Saturday 21 September 2013

कपाट

प्रिय.....
किती वर्ष लोटली गं तुला पत्रं लिहून? अगं वेळच आली नाही ना कधी पत्रं लिहायची, मग कसं लिहिणार? कारण तर हवं ना.  असो! आज काय करावं हा प्रश्नं पडला. वेळ जाता जाईना. म्हटलं दोन कामं आहेत म्हणा पेंडिंग. एक म्हणजे तुला पत्रं आणि दुसरं, तुझ्या अत्यंत आवडीचं काम - मी घातलेला पसारा हसतमुखाने आवरायचं. पण तू जिंकलीस हे मान्यच करायला  हवं. तू कधीतरी चिडावंस म्हणून मी काय कमी प्रयत्नं केले?  उलट तू लवकरात लवकर सगळं उरकून मिश्किल हसायचीस.
दुसरं काम आधी केलं मी मुद्दाम आज. तुझ्या काय काय वस्तू सापडतात ते बघून म्हटलं तुला दोन चार तिरकस शेरे मारता येतील. म्हणून आधी कपाट आवरायला घेतलं. काय बायका गं तुम्ही… किती सोस तो वस्तू जोंबाळून ठेवायचा असा शेरा मी तयारच ठेवला होता. पण छे!!! ती ही संधी तू दिलीच नाहीस. माझाच कप्पाच सगळ्यात गचाळ होता. नेहमीप्रमाणे मी तिकडे दुर्लक्ष करून तुझ्या कप्प्याकडे गेलो आधी. काय नी काय वस्तू तरी एकेक तुझ्या. यादीच केली मी. मला माहितीये, तू म्हणणार, 'तुम्हाला नाही कळणार यातली गम्मत'… तरी पण केलीये.        
आपल्या साखरपुड्याची घडीवर विरलेली ती अंजिरी साडी, अगं किती विटलीये ती. पण तुझ्या गो-या रंगाला काय खुलून दिसायची ना ती. त्याखाली लग्नातला घडी विस्कटलेला मोरपिशी शालू, बुट्टे मात्रं अजून चमकदार आहेत. इनमिन पाच फूट तू, तुझ्यापेक्षा त्या शालूचंच वजन जास्तं भरलं असतं तेंव्हा. लहानच होतीस म्हणा तेंव्हा तू तशी. चेह-यावर पोक्तं, गंभीर भाव आणायची कसरत बघताना मला मात्रं हसू फुटत होतं. तरी नथ सारखी करायच्या नावाखाली तू हसून घ्यायचीसच.  तू मुळात एक डामरट्ट  मुलगी  आहेस असं माझं अजूनही ठाम मत आहे. आणि काय गं तुझा हा लग्नाआधीचा फोटो!!! एक्सरे काढल्यासारखा हडकुळा. पण  तुझ्या  डोळ्यात तेंव्हा दिसलेली जादू मात्रं अजून तशीच आहे. हडकुळेपणामुळे जास्तंच उठून दिसणारं सरळ नाक आणि वेध घेणारे करारी पिंगट डोळे.  पण काही म्हण तू, ह्या जुन्या कृष्णं-धवल फोटोंना ब-याच वर्षांनतर जी मजा येते न बघण्यात ती  आताच्या  रंगीत  फोटोला नाही बघ. लग्नाचा अल्बम बघ. फुगलाय आता. तेंव्हा कुठे गं क्वालिटी आलीये एवढी. बरेचसे पुसट झालेत आता. पण  काय  गम्मत आहे बघ, काहीही दिसत नसलं तरी आपण दोघं बरोब्बर सांगू शकतो कुठला फोटो ते.        
दरवर्षी मला नवीन डायरी मिळायची. लग्नं झाल्यावर मिळालेली पहिली डायरी तू घेतली होतीस ताब्यात, हक्काने. वर्षभरात  काहीही लिहिलं नाहीस त्यात!!! पण कुठेतरी लिहिलेलं सापडेल म्हणून पानं चाळली, तर काय रे बाबा वस्तू. त्या राजा केळकर संग्रहालयात कश्या असतात वेगवेगळ्या, अगदी तशाच. पहिल्या पानावरचं वळणदार 'श्री' सोडलं तर मी काही तुझ्यासारखा नाही म्हणा प्रतिकात्मक आठवणी वगैरे जपणारा. पण तुझ्या त-हेत-हेच्या गोष्टी मात्रं भन्नाटच आहेत बरं का… अर्क असतो तशा. हं.…काय काय आठवलं त्या बघून. एका दिवाळीत आणलेल्या दहाच्या को-या बंडलातल्या सिरिअल मधल्या दहा नोटा. तू म्हणालीस, असू दे लक्ष्मी जपावी, तरच रहाते. एक तुझा आवडता सिद्धिविनायकाचा फोटो, एवढी मोठ्ठी फ्रेम केली आहेस तरी तो बारीक जपलासच. आपल्या लग्नानंतर तेंव्हाच्या प्रथेप्रमाणे स्टुडीओत जाऊन काढलेला फोटो आणि आपल्या दोघांकडच्या लग्नपत्रिका. आपण जुने झालो आता. आपल्यात पण बदल झाला, कागदात होईल नाही तर काय. कागद पुसट झाले की ब्रेल लिपी येत असेल का ग त्यावर?? काही दिसो न दिसो, बोटं फिरवली की वाचता येतं, दिसतंही. असो…              
आणि हे काय…लागल्या असत्या की या सुया आत्ता मला!!! मला हसूच आलं पटकन. लोकरीच्या गुंड्यात खोचल्या आहेस तू पण केवढ्या थंडगार पडल्यात त्या. लोकरीची ऊब मायेचा हात फिरल्यावर येत असावी. आणि हे बघ काय - अर्धवट गुंडाळून ठेवलेलं भरतकामाचं घर? ते घर आहे हे त्यावरच्या आधीच काढलेल्या चित्रामुळे कळलंय, बरं का. हसू नकोस ग. तुला सगळ्यातली आवड आणि  माझी  सगळ्यात  बोंब. चांगलं काय ते कळायचं पण कला वगैरे प्रकार नाहीच जमले मला कधी.    
 

आता मात्र हद्द झाली हा. तुला खरं तर पुरस्कारच द्यायला हवा. मौल्यवान हिरा ठेवल्यासारखी कोप-यात दडवलेली ही दागिन्यांची मखमली पिशवी!!! आणि आत काय तर काळ्या पडलेल्या दोन चांदीच्या वेढण्या, एक छल्ला आणि एक तू हौसेने अंबाड्यात घालण्याकरता केलेलं चाफ्याचं फू आणि एक बिन झाकणाचा रिकामा करंडा. समोर असतीस तर हिसकावून घेतलं असतंस. 'तुम्हाला नाही कळणार' हे वाक्यं तर हल्ली मीच आधी म्हणतो. उद्या गावात गेलो की विचारतो या गोष्टी कळण्यासाठी आहे का एखादं पुस्तक म्हणून. अर्थात अडलं की तुलाच विचारणार. उत्तर ही पाठ आहे तुझं. 'झेपतंय तेच करावं माणसानी'. फक्त हे वाक्य जाताजाता, सुरक्षित अंतरावर गेल्यावर तू जे टाकतेस ना, ते तुलाच जमतं.   

आता हे आणि काय या पिशवीत? धन्यं आहात आपण. वरच्या सोनेरी पाकिटाएवढंच पिवळं पडलेलं, मी पाठवलेलं पहिलं वहिलं पत्रं, एक संपूर्ण चार्तुमास, एक अकरावा अध्याय, एक सुवर्ण भिशी योजनेची जाहिरात. कशाचा कशाला तरी मेळ आहे का मला सांग. नाही, वस्तू, आठवणी जपाव्यात पण निदान त्यात काही तरी सुसंगती हवी की नको? असो! 'तुम्हाला नाही कळणार' ऐकण्यापेक्षा गप्पं बसलेलं बरं. बाकी काही आवरण्यासारखा नाहीचे कप्पा. मला बोलायला कारण मिळावं म्हणून मी शोधल्या आपल्या तुझ्या मागे खोचून ठेवलेल्या पिशव्या.  

फार विरह व्हावा असं खरं तर आपलं काही वय नाहीये. पण अलीकडे काहीच बोलणं नाही आपलं. त्यामुळे विरह की काय तो वाढलाय खरा. :) …  मी पण आता एक वेगळीच गम्मत करणार आहे. माझं पण सामान बांधून तयार ठेवणार आहे उद्या. 
तुझ्या भाषेत, अगदी चला म्हटलं की निघायला तयार पाहिजे माणूस अशी तयारी. मी पण जरा तुझ्यासारखं व्हायचं ठरवलंय. आता वाचल्यावर डोळ्यात पाणी येईस्तोवर हसशील, माहितीये मला. पण खरच सांगतोय… मी तुझे या भिंतींवर, वस्तूंवर, माझ्या अंगावर रेंगाळणारे स्पर्श गोळा केले की मग घ्यायचं काही काही उरणार नाही मागे. मग मी तयार. तिकीट बुक झाल्याचं कन्फर्म झालं कि निघालोच बघ. 
पण खरं सांगू का, ब-याच दिवसांनी आवरतोय ना घर त्यामुळे धांदल उडाली बघ माझी. तू गेल्यानंतर पहिल्यांदाच.....
--जयंत विद्वांस

No comments:

Post a Comment