Thursday 12 September 2013

मला सुंदर दिसलेल्या ललना (८)….आशा भोंसले (भाग - १)

परवा या चिरतरुण आजींना ८१ वं वर्ष लागलं. आवाज आणि उत्साह मात्रं आकड्यांची आलटापालट केल्यासारखा १८ चा आहे. या वयात 'आता उरलो सल्ल्यापुरता' ही अवस्था आलेली असते आणि  ही बाई  या वयात सिनेमात काम करते, स्टेज शो करते, बिनधास्त मुलाखती देते, आत्मचरित्र लिहितीये, मुलीच्या अकाली निधनाचं दु:खं पचवतीये. आकड्यांच्या हिशोबातलीवयं आपल्या सारख्या सामान्य माणसांना… (चाळिशीत ग्रांड स्लाम जिंकलं परवा लिएंडर पेसनी) ही माणसं असामान्य. 

कुणाला चेह-यानी एखादवेळेस नाही वाटणार सुंदर पण ही बाई आवाजानी मात्रं चिरतरुण, सौंदर्यवतीच आहे. गौतम राजाध्यक्षांनी काढलेल्या त्या पाच भावंडांच्या प्रसिद्ध फोटोत आशाबाई सगळ्यात सरस दिसतात (आणि त्या एरवीही आहेत असं माझं मत आहे). वटवृक्षाच्या सावलीत बाकीची झाडं खुरटतात पण हे रोपटं मात्रं असं काही उंच झालं की हेवा करावा. स्वकर्तुत्वावर, स्वबळावर सहानुभूती न घेत, झगडत. त्यांच्या ऐकलेल्या, पाहिलेल्या, वाचलेल्या मुलाखतीतून, त्यांच्यावर आलेल्या लेखातून जेकाही समजलंय त्यावरून वाटतं की हे आपल्या बुद्धीच्या पलीकडचं काम आहे. त्याचं आत्मचरित्र येऊ घातलंय. त्यांच्यासारखच फटकळ, स्पष्ट असणार याची खात्री आहे. किती जणांची पितळं उघडी पडतील काय माहित.
पहिल्यांदा घरोघरी ठोक्याच्या कळशा असायच्या. तांबटाच्या एक पट्टीचे आणि हातोडीचे घाव सोसून तयार केलेली नक्षी, जगात  असे  तांबट हातोड्या आणि पट्ट्या  घेऊन  तयारच  असतात.  आशाताईंनी  असे  अनेक  घाव सोसले पण एकही  पोचा  पृष्ठभागावर दिसू दिला  नाही.  त्यांच्या गालावरच्या खळ्यात  आणि  गाण्यात  मधेच हसतात ना तशा  हसण्यात  सगळं लपवून टाकलं त्यांनी. पण बाई  धीराचीच. त्यांच्या नावातच  आहे  हो  सगळं. उगाच आपलं नाव सोनुबाई… हा प्रकार नाही. सुरेल गळा एवढीच पुंजी खरं तर. चोहोबाजूनी झालेली कोंडी, सहनायिकांसाठीची मिळणारी गाणी, कुणीतरी आज नाही म्हणून मिळालेली गाणी आणि कुणीतरी आज आहे म्हणून नाकारली गेलेली गाणी. 

'मेरा नाम जोकर' ची सगळी गाणी त्यांची आहेत, तितर के दो आगे तितर, मोहे अंग लग जा बालमा आणि दाग न लग जाये. का? तर आर.के.चं थोरलीशी भांडण झालं होतं म्हणून. 'मोहे अंग लग जा बालमा' ला त्या जो उसासा टाकतात ना तो पद्मिनीला शारीरिक दाखवावा लागतो, त्या गळ्यातून दाखवतात. सुलोचना चव्हाण जशा अंगभर पदर घेऊन खाली मान घालून लावणीतला भाव चेह-यावर न आणता शृंगारिक लावण्या म्हणतात ना (आता त्यांचे कार्यक्रम होत नाहीत हे आपलं दुर्दैवं) तशा या आज्जीबाई गळ्यातून काय काढतील सांगता येत नाही. अनेक नवीन गायिका मादक, उडत्या चालीची गाणी गाताना तसेच अंगविक्षेप करावे लागतात या भ्रामक कल्पनेत तसं गात असतात. आशाताई रेशमी साडीत, एक चकचकीत ब्रेसलेट, कानात कुड्या अशा पेहरावात चढती जवानी…, ये मेरा दिल प्यार का दिवाना …, मेरा कुछ सामान…., नाच रे मोरा  आणि युवती मना दारूण रण म्हणतात. देवानी  गळ्यात कुठली चीप बसवून पाठवलंय, त्यालाच माहित.

त्यांच्या गाण्यांबद्दल बोलायचं म्हणजे पुस्तकच होईल (ते काम नेरूरकरांनी आधीच केलं आहे). पण काही गाणी मात्रं त्यांचीच. कुठली घ्यावी आणि कुठली वगळावी? नाच रे मोरा,  भरजरी गं पितांबर, एका तळ्यात होती, मलमली तारुण्य माझे, चांदण्यात फिरताना, सोनियाच्या ताटी,  बुगडी माझी, ही वाट दूर जाते, ये रे घना, ऐन दुपारी यमुनातीरी, केंव्हा तरी पहाटे, चुरा लिया है, दम मारो दम, खाली हाथ शाम, मेरा कुछ सामान, बेचारा दिल क्या करे, कतरा कतरा, दिल चीज क्या हैं, ये क्या जगह हैं दोस्तों, ये मेरा दिल प्यार का दिवाना, मोनिका, पान खाओ सैय्या आणि अशी कितीतरी. आशाबाई म्हणजे गाण्याचा मॉल आहे. बालगीत, प्रेमगीत, भावगीत, छेडाछेडी, उत्तान कॅब्रे, विरह, नाट्यसंगीत काय हवं ते मागा, सगळं अंडर वन रुफ आहे.      


पान खाओ सैय्याच्या ताना काय अफाट आहेत, बेचारा दिल क्या करेचं हमिंग, चांदण्यात फिरतानाचा तो तालाशी खेळणारा आवाज… झुलायला होतं अगदी. ये मेरा दिलच्या कडव्यात तर मला हेलनची घाई पण दिसते. बुगडी माझीचा कोवळा नवतरुणीचा, शारद सुंदर चा चंदेरी आणि सांज ये गोकुळी, झिनी झिनी वाजे, जय शारदे चा धीरगंभीर आवाज. देणगीच ही. पडद्यावर जयश्री गडकर, वहिदा रेहमान, नितू सिंघ, झीनत अमान, सिमा, हेलन, बिंदू, रेखा, हेमा मालिनी पासून उर्मिला, तबू कुणीही असो ते गाणं त्या अभिनेत्रीचच वाटतं हे त्यांचं सगळ्यात मोठं  यश आहे. मद्दड चेह-याच्या अभिनेत्रींसाठी त्या काय मेहनत घेतात हे एकदा विचारायला हवं त्यांना कुणीतरी. 
(रसिक वाचकांनी आपापली मनपसंत गाणी यात टाकून वाचावं :) )

क्रमश:….२

--जयंत विद्वांस

2 comments: