Thursday 24 November 2016

इम्मॉर्टल…


एकोणतीस वर्ष झाली त्याला जाऊन आज. जिवंत असता तर सत्त्याऐंशी वर्षाचा असता तो. ह्रषिकेश मुखर्जी त्याला आणि मेहमूदला घेऊन 'आनंद' काढणार होते. त्याच्या आवाजात 'आनंद'ची गाणी कशी वाटली असती? सुंदरच वाटली असती पण तुमचं ते 'कही दूर जब' मुकेशच्या आवाजात चांगलं आहे असं म्हणावं तर त्यापेक्षा मूळ चाल हेमंतकुमारच्या आवाजातलं 'अमॉय प्रोश्नो करे निल ध्रुवो तारा' जास्ती सरस आहे असं वाटतं. तुलनेला अंत नसतो. पण त्याच्या आवाजात हळवी गाणी जास्ती सुंदर आहेत. अत्यंत प्रतिभावान, विक्षिप्त माणूस. एखादा माणूस का आवडतो याचं नेमकं स्पष्टीकरण देता येत नाही. जे उमगतात ते मन व्यापत नसावेत. त्याची नक्कल करणारे अनेक आले, येतील. पण काही नेमके हळवे शब्दोच्चार (त्याचा 'ह' दुसरा कुणी म्हणत नाही तसा), स्याड व्हर्जन त्याच्या आवाजातच ऐकावीत.

कधी 'फंटूश' मधलं 'दुखी मन मेरे' ऐका कान देऊन. 'पत्थर के दिल मोम न होंगे' ओळ ऐका, 'होंगे'चा 'ह' स्वरयंत्रातून आलेला नाही, हृदयातून आलाय. 'दोस्त' मधलं 'गाडी बुला रही है' ऐकाल. त्यातल्या त्या दोन संथ ओळी अशाच हृदयातून आल्यात. 'आत है लोग, जाते है लोग, पानीके जैसे रेले, जानेके बाद, आते है याद, गुजरे हुए वो मेले' मधला 'गुजरे' ऐका. 'ये क्या हुआ, कब हुआ' चा हसत रडवेला म्हटलेला 'हुआ' ऐका. 'मुकद्दर का सिकंदर'मधे 'रोते हुए, आते है सब' त्याच्या आवाजात येणारच होतं त्यामुळे शेवटी विनोद खन्नाला रफी आला पण मला कायम वाटत आलंय ते त्याच्या आवाजातच पाहिजे होतं. 'शोले' मधे आर.डी.ने तो लफडा ठेवलाच नाही, 'ये दोस्ती' ला बच्चनला मन्ना डे घेतल्यावर आपसूक धर्मेंद्रला तो आला. इतक्यांदा बघूनसुद्धा 'साथी तू बदल गया' ऐकताना काहीतरी होतंच. 'शराबी'तलं 'इंतहा हो गई इंतजारकी' ऐकताना पण असा वेगळाच आवाज कानाला मोहून टाकतो. विनोदी ते गंभीर अशी टोकांची गाणी त्यानीच गावीत.     
    
त्या 'कोई होता जिसको अपना'ला, 'तेरी दुनियासे होके मजबूर चला'ला, 'मेरे मेहबूब कयामत होगी'ला, 'अगर सुन ले तो इक नगमा'ला, 'कोई लौटा दे मेरे बिते हुए दिन'ला, 'ओ साथी रे'ला, 'मै शायर बदनाम'ला, 'चिंगारी कोई भडके'ला, 'वो शाम कुछ अजीब थी'ला, 'तुम आ गये हो'ला, 'मेरी प्यारी बहनिया'ला, 'तेरे बिना जिंदगीसे'ला, 'अपने प्यारके सपने सच हुए'ला,  'सफर'चं 'जीवनसे भरी'ला, 'आप की कसम'चं 'जिंदगी के सफर में'ला त्याचा आवाज वेगळा आहे. काय साला पोटातून गायलाय तो. उमाळा आतून यायला लागतो तसा हा आवाज पण आतून येतो. फॉस्फरस जसा पाण्यात ठेवतात तसा हा राखलेला आवाज, पोटात दडलेला. 'माना जनाब ने', 'अरे यार मेरी', 'छोड दो आंचल', चुडी नही ये मेरा', 'चल चल चल मेरे साथी', 'एक लडकी भिगीभागीसी', 'जानेजा, धुंडता फिर रहा', 'तू तू है वही' चा आवाज वेगळा आहे. 'मेरी प्यारी बिंदू', 'ओ मन्नू तेरा हुआ', 'मेरे सामनेवाले खिडकीमें', 'चिलचिल चिल्लाके', 'एक चतुर नार', 'देखा ना हाय रे', 'बचना ऐ हसीनो' चा आवाज वेगळा आहे. 

'जंगल में मंगल'चं 'तुम कितनी खूबसूरत हॊ', 'रात कली', 'सवेरा का सूरज', भारत भूषणचं 'तुम बिन जाऊ कहा', अमेरिकेला जायचं असल्यामुळे बच्चनची एकंच ओळ आधी गाऊन गेलेलं 'परदा है परदा', 'खिलते हैं गुल यहा', 'प्यार दिवाना होता है', 'ये शाम' कशात टाकायची? लताला वेळ नव्हता, रेकॉर्डिंग तर उरकायचंय म्हणून दोन्ही आवाजात गायलेलं 'हाफ टिकिट'मधलं 'आ के सिधी लगी दिलपे' सारखी धमाल परत होणार नाही. गाण्यांची यादी किती देणार. वारूळ फुटल्यासारखं होतं, रांग थांबतंच नाही. मराठीत पुलं आणि हिंदीत हा. यांच्यात मला कायम साम्यं वाटत आलंय. गीतलेखन, अभिनय, संगीतदिग्दर्शन, गायन, लेखन, चित्रपट दिग्दर्शन आणि सोड्याच्या बाटलीसारखा बाहेर येणारा निर्विष, उच्च दर्जाचा कारुण्याची झालर लावून आलेला, टचकन डोळ्यात पाणी आणणारा, सहज, आटापिटा न केलेला विनोद. त्याच्या हस-या मुखवटयामागे दडलेला खरा चेहरा पाह्यचा असेल तर 'दूर गगन की छांवमें' बघा. त्याच्या धीरगंभीर आवाजातलं 'आ चल के तुझे' कधीही ऐका, श्रवणीयच.

त्याच्या विक्षिप्तपणाचे किस्से त्याच्या गाण्यांएवढेच प्रसिद्ध आहेत. योगीताबालीशी लग्नं केलं म्हणून त्यानी काही काळ मिथूनसाठी आवाज देणं बंद केलं होतं. 'लव्ह स्टोरी' साठी कुमार गौरवचा आवाज तो देणार होता. कबूल करूनही रेकॉर्डींगला तो गेलाच नाही, माणूस घ्यायला आला तर त्यानी दरवाजाच उघडला नाही शेवटी आर.डी.नी अमितकुमारला घेऊन काम केलं, याचा हेतू साध्यं झाला. फिल्म इंडस्ट्रीमध्ये प्रत्येकजण प्रयत्नं करतोच आपल्या मुलांना पुढे आणायला, ह्याचा खाक्या वेगळाच. अनेक हिरोंची चलती याच्या आवाजामुळे झाली. आराधना हिट नसता झाला तर हा गायन बंद करणार होता. पण सगळी गाणी हिट झाली मग त्याने मागे वळून पाहिलंच नाही कधी. रफी, मुकेश, मन्नादा सगळे मागे पडले. यॉडलींगचा आठवा सूर होताच.

कुणीतरी त्याला श्रद्धांजली म्हणून सैगलची गाणी गाण्याचा आग्रह केला होता. काय सुरेख बोलून गेलाय तो. 'मी म्हणणार नाही, मी भिकार म्हटलीयेत असं कुणी म्हणालं तर मला वाईट वाटणार नाही पण मी त्याच्यापेक्षा चांगली म्हटली असं कुणी म्हणालं तर मला वाईट वाटेल'. आदर पाया पडलो म्हणजेच असतो असं नाही, कृतीतून दिसतो तो ही आदरच असतो. पैसे मिळाल्याशिवाय रेकॉर्डिंग न करणा-या या माणसाने राजेश खन्नानी काढलेल्या 'अलग अलग' साठी एक रुपयाही घेतला नव्हता. विक्षिप्तपणा सुद्धा ओरिजिनल हवा, तो मग हवाहवासा वाटतो. आमची ही अनंत कारणांनी काजळली गेलेली चिमूटभर आयुष्यं तू किती सुखाची करून गेलास याची तुला कल्पना नाही. अजूनही तो सतत वाजता आहे. 

सत्तेचाळीस गेलेला सैगल अजून ऐकतो मी, तुला जाऊन एकोणतीस वर्ष झालीत फक्तं. मी मरेपर्यंत तू सोबत असशील. शेवटी तूच लिहिलेल्या, संगीत दिलेल्या, गायलेल्या, अभिनीत केलेल्या वर्णनाच्या ठिकाणीच जाणार, मी काय किंवा अजून दुसरा कुणी काय :

'आ चल के तुझे,, मै लेके चलू एक ऐसे गगन के तले 
जहां गम भी न हो, आंसू भी न हो, बस प्यार ही प्यार पले'


आहे का रे खरंच असं सगळं तिथे? तरच मजा आहे तिथे येण्यात, नाहीतर मग मेलो काय आणि जगलो काय, फरक शून्यं.

जयंत विद्वांस 

No comments:

Post a Comment