Sunday 1 September 2013

मला सुंदर दिसलेल्या ललना (७)… " मधुबाला"

निखळ, निरोगी शुभ्रं दंतपंक्ती दाखविणारं, निर्मळ हास्य म्हणजे मधुबाला  कृत्रिमपणा, कुचकेपणा, छद्मीपणाचा  लवलेश  नसलेला  मोहक चेहरा म्हणजे मधुबाला. प्रसन्न व्यक्तिमत्व , सहज वावर, शिडशिडीत शरीरयष्टी म्हणजे मधुबाला.  झीनत अमान  आणि  मधुबाला यांच्यात साम्यं काय? तर दोघींचा अभिनय बघायला कुणीही जात नाही. काय बघायला जातात याची कारण फक्तं वेगळी.

उणपुरं फक्तं छत्तीस वर्षाचं आयुष्यं जगली ती. त्यातली शेवटची सात आठ वर्ष  आजारपणातच गेली. वयाच्या चौदाव्व्या वर्षी, १९४७ साली भारत स्वतंत्र झाला तेंव्हा ती आधीच्या सहा बहिणींना जगवण्यासाठी वडिलांच्या पारतंत्र्यात गेली आणि राजकपूर बरोबर 'नीलकमल' मध्ये चमकली. नंतर आलेला गूढ चित्रपट 'महल', त्यातील गाणी, रहस्यं आणि मधुबाला मुळे गाजला. तिच्या हृदयाला भोक पडलं होतं. तसंही मतलबी वडील, असफल प्रेम यांनी पडली होती ती वेगळीच!!! 

मधुबालाबद्दल अश्लील बोललेलं, लिहिलेलं मी आजपर्यंत ऐकलेलं, वाचलेलं नाही. डोळ्यात दुर्योधनाची नजर घेऊन चित्रपट बघणा-या माणसांकडूनही नाही. ती नितांत सुंदर होती, ते सौंदर्य अलौकिक होतं. मेकपमन  नी  फुलवलेलं  नव्हतं  ते.  गावठी  गुलाब जसा मोहक, सुगंधी असतो तशी होती ती. अफाट स्त्री सौंदर्याची वर्णनं करताना अतिशयोक्तीचा  आधार घेतात, जसं  मस्तानीच्या कंठातून म्हणे तांबूलरस उतरताना दिसायचा…म्हणे द्रौपदीच्या अंगाचा सुगंध काही मैल लांबून यायचा (म्हणून  तिचं  एक नाव योजनगंधा असंही होतं). थोडक्यात काय…जे साध्या शब्दात सांगता येत नाही ते थोडं  अतिशयोक्त  सांगायचं.  मधुबाला  बद्दल लिहिताना असच होतं. एक शापित अप्राप्यं सौदर्य. ज्याला मिळेल त्याचा हेवा करायचा.    

मूळ कृष्ण-धवल 'मुघल-ए-आझम' नंतर रंगीत झाला. के.असिफनी  मूळ चित्रपटात 'जब प्यार किया तो डरना क्या….' एवढं एकच गाणं रंगीत केलं होतं. माझ्या मते मधुबालाच्या सौंदर्याला दिलेली ती सर्वात मोठी दाद होती. वरच्या शेकडो आरशात मधुबाला सहन होत नाही. तो ऐश्वर्य सीन होता. एक देवानी पाठवलेलं शिल्पं आणि बाजूनी मनुष्यं निर्मित सौंदर्य!!!

मधुबाला 'चीप' कधीच वाटली नाही. 'हावडा ब्रिज' मधली  'मेरा नाम चीन चीन चू' , 'आईये मेहेरबां' कधीही बघा, मोहक आहेत. 'काला पानी' मधलं 'अच्छा जी मैं हारी पिया' मध्ये फक्तं तिला आणि तिच्या खट्याळ चेह-याला बघत रहावं. किशोर बरोबरची 'दे दो मेरा पाच रुपय्या', 'चांद रात तुम हो साथ', 'एक लडकी भिगी भागीसी', 'हाल कैसा है जनाब का', 'झुमरू' मधलं 'ठंडी हवा ये चांदनी सुहानी' ही गाणी जेवढी श्रवणीय होती तेवढीच प्रेक्षणीयंही होती.   

दिलीपकुमार आणि प्रेमनाथ दोघं तिच्या प्रेमात होते. दिलीपकुमारसाठी प्रेमनाथनी माघार घेतली असं वाचलय.तिचं दोघांपैकी  कुणाशीच लग्नं होऊ शकलं नाही. हरहुन्नरी पण विक्षिप्त किशोरकुमारशी झालेलं लग्नं अल्पंकाळाचं सुखं होतं. पण ती फार काळ जगणार नाही हे तो पर्यंत माहित झालेलं होतं. 

दोघांची जात एक असताना तिचं दिलीपकुमारशी लग्नं झालं नाही ('नया दौर' मध्ये होती ती, त्यावेळी झालेल्या वादात दिलीपकुमारनी तिच्या वडिलांची माफी मागितली असती तर झालं असतं त्यांचं लग्नं, असं वाचलंय) आणि जात वेगळी आहे म्हणून देव आनंद चं सुरैय्याशी आणि सायरा बानो चं राजेंद्रकुमारशी झालं नाही. सुंदर बायका नेहमी अयोग्यं  पुरुषाच्या  प्रेमात  का  पडतात  हे  एक  कोडंच आहे!!! पहा ना या जोड्या - ऐश्वर्या-सलमान, माधुरी-संजय दत्त, स्मिता पाटील-राज बब्बर, परवीन  बाबी-महेश  भट  आणि   मधुबाला-प्रेमनाथ…असो …   

जोपर्यंत सौंदर्य, सौंदर्यवतींची चर्चा होईल तोपर्यंत सगळ्या गोष्टी मधुबालाशी (ती परिमाण आहे) ताडून पाहिल्या जातील एवढं निश्चित. मग समाधानासाठी कुणाला तिच्या हसण्यात आणि माधुरीच्या हसण्यात साम्य आहे असं वाटेल, असेलही, पण मधुबाला एकमेवाद्वितीय होती. काय नंबर लावायचेत ते अकरा पासून पुढे लावा, एक ते दहा तीच आहे!!!   

मला तर वाटतं स्वर्गलोकीच्या अप्सरांचं यान गुपचूप पृथ्वीवर आलं असावं. त्यातली एक छोटीशी अप्सरा इथेच राहून गेली. मनमोहन देसाईं च्या चित्रपटात जसं 'हरवले सापडले' असतं ना त्याप्रमाणे एका अप्सरेला ती पृथ्वीवर दिसली असावी. मग काय… घेतलं बोलावून तातडीने… 'त्याच्या' घरचा खजिना त्यांनी परत नेला. तो आपल्याला पहायला मिळाला हेच आपलं भाग्यं. 

--जयंत विद्वांस 




No comments:

Post a Comment