Thursday 24 November 2016

गॉड नोज...



मी आस्तिक आहे की नास्तिक, हे मला स्वतःला न सुटलेलं कोडं आहे. तसंही बरीच माणसं जशी संधी न मिळाल्यामुळे, धाडस नसल्यामुळे सज्जन, अभ्रष्ट असतात तशीच ती सोयीनुसार आस्तिक/ नास्तिकही असतात, अर्थात मी ही त्यापैकीच एक. पूजाअर्चा, रांगा लावून दर्शन, अमुक देणगीत तमुक पटीत काम होतं, उपवास वगैरे प्रकार मात्रं मला आवडत नाहीत. दिसलं देऊळ की लगेच माझा हात छातीपाशी जात नाही. मी देवळात क्वचित जातो. 'तो' आहे अशी चर्चा पुरातन कालापासून आहे पण 'तो' देवळातच आहे वगैरे प्रकार समाधानासाठी आहेत. 'त्या'च्याकडून कुठलाही प्रतिवाद शक्यं नसल्यामुळे त्याच्या नावावर अनंत गोष्टी खपवल्या जातात. 'तो' निराकार आहे असं म्हणतात पण माणसांनी त्याला रूप, रंग, चेहरा, आकार आणि धर्मसुद्धा दिला. तरीपण सगळ्या शक्यता संपतात तेंव्हा आपण 'दिवार'च्या अमिताभसारखं नाईलाजाने का होईना या अदृष्यं शक्तीच्या पायाशी जातोच. कुठेतरी असं काही घडून जातं की विश्वास ठेवावा लागतो. माणसाच्या रूपात तो मदतीचा हात देऊन जातो आणि तो माणूस नंतर सापडतच नाही तेंव्हा कोडं अजून वाढतं. 

सत्रह साल पहले की बात है! पूर्वसुकृत म्हणा किंवा या जन्मातलं पुण्यं कमी पडलं असेल म्हणून क्षमाला माझ्याशी लग्नं करावं लागलं यावर ती ठाम आहे. मोरावळा जुना होत जातो तसा तो अजून चविष्ट होत जातो, त्यातले आवळे करकरीत रहात नाहीत, अगदी मऊ पडतात. पण आता सतरा वर्ष होतील तरी तिच्या मतात फरक न पडता ते अजून दृढ होत चाललंय. चांगल्या बायकांच्या नशिबात असलेच ('असलेच' म्हणजे काय याची तिची व्याख्या सांगायला साधारण दोन पानं लागतील) नवरे असतात हे पटवायला तिला स्मिता पाटील (राज बब्बर), शिवानी कोल्हापुरे (शक्ती कपूर) आणि क्षमा जोशी (जयंत विद्वांस) ही तीन उदाहरणं पुरेशी आहेत. तर लग्नं झाल्यापासून सहा सात महिन्यानंतरची गोष्टं असेल, जेंव्हा मी बोलायचो आणि ती ऐकायची, तेंव्हाची. आता ड्युरासेल टाकल्यासारखी फक्तं ती बोलते (रेडिओ बंद तरी करता येतो बटणानी) आणि मी ऐकतो (याला बोलणी खाणं असं म्हणतात). 

तर ती डोंबिवलीहून पुण्याला येत होती. बरोबर लगेज काहीही नव्हतं. फक्तं पर्स. लोकलनी कल्याणला आली, उतरली तर समोर 'सिंहगड' उभी. तेंव्हा स्लिमट्रिम असल्यामुळे ती चपळाई करून लगेच चढली. गाडी हलली. 'जिंदगी के सफरमें गुजर जाते है जो मकाम' गाण्यात कल्याण सोडल्यावर 'दिवार'मधे शशी आणि अमिताभच्या वाटा जशा देवळापासून वेगळया होतात तसे ते कर्जत आणि कसा-याला जाणारे फाटे दिसतात, तिथे हिची 'सिंहगड' अल्झायमर झाल्यासारखी कर्जतच्या फाट्याला फाट्यावर मारून कसा-याकडे वळाली. मगाचच्या धावपळीत आलेला घाम तोवर पुसून झाला होता तो परत जमा व्हायला लागला. एकानी सायलेंट घाम काढला, 'बहेनजी, ये 'पंचवटी' है, गलती आपकी नही है, ये थोडी लेट है तो 'सिंहगड'की जगह ये लगाई थी, अनाउन्समेंट सुनी नही क्या आपने! और दोनोका कलर भी सेम है!' आता नाशिक किंवा आधी कुठे थांबेल तिथे जावं लागणार या कल्पनेनी हिला घाम फुटला. भैय्ये लोक होते गाडीत. ते म्हणाले जनरली कसा-याला सिग्नल नसतो, हळू होते गाडी, तुम्ही उतरा. खरंच गाडी कसा-याला स्लो झाली. हिला दोघातिघांनी प्लॅटफॉर्मला उतरवलं. ती चेह-यानी (फक्तं) अतिशय गरीब आहे. माझ्याकडे तिकीट नाही हे तिच्या तोंडावर स्क्रोल होत होतं. तिला टीसीने धरलं आणि इस्टोरी सांगूनही व्हीटीपासूनचा दंड घेतला. 

ठाण्याचा एक मुलगा हे सगळं ऐकत, बघत होता. त्यानी तिला धीर दिला, तिचं कल्याणचं तिकीट काढलं. कल्याणला उतरून पुण्याचं तिकीट काढून दिलं, तिला 'सह्याद्री'त बसवलं. तेंव्हा मोबाईल नव्हता. स्वतः:चं नाव आणि पत्ता लिहून दिला. माझा घरचा नंबर घेऊन गाडी सुटल्यावर काय झालंय ते त्यानी सविस्तर सांगितलं. उतरणार कुठे हे विचारायचं राहून गेलं, शिवाजीनगर की स्टेशन. साधारण दहाला 'सह्याद्री' पुण्याला येते. मी स्टेशनला गेलो आधीच. 'सह्याद्री' आली, प्लॅटफॉर्म रिकामा झाला तरी क्षमा नाही, मग शिवाजीनगरला गेलो तर तिथेही कुणी नाही, घरी फोन केला तर तिथेही नाही, परत स्टेशनला गेलो, तिथून फोन. मग रिक्षेनी गेली असेल असं गृहीत धरून घरी आलो, तरी नाही. दहाएक मिनिटांनी रिक्षा थांबल्याचा आवाज आला. सशाचा घाबरा चेहरा करून ती घरात आली आणि तिला रडू फुटलं. सगळी स्टोरी सकाळी सांग म्हटलं. मग सकाळी आम्ही 'बुगडी माझी सांडली गं' च्या चालीवर 'क्षमा आमची हरवली गं, जाता कसा-याला'च्या चालीवर सगळी स्टोरी ऐकली.  

घरी फोन करायला ती स्टेशनला थांबली. पीसीओवरून फोन करताना शेजारी ठेवलेली पर्स कुणीतरी आम्हांला नको असल्यासारखी उचलून नेली. आता घरी यायला रिक्षेला पैसे नाहीत. रिक्षा करून घरी आल्यावर द्यायचे एवढाच मार्ग. पण एक अपंग बाई आणि तिचा नवरा सिंहगड रोडला चालले होते, त्यांनी थोडी वाकडी वाट करून तिला घरापाशी सोडलं आणि एक रुपया न घेता, आभार मानायची संधी न देता ते निघून पण गेले. त्या मुलाचं नाव, पत्ता आणि फोन नं.ची चिट्ठी पर्समध्ये होती, ती पण गेली. आता तो तिला रस्त्यात दिसला तरी ती ओळखू शकणार नाही पण कुणीतरी अज्ञात सज्जन माणसानी केलेल्या मदतीचे आभार मानायचे राहून गेलं याची रुखरुख कायमची राहील. त्यानी काढून दिलेल्या तिकिटाचे पैसे तिनी तळ्यातल्या गणपतीला ठेवले. त्याचा प्रतिनिधी आला होता त्यामुळे ब्रँचऑफिसला जमा केले. आता या सगळ्यात देव कुठे आला असा प्रश्नं पडेलच पण माझं उत्तर त्या हुशार धर्मगुरूसारखंच आहे.   

एका धर्मगुरूला वाद घालण्यासाठी एकानी प्रश्नं विचारला, 'इज देअर गॉड?' त्यानी उत्तर दिलं पण आणि नाही पण, तो म्हणाला, 'गॉड नोज'. :)

जयंत विद्वांस 

(सदर पोस्ट टाकल्यानंतर पुढे आठवडाभर नविन पोस्ट न दिसल्यास मला काही नविन सुचलं नाहीये असा अर्थ काढावा. डोळ्यावरची सूज उतरली का? हाताला प्लास्टर अजून किती दिवस सांगितलंय? कामावर स्वतः गाडी चालवून जाऊ शकता का? वगैरे प्रश्नं विचारून वुंडवर सॉल्ट रबू नये,)

No comments:

Post a Comment