Thursday 24 October 2013

मन्ना डे


भारतीय सिनेसृष्टीतील पार्श्वगायनाच्या इतिहासातला राहुल द्रविड म्हणजे मन्ना डे. प्रत्येक मोठ्या हिरो साठी त्यांनी आवाज दिलाय पण तरीही 'ते फक्त शास्त्रीय बेस गातात', 'विनोदी गाण्यांसाठीच ते जास्त सूट आहेत' असं लेबल लाऊन त्यांना कायम दुर्लक्षित ठेवण्यात आलं. जो आवाज महमूद ला शोभला तोच राज कपूर ला आणि तोच राजेश खन्ना ला ही. पण पडद्यावरच्या व्यक्तिरेखे प्रमाणे आपण लेबल लाऊन मोकळे होतो. लगेच लो ग्रेड होते. 

बलराज सहानी - ए मेरी जोहराजबीं, ए मेरे प्यारे वतन, तू प्यार का सागर है; प्राण - क़समें वादे प्यार वफा सब, यारी है इमान मेरा, राज कपूर - ये रात भीगी भीगी, आजा सनम, लागा चुनरी मैं दाग; ए भाय जरा देखके चलो, आगा - फुल गेंदवा ना मारो; महमूद - मै तेरे प्यार मै; एक चतुर नार करके सिंगार, राजकुमार - हर तरफ अब यहीं अफ़साने हैं; अशोक कुमार - पूछों ना कैसे मैंने रैन बिताई. काळ्याकुट्ट अशोक कुमारची विषण्णता गाण्यातून पण अंगावर येते. आणि चक्क अमिताभ साठी ये दोस्ती…एका पेक्षा एक सरस गाणी. अलीकडचच प्रहार मधलं 'हमारी ही मुट्ठी में आकाश सारा' ऐका. प्रार्थना आहे हे सांगावं लागत नाही इतका धीरगंभीर आवाज आहे. ही गाणी जेवढी त्या अभिनेत्यांची तेवढीच ती मन्नादांची म्हणून ओळखली जातात हाच कदाचित त्यांचा दोष असेल. दादासाहेब फाळके पुरस्कार जाणीवा शाबूत असताना त्यांना मिळाला हे त्यांचं भाग्यच म्हणावं लागेल. 

आजा सनम, ये रात भीगी भीगी, लागा चुनरी में आणि यारी हैं मी कितीही वेळा ऐकू शकतो. अभिनेता पण चांगला लागतो त्यासाठी. यारी हैं ला प्राण ने २००% न्याय दिलाय तेवढाच न्याय राज कपूर ने लागा चुनरी में दाग ला दिलाय. शेवटचा तराना म्हणताना आरके चे फक्त ओठ हलत नाहीत तर शब्द ही बाहेर येतात, अर्थात आरके ला सुद्धा संगीताची  अफाट जाण होतीच. मन्नादांचं नशीबच फुटकं आपल्या द्रविड सारखं. आरके ला मुकेश चा आवाज आवडला आणि सूट पण झाला. त्यामुळे मन्नादा मागे पडले. तरीही ए भाय जरा देख के चलो साठी हाच आवाज लागला कारण शेवटच्या तीन ओळी फक्त मन्नादांनीच गाव्यात. 'बिना चिड़िया का बसेरा हैं' हे थेटर च्या अंधारात ऐकताना ही काटा येतो अंगावर. तो निर्मनुष्य तंबू त्या आवाजामुळे अजूनच भयाण वाटतो. या शिवाय छम छम बाजे रे पायलिया, झनक झनक तोरी बाजे पायलिया, प्यार की आग में, ज़िंदगी कैसी हैं पहेली हाए, कौन आया मेरे दिल के द्वारे, तेरे नैना तलाश कर जिसे आणि दिल की गिरह खोल दो सारखी अनेक युगुल गीतं.                        
किशोर, मुकेश, रफी आणि मन्नादा ही सुरेल चौकडी होती. हेमंत कुमार, तलत ही मंडळी ही होतीच पण ही चौकडी महान होती. एक एक करत सगळे गेले. मन्नादा शेवटचा मालुसरा. चौकडीत प्रत्येकाची काही ना काही खासियत होती. मन्नादांची आठवण मात्र फक्त शास्त्रीय बेस किंवा विनोदी गाण्यांसाठीच व्हावी हा विरोधाभास अनाकलनीय आहे. अनेक भाषांतून हा माणूस गायलाय. यादी काढली आठवली तर कित्तीतरी सुरेल गाणी देत येतील. पण वरची गाणी मनात घट्ट रुतून आहेत. मन्नादा म्हटलं की ही गाणी डोळ्यांपुढे हजर होतात, कानात वाजू लागतात. त्यांची मराठीतली काही गाणी सुद्धा लक्षात राहण्यासारखी आहेत. अ आ आई,  गोपाला गोपाला देवकीनंदन, घन घन माला नभी, हाऊस ऑफ बॅम्बू, होम स्वीट होम अशी बरीच. या शिवाय भजनं आणि चित्रपट व्यतिरिक्त ही बराच गायलेत मन्नादा. त्यांनी हरिवंश राय बच्चन यांचं 'मधुशाला' खूप सुरेख गायलंय.     

ही सगळी मोठी माणसं. केवळ अंगातल्या कलेमुळे नाही गाजली तर विनम्र स्वभाव, एकमेकांबद्दल आदर आणि निरोगी स्पर्धा यामुळे गाजली. 

बसंत बहार मध्ये त्यांना भीमसेन जोशींबरोबर केतकी गुलाब जुही हे गाणं होतं. पडद्यावर मक्ख चेहऱ्याच्या भारत भूषणला मन्नादांचा आवाज होता आणि समोरच्या प्रतिस्पर्ध्याला पं. भिंसेन जोशींचा. चित्रपटाच्या कथेनुसार भारत भूषण जिंकतो. झालं. मन्नादा काही केल्या रेकॉर्डिंग ला यायलाच तयार होईनात. पडद्यावर का होईना पण भीमसेन जोशींना हरवायचं??? छ्या!!! 'मी येणार नाही' असं सरळ कळवून टाकलं त्यांनी. शेवटी भीमसेनजींनी समजूत काढली - अहो हे खोटं आहे. या तुम्ही. अत्यंत नम्रतेने हा माणूस त्या रेकॉर्डिंग ला गेला.      

आता मन्नादा ही नाहीत आणि भीमसेन ही नाहीत. मुळात ती विनम्रताच आता नाही. सभ्य कलाकार हा शब्दही आता दुर्मिळ आणि माणसंही.   

--जयंत विद्वांस

Monday 7 October 2013

प्रिय राहुल...

प्रिय राहुल 

आम्ही पु.लं.चा नारायण वाचला, ऐकला आणि गेली 15-16 वर्षे पाहीला पण. काल भारतीय संघाचा नारायण निवृत्त झाला. द्यानेश्वरांनी चालवलेली पहिली आणि ही दुसरी, अश्या दोन भिंती आम्हांला माहीत आहेत.

तो जोकर होता बावन पत्त्यातला. ट्रायो, सेकंड सिक्वेनस् हवाय, वापरा बिनधास्तं. त्यानं काय केलं नाही? त्यानी जे सांगितलं ते सगळं केलं संघासाठी. फक्तं त्यानी कधी रडीचा डाव खेळला नाही, त्यानी अंपायरला शिव्या दिल्या नाहीत, तो कुणाच्या अंगावर धाउन गेला नाही, मॅच फिक्सिंग मधे साधा उल्लेख नाही, वादळी मुलाखती नाहीत, लफडी नाहीत.

तो म्हणजे क्रिकेट मधला आशा काळे, अलका कुबलचा वारसदार. त्याची बॅट म्हणजे पतिव्रताच. जरा पदर ढळणार नाही. कव्हर चा फटका तर किती मोहक. चेंडूला फार त्रास तर होणार नाही ना, गोलंदाजाला राग तर येणार नाही ना अश्या सगळ्या काळ्ज्या त्यानी घेतलेल्या असायच्या. सेहवागसारखा स्पीड, रिचर्डसची ताकद, गॉवरची नजाकत काही काही नसायचं त्यात. त्यात असायचं परफेक्शन्.

संयम शब्दाचा अर्थ जास्तं त्रास न घेता पटवून द्यायचा असेल तर त्याचं नाव घ्या, पटेल लगेच्. सभ्यं लोकांचा खेळ असं म्हणतात क्रिकेटला, आताही म्हणतील, पण आत्ता खेळणा-या काही मोजक्या सभ्यं माणसांपैकी एक काल निवृत्त झाला.

द्राविडी प्राणायाम चा खरा अर्थ त्याला ज्यांनी गोलंदाजी केली त्यांना विचारा. तू केंव्हा निवृत्त व्हावस्, व्हायला हवं होतं या बद्दल बरेच जण बोलत होते, बोलतील. ज्यांना स्‍वतःला कधी निवृत्त व्हावं हे कळलं नाही, ते तर सल्लागार म्हणून आघाडीला होते. आम्ही साधे भारतीय, व्यक्तिपूजक प्रेक्षक, फार काही कळत नसल्यामुळे आम्ही खेळाचा आनंद लुटू शकतो. तुला मोफत सल्ला देण्याएवढा अधिकार नाही आणि पात्रताही नाही. असो.

राहुल, तू आम्हांला जो आनंद दिलास् त्या बद्द्ल शतशः आभार.
--- जयंत विद्वांस   



-- 

Thursday 3 October 2013

प्रिय ‘ती’स् .....


किती वर्षांनी दिसलीस? जवळजवळ १९-२० वर्षांनी. जग फार छोटं आहे म्हणतात तरीही एकाच शहरात एवढा काळ लागला नुसतं दिसायला, समोरासमोर येणं अजून लांबच आहे. 

काळाचा फार परिणाम तुझ्यावर झाला नाही, याचं कौतुक वाटलं. सगळेच् देखणे चेहरे वाढत्या वयात तसेच रहात नाहीत. काहीवेळेस जुने चेहरे आठवणीतून पुसून टाकावेत इतके बदलतात. तू फेसबुकावर आहेस की नाहीस माहित नाही. तुझ्यावर ती-1 ते 15 अशा तब्बल पंधरा कविता झाल्यात… इतर सौंदर्यकवितांचं  प्रेरणास्त्रोत पण तूच तर आहेस त्यामुळे फक्त १५ नाहीत. त्याची रॉयल्टी काय देउ??? 

मनात असूनही हाक मारू शकलो नाही कारण आपण परत न भेटणच इष्टं असं मला वाटलं. काही जपलेल्या गोष्टी असतात त्या तशाच राहिलेल्या ब-या, नाही का? अज्ञानात सुख असतं असं म्हणतात, जबाबदा-या, संसार, मुलं, समाज या सगळ्या जंजाळातून त्या पूर्वीच्या भावना उरतीलच असं नाही. असतील उरल्या तरी दर्शविता येतीलच असंही नाही. सगळीच कुचंबणा आणि बंधनं. त्यामूळे जे जपलय तेच छान आहे असा विचार केला.



असेल योग तर भेटूच आपण आज ना उद्या. दोघांकडेही सांगण्या ऐकण्यासारखं खूप असेल, फक्तं काळ तेवढा शिल्लक असला म्हणजे झालं.

(कुठल्याही मृत अथवा जिवंत, एक किंवा अनेक व्यक्तिशी संबंध आढळल्यास तो योगायोग समजू नये.)
......

जयंत विद्वांस

Saturday 21 September 2013

कपाट

प्रिय.....
किती वर्ष लोटली गं तुला पत्रं लिहून? अगं वेळच आली नाही ना कधी पत्रं लिहायची, मग कसं लिहिणार? कारण तर हवं ना.  असो! आज काय करावं हा प्रश्नं पडला. वेळ जाता जाईना. म्हटलं दोन कामं आहेत म्हणा पेंडिंग. एक म्हणजे तुला पत्रं आणि दुसरं, तुझ्या अत्यंत आवडीचं काम - मी घातलेला पसारा हसतमुखाने आवरायचं. पण तू जिंकलीस हे मान्यच करायला  हवं. तू कधीतरी चिडावंस म्हणून मी काय कमी प्रयत्नं केले?  उलट तू लवकरात लवकर सगळं उरकून मिश्किल हसायचीस.
दुसरं काम आधी केलं मी मुद्दाम आज. तुझ्या काय काय वस्तू सापडतात ते बघून म्हटलं तुला दोन चार तिरकस शेरे मारता येतील. म्हणून आधी कपाट आवरायला घेतलं. काय बायका गं तुम्ही… किती सोस तो वस्तू जोंबाळून ठेवायचा असा शेरा मी तयारच ठेवला होता. पण छे!!! ती ही संधी तू दिलीच नाहीस. माझाच कप्पाच सगळ्यात गचाळ होता. नेहमीप्रमाणे मी तिकडे दुर्लक्ष करून तुझ्या कप्प्याकडे गेलो आधी. काय नी काय वस्तू तरी एकेक तुझ्या. यादीच केली मी. मला माहितीये, तू म्हणणार, 'तुम्हाला नाही कळणार यातली गम्मत'… तरी पण केलीये.        
आपल्या साखरपुड्याची घडीवर विरलेली ती अंजिरी साडी, अगं किती विटलीये ती. पण तुझ्या गो-या रंगाला काय खुलून दिसायची ना ती. त्याखाली लग्नातला घडी विस्कटलेला मोरपिशी शालू, बुट्टे मात्रं अजून चमकदार आहेत. इनमिन पाच फूट तू, तुझ्यापेक्षा त्या शालूचंच वजन जास्तं भरलं असतं तेंव्हा. लहानच होतीस म्हणा तेंव्हा तू तशी. चेह-यावर पोक्तं, गंभीर भाव आणायची कसरत बघताना मला मात्रं हसू फुटत होतं. तरी नथ सारखी करायच्या नावाखाली तू हसून घ्यायचीसच.  तू मुळात एक डामरट्ट  मुलगी  आहेस असं माझं अजूनही ठाम मत आहे. आणि काय गं तुझा हा लग्नाआधीचा फोटो!!! एक्सरे काढल्यासारखा हडकुळा. पण  तुझ्या  डोळ्यात तेंव्हा दिसलेली जादू मात्रं अजून तशीच आहे. हडकुळेपणामुळे जास्तंच उठून दिसणारं सरळ नाक आणि वेध घेणारे करारी पिंगट डोळे.  पण काही म्हण तू, ह्या जुन्या कृष्णं-धवल फोटोंना ब-याच वर्षांनतर जी मजा येते न बघण्यात ती  आताच्या  रंगीत  फोटोला नाही बघ. लग्नाचा अल्बम बघ. फुगलाय आता. तेंव्हा कुठे गं क्वालिटी आलीये एवढी. बरेचसे पुसट झालेत आता. पण  काय  गम्मत आहे बघ, काहीही दिसत नसलं तरी आपण दोघं बरोब्बर सांगू शकतो कुठला फोटो ते.        
दरवर्षी मला नवीन डायरी मिळायची. लग्नं झाल्यावर मिळालेली पहिली डायरी तू घेतली होतीस ताब्यात, हक्काने. वर्षभरात  काहीही लिहिलं नाहीस त्यात!!! पण कुठेतरी लिहिलेलं सापडेल म्हणून पानं चाळली, तर काय रे बाबा वस्तू. त्या राजा केळकर संग्रहालयात कश्या असतात वेगवेगळ्या, अगदी तशाच. पहिल्या पानावरचं वळणदार 'श्री' सोडलं तर मी काही तुझ्यासारखा नाही म्हणा प्रतिकात्मक आठवणी वगैरे जपणारा. पण तुझ्या त-हेत-हेच्या गोष्टी मात्रं भन्नाटच आहेत बरं का… अर्क असतो तशा. हं.…काय काय आठवलं त्या बघून. एका दिवाळीत आणलेल्या दहाच्या को-या बंडलातल्या सिरिअल मधल्या दहा नोटा. तू म्हणालीस, असू दे लक्ष्मी जपावी, तरच रहाते. एक तुझा आवडता सिद्धिविनायकाचा फोटो, एवढी मोठ्ठी फ्रेम केली आहेस तरी तो बारीक जपलासच. आपल्या लग्नानंतर तेंव्हाच्या प्रथेप्रमाणे स्टुडीओत जाऊन काढलेला फोटो आणि आपल्या दोघांकडच्या लग्नपत्रिका. आपण जुने झालो आता. आपल्यात पण बदल झाला, कागदात होईल नाही तर काय. कागद पुसट झाले की ब्रेल लिपी येत असेल का ग त्यावर?? काही दिसो न दिसो, बोटं फिरवली की वाचता येतं, दिसतंही. असो…              
आणि हे काय…लागल्या असत्या की या सुया आत्ता मला!!! मला हसूच आलं पटकन. लोकरीच्या गुंड्यात खोचल्या आहेस तू पण केवढ्या थंडगार पडल्यात त्या. लोकरीची ऊब मायेचा हात फिरल्यावर येत असावी. आणि हे बघ काय - अर्धवट गुंडाळून ठेवलेलं भरतकामाचं घर? ते घर आहे हे त्यावरच्या आधीच काढलेल्या चित्रामुळे कळलंय, बरं का. हसू नकोस ग. तुला सगळ्यातली आवड आणि  माझी  सगळ्यात  बोंब. चांगलं काय ते कळायचं पण कला वगैरे प्रकार नाहीच जमले मला कधी.    
 

आता मात्र हद्द झाली हा. तुला खरं तर पुरस्कारच द्यायला हवा. मौल्यवान हिरा ठेवल्यासारखी कोप-यात दडवलेली ही दागिन्यांची मखमली पिशवी!!! आणि आत काय तर काळ्या पडलेल्या दोन चांदीच्या वेढण्या, एक छल्ला आणि एक तू हौसेने अंबाड्यात घालण्याकरता केलेलं चाफ्याचं फू आणि एक बिन झाकणाचा रिकामा करंडा. समोर असतीस तर हिसकावून घेतलं असतंस. 'तुम्हाला नाही कळणार' हे वाक्यं तर हल्ली मीच आधी म्हणतो. उद्या गावात गेलो की विचारतो या गोष्टी कळण्यासाठी आहे का एखादं पुस्तक म्हणून. अर्थात अडलं की तुलाच विचारणार. उत्तर ही पाठ आहे तुझं. 'झेपतंय तेच करावं माणसानी'. फक्त हे वाक्य जाताजाता, सुरक्षित अंतरावर गेल्यावर तू जे टाकतेस ना, ते तुलाच जमतं.   

आता हे आणि काय या पिशवीत? धन्यं आहात आपण. वरच्या सोनेरी पाकिटाएवढंच पिवळं पडलेलं, मी पाठवलेलं पहिलं वहिलं पत्रं, एक संपूर्ण चार्तुमास, एक अकरावा अध्याय, एक सुवर्ण भिशी योजनेची जाहिरात. कशाचा कशाला तरी मेळ आहे का मला सांग. नाही, वस्तू, आठवणी जपाव्यात पण निदान त्यात काही तरी सुसंगती हवी की नको? असो! 'तुम्हाला नाही कळणार' ऐकण्यापेक्षा गप्पं बसलेलं बरं. बाकी काही आवरण्यासारखा नाहीचे कप्पा. मला बोलायला कारण मिळावं म्हणून मी शोधल्या आपल्या तुझ्या मागे खोचून ठेवलेल्या पिशव्या.  

फार विरह व्हावा असं खरं तर आपलं काही वय नाहीये. पण अलीकडे काहीच बोलणं नाही आपलं. त्यामुळे विरह की काय तो वाढलाय खरा. :) …  मी पण आता एक वेगळीच गम्मत करणार आहे. माझं पण सामान बांधून तयार ठेवणार आहे उद्या. 
तुझ्या भाषेत, अगदी चला म्हटलं की निघायला तयार पाहिजे माणूस अशी तयारी. मी पण जरा तुझ्यासारखं व्हायचं ठरवलंय. आता वाचल्यावर डोळ्यात पाणी येईस्तोवर हसशील, माहितीये मला. पण खरच सांगतोय… मी तुझे या भिंतींवर, वस्तूंवर, माझ्या अंगावर रेंगाळणारे स्पर्श गोळा केले की मग घ्यायचं काही काही उरणार नाही मागे. मग मी तयार. तिकीट बुक झाल्याचं कन्फर्म झालं कि निघालोच बघ. 
पण खरं सांगू का, ब-याच दिवसांनी आवरतोय ना घर त्यामुळे धांदल उडाली बघ माझी. तू गेल्यानंतर पहिल्यांदाच.....
--जयंत विद्वांस

Saturday 14 September 2013

मला सुंदर दिसलेल्या ललना (८) … आशा भोसले - भाग २

दुसऱ्यांच्या, त्यातल्या त्यात सेलेब्रिटींच्या आयुष्यात घडलेले किस्से, प्रसंग, अडचणींच्या कहाण्या आपण मोठ्ठ्या चटकदार गोष्टी असल्यासारख्या वाचतो. पण तेंव्हा त्यांची अवस्था तेच जाणोत (ती ही माणसंच आहेत हे पण का विसरतो खरं तर). त्यांच्या ऐकीव, क्वचित पसरवलेल्या, खऱ्या - खोट्या सफल असफल प्रेमकहाण्या आपण लफडी या एकाच शब्दात तोलून मोकळे होतो. आशाबाई जेंव्हा आत्मचरित्र लिहितील तेंव्हा कळेल भोसले, दादा कोंडके, .पी नय्यर आणि आर. डी. यांच्या बद्दलचं सत्य किंवा त्यांची बाजू. दुर्दैवाने आज चौघंही हयात नाहीयेत
     
विभक्त झाल्यावर त्यांनी सोसलेले हाल, उपसलेले कष्ट त्यांच्याच तोंडून ऐकायला हवेत. बोरिवलीहून त्या लोकलने जायच्या. तुम्ही म्हणाल त्यात काय मोठंसं, अख्खी मुंबई जाते. पण अख्खी मुंबई एवढी गाणी नाही गातसंसारिक अडचणी, कराव्या लागणाऱ्या तडजोडी, मानहानी, डावललं जातंय ही बोच हे सगळं एका कप्प्यात बंद करून माईक पुढे उभं राहिल्यावर त्यातले भाव असतील त्याच्याशी फक्त नातं जोडायचं हे खायचं काम नाहीये

काही जोड्या जुळतात, काही प्रसिद्धी मिळवतात, काही कमनशिबी असतात. त्यांची .पी. बरोबरची जोडी नशीबवान होती. 'माझ्याशिवाय तुम्हाला यश शक्यच नाही' असा प्रभाव असणाऱ्या एका प्रस्थापित आणि यशस्वी गायिकेला एकदाही घेता हा माणूस शिखरावर गेला कारण त्याच्या सोबत तेवढाच दमदार (काकणभर सरसच माझ्या मते), कुठल्याही प्रकारच्या गाण्याची सवय असलेला, मुख्य म्हणजे जो हवा तोच भाव ओतणारा (हल्ली बहुतेकवेळा स्वरांची बाराखडी असतेजर्रा इकडे तिकडे हलायचं नाहीभाव गेला तेल लावतचिरतरुण आवाज होता. या जोडीने धुमाकूळ घातला. नमुना म्हणून ही गाणी बघा ना: माँग के साथ तुम्हारा, उडें जब जब जुल्फें तेरी, आईएं मेहेरबां, ये हैं रेशमी जुल्फों का अँधेरा, जाईए आप कहाँ जाएंगे, आओ हुजुर तुमको, इशारों इशारों में, दिवाना हुआ बादल, बहोत शुक्रिया बड़ी मेहेरबानी, चैन से हमको कभी, हुज़ुरेवाला, में शायद तुम्हारे लिए अजनबी हूँ, फिर मिलोगे कभी, यहीं वो जगह हैं आणि अशी कितीतरी… 
       

अशीच एक त्यांची जोडी फडके साहेबांबरोबर जुळली. स्पष्ट शब्दोच्चार सोप्प्या वाटणाऱ्या अवघड चाली आणि कुठलाही आव आणता म्हटलेली गाणी. सहज गुणगुणता येतील इतक्या सोप्प्या वाटतात की नाही चाली?? म्हणून बघा. सोप्प्या नाहीत हे मान्य करा आणि पुन्हा त्यांना ऐका. ते जास्तं सोप्पं काम आहे. उदाहरण द्यायचं झालंच तर धुंदी कळ्यांना, स्वप्नात रंगले मी, धुंद एकांत हा,हृदयी प्रीत जागते, आज कुणीतरी यावे, का रे अबोला, या सुखांनो या, एकाच या जन्मी जणू, चंद्र आहे साक्षीला, अशी कितीतरी

आर. डी., गुलजार आणि आशाताई हे एक वेगळंच त्रिकुट आहे. मोठ्या दवाखान्यात कसे वेगवेगळे स्पेशालिस्ट असतात तसं होतं यांचं. एक लेखणीचा जादुगार, एक तालासुरांशी रममाण झालेली वल्ली आणि एक - झालं का तुमचं फायनल, तर द्या इकडे - इतक्या सहजतेने गाणारा गळा. काय गाणी आहेत एकेक तिघांची. मेरा कुछ सामान जेंव्हा चाल लावण्यासाठी दिलं तेंव्हा पंचम म्हणाला होता, हे काय गाणं आहे?? उद्या टाइम्सची हेडलाईन द्याल चाल लाव म्हणून. गुलजार म्हणाले, खरा संगीतकार त्याला सुद्धा चाल लावेल. मग जे काही आर. डी. ने तयार केलंय ते मात्र चिरंतन आहे, ही तिन्ही माणसं काळाच्या पुढे होती, काळाशी जुळवून घेणारी होती, लवचिक होती. यांचा आवाका मुळातच मोठा. म्हणूनच तेरे बिना जिंदगी से लिहिणारा गुलजार छैया छैया, कजरा रे, नीले नीले जिंदे शामियाने के तले लिहू शकतो. सुनो चंपा सुनो तारा देणारा आर. डी. चिंगारी कोई भडके, मेरे नैना सावन भादो आणि रिमझिम रिमझिम रुमझुम रुमझुम पण देऊ शकतो. आशाताईंबद्दल काय बोलणार. पाण्यासारखा गळा, तुम्ही टाकाल तो रंग दाखवणारा

त्यांची आर. डी. बरोबरची गाणी बघा : हसीना जुल्फोंवाली, मेरे सोना रे, आजा आजा मैं हूँ प्यार तेरा, पिया तू अब तो आजा, दम मारो दम, मोनिका माय डार्लिंग, चुरा लिया हैं तुमने, आपके कमरे में, लेकर हम दिवाना दिल, जानेजाँ ढूंढता फिर रहा, खाली हाथ शाम आयी हैं, कतरा कतरा, छोटीसी कहानी से, मरिया, रोज़ रोज़ आँखों तले, पिया बावरी, जाना मेरी जाना, हैं अगर दुश्मन, ये लड़का हाए रे अल्लाह...  किती देणार यादी!!! 

हृदयनाथ मंगेशकरांकडे सुद्धा त्यांनी काही अप्रतीम गाणी गायिली आहेत. ती ही अशीच - गुणगुणायला जरी सोप्पी वाटली तरीही…. बघा तपासून : सखी मुरली मोहन मोही मना, तरुण आहे रात्र अजुनी, मी मज हरपून, जांभूळ पिकल्या झाडाखाली, कोन्या राजानं राजानं, काजल रातीनं ओढून नेला, आला आला वारा, उषःकाल होता होता, गेले द्यायचे राहून, केंव्हा तरी पहाटे, चांदण्यात फिरताना, चांदणे शिंपित जाशी, पांडुरंग कांती, मागे उभा मंगेश, ये रे घना ये रे घना, समईच्या शुभ्र कळ्या, ही वाट दूर जाते…. किती अवीट गोडीची गाणी आहेत ही सगळी… 

संगीतकार नवीन असो वा प्रथितयश, त्या त्यांचं शंभर टक्केच देतात. बघा ना
रवि बरोबर तोरा मन दर्पण कह्लाए, आगे भी जाने ना तू, दिन हैं बहार के, दिल की कहानी रंग लाई हैं, इन हवाओं में इन फिजाओं में, ज़िन्दगी इत्तेफ़ाक़ हैं
एस. डी. बर्मन बरोबर अच्छा जी मैं हारी, नज़र लागी राजा, जानू जानू रे काहे खनके हैं तोरा कंगना, काली घटा छाए मोरा जीया घबराय, अरे यार मेरे तुम भी हो ग़जब, अब के बरस भेज भैया को बाबुल, रात अकेली हैं (हे आणि होठों पे ऐसी बात आर. डी. नेच दिलंय म्हणे. ठेका बघितला तर मान्य आहे);                  
अनु  मल्लिक कडे किताबें बहोत सी पढ़ी होंगी तुमने; रहमान कडे रंगीला रे, तनहा तनहा यहाँ पे, राधा कैसे जले, मुझे रंग दे, भँवरे; मदन मोहन कडे झुमका गिरा रेसलिलदांकडे कडे जानेमन जानेमनसंदीप चौटा कडे कम्बख्त इश्क़ आणि खय्याम कडे अख्खा उमराव जान…. 

अनेक पुरस्कार मिळाले. फिल्मफेअर, आयफा, गिनीज बुक मध्ये नाव गेलं, जीवन गौरव मिळालं, फाळके पुरस्कार, पद्मविभूषण मिळालं. पण काहीतरी राहून गेलंच. मेरा नाम जोकर च्या अपयशाबद्दल बोलताना राज कपूर म्हणाला होतामाझं थोडं आई सारखं झालंय. थोडं मागे पडलेलं, अशक्त, अपयशी मुल तिच्या जास्तच जवळचं असतं, तसं माझं मेरा नाम जोकर च्या बाबतीत झालंय. तो माझ्या हृदयाच्या जवळ आहे. आधीचं आणि नंतरचं उत्तुंग यश नाही त्याच्या हृदयाजवळ आलं. निसटलेलं, अपयश, हुकलेली संधी असंच शिल्लक रहात असेल का मनात?? आशाताईंच्या मनात किती गर्दी असेल ना अशा गोष्टींची. ऐनवेळी नाकारलं गेलेलं मेरे वतन के लोगों, डावललं गेल्याची अनेक शल्य, आर. डी. गेल्यानंतर झालेला मनस्ताप आणि खूप काही.   


एक उत्कृष्ठ सुगरण, एक गोड गळ्याची लोभस खळ्यांची गायिका, एक बिनधास्त बाई, एक मिश्किल नकलाकार, एक यशस्वी उद्योजिका, टीका आणि हारतुरे एकाच भावनेने स्वीकारणारं एक दिलखुलास व्यक्तिमत्व, एकटी पडली (किंवा पाडली) म्हणून हार मानता यशस्वी होणारी जिद्दी स्त्री आणि उशीरा यश मिळालंय म्हणून कसलीही कटुता ठेवणारी

आपण फक्त एवढच लक्षात ठेवायचं. आत्मचरित्र आलं की वाचायचं…. जमलं तर बिटवीन लाईन्स.     


-- जयंत विद्वांस