिढी मागे रेटत असते. वयामुळे कुणी फटकन बोलत नाही तरी हे अक्कल शिकवायला जातात, अपमानित होतात पण मागे हटत नाहीत. तिथलाच त्यांच्याइतकाच नवखा, स्वप्नाळू जमाव शोधतात आणि त्यांना 'पुरुषोत्तम'ला काय काय केलंय, कुणी कुणी कौतुक केलं होतं, नंतर आपल्याला संधी कशी मिळाली नाही, आपल्यावर अन्याय कसा झाला अशा स्टो-या सांगायला सुरवात करतात. ते भाबडे लोक ऐकतात, हळहळतात. याला तेवढंच बरं वाटतं. त्याला त्यानी जिथून सुरवात केली तो दिवस आठवतो आणि एक वर्तुळ पूर्ण होतं.  

जयंत विद्वांस

No comments:

Post a Comment