Showing posts with label गीत. Show all posts
Showing posts with label गीत. Show all posts

Sunday, 24 February 2013

सांगत जाउ फुलाफुलाला


सांगत जाउ फुलाफुलाला...

काल अचानक स्वप्नी आला
चुंबीत वदला हळू गालाला
उठ प्रिये ही रात्रं नशिली
सांगत जाउ फुलाफुलाला

दचकून बाई मी गं उठले
पदराचे मग भान कुठले?
खुदकन का तो गाली हसला?
सांगत जाउ फुलाफुलाला

शरमेनी मी डोळे मिटले
शब्दावाचून ओठही हलले
सरकन काटा अंगी फुलला
सांगत जाउ फुलाफुलाला

घेउन मजला कवेत अलगद
कानी सांगे अपुले हितगुज
रागाचा तो बहर निवळला
सांगत जाउ फुलाफुलाला

हिरवाळीवरी मजे पहुडलो
लटके लटके उगा भांडलो
होता एकला चंद्र साक्षीला
सांगत जाउ फुलाफुलाला


--जयंत विद्वांस

उणे राहीले


उणे राहीले

डोळ्यात माझे प्रतिबिंब पाहता
स्मित तुझ्या गाली फुलले
हलके तुजला मिठीत घेता
लाजाळूचे पान मिटले

बोलायाचे किती होते
नजरेने ते सारे कळले
स्पर्श सगळं सांगत होता
शब्दाने जे उणे राहीले

वाट पहाणे अवघड होते
प्रचितीने मलाही कळले
अश्रू सगळं सांगत होता
स्पर्शाने जे उणे राहीले

विरहाने का प्रेम वाढते
वेलीला का झाड बिलगले
आवेग तुझा सांगत होता
अश्रूंनी जे उणे राहीले

--जयंत विद्वांस

वाट पहातो...


वाट पहातो...

डोहाच्या शांतकिनारी
आंब्याच्या झाडाखाली
रोज तुझी मी वाट पहातो

पाण्यामधे पाय सोडता
पाण्यावरी तरंग उठतो
बुडबुडा आशेचा फुटतो
रोज तुझी मी वाट पहातो

पक्ष्यांना मी साद घालतो
कोकिळेला सूर मागतो
आठवणींचे गीत गातो
रोज तुझी मी वाट पहातो

पश्चिमेला सूर्य कलतो
भावनांना बांध घालतो
तरी अश्रूंचा पूर येतो
रोज तुझी मी वाट पहातो

--जयंत विद्वांस


समजून घे रे


समजून घे रे

सांग कशी येऊ मी सोडून सारे
तुझ्यासाठी जीव तुटे, समजून घे रे

ध्यानीमनी एक तुझीच प्रतिमा
मी रोहिणी अन तू माझा चंद्रमा
प्रीत माझी सोन्याची परखून घे रे
तुझ्यासाठी जीव तुटे, समजून घे रे

तुझेच गीत सदा माझ्या अधरी
भोळी मी राधा अन तू सखा हरी
सुर तुझ्या पाव्याचे जुळवून घे रे
तुझ्यासाठी जीव तुटे, समजून घे रे

जमली तशी केली प्रीती तुजवरी
दुःखं तुला देऊ मी ही कुठवरी
मैफिल तुझी तू सजवून घे रे
तुझ्यासाठी जीव तुटे, समजून घे रे

जयंत विद्वांस

तुझ्याविना.....

तुझ्याविना.....

तुझ्याविना हे चंद्र चांदणे
काय मला उपयोग आहे
तुझ्याविना हा बहर फुलांचा
पानगळीच्या समान आहे

रुपे तुझी अनंत असती
फेर धरती माझ्या भवती
श्वास तुझा की वास फुलांचा
या इथे दरवळतो आहे

धुंद कामिनी, चपल दामिनी
रेघ ओढते निळ्या गगनी
स्वप्नं सारे वास्तव वाटे
तु माझिया मिठीत आहे

मखमालीवर हया पाचूच्या
रंग सांडला आहे उषेचा
चित्रं सारे सुंदर तरीही
तुझ्या विना ते अपूर्ण आहे

--जयंत विद्वांस